Home Study Material सुई मुण्डा

सुई मुण्डा

बादशहा शाहआलम कडून बक्सरच्या युद्धानंतर इंग्रजांना बिहार, बंगाल व ओरिसा प्रांतांचे दीवाणी हक्क मिळाले व त्यांनी या प्रांतांतून मोगलांच्या पेक्षा दुप्पट सारा वसुली सुरू केली. तेवढ्याने इंग्रजांचे समाधान होईना, म्हणून त्यांनी बिहारच्या दक्षिण भागातील डोंगराळ व घनदाट अरण्यांत राहणाऱ्या आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेऊन जास्तीत जास्त सारावसुली करून देणाऱ्या या प्रदेशाबाहेरच्या मुसलमान ठेकेदारांकडे या जमिनी सोपविल्या व हे ठेकेदार त्या आदिवासींकडून इंग्रजांना अपेक्षित असणाऱ्या साऱ्यापेक्षाही जास्त सारावसुली जोरजबरदस्तीने सुरु केली. त्याबरोबरच ते या आदिवासी स्त्री, पुरुषांवर अत्याचारी करु लागले. त्यामुळे हे आदिवासी चिडले व त्यांनी संगठित होऊन या ठेकेदारांना आपलया प्रदेशातून घालवून देण्याचा निर्धार केला. ‘हो’, लरका हो’, ‘कोल’, ‘मुंडा’ आदि या आदिवासी जमाती होत.
कुमांग गांवात मोहमद अली हा ठेकेदार राहात होता. तो भयंकर अत्याचारी होता. ११ डिसेंबर १८३१ रोजी ‘लरका हो’ जमातीच्या आदिवासींनी एकत्र येऊन मोहम्मद अलीची २०० गुरे पळवून नेली. म्हणून मोहमद अलीने इंग्रज सरकारकडे याविषयी तक्रार नोंदविली. नंतर १० दिवसांनीच ७०० आदिवासींनी २० डिसेंबर १८३१ रोजी दुसऱ्या चार गांवावर हल्ले करुन तेथल्या जमीनदार ठेकेदारांचे महाल लुटून जमीनदोस्त करुन टाकले. छोटा नागपूर व जंगल महालाचा हा प्रदेश होता. हे ठेकेदार सारावसुली शिवाय इतरही जाचक कर आदिवासी लोकांकडून जबरदस्तीने वसूल करायचे. ते इंग्रज सरकारचे त्या प्रदेशातील आधारस्तंभ होते.

या आदिवासींचा नेता होता एक ग्राम प्रमुख सुई मुण्डा. त्यानेच सर्व आदिवासींना या ठेकेदारांविरुद्ध व इंग्रज सरकारविरुद्ध लढा देण्यास उद्युक्त केले होते. २५ डिसेंबर १८३१ रोजी ३०० आदिवासींनी गासू या गावचा जमीनदार काले खाँ आणि रांचीचा जमीनदार सैफुल्लाह यांच्या महालावर हल्ले करुन ते लुटल्यावर जाळून टाकले. या हल्ल्यात काले खाँ ठार झाला. पण सैफुल्लाह जीव घेऊन पळून गेला.
सन १८३३ च्या आरंभीच एक हजार आदिवासींनी संघठित होऊन कुमांग व कोरुबुरु गावांच्या जमीनदारांवर हल्ला करुन त्यांचे महाल जाळून टाकले. गांगिरा येथला जमीनदार याजर अली हा भयंकर अत्याचारी होता. त्याने कोल जमातीच्या एका महिलेला जबरदस्तीने आपली रखेल बनविली होते. आदिवासींच्या या जमावाने गांगिरा गांवावर हल्ला करुन जमीनदार याजर अलीला ठार केले. या क्रातिवीरांनी प्रतिज्ञाच केली होती की, सोनपूर परगण्यातील सर्व जमीनदारांचा नाश करायचाच. १५ जानेवारी १८३२ च्या आसपास आदिवासींची शक्ती वाढली. चार हजार आदिवासींनी गोविंदपुरवर एकदम हल्ला केला. तेथला जमीनदार आपल्या परिवारासह निसटून पळून गेला. सगळा बेलकुदा परगणा आता आदिवासींच्या ताब्यात आला होता.

[irp]

एक परगणा आदिवासींनी जिंकला. मूळात तो त्यांचाच होता. पण इंग्रज सरकार भयंकर खवळले. पाटण्याचा आयुक्त लॅम्बर्टच्या आदेशानुसार कॅ. कुथबर्ट आपल्या पलटणीसह रायगडला व हजारीबागला गेला. आदिवासींनी सोनपूर परगण्यातील बहुतेक ठाणी जाळून खाक केली होती. २६ जानेवारी १८३२ पर्यंत आदिवासींनी छोटा नागपूरमधील पालकोटच्या दक्षिणेकडचा थोडा भाग सोडून सगळा छोटा नागपूर परगणा आपल्या ताब्यात घेतला होता. या ‘हो’ आदिवासींच्या अंत: करणात स्वातंत्र्याची ज्योत प्रखर झाली होती आणि इंग्रज सरकारचे सैन्य ती ज्योत विझवून टाकण्यात असफल झाले होते.

सेनापती कॅ. विलकिन्सनच्या मागणीप्रमाणे इंग्रज सरकारने कलकत्त्याहून व पाटण्याहून अधिक सैन्य छोटा नागपूर परगण्यात तात्काळ पाठविले. एवढी फौज जवळ आल्यावरही आदिवासींचे हल्ले चालूच होते. कर्जन बोवेनच्या सैनिक आदिवासींची गावेच्या गावे जाळीत व हातात सापडलेल्या आदिवासींना ठार करीत पुढे सरकत होते. आदिवासींची गुरे कापून खात होते. तरीही या बहादुर आदिवासी क्रांतिकारकांनी आत्मसमर्पण न करता डोंगरांचा व जंगलांचा आश्रय घेतला.

[irp]

कॅ. माल्टवी ने २० मार्च १८३२ रोजी राणा दिसगावावर हल्ला करुन त्या गावातील सारे धान्य नष्ट करुन टाकले. त्याने डोंगरात व जंगलात गेलेल्या आदिवासींना रसद पुरविण्याचे सर्व मार्ग रोखून धरले. त्यामुळे अन्नावाचून त्या आदिवासींचे हाल होऊ लागले. त्यांच्या बायकांना व मुलींना पकडून नेऊन त्यांच्यावर अत्याचार चालू ठेवले.

इंग्रज सरकारच्या सैन्याजवळ तोफा-बंदुकीसारखी आधुनिक हत्यारे होती; तर आदिवासींच्या जवळ परशु (कुहाडी) व धनुष्यबाण यांसारखी परंपरागत हत्यारे होती. त्यांची बरोबरी कशी होणार? तरीही या संघटीत आदिवासींनी प्रशिक्षित सैन्याला लोखंडाचे चणे खायला भाग पाडले होते. पार जेरीस आणले होते. या क्रांतिकारी आदिवासी जमेची व महत्त्वाची बाजू एवढीच होती की, ते आपल्याच धरतीवर लढत होते व त्या धरतीची त्यांना खडा न खडा माहिती होती. त्यामुळेच ते अखेरपर्यंत लढत होते. शेवटी इंग्रज सरकारला त्यांच्या पुढे झुकावेच लागले व आदिवासी – विरोधी नीती बदलावी लागली. हा सुई मुण्डाचा व त्याच्या जातीच्या क्रांतिवीरांचा बहुमोल विजय होता.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!