Home Study Material राणा बेनी माधो सिंह

राणा बेनी माधो सिंह

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात राणा बेनी माधोसिंह यांनी रायबरेली जिल्हा इंग्रजांच्या सत्तेपासून सलग १८ महिने स्वतंत्र ठेवला होता. तात्या टोपेसारखीच दहशत बेनी माधोसिंहाची इंग्रजांना वाटत होती. राणा बेनी माधो सिंह हे उत्तर प्रदेशातील राजपूतांचे सरदार होते. शंकरगड येथील तालुकदार निपुत्रिक होते. त्यांनी बेनी माधोसिंहाना दत्तक घेतले होते. ते दृढनिश्चयी व साहसी होते. त्यांनी कधीही इंग्रजांपुढे शरणागती पत्करली नाही. व्हिक्टोरिया राणीच्या जाहीरनाम्यानंतरही ते इंग्रजांशी लढत राहीले. या युद्धात त्यांनी अवधची बेगम हजरत महल हिला अखेरपर्यंत साथ दिली. ते अध्यात्मिक पुरूष होते. दुर्गामातेची उपासना ते नियमितपणे करीत असत. त्यांच्या गुणामुळे अवधचा नबाब वाजित अली शाह प्रसन्न झाला होता व त्याने बेनी माधोसिंहना ‘दिलेरजंग’ हा किताब बहाल केलेला होता.

रायबरेलीत चारही दिशांनी स्वातंत्र्य युद्धाच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे तेथला डेप्युटी कमिशनर घाबरला आणि १० जून रोजी संध्याकाळी अलाहाबादला पळून गेला तेव्हा इंग्रजांची वक्रदृष्टी रायबरेली जिल्ह्यावर पडली. त्यांनी बेनी माधोसिंहाची ११६ गावे जप्त केली. त्यामुळे बेनी माधोसिंह संतप्त झाले आणि त्यांनी या युद्धात भाग घेऊन इंग्रज सत्ता आपल्या देशातून नष्ट करून टाकण्याची प्रतिज्ञा केली. त्यांच्या सैन्यात ४००० शिपाई, २००० घोडेस्वार आणि ४० तोफा होत्या. एक इंग्रज अधिकारी मेजर गॉल लखनौमधून इलाहबादला रायबरेलीच्या बातम्यांची पत्रे घेऊन चालला असतांना त्याला बेनी माधोसिंहाच्या सैनिकांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर जो इंग्रज दिसेल त्याला यमलोकात पाठवून देण्याचे सत्रच त्या सैनिकांनी सुरु केले.
__रायबरेलीच्या पधरिया भागातील मीर बाकर अली नेहमीच बेनी माधोसिंहाच्या बरोबर असत. बेनी माधोसिंहाच्या सैन्याला रसद, हत्यारे वगैरे पुरविण्याचे काम मीर बाकर अली करीत असत. त्यांच्यासह युद्धात भाग घेत असत. मे १८५८ मध्ये बेगम हजरत महल हिने बेनी माधोसिंहाना आलमनगरच्या युद्धात सहभागी होण्यासाठी सैन्यासह बोलाविले. त्याचप्रमाणे ते त्या युद्धात सहभागी झाले आणि त्यानंतर त्यांनी मे-जून १८५८ मध्ये बहराइचमधून सर्व इंग्रजांना हाकून दिले. लखनौमध्ये युद्ध दीर्घकाळ चालले. त्या युद्धात त्यांनी बेगमेच्या वतीने इंग्रजांशी सतत लढा दिला. इंग्रजांना त्यांची फार दहशतवाटत असायची. लखनौच्या बेलीगारद युद्धातही त्यांनी इंग्रजांविरूद्ध जबरदस्त लढा दिला होता. कुँवरसिंहासारखे ते गनिमी काव्यात तरबेज होते. बेनी माधोसिंहांना कसे ठार करायचे याची चिंता सतत इंग्रज सेनाधिकाऱ्यांना वाटत असे.

लखनौचा पाडाव झाला, तरी त्यांनी हार मानली नाही. उलट नव्या जोमाने त्यांनी इंग्रजांशी टक्कर देण्याचे ठरविले. इंग्रज सरकार लखनौच्या परिसरात जेथे जेथे इंग्रज अधिकाऱ्यांना राज्यकारभारासाठी पाठवत असे, तेथे तेथे जाऊन बेनी माधोंसिंह त्या इंग्रज अधिकाऱ्यांना ठार करीत असत. उतारवयातही त्यांनी हिंमत हारली नव्हती.

[irp]

इंग्रज अधिकाऱ्यांनी बेनी माधोसिंहाला शेवटी एक पत्र दिले, ते असे

“इंग्लंडच्या साम्राज्ञीचे घोषणापत्र सोबत पाठवित आहे. तुम्हाला ताकीद देण्यात येत आहे की, त्या घोषणापत्रातील शर्तीनुसार तुम्ही साम्राज्ञीची आज्ञा मानली, तरच तुमचे जीवन सुरक्षित राहील. गव्हर्नर जनरल तुमच्यापाशी कठोरपणे वागू इच्छित नाहीत. तुम्ही दीर्घकाळापासून सशस्त्र बंड करीत आहांत. याआधीच तुम्ही आमच्या सैन्यावर आक्रमण केले आहे. म्हणून तुम्ही तुमचे चारही किल्ले आणि तोफा आमच्या हवाली कराव्या आणि तुमच्या सैन्याला आमच्या सेनाधिकाऱ्यांच्या पुढे शस्त्र खाली ठेवण्यास सांगावे. तेव्हाच तुमचे सैनिक विना दंड आपापल्या घरी जाऊ शकतील”.
इंग्रज सरकारच्या या धमकी वजा पत्राचे उत्तर बेनी माधो सिंहांनी कोलिन कॅपबेलला बाणेदारपणे दिले – “मी कोणत्याही परिस्थितीत शस्त्रे खाली ठेवणार नाही. मी बेगम हजरत महल व बिरजिस कद्र यांना सहकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. मी माझ्या मरणापर्यंत त्यांच्याशी मुळीच विश्वासघात करणार नाही”.

[irp]

बेनी माधोसिंहांचे पत्र हाती पडताच कोलिन कँपबेल आपल्या सैन्यासह केशीपूरला आला. होप ग्रँट सुद्धा त्या सैन्याच्या उजवीकडे तीन मैलावर आपले सैन्य घेऊन तळ ठोकून राहीला. पश्चिमेकडून ब्रिगेडिअर इ बेल आपल्या सेनेसह चाल करून आला. राणा बेनी माधोसिंह इंग्रजांची ताकद ओळखून होते. इंग्रज सेनाधिकाऱ्यांना भीती वाटत होती की, राणा केव्हाही आपल्यावर आक्रमण करील. म्हणून ते दक्ष होते. बेनी माधोसिंहांनी आपला शंकरगड किल्ला मोकळा केला. किल्ल्यात चिट पाखरूसुद्धा उरले नाही. १६ नोव्हेंबर १८५८ रोजी ते रायबरेलीच्या मार्गाने आपले सैन्य घेऊन डोडियाखेडा येथे आले. तेथे त्यांची भेट रामबक्श सिंहांशी झाली. दोघांनी मिळून ब्रिगेडिअर इबेलच्यासैन्याशी लढा दिला. त्यांनी त्या लढाईत मोठा पराक्रम गाजवून इंग्रजांचे शेकडो सैनिक ठार केले. परंतु त्या भल्या मोठ्या सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

बेनी माधोसिंहाची गाठ कँपबेलच्या सैन्याशी नामपाराच्या उत्तरेला बंकी या गावाजवळ पडली. परंतु तेथेही त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर ते नेपाळमध्ये निघून गेले. मोठ्या कष्टानंतर बेगम हजरत महलची व त्यांची बेट झाली. नंतर ते विरक्त झाले. असे म्हणतात की, ते त्यानंतर एकदा साधुवेषात शंकर गडला आले होते. या महान वीराला नैराश्यात कधी व कोठे मृत्युने गाठले. ते मात्र अज्ञात आहे.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!