Home Study Material वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके

सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके यांनी २१ फेब्रुवारी १८७९ रोजी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. त्या दिवशी त्यांनी पुण्याजवळच्या धामारी गावावर पहिला दरोडा रामोश्यांच्या साह्याने घातला व ते रामोशांसह जंगलात पळून गेले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यास तशीच कारणे धाडली होती व इंग्रजांना या देशातून हाकून देण्याचा निर्धार त्यांनी केला होता.

वासुदेव बळवंत फडके हे पहिल्या स्वातंत्र्य युद्धानंतरचे उल्लेखनीय क्रांतिकारक होते. त्यांच्या आईचे नाव सरस्वती. तिचे माहेर कल्याणचे. तिच्या पोटी वासुदेवांचा जन्म त्यांच्या मूळ गावी शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी कल्याण येथे झाले. तेथेच त्यांनी डॉ. विल्सन यांच्या मिशनरी शाळेत इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे नाना शंकरशेट यांनी चालविलेल्या शाळेत ४ महिने अभ्यास केला व नंतर ते पुणे येथल्या पूना हायस्कूलमध्ये प्रवेश परीक्षेच्या वर्गापर्यंत शिकले; पण त्या परीक्षेस ते बसलेच नाहीत. त्या शाळेत त्यांनी इंग्रजी भाषेचा चांगला अभ्यास केला. त्यांचे मराठी व इंग्रजी हस्ताक्षर वळणदार होते. त्याचा उपयोग त्यांना नोकऱ्या मिळण्यासाठी झाला. पनवेल जवळच्या पाल येथील दाजिबा सोमण यांच्या सई नावाच्या मुलीशी त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी जी.आय.पी. (मध्य) रेल्वेच्या ऑफिसमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजच्या ऑफिसमध्ये व कामिसारिएट ऑफिसमध्ये कारकून म्हणून मुंबई येथे नोकऱ्या केल्या. मुंबईच्या कामिसारिएट ऑफिसमधून त्यांची बदली त्याच ऑफिसच्या पुणे येथल्या कार्यालयात झाली. पुण्याला त्यांचा चांगला जन्म बसला.
पुण्याला त्यांनी आध्यात्मिक साधनाही केली. अनेक सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या. त्यांचे मार्गदर्शन मिळविले. त्यांना व्यायामाचा, तलवारी, भाले, बंदुका चालविण्याचा छंद पुणे येथे जडला. घोड्यावर बसविण्यात ते पटाईत होते. चांगली घोडदौड करीत असत. मुलांना स्वदेश प्रेमाचे शिक्षण मिळाले पाहिजे असे त्यांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ ही संस्था स्थापन करून मुलांना राष्ट्रीय शिक्षण मिळविण्यासाठी या संस्थेत वर्ग सुरु केले. सध्याचे पुण्याचे भावेस्कूल हे त्याच संस्थेचे रूपांतर आहे.

पुण्यास आल्यावर दोन वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला; पण तो बालपणीच मरण पावला. नंतर दोन वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली. ती मथूताई मात्र जगली. सन १८७० मध्ये त्यांची आई अतिशय आजारी आहे, असे त्यांना समजले. आईला भेटण्यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्याकडे रजेचा अर्ज दिला. पण तो अर्ज त्या अधिकाऱ्याने नामंजूर केला. तेव्हा ते रजेविनाच आपल्या आईला भेटण्यासाठी शिरढोणला गेले. तेथे गेल्यावर त्यांना समजले की, आपली आई आधीच आपल्याला सोडून निघून गेली आहे. आईचे अंत्यदर्शनही त्यांना घडू शकले नाही. त्यामुळे रजा न देणाऱ्या त्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्याविषयी त्यांच्या मनात संताप धुमसू लागला. एक वर्षानंतर आईच्या वर्षश्राद्धासाठी आपल्या गावी जाण्याकरिता त्याच वरिष्ठाकडे रजेचा अर्ज दिला. पण हा अर्जसुद्धा त्या अधिकाऱ्याने नामंजूर केला. त्यामुळे ते इंग्रजांविषयीच्या सूड भावनेने पेटून उठले. इंग्रजांना आपल्या देशातून घालवून दिलेच पाहिजे, या विचाराने त्यांच्या मनात घर केले. त्यांना कसे हाकून द्यायचे, हाच विचार त्यांच्या मनात घोळू लागला.
सन १८७१ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पुण्यास बदलून आले. त्यांची स्वदेशी व्यापाराविषयीची भाषणे ऐकल्यावर वासुदेवांनी स्वदेशीचे व्रत पाळण्याचा निर्धार केला. केवळ कपडेच नव्हते, तर इतर वस्तूही ते स्वदेशात तयार होणाऱ्याच वापरू लागले. न्या. रानड्यांच्या भाषणांमधून त्यांना कळून चुकले की, इंग्रजसरकार आपल्या देशातील उद्योगधंदे बुडवीत आहे व आपल्या देशाची भयंकर लूट करीत आहे. त्याचाही परिणाम त्यांच्या मनावर इंग्रजांविरूद्ध उठाव करण्यासाठी कारणीभूत ठरला आणि ते तशा प्रयत्नांना लागले.

सन १८७३ मध्ये त्यांची प्रथम पत्नी सईबाई हिचे निधन झाले. त्यांचे दुसरे लग्न काशीनाथ शास्त्री कुंटे यांच्या गोदूताई नावाच्या मुलीशी झाले. सासरचे तिचे नाव गोपिकाबाई असे ठेवण्यात आले. याच ‘बाई फडके होत. त्या शरीराने घडधाकट होत्या. वासुदेवांनी त्यांनाही शस्त्रे चालविण्यात व घोड्यावर बसण्यात तरबेज केले होते.

वासुदेवांनी पुण्यात आळीआळीतून इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरूद्ध अनेक व्याख्याने दिली. पुण्यातील सुशिक्षित मंडळीही त्यांची भाषणे एकत असे. आपला देश इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झालाच पाहिजे. त्यासाठी सुशिक्षित-अशिक्षित सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी धनिकांनी पैशांची तरतूद करायला हवी. असे विचार ते आपल्या भाषणांमधून लोकांना पटवून देऊ लागले.

सुशिक्षत लोक त्यांची भाषणे आवडीने ऐकत असत. पण ते जे विचार मांडीत, ते अविचाराचे आहेत, असेच त्यांना वाटत असे. कारण इंग्रजांच्या भारतातील बलाढ्य सत्तेला नाहीसे करणे, हे त्यांना आकाशातले फूल तोडण्या इतके अशक्यप्राय वाटत असे. हा एकटा मनुष्य काय करू शकणार? असेही त्यांना वाटायचे. वासुदेव बळवंतांचे विचार वेडगळपणाचे आहेत, असेही पुण्यातल्या सुशिक्षितांना वाटायचे. ते म्हणत, इंग्रजी राज्य नष्ट झाले पाहिजे, हे खरेच. पण त्यासाठी आमच्याकडून मदतीची किंवा धनाची अपेक्षा करू नका.’ अखेर पुण्यातल्या सुशिक्षित वर्गाने त्यांना साथ दिलीच नाही.
सन १८७६-७७ च्या दुष्काळाने महाराष्ट्रात फार मोठा कहर मांडला. त्यात लक्षावधी लोक अन्नान्न दशा होऊन मरण पावले. पण इंग्रज सरकारने त्या तडफडणाऱ्या लोकांसाठी काहीही केले नाही. सरकार आपले कर्तव्य विसरले. याचाही भयंकर संताप वासुदेव बळवंतांना आला. पण त्या भुकेने तडफडणाऱ्या जनतेसाठी ते काहीही करू शकतले नाहीत. त्यांच्यासाठी लोकांना आवाहन करून धान्य किंवा पैसा ते जमवू शकले नाहीत. तेही एवढा पैसा कोठून आणणार?

इंग्रजांविरूद्ध उठाव करायचा, तर त्यांनी ठरविलेच होते. त्यासाठी त्यांनी दीर्घ मुदतीच्या रजेचा अर्ज आपल्या ऑफिसकडे पाठवून दिला. त्यांनी दाढी-मिशा व जटा वाढविल्या. खांद्याला झोळी आडकवून ते महाराष्ट्रभर व मध्यप्रांतात ही हिंडले. आपल्या विचाराचे कोणी भेटले काय, याचा तपास केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.

महाराष्ट्रातली सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात राहणारी रामोशी जमात आपणांस साथ देईल, असे आता त्यांना वाटू लागले. ही जमात बलदंड, धाडशी, बेडर, प्रामाणिक व पराक्रमी म्हणून शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध होती. दुसऱ्या बाजीरावाने त्यांची वतने काढून घेतली होती व ती वतने खूप प्रयत्न करूनही इंग्रज सरकारने त्यांना परत दिली नाहीत. म्हणून ते सुद्धा इंग्रज सरकारावर चिडलेले होतेच. महाराष्ट्रात त्यांची वस्ती १७ ते १८ हजारावर होती. हे लोक शेळ्या-मेंढ्या पाळीत व दरोडेही आपल्या पोटपाण्यासाठी घालीत असत. वासुदेव बळवंतांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात व जंगलात हिंडून रामोशांच्या म्होरक्यांच्या गाठी घेतल्या. त्यांच्या साह्याने २०० रोमोशी संघटित केले. सुमारे २०० रामोशी लोणीकारभोरला एकत्र जमविले. त्यांना जेवण दिले व फेटेही बांधले. आपला हेतू त्यांनी आधीच त्यांच्या म्होरक्यांना सांगितलेला होता. ते सारे एकजुटीने वासुदेव बळवंतांच्या पाठीशी उभे राहिले. आत या लोकांच्या व त्यांच्याकुटुंबियांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी गावोगावच्या धनिकांच्या घरांवर दरोडे घालण्याशिवाय त्यांना तरणोपायच नव्हता. त्यांनी इंग्रज सरकारचे खजिने लुटायचे ठरविले. कारण कोठूनही पैसा मिळणे शक्यच नव्हते. त्यांना पुण्यातले गोपाळराव साठे व विष्णुपंत हे दोनच सुशिक्षित साथीदार मिळाले होते. पण तेही सामान्य कुटुंबातलेच होते. दरोडे घालण्याची सुरूवात करण्याआधी त्यांनी आपली पत्नी गोपिकाबाई हिला तिच्या मामाच्या घरी पोहचविले व ते प्रापंचिक व्यापातून मुक्त झाले.
वासुदेव बळवंतांनी पहिला दरोडा पुण्याजवळच्या धामारीया गावात घातला. त्यामुळे त्यांचा व त्यांच्या रामोशी साथीदारांचा उत्साह वाढला. नंतर त्यांनी मोठ्या धाडसाने पुण्यातल्या भांबुर्डे (सध्याचे शिवाजीनगर) येथील खजिना लुटला. तो खजिना तेथल्या एका भक्कम वाड्यात होता व रक्षकही तेथे मोजकेच होते. हा सरकारी खजिना लुटला गेला, हे पाहून इंग्रज सरकार खळबळून जागे झाले व सरकारने त्याचा तपास लावण्यासाठी मेजर डॅनिअलची नेमणूक केली. वासुदेव बळवंतच या दरोड्याचा म्होरक्या आहे, याचा सुगावा मेजर डॉनियलला लागला व त्याने पोलिसांची एक तुकडी घेऊन त्यांच्या घरावर छापा मारला. त्यांच्या घरातली अनेक शस्त्रे त्याने जप्त केली. मुंबईच्या गव्हर्नरने वासुदेव बळवंताला पकडून देणाऱ्यास चार हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. कारण वासुदेव बळवंताने पुणे व सातारा जिल्ह्यात दरोडे घालण्याचे सत्रच चालू केले होते. आता त्याच्याकडे ३०० रामोशी व कोळी यांची फौज होती. दौलतराव नाईक हा त्यांचा शूर व धाडसी पुढारी होता. तो वासुदेव बळवंतांचा उजवा हातच बनला. सरकारने वरील इनाम जाहीर केल्यानंतर वासुदेव बळवंतांनीही मुंबईच्या गव्हर्नरचे मुंडके आणून देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. हे इनाम जाहीर झाल्यावर सारी जनता आश्चर्य चकित व उत्सुकही झाली.

[irp]

आता पुण्यात व पुण्याभोवतालच्या परिसरात जिकडे तिकडे पोलिसांचा सुळसुळाट झाला होता. म्हणून वासुदेव बळवंतांचे उजवे हात असलेले दौलतराव नाईक आपल्या टोळीसह कोकणात उतरले. १० व ११ मे १८७९ रोजी त्यांनी पळस्पे व चिखली ही दोन गावे लुटली. त्या लुटीत त्यांना दीड लाख रुपये मिळाले. दौलतराव तुळशीच्या खोऱ्यातून घाटमाथ्याकडे निघाले. त्यांना मेजर डॅनिअलने आपल्या शिपायांसह गाठले. चांगली चकमक उडाली तीत दौलतराव मारले गेले. डॅनिअलने ती लूट हस्तगत केली. ते ऐकल्यावर वासुदेव बळवंत अत्यंत निराश झाले व ते निजाम हद्दीतल्या श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन येथे निघून गेले.

१३ मे १८७९ रोजी पुण्यातल्या बुधवारवाडा आणि विश्रामबागवाडा या दोन्ही मोठ्या पेशव्यांच्या इमारतींना आगी लागल्या. या दोन्ही वाड्यांत इंग्रज सरकारची कार्यालये होती. त्या आगीविषयीही सरकारला वासुदेव बळवंतांचा संशय आला. देशातल्या अँग्लो इंडियन पत्रांनी या दोन्ही घटनांविषयी चांगलेच काहूर उठविले. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही त्या बद्दल चर्चा झाली व वासुदेव बळवंतांचे बंड मोडून काढण्याची मागणी करण्यात आली.

___ मल्लिकार्जुन येथे वासुदेव बळवंतांच्या अंगात चांगलाच ताप भरला. अशा स्थितीतच ते गाणगापुरास आले. श्रीदत्त हे त्यांचे उपास्य दैवत होते. तेथे त्यांनी उपासना सुरू केली. निजाम हद्दीतील रोहिल्यांची सेना उभारावी असे त्यांचे मनाने घेतले. त्यासाठी त्यांनी काही प्रमुख रोहिल्यांशी संगनमत केले. त्यांना आगाऊ पैसा देण्याची तजवीज वासुदेव बळवंत करू लागले. वासुदेव बळवंतांचा परिचय असलेली पुण्यातली एक बाई त्या काळात गाणगापुरला गेली होती. तेथे तिने त्यांना पाहिले. पुण्यास परत आल्यावर एका देवळात प्रवचन ऐकतांना त्या बाईने आपल्या शेजारी बसलेल्या आपल्या मैत्रिणीला सांगितले की, “मी वासुदेव बळवंतांना गाणगापुरात पाहिले.” हे बोलणे त्यांच्या मागे बसलेल्या एका जमादारणीने ऐकले व घरी जाऊन तिने आपल्या जमादार नवऱ्याला ती बातमी सांगितली. तो लगेच मेजर डॅनियलकडे गेला व वासुदेव बळवंत हे गाणगापूर येथे आहेत, असे त्याला त्या जमादाराने सांगितले. डॅनियल ती बातमी ऐकताच एकदम खुश झाला.

मेजर डॅनियल आपल्या पोलिसांच्या तुकडीसह गाणगापुरास निघाला. वासुदेव बळवंत देवनावडगी येथे एका मंदिरात झोपले आहेत, असे त्याला समजताच तो आपल्या पोलिसांसह रात्रीच देवनावडगीस आला. त्या देवळात झोपलेल्या अवस्थेत त्याने वासुदेव बळवतांना पकडून जेरबंद केले. गाणगापुरास येऊन त्याने वासुदेव बळवंतास भेटलेल्या रोहिल्यांबाबतही चौकशी केली. २३ जुलै १८७९ रोजी वासुदेव बळवंतांना पुण्यास आणले. त्यांच्या १५ सहकाऱ्यांनाही पकडण्यात आले. तुरूंगात त्यांचा खूप छळ करण्यात आला. त्यांच्या विरूद्ध पुरावे जमविण्यात तीन महिने गेले.

[irp]

२२ ऑक्टोबर १८७९ रोजी पुण्यातल्या कोर्टात न्यायाधीश न्यून हॅम यांच्या समोर त्यांची सुनावणी सुरू झाली. त्यांचे वकीलपत्र घेण्याचे धाडस पुण्यातल्या एकाही वकीलात नव्हते. तेव्हा सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले. दुसऱ्यादिवसांपासून साक्षीदारांच्या साक्षी घेण्यास सुरूवात झाली. गाणगापुराकडून आणलेल्या रोहिल्यांच्याही साक्षी झाल्या. सरकारी वकील नानाभाई हरिदास यांनी वासुदेव बळवंतांवरील आरोप वाचून दाखविले, ते असे

(१) इंग्रज सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे. (२) त्यासाठी माणसे व पैसा जमविणे. (३) पैसा जमविण्यासाठी दरोडे घालणे. (४) सरकार विरुद्ध जनतेचे मन कलुषित करणे.

पुण्यातील कोर्टातले कामकाज संपल्यावर हा खटला मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात वर्ग करण्यात आलावरिष्ठ न्यायालयात मुंबईचे सुप्रसिद्ध वकील महादेव चिमणाजी आपटे यांनी वासुदेव बळवंतांचे वकीलपत्र घेतले. त्यांनी साक्षीदारांची उलटतपासणी केली. त्यानंतर वासुदेव बळवंतांचे वक्तव्य झाले. “त्यात त्यांनी जनता उपासमारीने इंग्रजांच्या राजवटीत मरते आहे, इंग्रज नोकरांना भरमसाठ पगार व देशी नोकरांना तुटपुंजा पगार दिला जातो दुष्काळात लाखो लोक मरण पावले, तरी सरकारने तिकडे लक्ष दिले नाही. हे माझ्याच्याने पाहवले नाही; म्हणून मी इंग्रज सरकारविरुद्ध बंड केले. त्यात मला यश मिळाले नाही, पण परमेश्वराला माहित आहे की, मी हे माझ्या देशासाठी केले. हिंदुस्थानातील लोक हो! माझ्यामुळे तुम्हांला काही सुद्धा लाभ झाला नाही, याबद्दल तुम्ही मला क्षमा करा.”

अखेर न्यायाधीशाने वासुदेव बळवंतांना काळ्या पाण्याची व इतरांना सक्त मजुरीच्या कमी-अधिक शिक्षा ठोठावण्यात आल्या. जमलेल्या जनसमुदायाने “वासुदेव बळवंत की जय” असा त्यांचा जयजयकार केला. त्यांच्या देशभक्तीची प्रशंसा करणारे लेख सर्व देशी वर्तमानपत्रातून छापून आले. वासुदेव बळवंतांना ठाण्याच्या तुरूंगात डांबण्यात आले. त्यांनी पूनायाची मागणी केली, तीही फेटाळून लावण्यात आली.

[irp]

९ जानेवारी १८८० रोजी त्यांना ‘तेहरान’ या आगबोटीने एडन येथे नेण्यात येऊन तेथल्या तुरूंगात बंदिस्त केले. तेथेही त्यांचे फार हाल करण्यात आले. तेथल्या भयंकर उष्ण व रखरखीत वातावरणाचा ही त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम झाला. तेथल्या हालांना कंटाळून त्यांनी १२ ऑक्टोबर १८८० रोजी एडनच्या तुरूंगातून पलायन केले. ते सलग १२ मैल पळत गेले. शेवटी बिरआबेद येथे त्यांना घोडेस्वार शिपायांनी पकडूनएडनच्या तुरूंगात आणले. त्यांच्यावर कडक पहारा बसविण्यात आला, तसेच खूप छळही करण्यात आला. अखेर त्यांना क्षयरोगाने पछाडले.

__ १७ फेब्रुवारी १८८३ रोजी सायंकाळी ४.२० वाजता त्यांचे त्या तुरूंगात निधन झाले. आपल्या वैयक्तिक सामर्थ्याची पराकाष्ठा करून गुप्तपणे संघटना उभारणारा, स्वातंत्र्याचा प्रचार बेडरपणे करणारा, आपल्या तुटपुंज्या शस्त्रबळाने मूठभर साथीदारांसह इंग्रजांच्या सत्तेशी लढणारा हा थोर क्रांतिकारक अनंतात विलीन झाला. महाराष्ट्रातील तरूणांना तो स्वातंत्र्य-प्रेमाचा धडा शिकवून गेला, त्यांचा लढा २१ फेब्रुवारी १८७९ ते २० जुलै १८७९ एवढ्या सहासातच महिने सुरू होता, तरी त्याला सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात विशेष महत्व आहे.

“काँग्रसच्या स्थापनेस वासुदेव बळवंतांचा हा हादराच कारणीभूत झाला.” असे वेडरबर्न यांनी काँग्रेसचे संस्थापक ह्यूम यांच्या चरित्रात म्हटले आहे.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!