सध्याच्या नागालँड राज्याचा सारा प्रदेश डोंगरांनी व्यापलेला आहे. या प्रदेशात नागा जातीच्या काही उपजातींचे वास्तव्य आहे. डोंगराळ भागातच या जाती राहात असल्याने या सर्व जाती अतिशय काटक, धाडसी, निर्भय व शूर आहेत. त्यांची एक उपजाती कच्छ नागा ही असून या जातीला कछारी नागा असेही म्हणतात. सध्याच्या कछार जिल्ह्यात या जातीचे बहुसंख्य लोक राहतात. कछार नागा वीरांच्या कथा आजही या प्रदेशात मोठ्या अभिमानाने सांगितल्या जातात.
आसाम प्रांतात पूर्वी अहोम वंशाचे राज्य होते. त्या काळात कछारी नागा जातीचे लोक अहोम राजांच्या राज्यातून वेगळे झाले व त्यांनी नागा प्रदेशात वास्तव्य केले. इंग्रजांची दृष्टी या प्रदेशावर पडल्यानंतर कछारी नागांचे स्वातंत्र्य थोड्या काळातच नष्ट झाले. त्यांना गुलामगिरीत जीवन कंठावे लागले. इंग्रजांची गुलामगिरी व अत्याचार या स्वतंत्र वृत्तीच्या कछारी नागांना सहन होणे शक्यच नव्हते. इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध त्यांच्या मनात असंतोष खदखदू लागला. या कछारी नागामधूनच शम्भूदान नामक वीर उदयाला आला. त्याने आपल्या जातीच्या तरुणांची संघटना तयार केली. मेवांग हे गाव त्या संघटनेचे प्रमुख केंद्र होते. संघटनेसाठी तो पैसा कोठून आणणार? संघटनेतील तरुणांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यासाठी बराच पैसा जमविला तो स्वतःच्या खिशातूनच.
कछारी नागा शम्भूदान याने संघटना उभारुन इंग्रजांशी लढण्याची तयारी चालविली आहे, याची बातमी त्या भागातील इंग्रज अधिकाऱ्यांना लागली. तेव्हा मेजर बॉएडने या संघटनेचा नेता शम्भूदान याला पकडण्यासाठी व त्याने सुरु केलेला विद्रोह दडपून टाकण्यासाठी पोलिसांचे मोठे दल कछारी नागांच्या प्रदेशात रवाना केले. हे पोलिस दल जेव्हा शम्भूदान व त्याचे साथीदार यांना जिवंत अथवा मृतावस्थेत पकडण्यासाठी असमर्थ ठरले. तेव्हा मेजर बॉएडने संतापून स्वतःच ते कार्य करण्याचे ठरविले. त्याने आपल्या सेनेसह मेवांग गावाकडे कूच केले. ते समजताच शम्भूदान व त्याचे सहकारी आपल्या अनुयायी वीरांसह मोजांग येथे निघून गेला. तेथल्या पोलिसाला व त्याच्या साथीदारांना त्यांनी ठार केले.
[irp]
शम्भूदान पुन्हा आपल्या कछारी नागा वीरांसह मेवांग या आपल्या गावाकडे आला. तेथे त्यांचा सामना मेजर बॉएडच्या सैनिकांशी झाला. तेथे तुंबळ युद्ध झाले. कछारी नागांच्या बाणांनी, भाले-बरच्यांनी इंग्रजांच्या सैन्यावर जणू वज्रघातच केला. त्या सैन्याला पळताभुई थोडी झाली. अनेक इंग्रज सैनिक व मेजर बॉएड या युद्धात मारला गेला.
[irp]
शम्भूदानला कसेही करुन पकडलेच पाहिजे. असे इंग्रजांनी ठरविले. कछार जिल्ह्यात व आसपासच्या भागात त्यांनी हेरांचे जाळे पसरविले. तेव्हा शम्भूदान एका अज्ञात स्थळी निघून गेला. भूमिगत झाला. इंग्रज हेरांना शम्भूदानच्या लपण्याचे स्थान माहित झाले. लगेच इंग्रज सैन्याने त्या स्थानाला वेढा घातला. आता कसेही करुन त्या स्थानातून निसटलेच पाहिजे, असे शम्भूदानने ठरविले. तो लपत-छपत त्या स्थानातून निघाला. पण दुर्दैव आड आले. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. पायात एक गोळी घुसली. तरीही तो निसटून गेला. उपचाराअभावी गोळीची जखम वाढत गेली. त्यामुळे हा नागावीर हे जग सोडून गेला. एक जबरदस्त वादळ शमले. नागा प्रदेश शोकविव्हल झाला.
[irp]
संदर्भ :
महान भारतीय क्रांतिकारक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ |
![]() |