Home Study Material राजा मर्दन सिंह

राजा मर्दन सिंह

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध सुरु झाले आणि इंग्रजांच्या झाशी व ललितपूर छावण्यांमधील देशी पलटणीही त्या युद्धात सामील होण्यासाठी अधीर झाल्या. त्या छावण्यांतील देशी सैनिकांना इंग्रज सरकार विरुद्ध उठाव करण्यास बानपूरचा राजा मर्दनसिंह याने आपली खास माणसे पाठवून प्रवृत्त केले होते. मर्दनसिंहांच्या सूचनेवरून आधी ललितपूरच्या छावणीतील सैनिक इंग्रजाविरूद्ध बंड करून उठले आणि त्यांनी ललितपूर छावणीतून इंग्रज अधिकाऱ्यांना त्या छावणीतून पळवून लावले. १३ जून रोजी त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सागर येथील छावणीतून काही तोफा गोऱ्या सैनिकांसह ललितपूरला पाठवून दिल्या. ललितपूरहून पळून गेलेल्या इंग्रजांपैकी कॅ. डॉ. ब्रिथन हा मसौरागढीत राजा मर्दनसिंह याच्या आश्रयाला आला. शरणागवाला आश्रय द्यावा, या भारतीय नीतिनुसार मर्दनसिंहाने त्याला आश्रय दिला. मर्दनसिंह हा राजपूत होता. तो नितीबाह्य आचरण कसे करील? क्षत्रियांची तर ती परंपराच होती. आणखीही काही इंग्रज अधिकारी शरणागत म्हणून त्याच्या आश्रयाला आले. त्यांनाही मर्दनसिंहाने आश्रय दिला. मर्दनसिंहाने आपल्या बुद्धिमानीने त्या इंग्रजाकडून इंग्रजांचे युद्ध बल, युद्धाची तयारी वगैरेंची माहिती काढून घेतली. त्यांचे पुढचे बेत काय आहेत ते ही जाणून घेतले.
 ____ मर्दनसिंह नंतर ललितपूरला गेला. तेथल्या सैनिकांना उत्तेजीत करून त्यांच्यासह सागरला गेला. तालबेहट गडात इंग्रजांना १३ जून १८५७ रोजी काही सैनिकांना कैद करून ठेवले होते. त्यांना मर्दनसिंहाने आधी मुक्त केले. देशी सैनिकांना मर्दनसिंहाने आवाहन केले की, “मर्दानो, हीच आता आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या पंज्यातून मुक्त करण्याची संधी आहे. तेव्हा तुम्ही आपल्या देशबांधवांच्या, देशी सैनिकांच्या विरुद्ध न लढता गोऱ्या लोकांविरूद्ध लढण्यासाठी तयार व्हा. आणि त्यांना आपल्या देशातून घालवून द्या.”

जुलै १८५७ च्या शेवटच्या आठवड्यात मर्दनसिंहाने १३०० सैनिकांसह सागरवर आक्रमण केले. मर्दनसिंहाच्या नेतृत्वाखाली त्या सैन्याने सागर जिल्हा इंग्रजांपासून मुक्त केला. फक्त सागरच्या किल्लाच इंग्रजांकडे राहीला. त्या नंतरच्या पाच महिन्यात मर्दनसिंहाने संपूर्ण बुदंलखंडातून इंग्रजांचे राज्य नष्ट केले. इंग्रजांशी झालेल्या युद्धात इंग्रज सैन्याचा एक कर्नल डॅलन मारला गेला. हातातून गेलेला भूभाग परत मिळविण्यासाठी सर ह्यू रोज याच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्याने राहतगडावर हल्ला करण्यासाठी चालून आले. हा गड क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र होता. इंग्रजांच्या तोफखान्याच्यागोळीबाराने राहतगडाचा तट खिळखिळा झाला. राहतगडातील क्रांतिकारक सैनिकांना कैद करून सर ह्यू रोज विजयोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना मर्दनसिंहाच्या सैनिकांनी इंग्रज सैन्यावर अचानक हल्ला केल्याने ते सैन्य विस्कळीत झाले आणि राहतगडावरील कैदी सैनिकांना घेऊन मर्दनसिंह आपल्या सैन्यासह निघून गेला. सर ह्यू रोज हात चोळीत बसला.

[irp]

बरोदिया गावाजवळ दुसरी विद्रोही सैनिकांची तुकडी मर्दनसिंहाला येऊन मिळाली. त्या सैनिकांना मर्दनसिंहाने झाशीच्या राणीच्या मदतीसाठी पाठवून दिले व तो स्वतः सर ह्यू रोजचा रस्ता अडविण्यासाठी सागरपासून ४० मैलावर मरथौन येथे त्याने ठाण मांडून राहिल त्याच्याशी सामना देण्याची हिंम्मत सर ह्यू रोज याला झाली नाही. म्हणून त्याने वेगळाच डाव टाकला. आपल्या सैन्यासह तो मर्दनसिंहाच्या बानपूरवर चालून गेला. बानपूरात मर्दनसिंहाचे थोडेसेच सैन्य होते. त्यामुळे सर ह्यू रोजला बानपूर सहज जिंकता आले. बानपूरात त्याला तोफांचे गोळे बनविण्याचा कारखाना आढळला. त्या कारखान्यात क्रांतिकारी सैन्यासाठी तोफगोळे तयार करण्याचे काम चालू होते.
 मर्दनसिंहाने बानपूरला जाण्याऐवजी आपला मोर्चा झांशीकडे राणी लक्ष्मीबाई हिच्या साह्यासाठी वळविला. परंतु झाशीचा किल्ला फितुरांमुळे इंग्रजांच्या हातात जाणार असे पाहून राणी लक्ष्मीबाईच्या मागोमाग मर्दनसिंह काल्पीकडे आपल्या सैन्यासह निघून गेला.काल्पीला पराभव झाल्यानंतर राणी लक्ष्मीबाई बरोबर मर्दनसिंह ग्वाल्हेरला आला. परंतु ग्वाल्हेरच्या मुरार भागात इंग्रजांनी त्याला पकडले. सैनिकी कोर्टात त्याची सुनावणी होऊन त्याला जन्मठेपची शिक्षा दिली व लाहोरच्या तुरुंगात रवाना केले. काही वर्षानंतर त्याला वृंदावनला जाण्याची परवानगी मिळाली. वृंदावन येथेच या मर्दाने २२ जुलै १८७९ रोजी आपला देह ठेवला.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!