Home Study Material विधा मानिक, जोधा मानिक, मुलू मानिक

विधा मानिक, जोधा मानिक, मुलू मानिक

सौराष्ट्रातील बाघेर जमात अत्यंत शूर, धाडसी, पराक्रमी व स्वातंत्र्यप्रिय होती. या जमातीचे वास्तव बहुतांशी सौराष्ट्राच्या वायव्येकडील ओखामंडल प्रदेशात होते. ओखामंडलचे प्रमुख स्थान द्वारकानगरी होते. द्वारका ही त्यांची राजधानी होती. द्वारकेजवळील बेटेही त्यांच्या ताब्यात होती. ओखामंडल हे जनपद होते. सन १८०२ मध्ये कंपनी सरकारच्या सैन्याने द्वारकेजवळच्या शंखोधर बेटावरील वाघेरांच्या किल्ल्यावर हल्ला केला. पण कंपनी सरकारचे सैन्य वाघेरांच्या जबरदस्त हल्ल्यामुळे त्या किल्ल्यात प्रवेश करू शकले नाही. म्हणून त्या सैन्याने शंखोधर बेटाच्या किनाऱ्यावरील वाघेरांची सर्व लहान मोठी जहाजे जाळून टाकली. सन १८०६ मध्ये मात्र कंपनी सरकारच्या सैन्याने शंखोधर बेट पुन्हा हल्ला करून जिंकून घेतले व तो किल्ला हस्तगत केला.

शंखोधर बेट गमावल्याचा सल वाघेर वीरांच्या मनात कायम होता. कंपनी सरकारचा अधिकारी द्वारकानगरीत राहात होता. वाघेर वीरांना सन १८२० मध्ये द्वारकेवर हल्ला करून त्या इंग्रज अधिकाऱ्याला द्वारकेतून पिटाळून लावले. ओखामंडलातील जहागीरदार कंपनी सरकारचे समर्थक होते. वाघेर वीरांनी त्या जहागीरदारांना सुद्धा कधीही सुखाचे जिणे जगू दिले नाही.
पुन्हा काही महिन्यांनी कंपनी सरकारच्या मोठ्या सैन्याने द्वारकानगरीवर योजनापूर्वक हल्ला केला. या युद्धात शेकडो वाघेर वीर मारले गेले.त्या सैन्याने द्वारकेमधून वाघेरांना हाकून दिले व ती नगरी आपल्या ताब्यात घेऊन तेथे आपली छावणी कायमची ठेवली. त्यामुळे ओखामंडलातली वाघेर जनता भयंकर खवळली. तिच्यावर नियंत्रण ठेवणे कंपनी सरकारच्या सेनाधिकाऱ्यांना अशक्यप्राय होऊन बसले. त्यामुळे कंपनी सरकारने ओखामंडल प्रदेश गायकवाड सरकारच्या ताब्यात देऊन टाकला. कंपनी सरकारचा प्रतिनिधीही तेथे राहू लागला. गायकवाड सरकारने २०० अरबांचे सैन्य द्वारकेच्या रक्षणासाठी ठेवले.

सन १८४७ साली वाघेरांचा नेता विधा मानिक याने आपल्या वाघेर वीरांसह द्वारकेवर हल्ला केला. त्या लढाईत विधा मानिक याने इंग्रज सेनाधिकारी जॉर्ज लॉख याला गोळी घालून ठार केले. तेव्हा नवानगर व पोरबंदर येथील जहागीरदारांनी आपल्या सैन्यासह विधा मानिकचा पाठलाग केला व त्याला पकडून कंपनी सरकारच्या प्रतिनिधीच्या ताब्यात देऊन टाकले.त्याने विधा मानिकला फांशी देऊन ठार केले. तरीही वाघेर वीर कंपनी सरकारच्या छावणीवर हल्ले करीतच राहिले. त्या दोघां जहागीरदारांनावाघेर वीरांनी त्रस्त करून सोडले. त्या काळात कंपनी सरकारने ओखामंडल आपल्या ताब्यात घेतले होते. कंपनी सरकारने कित्येक वाघेरांच्या जमिनी जप्त करून त्या जमिनी त्या प्रदेशातील जहागीरदारांना देऊन टाकल्याव त्या वाघेरांना अल्पसे पेन्शन देण्यात येऊ लागले. त्यामुळे वाघेर शेतकरी भयंकर संतापले. तेव्हा कंपनी सरकारने चलाखी करून पुन्हा ओखामंडल गायकवाड सरकारच्या ताब्यात देऊन टाकले.

 

सन १८५७ मध्ये हिंदुस्थानात स्वातंत्र्ययुद्ध सुरु झाले. वाघेरांच्या नवा नेता जोधा मानिक याने कंपनी सरकार, गायकवाड सरकार व त्याचे जहागीरदार यांच्याविरुद्ध लढा सुरु केला. त्या काळात १८५७ ते १८५९ या तीन वर्षात स्वामी दयानंद सरस्वती नर्मदा परिसर, गुजरात व सौराष्ट्र या प्रदेशात सारखे हिंडत होते. जोधा मानिक याला लढण्यासाठी प्रोत्साहन देत होते. वाघेर जनतेतही इंग्रज सरकारविरुद्ध आपल्या प्रवचनांतून प्रचार करीत होते. त्यामुळे हजारो वाघेर वीर जोधा मानिक याच्या लढ्यात सामिल झाले. त्याचे बळ वाढले.

सन १८५८ मध्ये कंपनी सरकारच्या सैन्याने द्वारकेतील मंदिर तोफा डागून उध्वस्त केली. मूर्तीही फोडल्या. वाघेर वीरांजवळ तोफा नव्हत्या. स्वामीजींनी या संबंधात लिहिले आहे की, “या प्रसंगी वाघेरवीर कंपनीच्या सैन्याशी शौर्याने लढले. त्यांनी अनेक इंग्रजांना ठार केले.”

सन १८५९ मध्ये जोधा मानिक याने सारे ओखामंडल जिंकून घेतले. तेव्हा गायकवाड सरकारने कंपनी सरकारकडे सैन्याची मदत मागितली. कंपनी सरकारने जोधा मानिकचा पराभव करण्यासाठी कर्नल होनर याला मोठे सैन्य देऊन पाठविले. कर्नल होनर याच्याबरोबर मोठे सैन्य आल्याचे पाहून जोधा मानिक आपल्या वाघेर वीरांसह काठेवाडात शिरला व त्याने अबपुरा डोंगरावर आपल्या सैन्याची मोर्चेबांधणी केली. ७ डिसेंबर १८५९ रोजी कर्नल होनरने त्या डोंगराला वेढा दिला. तेथे तुंबळ युद्ध झाले. वाघेर वीर परास्त झाले व जोधा मानिकने त्या डोंगरावरून आपले सैन्य काढन घेऊन जंगलाचा आश्रय घेतला.

[irp]

सन १८६० मध्ये जोधा मानिकने जुनागडच्या नबाबाच्या सैन्याशी व गायकवडांच्या सैन्याशी अनेक लढे दिले आणि त्याने कोडिनार हे महत्वाचे ठाणे जिंकून घेतले. तेथे त्याला भयंकर ताप भरला व त्या तापातच तो हे जग सोडून गेला. तेव्हा त्याची जागा मुलू मानिक या नेत्याने घेतली. देवा मानिक हा त्याचा साथीदार होता. पुन्हा जागा मुलू मानिक याने आपल्या वाघेर वीरांसह अबपुरा डोंगराचा आश्रय घेतला. कंपनी सरकारनेआणखी दोन इंग्रज अधिकारी वाघेरांचा उठाव दडपून टाकण्यासाठी पाठविले होते.
कंपनी सरकारच्या सैन्याने अबपुरा डोंगरावर जबरदस्त हल्ला केला आणि मुलू मानिकला देवा मानिकसह पकडले. त्यांना बडोद्यास आणून तुरुंगात डांबले. ते दोघे सन १८६२ मध्ये युक्तिप्रयुक्तीने तुरुंगातून निसटून ओखामंडलात पळून गेले. त्यांनी पुन्हा आपले वाघेर वीर संघटित केले आणि कंपनी सरकारच्या व गायकवाड सरकारच्या अधिकाऱ्यांवर वारंवार हल्ले करून त्यांना सळो की पळो करून सोडले.

[irp]

सन १८६८ मध्ये कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यानी सुचविल्याप्रमाणे जुनागड, गोंडल, नवानगर व पोरबंदर येथील जहागीरदारांनी एकजूट करून दोन लाख रुपये जमविले. ती रक्कम त्यांनी वाघेरांना सहाय्य करणाऱ्या छोट्या जमीनदारांकडून दंड म्हणून वसूल केली होती. या रकमेतून त्यांनी एकत्रितपणे सैन्य उभारले व ते सैन्य कंपनी सरकारच्या सेनाधिकाऱ्याकडे सुपूर्त केले. मुलू मानिक व देवा मानिक यांनी तोबरच्या डोंगरावर मोर्चेबांधणी केली होती. कंपनी सरकारच्या मोठ्या सैन्याने त्या डोंगराला चहुबाजूंनी वेढले. तुंबळ युद्ध तेथे झाले. त्यात कॅप्टन लाटूश मारला गेला व मेजर रेनाल्डस घायाळ झाला. डोंगराच्या एका बाजूला नवानगरचे सैन्य होते. त्या सैन्याला लढण्यासाठी इंग्रज सेनाधिकाऱ्यांनी बक्षिसे देण्याची लालूच दाखविली. पण त्या सैन्याने लढण्यास नकार दिला कारण आपल्याच लोकांविरूद्ध शस्त्र उचलणे त्यांना योग्य वाटले नाही. ते पाहून मुलू मानिक व देवा मानिक आपल्या वाघेरवीरांसह डोंगराच्या त्या बाजूने निसटून पळून गेले.

सन १८६४ मध्ये पोरबंदरच्या जहागीरदाराच्या साह्याने कंपनी सरकारच्या सैन्याने मुलू मानिक व देवा मानिक यांनी कोंडीत पकडले. त्या वेळच्या युद्धात मुलू मानिक ठार झाला व देवा मानिक जखमी होऊन पळून गेला. त्याचे पुढे काय झाले, ते अज्ञात आहे. अशा रीतीने वाघेर वीरांच्या हा दीर्घकाळ चाललेला लढा सन १८६८ मध्ये मोडीत निघाला. वाघेर वीरांना आपल्या प्रदेशातील जनतेचा पाठींबा असल्यामुळेच ते कंपनी सरकारच्या व कंपनीच्या मांडलीक राजे-जहागीरदारांच्या सैन्याशी दीर्घ काळ लढत राहिले, हे निर्विवाद होय. आजही या वाघेर वीरांच्या शौर्यगाथा सौराष्ट्रातील जनता मोठ्या भक्तिभावाने आपल्या लोकगीतांतून गात आहेत.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!