Home Study Material शाहमल जाट

शाहमल जाट

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांच्या देशी पलटणींच्या बरोबर शेतकऱ्यांनी, शेत मजुरांनी व आदिवासींनी मोठ्या प्रमाणात इंग्रजांविरूद्ध भाग घेतला होता. हे सारे इंग्रज सरकारच्या जुलमी राजवटीत भरडून निघाले होते. बहुसंख्य शेतकऱ्यांची तरुण मुले इंग्रजांच्या देशी पलटणीत होती. त्यांनीच या स्वातंत्र्य युद्धात फार मोठी कामगिरी केली होती.

सन १८३६ मध्ये उत्तर प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला, तेव्हा इंग्रज अधिकारी प्लाउडेन याने नव्याने शेतकऱ्यांवर जबरदस्त भूमिकर लादला. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला. तरीही इंग्रजी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून तो अन्यय्य भूमिकर वसूल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. इंग्रज अधिकाऱ्यांनी बागपत व बडौतमधील जमीनदरांना व शेतकऱ्यांना बजावले की, जो जमीनदार व शेतकरी निर्धारित भूमिकर देणार नाहीत, त्यांच्या जमिनी जप्त केल्या जातील व जे जमीनदार निर्धारित भूमिकर देण्याचे मान्य करतील, त्यांना त्या जमिनी कसायला देण्यात येतील. जर भूमिकर न देता जे जमीनदार व शेतकरी त्या जमिनी पेरून पीक घेतील, तर त्यांचे ते पीक जप्त करून त्याचे लिलाव केले जातील आणि लिलावाची रक्कम सरकारी खजिन्यात जमा केली जाईल. इंग्रज सरकारने हा बंदोबस्त धमकीवजा आदेश देऊन जमीनदारांवर व शेतकऱ्यांवर जोरजबरदस्ती केल्याने १८४० पासून १८५० पर्यंत त्या प्रदेशात अशांततेचे वातावरणात निर्माण झाले होते. कित्येक जमीनदारांच्या व शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या आणि त्या बाहेरच्या जमीनदारांना देण्यात आल्या.

मेरठ, बागपत, बडौत, बिजरौल या भागात जाट जमीनदार व जाट शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. बिजरौल गावाच्या शिवाराचे कुल्लो व भोली हे दोन भाग होते. कुल्लो भागातील सारी जमीन शाहमल जाटाच्या मालकीची होती. १० मे १८५७ रोजी मेरठ येथील इंग्रजांच्या देशी पलटणीने उठाव केला, तेव्हा मेरठच्या परिसरातील गावामधील शेतकारी व जमीनदारांना इंग्रजांविरुद्ध लढण्याची संधी मिळाली. ज्या जमीनदारांच्या व शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होऊन नव्या जमीनदारांना देण्यात आल्या होत्या, त्या जमिनी नव्या जमीनदारांना हुसकून देऊन आधीच्या जमीनदारांनी ताब्यात घेतल्या. या जमीनदारांचे नेतृत्व शाहमल जाट या क्रांतिकारकाने केले. त्याने हजारो शेतकरी व जमीनदार संघटित करून व्यापाऱ्यांना लुटले. बडौत तहसील कार्यालयावर हल्ला करून त्या कार्यालयाची इमारत जमीनदोस्त केली. शाहमलने दिल्लीच्याक्रांतिकारी सैनिकांच्या नेत्यांशी संपर्क साधला. त्यांनी शाहमलला मेरठ भागाचा सुभेदार नेमले. मेरठच्या देशी सैन्याने मेरठचा तुरुंग फोडून जे शेकडो कैदी मुक्त केले होते, तेही शाहमलला येऊन मिळाले. शाहमलची ताकद त्यामुळे वाढली. शाहमलने आपल्या अनुयायांसह बागपतजवळचा यमुना नदीवरील पूल नष्ट करून टाकला. त्याने त्या भागातील ८४ गांवांतील जाटांना भडकावून इंग्रज सरकारविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. आपल्या या भागातून धान्य व हत्यारे गोळा करून दिल्ली येथील विद्रोही सैनिकांना तो पुरवू लागला.

शाहमल जाटाने बडौत व आसपासचे तीनचार परगणे आपल्या ताब्यात घेतले व तो स्वतःला त्या प्रदेशाचा राजा म्हणवू लागला. ज्यावेळी इंग्रज सेनेने दिल्लीला वेढा दिला, त्यावेळी शाहमलने पुरविलेल्या रसदीमुळेच दिल्लीतील सैन्य व जनता जगू शकली. त्याने आपली गुप्तहेर यंत्रणा उत्तम रीतीने तयार केली. बडौत प्रमाणेच बागपत तहसील कार्यालय व बागपतचा बाजारही लुटला. इंग्रज सैन्याचे दिल्लीकडे जाणारे मार्ग खोदून नष्ट केले. बसौद गावी त्याने दिल्लीतील विद्रोही सैनिकांसाठी व जनतेसाठी ८००० मण गहू व डाळीचे भांडार सज्ज ठेवले. जेव्हा इंग्रज सैन्याने बसौदवर हल्ला केला, तेव्हा तो त्या गावातून गुप्तपणे निघून गेला. पंरतु त्याने साठवून ठेवलेल्या धान्याला हात लावायची कोणाचीही हिंमत झाली नाही. एवढा त्याचा धाक त्या भागात होता. त्या इंग्रज सैन्याची शाहमलच्या सैन्याने दाणादाण उडवून दिली.

मेठर, बागपत, बडौत प्रदेशात पूर्वीपासून जाट व गुजर जातितील लोकांत वैमनस्य होते. परंतु शाहमलच्या प्रभावाने ते वैमनस्य नाहीसे झाले. जाटांबरोबर गुजरांनी सुद्धा शाहमलला चांगली साथ दिली. त्यांच्या पराक्रमामुळे तो त्या भागातील सर्व जातित लोकप्रिय झाला होता. त्या चौयायशी गावांच्या प्रदेशाला ‘चौऱ्यांयशी देश’ म्हटले जात असे. त्या भागात जाटांची वस्ती मोठ्या प्रमाणात होती. ते सर्व जाट जमीनदार व शेतकरी शाहमलच्या पाठीशी उभे केले होते. त्याचे ७००० सडे सैन्य त्याने त्या भागातूनच उभे केले होते. इंग्रज अधिकाऱ्यांना त्याचे पारिपत्य कसे करावे याची मोठी चिंता होती. त्यांनी शाहमलला जिवंत किंवा मृतावस्थेत पकडून देणाऱ्यास १००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पण त्याला कोणीही भीक घातली नाही. शाहमलच्या विद्रोही करावाया आणि दिल्लीतील देशी सैन्याशी त्याचे घनिष्ट संबंध यामुळे इंग्रज सेनाधिकारी त्रस्त झाले होते. जुलै १८५७ मध्ये इंग्रज सैन्याने शाहमलच्या सैन्यावर जबरदस्त आक्रमण केले. शाहमलने आपल्या ७००० सैनिकांनिशी त्या सैन्यावर प्राणपणाने हल्ला केला शाहमलचा पुतण्या भगत याने इंग्रजांचा मुख्य सेनाधिकारी डनलॉप याचा वेगाने पाठलाग केला.डनलॉप त्याला घाबरून जिवाच्या आकांताने पळून गेला म्हणून वाचला. शाहमलचा साथीदार सूरजमल याने तर इंग्रज सैन्याला पळता भुई थोडी केली. बडौतच्या दक्षिण भागातील एका बागेत शाहमल इंग्रजांच्या खाकी रिसाल्याशी लढत होता. त्या बागेत तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात शाहमल मारला गेला. इंग्रजांची झोप उडविणारा स्वातंत्र्यवीर शाहमल आपल्या जन्मभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता युद्धभूमीवर शहीद झाला. इंग्रजांचा हा फार मोठा विजय होता. त्यांनी शाहमलचे शीर तलवारीने धडावेगळे केले व ते मोठ्या भाल्याच्या टोकावर खोचून आपल्या युनियन जॅकसह गावागावातून फिरवीत नेले. जनतेला दहशत बसावी म्हणून इंग्रजांनी शाहमलच्या शिराचे असे क्रूर प्रदर्शन केले.

शाहमलचा पुतण्या भगत व साथीदार सूरजमल तरीही डगमगले नाहीत. त्यांनी पुन्हा सैन्य संघटित केले. मुजफ्फरनगर व रोहिलखंडात आणि अवध प्रांतात इंग्रजांशी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना ते जाऊन मिळाले. पण त्यांनी आत्मसमर्पण केले नाही. शाहमलच्या निधनानंतरही हिंमत न हारता त्याचे अनुयायी इंग्रजांशी लढत होते. याचे आश्चर्य इंग्रजांना वाटत होते. त्यांचे देशप्रेम पाहून ते अधिकारी थक्क होऊन गेले होते.

 

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!