Home Study Material राणी अवंतिकाबाई लोधी

राणी अवंतिकाबाई लोधी

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात पुरूषांबरोबर स्त्रियासुद्धा इंग्रजांविरूद्ध लढल्या. राणी लक्ष्मीबाई तर सर्वांनाच परिचित आहे, हे स्वातंत्र्ययुद्ध सर्वप्रथम उत्तरप्रदेशात पेटले. त्याचे लोण मध्यप्रदेशातही छोट्या छोट्या राज्यांत पसरले. मध्यप्रदेशात नर्मदा नदीच्या दक्षिणेस मांडला जिल्ह्यात रामगडचे छोटेसे राज्य होते. ते डोंगराळ व जंगलांनी युक्त असे होते. त्यात ठिकठिकाणी अनेक तलावही होते. लक्ष्मणसिंह लोधी हा रामगडचा राजा होता. त्याचे निधन झाल्यावर त्याचा मुलगा विक्रमजितसिंह रामगडच्या गादीवर आला. तो स्वाभिमानी व पराक्रमी म्हणून त्या भागात प्रसिद्ध होता. तो त्या भागातील प्रमुख क्रांतिकारी होता. त्याच्या सनकी स्वभावामुळे इंग्रजांनी त्याला वेडा ठरविले होते. दुर्दैवाने अकालीच त्याचे निधन झाले. अमान सिंह व शेरसिंह ही त्याची दोन्ही मुले अजून अजाण असल्याने इंग्रज सरकारने ते विक्रमजितसिंहाचे औरस पुत्र असूनही त्यांना रामगड राज्याचे उत्तराधिकारी मानले नाही व रामगडचा राज्यकारभार पाहण्यासाठी एका प्रशासकाची नियुक्ती केली व विक्रमजित सिंहाची पत्नी अबंतिकाबाई लोधी हिला पेन्शन सुरू केले. त्यामुळे अवंतिकाबाई खवळून उठली. तिने त्या प्रशासकाला आपल्या राज्यातून घालवून दिले आणि इंग्रजांच्या दडपशाहीला चांगला दणका दिला. आणि राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला.

जबलपूरच्या कलेक्टरला त्या प्रशासकाने ही हकीकत सांगितली, तेव्हा तो अत्यंत संतापला व राणीला आदेश दिला की, तिने लगेच मांडलाच्या डेप्युटी कलेक्टरची भेट घ्यावी. पण अवंतिकाबाईने तो आदेश धुडकावून लावला आणि तिने त्याचे परिणाम ओळखले. तिने युद्धाची तयारी सुरू केली. रामगड किल्ल्याची मजबुती केली. आपले सैन्य सुसज्जित केले. पण तेवढे सैन्य इंग्रजांशी टक्कर देण्यास पुरेसे नव्हते. म्हणून राणीने आसपासच्या राजांना पत्रे लिहून सर्वांनी मिळून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आवाहन केले. तिच्या आवाहनाने त्या राजांना लढण्यासाठी उद्युक्त केले. मात्र रेवा संस्थांनच्या राजाने राणीला मदत न करता इंग्रजांना साह्य केले. राणी आपल्या सरदारांना म्हणाली “बंधुंनो, जो पर्यंत इंग्रज आपल्या देशात आहेत, तो पर्यंत ते आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत. त्यांना आपल्या देशातून घालवून देण्यासाठी आपणांस आपल्या सुखांवर पाणी सोडावे लागेल व रक्त वाहवावे लागेल. त्यासाठी सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे.” राणीचे सरदारही उत्साहाने युद्धाच्या तयारीला लागले.

[irp]

शाहपूरच्या राजाने नारायण गंज छावणीवर आक्रमण केले. बहादुरसिंह लोधीने शहरपुरावर हल्ला केला. सलीमाबाद येथल्या छावणीतील देशी सैन्याने इंग्रजांविरूद्ध दंडथोपटले. ते पाटण येथे जाऊन सुभेदार बलदेवसिंहाला मिळाले. स्वतः राणी अवंतिकाबाई व विजय राघवगडचा राजा सूरज प्रसाद यांनी एकत्र येऊन नर्मदा नदीच्या उत्तरेकडील प्रदेशात विद्रोहाची आग भडकावली.

राणीने मांडलावर हल्ला करण्यासाठी मांडला नजीकच्या खैरी गावाजवळ आपल्या सैन्याची व्यूहरचना केली. तोच इंग्रज सेनापती वेडिंग्टन मोठे सैन्य घेऊन त्या सैन्यावर चालून आला. दोन्ही सैन्यात अटीतटीचे युद्ध सुरू झाले. राणी पुरुषवेषात घोड्यावर बसून आपल्या तलवारीचे पाणी इंग्रज सैन्याला चाखवीत होती. सेनापती वेडिंग्टनने आंपला घोडा राणीकडे वळविला. दोघांनी परस्परांवर तलवारीने जबरदस्त वार केले. घोडा थोडा पुढे सरकल्याने राणीचा तलवारीचा वार चुकून वेडिंग्टनच्या घोड्याच्या मानेवर पडला. त्याच्या घोड्याचे मुंडके तुटून जमिनीवर पडले. घोड्याची मान तुटलेली पाहून वेडिंग्टनच्या मनात धडकीचं भरली. तो घोड्यावरून उडी घेऊन पळून गेला. राणीने त्याच्या सैन्यातील कित्येक सैनिक जमिनीवर लोळविले. वेडिंग्टन आपले सैन्य घेऊन पळून गेला.

[irp]

एका स्त्रीच्या हातून झालेला आपला पराभव त्याच्या मनाला बोचत होता. त्याने पुन्हा मोठे सैन्य घेऊन रामगडवर हल्ला करायचे ठरवून तो रामगडला आला. त्याने गढाला वेढा दिला. तो पुन्हा मोठ्या तयारीने येणार, याची खात्री राणीला होतीच. राणीने रामगड पूर्णपणे खाली करुन ती आपल्या सैन्यासह तो येण्याआधीच देवहारगडच्या टेकडीवरील जंगलात आपला मुक्काम हलविला होता. त्याने रामगडला आग लावून दिली व तो राणीच्या शोधात निघाला. रामगडला येतांना त्याने रामगडच्या आसपासची विजयराघवगड, पाटन, संग्रामपूर, सलीमनाबाद, नारायणगड, धुगरी आदि राज्ये जिंकून घेतली होती. या राज्यांतून राणीला मदत मिळू नये म्हणून आधीच हीसावधगिरी बाळगून कारवाई केली होती.

राणी अवंतिका बाईने आता गनिमी काव्याने लढायचे ठरविले. कारण तिच्या सैन्यबलापेक्षा वडिंग्टनचे सैन्यबल फार मोठे होते. तिने आपल्या सैन्याच्या काही तुकड्या करुन त्या तुकड्यांकरवी वेडिंग्टनच्या सैन्यावर अनेक वेळा हल्ले चढवून त्या सैन्याची दाणादाण उडवून दिली. वेडिंग्टनच्या मदतीसाठी रेवा संस्थानचे व इतर काही संस्थानांची सैन्ये येऊन पोचली. तरीही राणी मोठ्या जिद्दीने शत्रुसैन्याशी लढतच राहिली. शत्रुसैन्याने देवहारगडच्या टेकडीला चहुबाजुनी घेरले. तरीही राणीने हिंमत न हारता शत्रूच्या कित्येक सैनिकांना यमसदनास पाठविले. आता राणीचे सैन्य बरेच कमी झाले होते. ते पाहून राणीने आपल्या उमरावसिंह या सरदाराला म्हटले, “भैयाउमराव, मला वाटते शत्रू मला जिवंत पकडू इच्छितो. शत्रूच्या हाती जिवंतपणी न सापडता, मला माझे जीवन स्वतःच नष्टकरुन टाकावेसे वाटते.” त्यावर उमरावसिंह म्हणाला,

“राणीजी, आधी मला या शत्रूच्या सैन्याला माझ्या तलवारीची करामत दाखवू द्या. माझ्या पश्चात तुम्हांला जे योग्य वाटेल, ते करा.”

त्यानंतर उमरावसिंह भयंकर वेगाने शत्रुसैन्याचा संहार करीत त्या सैन्यात शिरला, आणि दिसेनासा झाला. राणी एकटीच राहिली. तिने आपली तलवार आपल्या पोटात खुपसून घेऊन प्राणार्पण केले आणि ‘हरिओम’ हा मंत्र उच्चारीत ती हे जग सोडून गेली.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!