Home Study Material वेलुत्तम्पी दलवा

वेलुत्तम्पी दलवा

इंग्रजांनी बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम हे प्रांत म्हणजे सारा पूर्व भारत काबीज करुन त्यांनी दक्षिण भारतातही मद्रास, केरळ मध्ये पाय रोवले होते. त्या काळात भारतात शेकडो लहान मोठी राज्ये होती. ती राज्य गिळंकृत करण्यासाठी ग.ज. लॉर्ड वेलस्ली टपलेलाच होता. तैनाती फौजेच्या योजनेने त्याने अनेक राज्ये अंकित केली होती. वास्तविक पाहता या लुटारु इंग्रजांना कोणत्याही भारतीय राज्याच्या कारभारात नाक खुपसण्याचा कसलाही अधिकार नव्हता. परंतु त्यांनी साम, दाम, दंड, भेद व कपटनीचा तसे अनेक प्रसंगी गुंडगिरीचा अवलंब करुन अनेक भारतीय राजांना आपल्या अधीन करुन ठेवले होते. भारताच्या दक्षिण किनारी असेच एक राज्य होते – तिरुवितांकुर, धर्मराज नावाचा राजा त्या राज्यावर राज्य करीत होता. या राज्याची राजधानी आधी पद्मनाथपुरम ही होती. नंतर धर्मराजाने तिरुअनंतपुरम् ही आपली राजधानी केली.तरीही राजाचे बहुतेक सैन्य पद्मनाथपुरम येथेच असायचे या राज्यातही वेलस्लीने कर्नल मेकॉले हा आपला धूर्त एजंट ठेवला होता. धर्मराजाला दरवर्षी चार लाख रुपये खंडणी इंग्रज सरकारला द्यावी लागत असे.
पद्मनाथपुरम जवळच थोड्या अंतरावर तलक्कुलम् नावाचे एक गाव होते त्या गावात अनेक प्रभूचे अर्थात सरदारांचे, अधिकाऱ्यांचे व धनिकांचे मोठमोठे वाडे होते. हे लोक राजाला युद्धात साह्य करीत. जो राजाला मोठ्या प्रमाणात साह्य करी, त्याला राजा ‘त्तम्पी’ ही बहुमानाची पदवी देत असे. या गावातच एका सामान्य कुटुंबात ६ मे १७६५ रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव वेलायुधन असे ठेवण्यात आले. त्या बालकाचे दुर्भाग्य असे की, त्याचे आईवडील त्याच्या बालपणीच मरण पावले. तेव्हा त्याचे पालनपोषन त्याच्या मामांनी केले. या पोरक्या मुलाची बुद्धी कुशाग्र होती. त्याच्या मामांनी त्याला शाळेत दाखल केले. शिक्षण सुरु झाल्यानंतर थोड्या वर्षातच त्याने मल्यालम, तामिळ व संस्कृत या तिन्ही भाषांचे ज्ञान आत्मसात केले. लहानपणापासूनच त्याला व्यायामाची आवड होती. दररोज तो नियमितपणे व्यायाम करीत असे. त्यामुळे त्याचे शरीर बळकट व सुडौल बनले. मजबूत खांदे, भरदार छाती व उंचीपुरी शरीरयष्टी यामुळे त्याचे व्यक्तित्व कोणावरही छाप पडेल असेच होते. त्याच्या बद्दल गावांतील लोकांना आदर वाटत असे. त्या काळात गावागावांत नेहमीच चोय व्हायच्या. त्याच्या तलक्कुलम गावात चोर शिरल्याचे ऐकताच तो धावून जायचा. त्याला पाहून चोर पसार व्हायचे. त्यामुळे तो अधिकच लोकप्रिय झाला. स्वभावाने तो नम्र, सुशील व प्रामाणिक होता.

__ एके दिवशी धर्मराज राजाच्या महालातून काही मौल्यवान हिरे चोरीस गेली. राजाच्या सेनाधिकाऱ्यांनी काही सैनिक घेऊन खूप शोधाशोध केली; परंतु हिऱ्यांचा तपास लागला नाही. तेव्हा राजा चांगलाच संतापला राजाने वेलायुधनच्या बुद्धिमत्तेसंबंधी व शक्तीविषयी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. राजाने वेलायुधनला बोलावून घेऊन त्याला हियांचा शोध लावण्यास सांगितले. वेलायुधनने अवघ्या तीन दिवसात चोरीस गेलेले हिरे चोरांसह राजापुढे हजर केले. राजाला ते पाहून अत्यानंद झाला. दरबार भरवून वेलायुधनचा राजाने सन्मान केला व त्याला ‘त्तम्पी’ ही सन्मान दर्शक पदवीही प्रदान केली. त्याला तालुकादारही बनविले व एका तालुक्याचा कारभार त्याच्याकडे सुपूंद केला. तेव्हापासून वेलायुधन ‘वेलुत्तम्पी’ या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्या गावकऱ्यांना त्याचा अभिमान वाटू लागला. त्याचे कुशल प्रशासन, सच्छीलता व न्यायप्रियता पाहून जनतेत त्याला लोकप्रियता लाभली. त्याच्याविषयीचा आदर वृद्धिंगत झाला. राज्यातील तो एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावाजला.
तिरुवितांकुर राज्याचे दीवाण केशवदास हे होते. ते सौजन्यमूर्ती व प्रतिभाशाली होते. तसेच ते कुशल प्रशासकही होते. त्यांच्या कारभारावर राजासह जनताही खुश होती. राजाच्या दरबारात जयंतन शंकरन नम्पूतिरी हा एक चापलूस, दीर्घद्वेषी व विघ्नसंतोषी सेवक होता. येनकेनप्रकारेण षड्यंत्र रचून दीवाण केशवदासांना दीवाणपदावरुन हटवायचे व आपण स्वतः दीवाण व्हायचे त्याचे स्वप्न होते. केशवदासांनी त्याच्या कारवाया अनेकवेळा विफल केल्या होत्या. तरीही तो राजाचे मन केशवदासांविषयी कलुषित करण्याचा प्रयत्न सोडीत नव्हता. केशवदासांबद्दल राजाच्या मनात संशय निर्माण करण्याची संधी वाया जाऊ देत नव्हता. त्याने राजाच्या मनात पक्के ठसविले की, केशवदासाने स्वतः राजा होण्याचे प्रयत्न चालविले आहेत. अनेक वेळा जयंतनच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्याने राजाचाही त्यावर विश्वास बसला व राजाने केशवदासांना दीवाणपदावरुन हटवून जयंतनची नेमणूक दीवाणपदी केली. विनाशकाले विपरित बुद्धी, दुसरे काय?

दीवान झाल्यावर जयंतनचा मनमानी कारभार सुरु झाला. त्यामुळे जनता संत्रस्त झाली. त्याने राजाला कळू न देता गुप्तरीत्या केशवदासांना तुरुंगात डांबले व बेमालूमपणे केशवदासांची त्या तुरुंगवासात हत्त्या करविली व आपल्या मार्गातील काटा नाहीसा केला.

जयंतन हा अत्यंत लोभी, लंपट व दृष्ट प्रवृत्तीचा होता. त्याचे साथीदारही तसेच होते. त्यामुळे राज्यात चोऱ्या मारामाऱ्या व दरोडे वाढले. राज्यात अराजकता माजली. कंपनी सरकारही आपला एजंट कर्नल मेकॉले याच्या मार्फत राजाकडून निरनिराळी कारणे दाखवून खूप पैसा हडपू लागले. जयंतनच्या मनमानी कारभारामुळे राज्याची आय कमी झाली व खर्चही खूप वाढला. राज्याचा खजिना रिकामा झाला. म्हणून जयंतनने प्रजाजनांवर अनेक भरमसाठ कर लादले जो या करांना विरोध करायचा, त्याच्याकडून जयंतन जबरदस्त दंड आपल्या साथीदारांकरवी वसूल करायचा.याचा परिणाम व्हायचा तोच झाला. जनतेत असंतोष धुमसू लागला. राज्यात क्रांती होण्याची लक्षणे दिसू लागली. परंतु राज्यातील जनतेतून तसा एकही नेता पुढे आला नाही.

[irp]

यदाकदाचित जनता वेलुत्तम्पीला आपला नेता बनवून उलथापालथ घडवून आणील-म्हणून त्याने वेलुत्तम्पीला जाळ्यात पकडायचे ठरविले. त्याला दरबारात बोलावून घेऊन तीन दिवसात तीन हजार रुपये खजिन्यात भरण्याचा हुकुम त्याला दिला. तो हुकूम वाचताच वेलुत्तम्पी अत्यंत संपातला. तीन हजार रुपये खजिन्यात भरेपर्यंत तालुकदार म्हणून काम करायचे नाही असेही जयंतनने त्याला बजावले-पण वेलुत्तम्पीने संयम राखला. व तो आपल्या तालुक्यात परतला. त्याने आपला जिवलग मित्र अय्यपन चंपकरमन व जनतेतील प्रतिष्ठित पंच-प्रमुखांना बोलावून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. सर्वांच्याच सहनशीलतेने परिसीमा गाठली होती. म्हणून त्यांनी एकमताने ठरविले की, ‘दिवाण जयन्तम विरुद्ध जनतेत रान उठवायचे. विद्राह करायचा. ‘जयन्तनला हे समजलेच नाही. तो आपल्याच गुर्मीत होता. परंतु कर्नल मेकॉलेने आपले गुप्त हेर राज्यात सर्वत्र पेरले होते. त्या हेरांकरवी मेकॉलेला ही विद्रोहाची बातमी समजली. त्याने तात्काळ धनराजाची भेट घेऊन त्याला विद्रोहाची माहिती दिली. राजाने कसलाही विचार न करता हा विद्रोह दडपून टाकण्याचा आदेश दिला. परंतु त्या हुकुमाकडे कोणीही लक्ष दिले नाही. कारण साऱ्या जनतेला दीवाण जयन्तनबद्दल तिरस्कार वाटत होता. सारी जनता वेलुत्तम्वीच्या पाठीशी उभी राहिली. त्याच्या साथीदारांनी जनतेला जागृत केले होते.
वेलुत्तम्पी अपार जनसमूहासह राजधानीत आला. तेव्हा जयन्तनचा कुठेच पत्ता लागत नव्हता. तो कोठे आहे, हे राजालाही माहित नव्हते. जनसमूहाच्या उद्रेकाला घाबरुन तो कोठेतरी दडून बसला होता. त्याने राजाला जनतेतील असंतोषाची कल्पनाच येऊ दिली नव्हती. तो जनसमुह पाहून राजा एकदम चकित झाला. राजाने वेलुत्तम्पीचे व जनतेच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकले. तेव्हा कोठे त्याला आपल्या या दिवाणाच्या करतूतींची कल्पना आली. राजाने जयन्तनला व त्याच्या साथीदारांना हुडकून काढून त्यांना त्या जनसमुहाकडे सोपवून दिले. जनतेने त्या सर्वांना त्यांच्या दृष्ट करणीची योग्य ती शिक्षा दिली.

राजाने वेलुत्तम्पीचा मित्र अय्यपन चंपकरमन याची नेमणूक दीवाण पदी व वेलुत्तम्पीची नियुक्ती वाणिज्यमंत्री पदी केली. ते पाहून नंतरच्या काळात जयन्तनच्या दडून बसलेल्या दृष्ट साथीदारांनी काही राजभक्त अधिकाऱ्यांच्या हत्त्या केल्या. दुर्दैवाने चम्पकरमनही मरण पावला. तो पर्यंत वेलुत्तम्पीने राज्याची घडी नीट बसवून भ्रष्टाचाराचे निर्मूलन केले होते. राज्याचे उत्पादन वाढवून राज्याला आबादी आबाद करुन सोडले होते. राजा त्याच्या कारभारावर खुश झाला होता. चम्पकरमन च्या निधनानंतर राजाने दीवाणपदी वेलुत्तम्पीची नेमणूक केली. दीवाण म्हणजे प्रधान मल्याळम भाषेत प्रधानाला ‘दलवा’ म्हणतात तेव्हापासून त्याचे नाव राज्यात ‘वेलुत्तम्पी दलवा’ असे रुढ झाले.

वेलुत्तम्पी दलवा जेवढे दयाळू व न्यायनिष्ठ होते, तेवढेच ते राज्यकारभारात कठोरही होते. कोणावरही अन्याय होऊ नये याची ते दक्षता घेत असत. हिंदूना हिंदूच्या धर्मशास्त्राप्रमाणे व मुसलमानांना कुराणाच्या आज्ञांनुसार ते न्याय देत असत. दोषी व्यक्तींना त्यानुसारच शिक्षा देत असत. त्यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांचे अधिकार व त्यांची कर्तव्ये कोणती हे ठरवून दिले आणि राज्यकारभाराची घडी चांगल्या रीतीने बसवून दिली. त्यामुळे जनता सुखासमाधानाने आपले जीवन कंटूलागली. वाणिज्य क्षेत्रात सुविधा वाढविल्या. करपद्धती जनतेला सुसह्य अशी केली. राज्यात सर्वत्र चांगले रस्ते तयार केले. उत्पादनाची नवनवी क्षेत्रे जनतेला उपलब्ध करुन दिली. व राज्याचे उत्पन्न वाढविले. राज्याची भरभराट होऊ लागली. राज्याला ऋणमुक्त केले.

राज्याची भरभराट झालेली पाहताच कर्नल मेकॉलेच्या तोंडाला पाणी सुटले व त्याने या राज्याच्या प्रगतीचा रिपोर्ट ग.ज. वेलस्लीला केला. त्यात वेलुत्तम्पीची प्रशंसाही केली. तो वेलुत्तम्पीशी फार चांगल्या रीतीने वागू लागला. वेलुत्तम्पी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी राज्यकारभाराविषयी मोकळ्या मनाने गप्पा मारीत असे. वेलुत्तम्पीचे येथेच चुकले.

[irp]

राज्य जरी ऋणमुक्त झाले, तरी कंपनी सरकारची खंडणी चार लाख रुपये देणे बाकी होते. तेवढी रक्कम तर राज्याच्या खजिन्यात नव्हती. म्हणून वेलुत्तम्पीने सैनिकांच्या वेतनात थोडीकपात करण्याचे ठरविले. हे समजताच सैन्याने विद्रोह सुरु केला. तेव्हा आपला मित्र म्हणून मेकॉलेचे साह्य विद्रोह दडपण्यासाठी मागितले. मेकॉले चाणाक्ष होता. त्याच्या आदेशानुसार इंग्रज सैन्याचे विद्रोह दडपून टाकला. वेलुत्तम्पीला हायसे वाटले.

सन १८०८ मध्ये कर्नल मेकॉलेने विद्रोहासंबंधी सारे काही वेलस्लीला कळविले. विद्रोह दडपण्यास साह्य देण्याच्या मोबदल्यात राजाशी नवा तह करण्याचे वेलस्लीनेमेकालेला सांगितले. या तहानुसार राजाने कंपनी सरकारला दरवर्षी आठ लाख रुपये खंडणी द्यावी. कंपनी सरकारच्या परवानगीशिवाय अन्य कोणत्याही राजाशी पत्रव्यवहार करु नये. एवढी खंडणी न दिली तर राज्य ताब्यात घेतले जाईल, अशी धमकीही त्या तहात होती. राजाने आपले सैन्य विसर्जित करावे व इंग्रज सैन्य आपल्या पदरी ठेवून त्या सैन्याचा सर्व खर्च राजाने करावा. राजाने आपल्या राज्याच्या उत्पानाच्या फक्त पाचवा हिस्सा घ्यावा व चार हिस्से कंपनी सरकारला द्यावे. वेलुत्तम्पीने कंपनी सरकारकडून दरमहा पाचशे रुपये घ्यावे व राज्याबाहेर मलबार मध्ये राहावे. राज्याचा कारभार कर्नल मेकॉले पाहतील.

__ अशा अन्यायकारक व जाचक अटी वेलुत्तम्पीला मान्य होणे शक्यच नव्हते. कर्नल मेकॉलेचे खरे रुप आता त्याला समजून चुकले होते. त्याने आपल्या राज्यातून इंग्रजांना घालवून देण्याचा चंग बांधला. राजा सुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहिला. वेलुत्तम्पीने आपल्या साथीदरांसह राज्यात दौरा करुन साऱ्या जनतेला इंग्रजांन विरुद्ध लढा देण्यास उद्युक्त केले. वेलुत्तम्पीने फ्रेंचाना व कालिकतचा राजा सामुविरी याला इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी विनंती केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा वेलुत्तम्पीने आपल्या जनतेच्या बळावरच इंग्रजांशी लढा देण्याचे ठरविले. राजाला व वेलुत्तम्पीला कळून चुकले की, कंपनी सरकारने आपले राज्य बळकावण्याचा चंग बांधला आहे. मेकॉलेने खंडणीतील दोन लाख मी कमी करीन. तुम्ही हा तह मान्य करुन त्यावर सही करा. इंग्रज सरकारने आपल्या कपटनीतीने उत्तरेकडील राज्ये बळकावण्याचा सपाटा लावला होता. त्या बातम्या इकडे येतच होत्या. शेवटी मेकॉलेच्या दबावाला बळी पडून राजाने त्या तहावर सही केली. दोन लाख रुपये कमी करुन द्या असे राजाने म्हणताच मेकॉलेने ग.ज. ची मान्यता घ्यावी. असे सांगून कानावर हात ठेवले. राजाला त्याचे कपट कळून चुकले व त्याने वेलुत्तम्पीला लढा देण्यास प्रोत्साहन दिले.

___वेलुत्तम्पीने कोच्चीचा बळकट किल्ला आपल्या ताब्यात घेतला. सेनापतीला मेकॉलेच्या बंगल्यावर हल्ला करण्यास पाठविले. मेकॉले बंगल्यात नव्हताच. आपल्या हेरांकरवी वेलुत्तम्पीचे बेत त्याला आधीच माहीत झाले होते व तो गुपचूप समुद्रात उभ्या असलेल्या जहाजावर निघून गेला होता. सेनापतीने त्याचा बंगला उध्वस्त करुन टाकला मेकॉलेने मद्रासच्या गव्हर्नरला पत्र पाठवून तिरुवितांकुर राज्य ताब्यात घेण्यासाठी मोठे सैन्य मागवून घेतले. कोल्लमच्या युद्धात दोन्ही सैन्यांची गाठ झाली. अटीतटीचे युद्ध होऊन दोन्ही बाजूचे बरेच सैनिक मारले गेले. या युद्धात राजाच्या सैन्याचा पराभव झाला. राजाच्या सैन्याकडे धनुष्यबाण, भाले, बरच्या, तलवारी ही परंपरागत हत्यारे होती. इंग्रज सैन्याच्या तोफा -बंदुकांच्या माऱ्यापुढे त्यांचा निभाव लागणे शक्यच नव्हते.

[irp]

आता १८०९ साल होते. एक वर्षापासून हा लढा चालू होता. वेलुत्तम्पीने कुंडरा या किल्ल्यात आपले सगळे सैन्य एकत्रित केले. त्याच्या तरक्कन व उम्मिणितम्पी या दोन प्रमुख विरोधकांनी ही बातमी कर्नल मेकॉलेला दिली. आपण आपल्या सैन्याच्या बळावर विजयी होऊ असा वेलुत्तम्पीचा विश्वास होता. पण मद्रासहून इंग्रजांना मोठी कुमक मिळाली. कर्नल कूपेज पाच पलटणीसह येऊन धडकला. लंकेतून इंग्रजांचा मोठा तोफखाना आला. त्यांचा सेनापती सेंट लीगर याला वेलुत्तम्पीच्या विरोधकांनी साह्य केले. लीगरने कांच्ची किल्ल्यावर जबरदस्त हल्ला करुन तो किल्ला ताब्यात घेतला. राजाच्या सैन्याने कोल्लम किल्ल्यावर हल्ला केला. त्या युद्धात वेलुत्तम्पीचा विश्वासू व पराक्रमी साथीदार अच्चन कामाला आला, त्याच्या सैन्याला हार पत्कारावी लागली.

वेलुत्तम्पीचा विरोधक तरक्कन आपल्या साथीदारांसह वेलुत्तम्पी विरुद्ध प्रचार करु लागला. वेलुत्तम्पीने राजाला पदच्युत करुन स्वतः राजा होण्यासाठी राजा विरुद्ध विद्रोह सुरु केला आहे. त्याला मुळीच थारा देऊ नका; या प्रचाराने जनतेत गोंधळ उडाला. उम्मिणितम्पीने वेलुत्तम्पीचा महाल जमीनदोस्त करुन त्याच्या नातेवाईकांना व साथीदारांना तुरुंगात डांबले. हे दोघे मेकॉलेचे हस्तक होते. मेकॉले राजाकडे येऊन म्हणाला, “वेलुत्तम्पीला विद्रोही म्हणून जाहीर करावे व त्याला पकडून देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करावी.”स्वामीभक्त वेलुत्तम्पीला विद्रोही म्हणणे व त्याला पकडून देणे या गोष्टी राजाला मुळीच पटल्या नाहीत. परंतु मेकॉलेने राजावर दबाव आणून या घोषणा राजाकडून करवून घेतल्या. राजा असहाय होऊन दुःख करीत बसला.

इंग्रजांनी पद्यनामपुरम्, कोल्लम, उदयगिरी व नागरकोविल ही महत्त्वाची ठाणी जिंकून घेतल्याने वेलुत्तम्पी निराश होऊन आपला भाऊ पद्यनाथन याच्यासह डोंगरदऱ्यांतील जंगलात निघून गेला. कर्नल मेकॉले उम्मिणितम्पी व तरक्कन यांच्यासह राजमहालात आला. त्याने त्या असहाय राजावर दडपण आणून उम्मिणितम्पीची नेमणूक दीवाण म्हणून व तरक्कनला मंत्री म्हणून राजाकडून करवून घेतली. वेलुत्तम्पी आपल्या भावासह जंगलातील भद्रकाली देवीच्या पडक्या मंदिरात विश्रांती घेत पडला होता. भयंकर निराशेने त्याला ग्रासले होते. जिवंतपणी इंग्रजांच्या हाती सापडणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली होती. काही लोक ह्या मंदिराकडे येत आहेत याची चाहूल पद्यनाथनला लागली व तो त्या मंदिराबाहेर आला. तेवढ्या वेळात वेलुत्तम्पीने आपल्या तलवारीने आपले शिर छाटून टाकून त्या काली मातेच्या चरणी अर्पण केले. पद्यनाभन आत आल्यावर ते दृश्य पाहताच धाय मोकलून रडू लागला. इंगज सैनिक तेथे आले व त्यांनी पद्यनाभनला ताब्यात घेतले. वेलुत्तम्पीचा निष्प्राण देह त्याच्या शिरासह आपल्या सेनापतीकडे घेऊन गेले. सेनापतीला आनंद झाला व त्वेषाने तो म्हणाला, “हे शव त्रिवेंद्रमपर्यंत फरफटत न्यावे आणि कण्णनमूलाच्या मोठ्या बाजारात ह्या शवाला फासावर लटकवावे. पद्यनाभनला आणि त्याच्या नातेवाईकांनाही फाशी देण्यात यावी.”

वेलुत्तम्पी दलवा १८०९ साली वयाच्या ४४ व्या वर्षी निजधामास निघून गेला. १८०८ ते १८०९ मधील सुमारे दीड वर्षाच्या काळात त्याने आपल्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी कडवी झुंज दिली. इंग्रजांकडील आधुनिक शस्त्रास्त्रांनीच त्याला हार पत्करावी लागली. तरी त्याचे नाव केरळच्या इतिहासात अमर झाले.

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!