Home Study Material वीराप्पा व पटुबसप्पा

वीराप्पा व पटुबसप्पा

कर्नाटक राज्यात पूर्वी कूर्ग हे संस्थान होते. योग्य प्रशासन नसल्याचे कारण दाखवून कंपनी सरकारने ते संस्थान सन १८३४ मध्ये खालसा केले. या संस्थानचा बराच भाग डोंगराळ होता. त्या डोंगराळ भागात काही आदिवासींचा निवास होता. त्या भागात जणू त्यांचेच राज्य होते. आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे व परंपरांनुसार त्या जाती जीवनयापन करीत असत. परंतु हे संस्थान इंग्रजांनी ताब्यात घेतल्यावर या आदिवासींना इंग्रज अधिकाऱ्यांचे अत्याचार सहन करावे लागले. त्यांच्यावर इंग्रज सरकारने अनेक बंधने लादली. स्वछंदपणे जगणाऱ्या या आदिवासी जमातींना पारतंत्र्याचे जीवन कंठावे लागले. त्यांचा इंग्रजांकडून पदोपदी अपमान होऊ लागला. अत्याचार सहन करणे व अपमानास्पद जीवन जगणे त्यांना असह्य वाटू लागले. त्यामुळे इंग्रजांविषयी या आदिवासींच्या मनात असंतोष धुमसू लागला. त्यांचा असंतोष दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी अनेक उपाय योजले. परंतु त्यांचा असंतोष वाढतच गेला.
कुर्गी आदिवासी तरुण वीरप्पा याने इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितले की, “मी कुर्मी राजवंशाचा वारस आहे. म्हणून मला योग्य ते अधिकार मिळाले पाहिजेत.”परंतु इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याची मागणी फेटाळून लावली – त्याला धुडकावून लावले. या अपमानाने तो पेटून उठला. त्याने अनेक आदिवासी तरुणांचे संघटन केले. अनेक वेळा इंग्रज अधिकाऱ्यांशी टक्कर दिली. अनेक वेळा इंग्रजांच्या ठाण्यांवर हल्ले केले. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी वीरप्पाला पकडण्यासाठी मोहीम सुरु केली. वीरप्पाने वेषांतर करुन ‘अपरम्पार स्वामी’ हे नाव धारण केले. आदिवासींना इंग्रज सरकारविरुद्ध भडकावण्याचे प्रयत्न सुरु केले. इंग्रज अधिकाऱ्यांनी वीरप्पाला पकडण्याची मोहीम जोरात सुरु केली. त्यांनी कुर्गी आदिवासीमध्ये फूट पाडली. काहींना प्रलोभने दाखवून आपलेसे केले. त्यांनीही फितुरी करुन वीरप्पाला पकडण्यासाठी इंग्रजांना मदत केली. वीरप्पास पकडून बंगलोरच्या तुरुंगात डांबले. तेथे त्याचा अनन्वित छळ करण्यात आल्याने तुरुंगातच वीरप्पाचे निधन झाले.

[irp]

कुर्गी आदिवासींची गोदास ही एक उपजाती आहे. या जातीत जन्माला आलेला तरुण पट्टबसप्पा वीरप्पाच्या तुरुंगातील मृत्युने अत्यंत संतापला. इंग्रजांना कूर्गमधून हाकून लावण्याची त्याने प्रतिज्ञा घेतली. सर्व आदिवासींवरील इंग्रजांनी लादलेली बंधने दूर करण्याचा निश्चय केला. इंग्रजांविरुद्ध लढाई सुरु केली. आपल्या सैन्याला उत्तेजित करुन पटुर, वतवालपासून मंगलोर पर्यंतचा प्रदेश त्याने इंग्रजांच्या कब्जातून मुक्त केला. या प्रदेशाच्या प्रशासनाची व्यवस्था लावली. स्व जातीचे रक्षण केले. न्यायाचे व्यवस्थापन सुरु केले. इंग्रजांच्या ताब्यातून एवढा प्रदेश पटुबसप्पाने स्वतंत्र केल्याने त्याच्या आदिवासी सैन्याचा उत्साह वाढला. सैन्याने सगळा कूर्ग प्रदेश स्वतंत्र करण्यासाठी पुढे चाल केली. परंतु काही कुर्गी आदिवासी इंग्रजांना फितुर झाले. त्यांनी पैशाच्या लोभाने पटुबसप्पाला पकडून दिले. इंग्रजांनी त्याला मंगलोर मध्येच फाशी दिले. आपल्या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी जिद्दीने लढणारे हे दोन्ही वीर आपल्या बलिदानाने अमर झाले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!