सन १८५७ च्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातली घटना आहे ही त्या वेळी दिल्ली स्वतंत्र झाली होती. बादशहा बहादुरशहा जफर दिल्लीच्चा तख्यावर बसून आपल्या सल्लागारांच्या साह्याने दिल्लीचा कारभार पाहात होता. देशातील इंग्रजांच्या छावण्यातील देशी सैन्य इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून उठले होते. देशातली जनताही त्या सैन्याला साथ देत होती. त्या जनआंदोलनाने इंग्रजांची त्रेधा तिरपीट उडाली होती. दिल्लीच्या सभोवतालच्या गावातील जनता तर त्या आंदोलनात अहमहमिकेने भाग घेत होती. आपल्या जवळ असलेल्या परंपरागत शस्त्रांनी लढत होती.
__ दिल्लीजवळच ग्रँडट्रंक रोडवर अलीपूर नावाचे एक गाव आहे. या गावातील स्वातंत्र्यप्रिय तरुणांनी तहसील कार्यालयात शिरून त्यातली सारी कागदपत्रे जाळून टाकली. इंग्रज सरकारला साथ देणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने लुटून जाळून टाकली. त्यांनी कित्येक इंग्रजांनाही ठार केले. त्यांचा नेता होता तरुण हंसराम. शरीराने एकदम तंदुरुस्त. दिसायला सुंदर व राजबिंडा असलेल्या हंसरामचे व्यक्तित्व अतिशय आकर्षक होते.
अलीपूरमधले हे आंदोलन नष्ट करण्यासाठी एकाक्ष मेटकाफ आपले इंग्रज सैन्य घेऊन अलीपूरला आला. त्याचा एक डोळा निकामी असल्याने सारेच त्याला ‘कानासाहब’ म्हणत असत. अलीपूरला आल्यावर त्याने गावाबाहेर असलेल्या दोन कदंबवृक्षाखाली आपला तळ दिला व अलीपूर गावाभोवती सैन्याचा वेढा दिला. गावाच्या प्रमुख रस्त्यावर तोफा लावून दिल्या. गावातून कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही. नंतर त्याने अलीपूरमधील ७५ तरुणांना अटक केली. त्यांत हंसरामही होताच. हंसरामचे व्यक्तित्व एवढे प्रभावशाली होते की, त्याला कैद करणाऱ्या अधिकाऱ्यालाही त्याचे प्राण वाचवेसे वाटले व त्याने हंसरामला पळून जाण्याचा सल्ला दिला.
आपले सर्व सहकारी इंग्रजांनी कैद केले असता, आपण एकट्यानेच आपली सुटका करून घेणे हंसरामला प्रशस्त वाटले नाही. त्याने प्रतिज्ञाच केली होती की, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगू किंवा मरु.’ त्या मर्दाने त्या अधिकाऱ्याला बाणेदारपणे उत्तर दिले, मी तर माझ्या साथीदारांबरोबर रहायाचे ठरविले आहे. ते जेथे जातील, तेथेच मी सुद्धा जाईन. आम्ही सर्वांनी तर आमच्या मातृभूमीच्या गळ्यातील इंग्रजांच्या गुलामीचा पट्टा तोडून टाकण्याची शपथ घेतली आहे.मी कोणाच्याही दयेचा इच्छुक नाही. आपल्याध्येयाच्या प्राप्तीसाठी जर मरण आले, तर त्यांच्याबरोबर आपल्या नश्वर देहाचा त्याग करणे हाच माझा धर्म आहे. त्याचे हे उत्तर ऐकून तो इंग्रज अधिकारी चकित झाला. हंसराज बद्दल त्याला आदर वाटू लागला. आता तर त्याचा नाईलाज होता. शेवटी त्या कैद केलेल्या सर्व ७५ तरुणांना दिल्लीच्या किल्ल्यात आणले.
[irp]
___हंसराजच्या प्रभावी व्यतिमत्वाने लाल किल्ल्यातील इंग्रज अधिकारी व त्यांच्या हाताखालचे कर्मचारीही भारावून गेले. त्याची सुंदर व बलवान काया आणि आकर्षक व्यक्तित्व पाहून त्या इंग्रज अधिकाऱ्यांने हंसरामला सुचविले की, तू गवताचे भारे वाहणाऱ्या मजुराच्या वेषात किल्ल्यातून निघून जा.’
परंतु दृढनिश्चयी हंसराम त्या अधिकाऱ्याला म्हणाला, ‘मला कोणाच्याही दयेची भीक नको आहे. जर माझ्या देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करणे हे पाप व गुन्हा असेल, तर मी ते पाप व गुन्हा केलेला आहे आणि त्यासाठी मी माझ्या प्राणांचे बलिदान करण्यास तयार आहे. हंसरामचे हे उत्तर एकून तो इंग्रज अधिकारी नतमस्तक झाला.या देशात असे बाणेदार वीर आहेत, हे पाहून त्याला वाटले असावे की, हा देश केव्हा ना केव्हा स्वतंत्र होईलच.
आपल्या साथीदाराबरोबर हंसराम प्रसन्न वदनाने फांसावर चढला, तेव्हा त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्याला निश्चितच मनोमन प्रणाम केला असेल.
[irp]
संदर्भ :
महान भारतीय क्रांतिकारक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ |
![]() |