Home Study Material वीर दराब

वीर दराब

सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या क्रांतिज्वाला शांत झाल्या होत्या. जनता त्या युद्धानंतर इंग्रजांनी केलेल्या क्रूर अत्याचारांच्या आठवणी काढून हळहळत होती. एके दिवशी कानपूर शहरात सरकारच्या वतीने एक दवंडी पिटविली गेली. ‘कानपूर मधील जनतेने जिल्हा कारागारासमोर हजर राहावे. दुसऱ्या दिवशी त्या कारागारासमोर अपार जनसमूह जमला. सर्वांची छाती धडधडू लागली होती. आता हे इंग्रज काय करणार म्हणून.

कारागाराच्या कर्मचाऱ्यांनी दोन प्रेते त्या जनसमूहासमोर उघड्यावर आणून टाकली. त्या प्रेतांवर कफन सुद्धा नव्हते. प्रेतांच्या चेहऱ्यावर शांती विलसत होती, तर जनसमूहाची मने श्रद्धा, प्रेम, आत्मीयता व करुणा या भावनांनी विकलित केली होती.त्या जनसमूहातून एका नुकतेच मिसरुड फुटलेल्या मुलाच्या दोन्ही डोळ्यांमधून अंगार वर्षत होता. ती दोन प्रेते होती, नारगौरचा राजा दरियाब चंद्र व त्याचा सेनापती फकीरशाह यांची. त्यानंतर काही वर्षे उलटून गेली. या दोन्ही हुतात्म्यांचे स्मरण कानपूरची जनता करीत राहिली.

एके दिवशी इटावा-फर्रुखाबाद मार्गावरुन इंग्रज सरकारचा मोठा खजिना चाललेला होता. त्याच्या संरक्षणासाठी सशस्त्र शिपाई त्या खजिन्याच्या गाड्यां बरोबर चालले होते. एका मोक्याच्या वळणावर तो खजिना येताच त्या सशस्त्र शिपायांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरु झाला. त्या शिपायांनी त्याचा प्रतिकार करुन पाहिला, पण व्यर्थ त्यांच्यातले काही शिपाई ठार झाले. काही अत्यंत जखमी झाले, उरलेले पळून गेले. तुफान गोळीबार करणाऱ्याने आपल्या साथीदारांसह तो खजिना लुटून नेला. तो गोळीबार करणारा वीर होता दराब, ज्याने काही वर्षांपूर्वी राजा दरियाबसिंह व सेनापती फकीरशाह यांची प्रेते कानपूरच्या कारागारा समोर पाहिली होती व त्याच्या विस्फारित डोळ्यात अंगार फुलला होता. पळून गेलेले शिपाई त्याच्या सहकाऱ्यांनी पकडून आणले. त्यांच्या अर्ध्या चेहऱ्यावर चुना व अर्ध्या चेहऱ्यावर काजळी फासून दराबने त्यांना दरडावून सांगितले,” तुम्ही माझे देशबांधव आहात. अत्यंत कमी पगारावर तुम्ही या हरामखोर इंग्रजांची चाकरी आपले पोट जाळण्यासाठी करीत आहात. तुमच्या त्या अन्नदात्यांना सांगा की, कोणी गोरी चामडीवाला (इंग्रज) जर माझ्या समोर आला, तर त्याला माझ्या या बंदुकीने नरकात पाठविले जाईल.”
दराबचे हे बोल आग्रा व अवधच्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या कानी त्या शिपायांनी घातले, तेव्हा ते अधिकारी दिडमुढ होऊन गेले. त्यांनी दराबला शोधण्यासाठी फार हातपाय आपटले, पण दराबला तात्या टोपे याची गनिमी काव्याची युद्धकला अवगत झाली होती. इंग्रज अधिकारी त्याच्यावर दातओठ खात होते. दराब मात्र धाडसाने इग्रंज सरकारचे खजिने लुटीतच होते. त्याच्या टोळीत शेकडो वीर तरूण होते. इटावा, कानपूर व फर्रूखाबाद हे त्यांचे लढाऊ क्षेत्र होते. काही ब्राह्मणांनाच त्याचा ठाव ठिकाणा दराब प्रत्येक पंधरवड्यात एक दिवशी हिंद नदीच्या घाटावरील नार घाटाच्या कबरस्थानात जात असतो आणि इंग्रजांच्या क्रुरतेची शिकार झालेल्या आपल्या बापाच्या कबरीवर दिवा लावीत असतो आणि मनातल्या मनात आपला संकल्प आठवीत असतो.

इटावाच्या प्रदेशात दराबने आपल्या शेकडो साथीदारासंह इंग्रज शिपायांशी मोठा लढा दिला. त्या शिपायांनी त्याच्या तळावर एकदम हल्ला केला होता. रक्ताचे व आगीचे मोठे तांडव त्या तळावर झाले आणि दराबसह त्यांचे साथीदार तेथून पसार झाले. ते त्या शिपायांच्या हाती लागलेच नाही. त्या तळावर एक

विझलेली भट्टीच फक्त शिपायांना दिसली. तिच्याजवळ एक चिट्ठी होती, ‘जीव वाचावयाचा असेल तर या भट्टीतली राख आपल्या तोंडांना फासा आणि चुपचाप चालते व्हा.’
फर्रुखाबाद जिल्ह्यातील वीरपूर या गावी दराबच्या मुलीच लग्न आहे, हे इंग्रज अधिकाऱ्यांना फितुरांच्या कडून समजले. एक इंग्रज अधिकारी आपली शिपायांची मोठी टोळी घेऊन वीरपूरला आला. त्या अधिकाऱ्याची खात्री झाली होती की, दराब आपल्या मुलीच्या लग्नासाठी निश्चितच येईल. तो अधिकारी आपल्या शिपायांसह वीरपूरला येण्याच्या आधीच दराब बुरखा घालून लग्न घरी आला व घरात जाऊन त्याने आपल्या मुलीला व जावयाला आशीर्वाद दिले. तोच तो अधिकारी लग्नघरासमोर आला. तेव्हा दराब तात्काळ त्या घराच्या छतावर चढून उभा राहून मोठ्याने गरजला. दराब आया था और अब जा रहा है। है कोई माई का लाल जो मेरा रास्ता रोके?’

[irp]

लगेच त्या अधिकाऱ्याने आपल्या शिपायांना हुकूम सोडला, ‘फायर’

त्याचवेळी दराबच्या बंदुकीतून एक गोळी सू सू करीत आली व तिने त्या अधिकाऱ्याच्या छातीचा वेध घेतला आणि तो इंग्रज अधिकारी चित्कारून धडकन जमिनीवर कोसळला व तडफडू लागला. त्याचे प्राण त्याची कुडी सोडून निघून गेले. दराबने घराच्या छतावरून उडी मारली व तो पसार झाला. शिपायांचे तर होशच उडून गेले. ते बंदुकी सरसावू लागले. तोच दरबऱ्या साथीदारांनी त्याच्यावर तुफान गोळीबार केला आणि ते सुद्धा पळून गेले.

दराबला कसे पकडावे, या विचाराने इंग्रज अधिकारी भयंकर चिंताग्रस्त झाले. आता फितुरी व प्रलोभनाशिवाय दुसरा मार्गच उरला नाही त्याचाच अवलंब त्यांनी केला.

एका संध्याकाळी दराब आपल्या पितृतुल्य वृद्ध स्नेहाच्या घरी दराब गेला. तेव्हा त्या वृद्धांने आपल्या कांपऱ्या हाताने दुधाचा पेला त्याला दिला. त्यातल्या दुधाचा घोट दराबच्या घशापर्यंत पोचताच दराबला कळून चुकले की, या दुधात जहाल विष आहे. तो घोट पोटात गेला. याच वृद्ध पुरूषांने दराबला इंग्रजांविरूद्ध बंड करण्याचा उपदेश केला होता. त्याच्यावर दराबचा पूर्ण विश्वास होता आणि त्याच्या विषयी दराबच्या मनात आदरही होता. दराब अधून मधून त्याच्या भेटीस नियमितपणे येत असे.याचा तपास इंग्रज अधिकाऱ्यांना कोणा फितुराकडून लागला होता. त्यांनी त्या वृद्धाला प्रलोभन दाखवून हे काम त्याच्याकडून करवून घेतले.

[irp]दराबने आपली बंदूक लगेच फेकून दिली. व त्याने आपले मस्तक त्या पितृतुल्य वृद्धाच्या पायांवर टेकवले व तो म्हणाला, ‘ठीक ही किया बाबा। जिन हाथोने दूध पिलाकर बडा किया, उन हाथोनेही जहरके प्याले में मेरा कलेजा डुबा दिया। ओह। मै तो चला। खुदा …..आपको ….. जिंदगी बक्शे।’

लडखडत तो आपल्या बाजी नावाच्या घोडीवर स्वार झाला. त्याला घेऊन घोडी वेगाने निघाली. त्याच्या मागून घोडेस्वार शिपाई दौडत येत होते. आता आपले काही खरे नाही, असे पाहून त्याने मोठ्या हिंमतीने आपल्या घोडीला आदेश दिला. ‘ठहर जा बाजी। लगेच तो त्या घोडीच्या पाठीवरून खाली काटेरी झुडुपात कोसळला. घोडी तेथेच आपली शेपटी हलवीत उभी राहिली.

थोड्याच वेळात ते घोडेस्वार शिपाई तेथे पोचले. घोडी त्या काटेरी झुडुपाजवळ उभी असलेली पाहून ते शिपाई तेथेच दराबला शोधू लागले. त्यांनी चहुकडे आपल्या बंदुकीच्या फैरी झाडल्या. शेवटी दराबची हलचाल न दिसल्यामुळे त्यांनी त्या घोडीजवळ जाऊन पाहिले. दराबचा मृतदेह काटेरी झुडुपात अस्ताव्यस्त पडलेला होता. त्या क्रांतीयुद्धाचा हा शेवटचा अंगार तेथे विझून पडला होता.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!