Home Study Material वेंकप्पा नाईक

वेंकप्पा नाईक

१८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम प्रथम उत्तर भारतात सुरु झाला. दक्षिणेतही रंगो बापूजीने बहुतेक संस्थानिकांना इंग्रजांविरुद्ध चेतविले होते. नानासाहेब पेशव्यांचे दूतही दक्षिणेतील प्रत्येक संस्थानिकाला त्याचसाठी गुप्तपणे भेट होते. विजापूर व सोलापूर या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर निजामाच्या राज्यात सोरापूर हे लहानसे संस्थान होते. त्या संस्थांनात बेडर जमात बहुसंख्येने राहात होती. वेंकप्पा नाईकहा त्या संस्थानचा राजा होता. तसा तो वयाने लहानच होता. पण शूर व स्वाभिमानी होता. इंग्रज सरकारने आपल्यावर अन्याय केल्याचे त्याच्या मनात डाचत होते. १८५७ मध्ये तो सोरापूरच्या गादीवर बसला होता.

___ निजामाने इंग्रजांकडून तो पर्यंत ६२ लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते. निजामाला ते कर्ज फेडता येईना, म्हणून इंग्रज सरकारने त्याचा ५२ लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. त्यात सोरापूरचे संस्थानही होते. कर्ज फेडीसाठी निजाम सोरापूरच्या राजाकडून ३ लाख रुपये घेऊ लागला. कर्ज निजामाचे व ते फेडायचे सोरापूरच्या राजाने! हा न्याय कसा? सोरापूरचा वेंकप्पा नाईक तरुण व स्वाभिमानी त्याने आपले संस्थान निजामाच्या व इंग्रजांच्या तावडीतून सोडवून स्वतंत्र करण्याचे ठरविले. आपल्या मेव्हण्याला त्याने इंग्रजांच्या ठाण्यावर हल्ला करण्यास पाठविले. पण त्या हल्ल्यात त्याच्या मेव्हण्याला पराभव पत्करावा लागला. त्याची बोच व्यंकप्पाला होतीच. दक्षिणेतील संस्थानिकांनीही वेंकप्पाला उठाव करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे वेंकप्पा अधिकच उत्साहित झाला आणि त्याने उठावाची तयारी सुरु केली.
आपल्या सैन्यात त्याने ६०० अरब, ४०० रोहिले व आणि ५० परदेशी यांची भरती केली. त्याचे स्वतःचे सैन्य होते, ते वेगळेच. त्याचे एकूण सैन्य पाच ते सहा हजार होते. या सैन्याच्या लहान लहान तुकड्या त्याने आपल्या राजवाड्याच्या आसपास ठेवल्या. आपला शिक्षक कॅ. मेडोज टेलर यांच्या संरक्षणासाठी त्याने २५ रोहिल्यांची तुकडी नियुक्त केली.

कॅ. डेव्हीडसन या रेसिडेंटला ही सैन्यभरती खटकली. त्याने वेंकप्पाला विचारले, “एवढे सैन्य कशासाठी?” लगेच ते सैन्य कमी करण्यास वेंकप्पाला फर्मावले. वेंकप्पाचे स्वत्व त्यामुळे दुखावले गेले. परंतु मूग गिळून तो शांत झाला आणि नव्याने भरती केलेल्या सैन्याच्या लहान लहान तुकड्या आपल्या राज्यात खेडोपाडी ठेवून दिल्या. एवढे केल्यानंतर कोल्हापूर, मुधोळकडून बातम्या आणण्याचे काम वेंकप्पाने केसोराम, महंमद हुसेन व कस्तुरीराज यांच्याकडे सोपविले. बातम्यांची देवाण-घेवाण चालूच होती. आताहल्ला करण्यास हरकत नाही, असे पाहून राजाने राजवाड्यात राहूनच सैन्याला इशारा केला. खेडोपाडी विखुरलेले सैन्य एक दिवशी संध्याकाळी धावून आले व त्या सैन्याने कॅप्टन विंडहॅम च्या छावणीवर एकदम हल्ला केला. त्यात कॅम्पबेल ठार झाला. न्यू बेरी गंभीर जखमी झाला. इंग्रजांनी अधिक सैन्य आणवून वेंकप्पाच्या राजवाड्याला घेरले. वेंकप्पाला अटक केली.

[irp]
वेंकप्पावर खटला भरला. आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली. कॅ. मेडोज टेलर हा वेंकप्पाचा शिक्षक होता. त्याने रदबदली करण्याचा प्रयत्न केला. राजाने त्याला एक निवेदन दिले. त्या निवेदनात त्याने उठावात सामील असलेल्या लोकांची व उठावाशी संबंध असलेल्या लोकांची नावे सांगून टाकली. दक्षिण महाराष्ट्रातील सर्व संस्थानिक आणि विशेषतः जमखिंडीकर यांच्या नावाचा उल्लेख त्यात प्रामुख्याने होता. जतच्या जहागीरदाराचाही संबंध या उठावाशी होता, असे त्याने सांगितले. मेडोज टेलरच्या मध्यस्थीने वेंकप्पाची फाशीची शिक्षा टाळली, पण त्याला काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली त्याला काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी नेत असता, त्याने त्याला नेणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कमरेस लटकवलेले पिस्तुल सहज ओढून घेतले आणि तात्काळ ते पिस्तुल स्वतःच्या हृदयावर झाडून घेऊन प्राणोत्क्रमण केले. काळ्या पाण्याची शिक्षा शरीराचा कण न् कण झिजवत आणि मनाला कुरतडत लाजीरवाणे जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करणेच श्रेयस्कर असे त्या स्वातंत्र्यवीराला वाटले असावे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात अशा किती वीरांनी आपल्या मातृभूमीला आपले रक्त अर्पण केले. त्याला गणतीच नाही. धन्य ते वीर! आणि धन्य त्यांची स्वातंत्र्य लालसा! वेंकप्पा नाईकच्या उठावावरून दिसून येते की, दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या प्रदेशात सगळीकडे असंतोष पसरला होता. कोल्हापूर, नरगुंद, कोप्पल, मिरज, रायचूर व सोरापूर ही उठावाची केंद्र होती. ८ फेब्रुवारी १८५८च्या सोरापूरच्या युद्धामुळे कर्नाटकातील विद्रोही नेत्यांचे बेत फसले. सोरापूरच्या उठावात सामील असलेल्या बेडर, अरब व रोहिले यांना पकडण्यात आले व त्यांना जबर शिक्षा ठोठाविण्यात आल्या. सोरापूरचे संस्थान खालसा करण्यात आले व ४ मार्च १८६१ रोजी ते निजामाच्या राज्यात सामील करण्यात आले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!