Home Study Material राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई

सिंहासन हिले उठे, राजवंशोने भृकुटी तानी थी।
बुढे भारत में भी आयी, फिरसे नई जवानी थी।
गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी।
दूर फिरंगी को करने सबने मन में ठानी थी
चमक उठी सनसत्तावन में वह तलवार पुरानी थी।
बुंदले, हरबालों के मुँह हमने सुनी कहानी थी।
खूप लडी मर्दानी वह तो झाँसीवाली रानी थी।

स्व. सुभद्राकुमारी चौहान यांची ही कविता भारतातील हिंदी प्रदेशातच नव्हे, तर महाराष्ट्रातही ज्याच्या त्याच्या तोंडी होती. आज ही ती कविता अमर झालेली आहे. राणी लक्ष्मीबाईची वीरता, तिचा पराक्रम केवळ हिंदी कवियित्रीनेच गायिली नाही, तर तिला पराभूत करणाऱ्या सर ह्यू रोजने सुद्धा तिचे गुणगान अशा शब्दांत केलेले आहे.

“राणी लक्ष्मीबाई जशी दुर्धर शौर्याची व दुर्दम्य धैर्याची मूर्ती होती, तशीच निस्सीम औदार्याचीही देवता होती. काल्पीच्या प्रतिपक्षात तिचेच भय सर्वाधिक होते. राणी या नात्याने तिची प्रतिष्ठा सर्वांहून जास्त होती. त्या सगळ्यांमध्ये झाशीची राणी ही सर्वोत्कृष्ट व वीरश्रेष्ठ सेनानी होती.”

राणी लक्ष्मीबाई ही एक कुशल योद्धा तर होतीच, त्याबरोबर ती योग्य प्रशासक, पतिव्रता, ममतामयी व दिलदार ही होती.तिचे विचार धर्मनिरपेक्ष होते. तिच्या सैन्यातील हिंदूच्या प्रमाणे मुसलमान सैनिकांचीही तिच्यावर अढळ निष्ठा होती.
राणीचे वडील मोरोपंत तांबे हे काशी येथे दुसऱ्या बाजीरावाचे कनिष्ठ बंधू चिमाजी अप्पा यांच्या आश्रयाला होते. तिच्या आईचे नाव भागीरथीबाई. तिच्या पोटी राणी लक्ष्मीबाई हिचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ रोजी काशी या नगरीत झाला. पण दुर्दैव असे की, तिच्या वयाच्या तिसऱ्या वर्षीच भागीरथीबाई ही इहलोक सोडून गेल्या. त्यानंतर मोरोपंतांचे आश्रयदातेही त्याच काळात कालवश झाले. तेव्हा ब्रह्मावर्त (विठुर) येथे इंग्रज सरकारचे पेन्शन घेत दुसरा बाजीराव राहात होता, त्याने मोरोपंतांना ब्रह्मावर्तास बोलावून घेऊन त्यांची नेमणूक आपल्या होम शाळेत केली. लक्ष्मीबाईचे जन्मनाव मनू असे होते. तीन चार वर्षांची मनू शरीराने उफाड्याची, सडपातळ व गौर वर्णाची होती. तिचे डोळे कमळासारखे सुंदर, चेहरा गोलसर, भव्य कपाळ, नाक चाफेकळीसारखे होते. ती चुणचुणीत असून बाजीरावाच्या वाड्यात तिचा मुक्त संचार होता. म्हणून बाजीरावतिला ‘छबेली’ या नावाने हाक मारीत असे. तेथे छबेली हेच तिचे नाव प्रचलीत झालेले होते.

बाजीरावाचे दत्तक पुत्र नानासाहेब (धोंडोपंत) त्यांचे चुलतभाऊ दादासाहेब व बाळासाहेब यांना शिकविण्यासाठी बाजीरावाने एक शिक्षक ठेवले होते. त्यांच्याबरोबरच मनूही शिकू लागली. घोड्यावर बसणे, तलवारीचे हात करणे, लहानशी बदूंक चालविणे, नेमबाजी करणे यातही ती त्यांच्याबरोबर प्रवीण झाली. ती जेव्हा आठ वर्षांची झाली, तेव्हा तिचे लग्न तिच्या भाग्याने झांशीचे संस्थानिक गंगाधरराव यांच्याशी झांशी येथे दुसऱ्या बाजीरावाने थाटामाटात करून दिले. तिचे सासरचे नाव ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. एका भिक्षुकाशी कन्या झांशीची राणी झाली.

लक्ष्मीबाईचे पती गंगाधरराव नेवाळकर हे २७ डिसेंबर १८४२ मध्ये झांशीच्या गादीवर आले. ते जेव्हा गादीवर आले, तेव्हा सगळ्या संस्थानावर कंपनी सरकारचे वर्चस्व होते. कंपनीच्या धोरणाप्रमाणे झांशी संस्थानशी कंपनी सरकारने नवा तह गंगाधररावांशी केला व तैनाती फौजेच्या खर्चासाठी झांशी संस्थानमधील २,२७,४५८ रुपये वसुलीचा प्रदेश आपल्या राज्यात सामील करून घेतला. गंगाधररावांच्या राज्यात त्यांची प्रजा सुखाने नांदत होती. त्यांच्या संस्थानाची शिबंदीही भरपूर होती. त्यांचे २२ हत्ती होते. ह्यातला सिद्धबक्श नावाचा हत्ती प्रचंड होता. त्या हत्तीचे सर्व अलंकार, अंबारी व हौदा सोन्याचा होता. त्यांच्या फौजेत ५००० शिपाई, ५०० घोडेस्वार, १०० घोड्यांची खास पागा व चार तोफखाने होते. त्यात अनेक लहानमोठ्या तोफा होत्या.
सन १८५१ मधील मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला राणीला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. तेव्हा गंगाधररावांना अत्यानंद झाला. पण तीन महिन्यातच तो पुत्र मरण पावला. त्याचा जबरदस्त धक्का गंगाधररावांना बसला. त्यांची प्रकृती ढासळू लागली. संस्थानच्या भविष्याची त्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांच्याच घराण्यातील श्री. वासुदेवराव नेवाळकर यांचा पुत्र आनंदराव याला त्यांनी दत्तक घेतले. त्या दत्तक विधानाच्या वेळी गंगाधरपंतांनी बुंदेल खंडाचे पोलिटीकल एजंट मि. एलिस, सैन्याधिकारी मेजर मार्टिन व रेसिडेंट मि. गार्डन यांना मुद्दाम बोलावून घेतले. त्यांच्या समक्ष दत्तक विधानाचा सोहळा पार पडला. मुलाचे नाव ‘दामोदर’ असे ठेवण्यात आहे. त्यावेळी तो ५ वर्षांचा होता. त्यानंतर गंगाधररावांची प्रकृती फारच खालावू लागली. आता आपले काही खरे नाही, असे पाहून त्यांनी पोलिटिकल एजंट मि. एलिस यांच्या मार्फत गव्ह. जनरस लार्ड डलहौसी याला एक खलिता पाठविला. नंतर ते २१ नोव्हेंबर १८५३ रोजी निधन पावले. तो असा

“माझे देहावसान झाले, तर आजपर्यंत मी सरकारशी प्रामाणिकपणे वागत आलो, या गोष्टीचा विचार करून माझ्या या दत्तक मुलावर सरकारने मेहेरनजर ठेवावी. माझी पत्नी ह्यात आहे, तोपर्यंत संस्थानची मालकीण व दत्तकमुलाची मातोश्री समजून संस्थानची व्यवस्था तिच्याकडे सोपवावी. तिला कोणत्याही प्रकारे त्रास पोहोचू देऊ नये.”

पण डलहौसी हा साम्राज्यवादी. त्याने गंगाधररावांच्या या खलित्याला वाटाण्याचा अक्षता लावल्या व मेजर डी. ए. माल्कम यांना आदेश दिला. तो असा

“झांशीचे महाराज २१ नोव्हेंबर १८५३ रोजी कैलासवासी झाले. त्यांनी मरणापूर्वी दामोदरराव ह्यास दत्तक घेतले आहे. परंतु नामदार गव्ह. जनरल ह्यांनी ते दत्तकविधान नामंजूर केल्यामुळे हिंदुस्थान सरकारचे सेक्रेटरी ह्यांच्याकडून ७ मार्च १८५४ चा हुकूम आल्याप्रमाणे झांशी संस्थान इंग्रज सरकारच्या अंमलात सामील करण्यात आले आहे. त्याप्रमाणे या जाहीरनाम्याद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येत आहे की, झांशी प्रांत तूर्त बुंदेलखंडाचे पोलिटिकल एजंट मि. एलिस यांच्या ताब्यात दिला आहे. म्हणून झांशी प्रांतातील सर्व प्रजेने आपण इंग्रज सरकारचे अंमलासाठी आहोत असे समजून मेजर एलिस साहेबांस वसूल देत जावा आणि सुखी व संतुष्ट राहावे. कळावे.” १३ मार्च १८५४.

___ हा जाहीरनामा लक्षात घेऊन आपले झांशी संस्थान खालसा झाल्याचे ते भयानक वृत्त ऐकताच राणी लक्ष्मीबाई मेजर एलिस समोर त्वेषाने उद्गारली, “मैं मेरी झांशी नहीं दूंगी।” ते ऐकताच मे. एलिस चमकलाच. पण या पाच शब्दांमागे केवढे वादळ दडलेले आहे, याची त्याला त्यावेळी कल्पना आली नाही. ते राणीचे दुःखोद्गार आहेत, असेच तो समजला. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईने आपला एक स्वतंत्र खलिता कंपनी सरकारला लिहिला. त्यात आपले व आपल्या दत्तक पुत्राचे न्याय्य हक्क मंजूर करण्याविषयी विनंती केली. पण त्याचा परिणाम राणीला सालाना ६०,००० रुपये पेन्शन तहह्यात कंपनी सरकारने मंजूर केले व तिला राहण्याकरिता झांशी शहरातील तिचा राजवाडा देण्यात आला.
स्वातंत्र्ययुद्ध सुरू होऊन ६/७ महिने होऊन गेले होते. २० सप्टेंबरला दिल्ली, ६ डिसेंबरला कानपूर आणि २१ मार्च १८५८ ला लखनौ ही महत्वाची तीन केंद्रे इंग्रजांनी जिंकून घेतली होती. आता ते इतर ठिकाणांचा समाचार घ्यायला मोकळे झाले होते. १६ मार्च १८५८ रोजी इंग्रजांनी झांशीचे राज्य खालसा केले. राणी लक्ष्मीबाईने युद्धाची तयारी सुरू केली. किल्ल्याच्या तटाची डागडुजी सुरू केली. बंदुका, तोफा, दारूगोळा तयार करण्याचा कारखाना सुरू केला. अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवून ठेवला.आपले सैन्य सज्ज केले. राणीने स्त्रीसैन्य तयार केले होते, तेही युद्धास तत्पर झाले. झलकारी, सुंदर व काशी ह्या राणीच्या अंगरक्षक होत्या. युद्ध सुरू होणार, असे झांशीच्या जनतेलाही कळून चुकले. राणीने बंडाचा झेंडा उभारला. ते समजताच सर ह्यू रोज दक्षिणेकडून मजला मारीत झांशीवर चालून आला. १९ मार्च रोजी त्याने झांशीजवळ चंचलपूरला येऊन तळ ठोकला. त्याने राणीला व तिच्या वडिलांना ५/६ निवडक लोकांसह आपल्या तळावर निःशस्त्र येण्याचा निरोप दिला तो राणीने धुडकावून लावला. तेव्हा २३ मार्च १८५८ रोजी त्याने झांशीला वेढा दिला. युद्ध सुरू झाले.

इंग्रजांचे सैन्य ताज्या दमाचे कवायती व शिस्तबद्ध होते. त्यांच्याजवळ भरपूर व लांब पल्ल्याच्या चांगल्या तोफा होत्या. त्यांच्या तोफांचा भडिमार सुरू झाला. त्याला राणीच्या गोलंदाजांनी चांगले प्रत्युतर दिले. गुलाम गोषखान व कुँवर खुदाबक्ष या राणीच्या गोलंदाजांनी चांगली बहादुरी दाखविली. झलकारीच्या पतीने-पूरचंदाने अविरत तोफांचा मारा केला. झलकारी त्याला मदत करीत होती. राणीने काल्पीला तात्या टोपे आणि रावसाहेब पेशवे यांना मदतीसाठी सैन्य पाठविण्याचा निरोप दिला होता. त्या सैन्याची ती वाट पाहात होती.

सर ह्यूरोज याने काल्पीकडून राणीच्या मदतीला सैन्य येऊ नये म्हणून काल्पीकडे ५० मैलांवर आपल्या सैन्याची एक तुकडी तोफखान्यासह पाठवून दिली. तिने काल्पीचा मार्ग रोखून धरला. तात्या टोपे तोफखान्यासह २०/२२ हजार सैन्य घेऊन निघाला. पण मार्ग रोखून धरलेल्या त्या इंग्रज सैन्याशी त्याला झुंज द्यावी लागली. त्यात तात्याचा पराभव झाला व त्याला आपल्या तोफा टाकून देऊन माघार घ्यावी लागली. सैन्याची मदत येण्याची राणीची आशा दुरावली. इकडे निकराची लढाई सुरू होती. तात्याला माघार घ्यावी लागली, त्यामुळे इंग्रजांचा उत्साह वाढला. त्यांनी नव्या जोमाने किल्ल्याच्या तटावर निकराचा मारा चढविला. त्या तोफ गोळ्यांनी किल्ल्यात आणि झांशी शहरात हाहाकार उडवून दिला. शहरात त्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अनेक इमारतींना आगी लागल्या. राणी विषण्ण मनाने तटावरून ते भीषण दृश्य पाहात होती.

राणीने आता निकराने शेवटचा मारा करायचे ठरविले. पुरुषी वेषात ती आपल्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन युद्धात शिरली. तिच्या बरोबर तिचे सरदार ही इंग्रज सैन्यावर तुटून पडले. राणी रणांगणात बरीच आत शिरली तिने कित्येक गोरे कापून काढले. तेव्हा तिच्या एका वृद्ध सरदाराने तिला परत फिरण्याचा सल्ला दिला व ती आपल्या सरदारांसह किल्ल्यात परतली. तिचा एक गोलंदाज दुलाजी ठाकूर याने फितुरी करून इंग्रजांना किल्ल्याच्या तटावर चढण्याचा मार्ग दाखविला. त्यानुसार इंग्रज सैन्यानेकिल्ल्याच्या तटाशी गवताचे भारे रचून त्यांचा जिना तयार करण्यास झपाट्याने सुरूवात केली. आता किल्ला सोडून जाण्याशिवाय मार्ग उरला नाही, असे त्या वृद्ध सरदाराने राणीला सांगितले. किल्ला सोडण्याचे ठरले. तेव्हा तिची शूर दासी झलकारी पुढे आली व तिने स्वतः राणीचा वेष धारण करून एका पाढया घोड्यावर बसून काही सैनिकांसह किल्ल्याबाहेर उतरून लढाई करावी आणि अंधार पडू लागताच राणीने गुप्त मार्गाने आपल्या निवडक सैन्यासह किल्ल्याबाहेर पडून काल्पीकडे निघून जावे, असे सांगितले. राणीला झलकारीचा उपाय पसंत पडला व झलकारी राणीच्या वेषात युद्धात पडली. राणी सैन्यासह काल्पीकडे निर्वेधपणे निघून गेली. त्या युद्धात झलकारी व तिचा पती मारले गेले.
राणीचा युद्धातला पराक्रम पाहून ह्यु रोज आश्चर्यचकीत झाला होता. राणी किल्ल्यातून निघून जाऊन काल्पीकडे गेली, असे त्याला समजले. तेव्हा त्याने लेफ्ट. बोअर याला तिच्या पाठलागावर पाठविले. त्याने राणीला गाठले. निकाराची चकमक उडाली. त्यात राणीने बोअरला चांगलेच जखमी केले. बोअर परतला. राणी भरधाव वेगाने काल्पीकडे निघाली. तिने आपल्या पाठीशी आपला दत्तक पुत्र याला धोतराने बांधून घेतले होते. सलग २४ तास दौंड करून ती काल्पीला पोचली. तेव्हा रावसाहेब पेशव्यांने तिचे सांत्वन केले.

[irp]

इकडे इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यात प्रवेश केला. त्यांनी राणीच्या उरलेल्या सैन्याची व लोकांची अमानुष कत्तल केली. इंग्रज सैनिकांनी किल्ल्यात व शहरात बेसुमार लूट केली. हजारो अबालवृद्धांना ठार केले. राणीचे वडील मोरोपंत जखमी झाले. त्यांना पकडून आणून राणीच्या राजवाड्यासमोर फांशी दिले. झांशीचा ताबा घेऊन तिथली व्यवस्था लावल्यावर सर ह्यू रोज आपल्या सैन्यासह काल्पीकडे निघाला. तो काल्पीला पोहचल्यावर तीन दिवस उभय पक्षात तुंबळ युद्ध झाले. त्याने काल्पीवर ताबा मिळविला. राणीने तात्याला व रावसाहेबाला ग्वाल्हेर सर करण्याचा सल्ला दिला. त्यांनी ग्वाल्हेरकडे मोर्चा वळविला.

ग्वाल्हेरजवळ आल्यावर रावसाहेबाने जयाजीराव शिंदे याला सहकार्य करण्याचा निरोप पाठविला. पण शिंद्यांचे दिवाण दिनकरराव राजवाडे यांनी जयाजीराव शिंद्यांसह त्यांच्यावरच हल्ला चढविला. त्यात शिंदे पराभूत झाले व दिनकर रावांच्या सल्ल्यानुसार ते दोघेही आपल्या लव्याजम्यासह आग्याला इंग्रजांच्या आश्रयास निघून गेले. ग्वाल्हेर रावसाहेब, तात्या व राणी लक्ष्मीबाईने जिंकले. तेथे त्यांच्या हाती शिंद्यांचा प्रचंड खजिना आला. रावसाहेबांने तिथे स्वतःला पेशवा म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. विजयानेधुंद झालेल्या रावसाहेब पेशव्यांने आनंदोत्सव सुरु केला. अन्नकोट व ब्राह्मण भोजने, दक्षिणावाटप शिंद्यांच्या संपत्तीतून सुरु झाले. ते १५/१७ दिवस चालले. राणी नवलखा बागेत उतरली होती. रावसाहेबाने ३ जूनला दरबार भरविला. त्यात राणी उपस्थित राहिली नाही. कारण तिला रावसाहेबाचे हे कृत्य पसंत नव्हते. पेशव्यांनी युद्ध सज्जता करण्याचे सोडून असे वागावे? त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.

४ जून रोजी ह्यू रोज काल्पीहून ग्वाल्हेरकडे वळला. इंग्रजांचे सैन्य जवळ येऊन ठेवले. तात्या टोपे लगेच युद्धास सज्ज झाला. १६ व १७ जून रोजी ग्वाल्हेरला युद्ध सुरू झाले. मुरार छावणी इंग्रजांच्या ताब्यात आली. १७ जून रोजी ब्रिगेडियर स्मिथने फुलबागेवर हल्ला केला. राणीच्या तोफखान्याने इंग्रजांची दाणादाण उडविली. तिने अनेक गोऱ्यांना ठार केले. राणी दिवसभर पुरूषवेषात आपल्या घोड्यावर स्वार होऊन कोटाकी सराई मधील प्रत्येक मोर्चावर जातीने जाऊन सैनिकांन मार्गदर्शन करीत होती. त्या दिवशी प्रचंड प्राणहानी होऊनच कोटाकी सराईची प्रत्येक टेकडी इंग्रजांना ताब्यात घेता आली. दुसऱ्या दिवशी क. स्मिथच्या मदतीला इंग्रज सैन्याच्या तीन तुकड्या येऊन मिळाल्या. १८ जून १८५८ रोजी इग्रजांनी तात्या टोपे व रावसाहेब पेशवे यांचा पराभव केला. ते समजताच राणीच्या सैन्याचे अवसान गळाले व थोड्याच वेळात तिच्या सैन्याची वाताहात झाली. प्रसंगावधानाने राणीने आपला घोडा इंग्रजांची कोंडी फोडून बाहेर काढला. तिच्या बरोबर तिच्या सुंदर व काशी या दोन दासी, दत्तक पुत्र दामोदर आणि सेवक रामचंद्र देशमुख आपापल्या घोड्यांवरून निघाले.

[irp]

राणी पळून जात असलेली पाहून काही इंग्रज घोडेस्वार तिचा पाठलाग करू लागले. एका इंग्रज स्वाराने राणीच्या सुंदर या दासीला गाठून तिच्यावर तलवारीचा वार केला. किंकाळी फोडून सुंदर खाली कोसळली. ती किंकाळी ऐकताच राणीने आपला घोडा मागे वळविला व त्या इंग्रज स्वाराला आपल्या तलवारीच्या एकाच फटक्यात ठार केले. पुन्हा आपला घोडा वळवून राणीने दौड सुरू केली. दुर्दैवाने मार्गात एक वाहता ओढा आडवा आला. राणीचा हा घोडा पाण्याला बिचकला व ओढ्याच्या काठीच तो चकरा मारू लागला. राणीचा नेहमीचा घोडा काल्पीतच मेला होता. त्या दुसऱ्या घोड्याने दगा दिला. पाठलागावर असलेले इंग्रज घोडेस्वार जवळ येऊन ठेपले. त्यातील एकाने राणीच्या शिरावर तलवारीचा वार केला. डोके फुटले. दुसऱ्या इंग्रज सैनिकाने तिच्या बगलेत आपल्या बंदुकीने एक गोळी झाडली. राणी रक्ताने न्हाऊन निघाली व घोड्यावरून खाली कोसळली. ती मरण पावली, असे समजून ते सर्व इंग्रज घोडेस्वार निघून गेले. परंतु तिच्या अंगात अजून धुगधुगी होती. रामचंद्र देशमुखाने राणीला अलगदउचलून शेजारच्या गंगादास बाबांच्या झोपडीत नेले. राणीने आपला दत्तकपूत्र दामोदर याला डोळे भरून पाहून घेतले व तिने मान टाकली. राणीने आधीच रामचंद्र देशमुखला सांगून ठेवले होते की, “माझा मृत्यु झाला, तर माझ्या शरीराला म्लेंच्छांचा स्पर्श होऊ देऊ नका.”

गंगादासबाबांच्या झोपडीपासून जवळच गवताची एक गंजी होती. रामचंद्र राव, काशी व गंगादासबाबा यांनी आपले रडे आवरून राणीच्या मृतदेहाला त्या गंजीवर ठेवून तिचा अग्नीसंस्कार केला. १८ जून १८५८ रोजी राणी या जगातून निघून गेली. पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची विद्युत देवता त्या ओढ्याच्या काठी अनंतात विलीन झाली. त्यावेळी तिचे वय अवघे साडे तेवीस वर्षांचे होते. तेथे राणीचे स्मारक उभारले आहे. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या या काव्यपंक्ती किती सार्थ आहेत!

कडकडा कडाडे बिजली।
शत्रुची लष्करे थिजली।
मग कीर्तिरुपे उरली।
ती पराक्रमाची ज्योत मालवे इथे झांशीवाली |

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!