Home Study Material शेख भिखारी

शेख भिखारी

छोटा नागपूरमधील ओरमांझी खटंगाचे राजा उमरावसिंह यांचे दिवाण शेख भिखारी यांची बहादुरी शौर्य व कुशल प्रशासनाची क्षमता पाहून उमरावसिंहाने त्यांना दिवाणपदावर नेमले होते. तसेच आपल्या राज्याचे खजिनदार म्हणूनही त्यांना नियुक्त केले होते. शेख भिखारीचा जन्म छोटा नागपूरमधील ओरमांझी गावापासून ६ मैलावरील अनगडा ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खुदिया-लोटवा या गावी झाला होता. शेख भिखारीचे पूर्वज शेख बुलंदू यांचे शौर्य व धाडस पाहून औरागडच्या राणीने त्यांची नेमणूक रामगड-सिकदरी घाटीच्या रक्षणासाठी काही शिपाई त्यांच्या मदतीला देऊन केली होती. त्याबद्दल राणीने शेख बुलंदू यांना खुदिया-लोटवा गावाची जमीनदारी व आसपासची बारा गावे इनाम म्हणून दिली होती. ही जमीनदारी व इनामाची गावे पूर्व परंपरागत शेख भिखारीकडे आलेली होती. ते स्वातंत्र्य प्रिय आणि अत्यंत अभिमानी होते. तसेच नम्रही होते.

दिल्लीला १८५७ मध्ये स्वातंत्र्य युद्ध सुरू झाल्याच्या बातम्या छोटा नागपूर भागात आल्या तेव्हा ३१ जुलै १८५७ रोजी जमादार माधवसिंह आणि सुभेदार नादिर अली यांच्या नेतृत्त्वाखाली चुटूपलू घाटीत त्यांनी स्वातंत्र्य युद्धाचा बिगुल वाजविला. चुटूपालू घाटी राजा उमरावसिंह यांच्या राज्यातच होती. शेख भिखारीने विद्रोही नेता माधवसिंह आणि नादिर अलीला हर प्रकारे सहायता देण्याचे वचन दिले व हत्ती, घोडे, हमालही त्यांना पुरविले. चुटूपालू घाटीचा व चारू घाटीचा मार्ग त्यांनी इंग्रज सैन्य येऊ नये म्हणून खोदून काढून नष्ट करून टाकला. विद्रोही सैनिकांनी दोन तोफा घेऊन रांचीकडे कूच केले आणि २ ऑगस्ट १८५७ रोजी रांची शहर आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा रांचीहून छोटा नागपूरचा कमिशनर जल्टन, कलेक्टर डेव्हीस, जज्ज ओक्स आणि पोलिस प्रमुख बर्च पिठौरिया मार्गाने पळून गेले.

डोरंडाच्या देशी सेनेचे प्रमुख गणपत राय व बडकागडचे राजा विश्वनाथ शाह यांच्यात दिल्लीला जाण्यासंबंधाने मतभेद निर्माण झाला. इंग्रजांना साह्य करणारी शीख सेना २ सप्टेंबरपासून हजारीबाग येथे पडाव टाकून थांबली होती. विद्रोही सैनिकांनी विश्वनाथ शाहदेव याला छोटा नागपूरचा सुभेदार बनविले होते. विश्वनाथ शाहदेवचे पत्र घेऊन शेख भिखारी गुप्तपणे शीख सेनेचा मेजर बिनशसिंह याला भेटला आणि त्याने बिशनसिंहाला छोटा नागपूरच्या स्वतंत्र सरकारला साह्य देण्यासाठी राजी केली. शेख भिखारीने त्याला आश्वासन दिले की, छोटा नापूरचे स्वतंत्र सरकार शीख सैनिकांनाउच्च पदे देऊन त्यांचा सन्मान करील. बिशनसिंहाने आपल्या शीख सैनिकांना सांगितले. ‘पंजाबमध्ये पुन्हा खालासा राज्य स्थापन झाले आहे. आता इंग्रजांच्यावतीने लढणे मूर्खपणाचे आहे. सर्व भागांतून इंग्रजांचा पराभव होतो आहे. छोटा नागपूरच्या स्वतंत्र्य सरकारकडून आपणास चांगले वेतन मिळेल.’ त्या काळात मेजर डाल्टन रांचीवर हल्ला करण्याची तयारी करीत होता. शीख सैन्य मात्र रांचीला जाऊ शकले नाही.

विद्रोही सैनिकांनी रांचीचा तुरूंग फोडून ३०० संथाल बंडखोरांना मुक्त केले होते. संथाल परगण्यातील संथाल नेते सिदो व कान्हू सन १८५५ पासून इंग्रज सरकार विरुद्ध लढत होते. सुरेंद्र शाहने ३० जुलै १८५७ रोजी हजारीबाग येथला तुरुंग फोडून तेथल्या विद्रोही संथालांनासुद्धा मुक्त केले होते. शेख भिखारीने संथाल वीरांना इंग्रज सरकारविरुद्ध लढण्यास उत्तेजन दिले व त्यांना आपल्याकडे वळवून घेतले.

[irp]

संथाल नेते रिपू मांझी, फागू मांझी, रिवजा मांझी, डबर गंझू व अर्जुन मांझी यांनी १८५७ मध्ये आपल्या संथाल वीरांच्या सहाय्याने हजारीबाग आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांनी गावागावांतून परंपरागत पंचायती व्यवस्था पुन्हा सुरू करून कर-वसुलीही सुरू केली होती. हजारीबागचा कलेक्टर सिंपसन त्यावेळी पळून जाऊन बढाई येथे राहत होता. बंगालचा गव्हर्नर हेली डे याने त्याच्याकडे जादा कुमक पाठवून हजारीबागवर हल्ला करून विद्रोहींना पळवून लावण्यास सांगितले. त्याने हजारीबागवर हल्ला करून ते शहर ताब्यात घेतले. त्या हल्ल्यात कित्येक संथाल ठार झाले व २०० संथालांना रस्त्यावरील झाडांवर फाशी देण्यात आले. संथालांची अनेक गावे इंग्रज सैन्याने जाळून टाकली. इंग्रज सैन्याचा दहशतीमुळे संथाल लोक छोटा नागपूर प्रदेशातून उत्तर बंगालमध्ये निघून गेले.

[irp]

गणपत रायच्या नेतृत्वाखाली विद्रोही सैन्य दिल्लीकडे चालले होते. रांचीला सैन्य उरलेच नव्हते. त्याचा फायदा घेऊन इंग्रज सैन्याने २३ सप्टेंबरला १८५७ रोजी रांची शहर पुन्हा ताब्यात घेतले. बिहारमध्ये आता इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला. विश्वनाथ शाहदेव व गणपत राय गनिमी काव्याने इंग्राजांशी लढतच होते. अशा परिस्थितीत इंग्रज अधिकाऱ्यांनी शेख भिखारी, राजा उमरावसिंह व त्याचा भाऊ घासीसिंह यांना ओरमांझी येथे गिरफ्तार केले व त्यांना कडेकोट बंदोबस्तात रांचीला आणले.

रांची येथील इंग्रज अधिकारी सूडाच्या भावनेने पेटले होते. त्यांनी अपराधी निरपराधी याचा विचार न करता सर्रासपणे जे हाती सापडतील त्या लोकांना फासावर चढविण्याचे सत्र सुरू केले होते. त्यांच्या नृशंतेची ती कमाल होती. जज्ज ओक्सने मद्रास पलटणीचा मेजर मॅक्डोनल्ड याला तोंडी आदेश दिला की, शेख भिखारी व राजाउमरावसिंह यांना चुटूपालू घाटीत आम जनतेसमोर झाडांना टांगून फाशी देण्यात यावे. त्या आदेशानुसार मेजर मॅक्डोनल्ड त्या दोघांना चुटूपालू घाटीत घेऊन गेला. त्यांच्या मागोमाग त्यांचे कुटुंबीय आक्रोश करीत प्रचंड जनसमुदायासह त्या घाटीत आले. ८ जानेवारी १८५८ रोजी त्या दुःखित जनतेसमोर रांची-ओरमांझी मार्गावरील त्या घाटीतील मोरहाबाद टागोर टेकडीजवळील एका मोठ्या वृक्षाच्या दोन फांद्यावर शेख भिखारी व राजा उमराव सिंह यांना त्याने फाशी दिली. त्या फाशीच्या जागेला तेव्हापासून टुगरी-फासी हे नाव पडले. त्यानंतर त्या दोघा स्वातंत्र्यवीरांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. आजही त्यांचे वंशज दारिद्र्यात जीवन कंठत आहेत.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!