Kishor Magazine Balbharti September 1976

25

Kishor Magazine Balbharti Download

किशोर मासिक बालभारती डाउनलोड

Kishor Magazine
Kishor Magazine
KISHOR MAGAZINE | किशोर मासिक

September 1976

Download Now

(Note : This file is not uploaded to this site, We are only providing download link to the original website. If you have trouble downloading the file, please try again later.)

About Kishor Magazine
किशोर मासिक विषयी विस्तृत माहिती

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे.

किशोर मासिक त्या काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. पूरक वाचनासाठी पुस्तकं प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणं शक्य होतं. त्यातून Kishor Magazine ‘किशोर’ची निर्मिती झाली.

नोव्हेंबर १९७१ मध्ये पंडित नेहरूंच्या जन्मदिनी ‘किशोर’चा पहिला अंक प्रकाशित झाला. मुखपृष्ठावरचं नेहरूंचं चित्र काढलं होतं प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी. “तुमच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काही अद्भूतरम्य विलक्षण असे पहावे, ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. या तुमच्या सर्वांगाने, सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हांला काही मदत करता आल्यास ती करण्याचा ‘किशोर’चा विचार आहे,” असं तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटलं होतं. पहिल्या अंकाच्या प्रती शाळांमध्ये मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी-शिक्षकांची प्रतिक्रिया अजमावण्यात आली. ‘किशोर’ची नियमित छपाई जानेवारी १९७२ पासून सुरू झाली. पहिल्यांदा दहा हजार प्रती छापण्यात आल्या. सहा महिन्यांनंतर ‘किशोर’ची विक्री दरमहा २५ ते ३० हजार प्रती आणि दिवाळी अंकाची विक्री ३५ ते ४० हजार प्रतींपर्यंत गेली. आता दरमहा सरासरी ६५ हजार प्रती वितरित होतात.

‘किशोर’ला कलात्मक मांडणी आणि आशय संपन्नतेचं अधिष्ठान दिलं ते पहिले कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकरांनी. ‘किशोर’नं कटाक्षानं काही पथ्यं पाळली. विद्यार्थी वाचकांमध्ये सम्यक, विवेकी, तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ विचार-दृष्टिकोन रुजावा; त्यांच्या मनात धार्मिक, जातीय, आर्थिक, लैंगिक भेदाभेदाच्या विचारांचा प्रभाव पडू नये, यासाठी काळजी घेण्याचं धोरण ‘किशोर’नं स्वीकारलं. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारं, जुन्या रूढी परंपरा, कर्मकांडांना प्रोत्साहन देणारं लिखाण मासिकात नसेल असं पथ्यही मंडळानं घालून घेतलं. विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल, सामाजिक इतिहास यासारख्या विषयांना विशिष्ट पानं राखीव ठेवण्यात आली. या विषयावरचं लेखन सोपं-सुटसुटीत असेल याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी होमी भाभा सायन्स एज्युकेशन सेंटरची मदत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारं ‘शंका-समाधान’ हे सदर, शिरवाडकर यांची ‘असे हे विलक्षण जग!’ ही लेखमाला खूप गाजली. गोष्टी, कवितांसोबत रंगीत चित्रं, रेखाटनं वापरण्याची प्रथा ‘किशोर’नं पहिल्या अंकापासून पाडली.

श्री. वसंत शिरवाडकरांनंतर हरहुन्नरी लेखक वसंत सबनीस आणि त्यानंतर ज्ञानदा नाईक या कार्यकारी संपादकांनी ‘किशोर’ची ध्वजा आणखी उंचावली. या तिघांचाही मराठी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी गाढा संपर्क. त्यामुळे उत्तमोत्तम कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णनं, स्थलचित्रं, व्यक्तिचित्रं यांनी ‘किशोर’चे अंक समृद्ध झाले. सोबत विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध, पर्यावरण, प्रदूषण आदी विषय ‘किशोर’नं मुलांच्या भाषेत मांडले. मराठीतल्या बहुतांश लेखक-कवींनी किशोरसाठी लेखन केलं आहे. अनेक प्रतिभावान चित्रकारांनी मासिकाला सजवलं. त्याचं श्रेय या तीनही कार्यकारी संपादकांचं. ‘किशोर’चे आताचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनीही नवीन सदरं आणि रंजक उपक्रमांची ही परंपरा कायम राखली आहे.

किशोरनं दिग्गज चित्रकारांकडून चित्रं काढून घेतली तसंच सामाजिक भान ठेवून कला महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांनाही संधी दिली. त्यामुळे ‘किशोर’मधील चित्रं ताजीतवानी राहिली. तरुण कलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या वेगवेगळ्या शैलीतल्या चित्रांनी मुखपृष्ठं सजली.

‘किशोर’ला देखणं करण्यात संपादक-चित्रकारांइतकाच निर्मिती विभागाचाही वाटा आहे. १९८४ च्या दिवाळी अंकाला शांताराम पवार यांनी फुलपाखरं, मुलं आणि फुलांचं प्रतिकात्मक चित्र केलं होतं. या मुखपृष्ठाला मोठा अवकाश हवा होता. तेव्हाचे नियंत्रक शं. वा. वेलणकर यांनी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाला दुमडता येईल असं एकेक पान जोडून भव्य कव्हर केलं. या अंकासाठी गंगाधर गाडगीळ, शंकरराव खरात, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, अरुण साधू, राजा मंगळवेढेकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, वा. रा. कांत, संजीवनी मराठे, मंगेश पाडगावकर, शान्ता शेळके, शंकर वैद्य अशा मातब्बर लेखक-कवींनी लिहिलं होतं. याच वर्षी उन्हाळी सुट्टीचा विशेषांक काढण्यास सुरूवात झाली. नंतर नाट्य, लोककथा, स्वातंत्र्य, कारगिल युद्ध, स्वच्छता अशा वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढण्याची प्रथा ‘किशोर’नं सुरू केली.

‘किशोर’साठी दुर्गा भागवत, पंढरीनाथ रेगे, ग. दि. माडगूळकर, वसंत सबनीस, ज्योत्सना देवधर, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, श्रीपाद जोशी, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, सरिता पदकी, महावीर जोंधळे यांनीही लेखन केलं. राजन खान, प्रवीण दवणे, राजीव तांबे, संजय भास्कर जोशी, अरुण म्हात्रे, दासू वैद्य या आताच्या लेखकांपर्यंत हा प्रवास सुरू आहे. अन्यत्र प्रसिद्ध झालेलं साहित्य न स्वीकारण्याच्या भूमिकेमुळं मुलांना नेहमी कोरं-करकरीत वाचायला मिळालं. चित्रकार मुरलीधर आचरेकर, राम वाईरकर, प्रभाशंकर कवडी, पद्मा सहस्रबुद्धे, श्रीधर फडणीस, मारिओ मिरांडा, अनंत सालकर, रवी परांजपे, शांताराम पवार, अनंत कुलकर्णी, श्याम फडके, मुकुंद तळवलकर, अरुण कालवणकर, भालचंद्र मोहनकर, रेश्मा बर्वे, घनश्याम देशमुख, प्रभाकर काटे, रमेश मुधोळकर आदींनी रंगवलेल्या जादुई दुनियेत मुलं हरवून गेली. ‘माझे बालपण’, ‘सुटीचे दिवस’, ‘माझा गाव’, ‘चित्रकथा’, ‘फास्टर फेणे’, देशोदेशींच्या कथा मुलांपर्यंत पोचवणारं ‘देशांतर’ ही या मासिकातली काही गाजलेली सदरं. ‘माझे बालपण’ या सदरात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, विजय तेंडुलकर, सुनील गावसकर, जयंत नारळीकर ते नव्या पिढीचे सचिन तेंडुलकर, अमृता सुभाष यांनी लेखन केलं.

‘किशोर’ वाचकाभिमुख व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. मुलांना गोष्टी, चित्रं, कोडी, विनोद असं हलकंफुलकं, चटपटीत वाचन हवं असतं. त्यानुसार बदल करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी साहित्याचा आणि चित्रांचा विभाग सुरू केला. विद्यार्थ्यांमधून लेखक घडावेत म्हणून ‘किशोर’नं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, वाड्यावस्त्यांवर, साखर शाळांमध्ये, दगडखाण कामगारांच्या मुलांच्या शाळांमध्ये, आदिवासी पाड्यांत लेखन कार्यशाळा घेतल्या. कविता, कथा, लेख कसे लिहावेत याचं मार्गदर्शन वसंत बापट, यदुनाथ थत्ते, महावीर जोंधळे, माधव वझे, अनिल तांबे, बाळ सोनटक्के, विजया वाड, प्रवीण दवणे आदींनी केलं. सर्वोत्तम ते देण्याची धडपड मासिकात प्रतिबिंबित होत असल्यानं ‘किशोर’ विविध व्यासपीठांवर नावाजला गेला. तीन अंकांना राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संघाची बक्षीसं मिळाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्च १९७३ आणि नोव्हेंबर १९७६ च्या अंकांना छपाई आणि सजावटीसाठी अनुक्रमे श्रेष्ठता प्रमाणपत्र आणि प्रथम पुरस्कार देऊन गौरवलं. ही परंपरा आजतागायत कायम आहे. मागील २०१६ दिवाळी अंकालाही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जानकीबाई केळकर उत्कृष्ट बाल वाड्मयाचे पारितोषिक मिळाले. आजपर्यंत मासिकाला वेगवेगळी ४५ पारितोषिकं मिळाली आहेत.

‘किशोर’चं वितरण ‘बालभारती’चं करते. शाळा आणि देणगीदारांना पोस्टामार्फत सवलतीच्या दरात अंक वितरित केला जातो. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यापासून ‘किशोर’मध्ये चार इंग्रजी पानं देण्यात येतात.

निवडक किशोर

मराठी साहित्यातल्या मातब्बर लेखक-कवींनी ‘किशोर’साठी लिहिलं. ‘किशोर’चा दिवाळी अंक तर मुलांसाठी खजिनाच. ही कलात्मक, साहित्यिक श्रीमंती जतन व्हावी, पुढील पिढ्यांपर्यंत पोचावी, म्हणून ‘बालभारती’नं ‘निवडक किशोर’चा उपक्रम हाती घेतला. निवडक कथा, कविता, कादंबरिका, दीर्घ कथा, गंमतगाणी, ललित, छंद, चरित्र आदी चौदा खंड प्रकाशित झाले. शांता शेळके आणि नंतर महावीर जोंधळे संपादन समितीचे अध्यक्ष होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here