Home Study Material राजा बलभद्रसिंह चहलारी

राजा बलभद्रसिंह चहलारी

उत्तर प्रदेशात सीतापूर व बहराइच या नगरांच्या मधील प्रदेशातून शरयू (घागरा) नदी वाहते. या नदीच्या तीरी असलेल्या चहलारी घाट नावाच्या गावात चहलारीचे जहागीरदार ठाकुर श्रीपालसिंह यांचे वास्तव्य होते. त्यांची जहागीरदारी आसपासच्या ३३ गावात होती. बहराइच जनपदातील मुरौआडीह गावात त्यांचा मुलगा बलभद्रसिंह याचा जन्म १० जून १८४० रोजी झाला. त्यांच्या वैभवशाली चहलारी गावात बलभद्रसिंहाचे लालन-पालन आणि शिक्षण झाले. युद्धकलेतही तो कुमारवयातच प्रवीण झाला. तो उंचापुरा, धष्टपुष्ट, सुंदर व राजबिंडा तरुण तेजस्वी आणि धीर-गंभीर वृत्तीचा असल्याने त्याची छाप कोणावरही चटकन पडायची. श्रीपालसिंहानंतर बलभद्रसिंह चहलारीचा राजा झाला. त्या आधीच त्याचे लग्न झाले होते. जो राजा झाला तेव्हा त्याचे वय आठरा वर्षांचे होते. बुद्धीमान व कुशल प्रशासक असल्याने त्याने आपला राज्य कारभार उत्तमरितीने चालविला. आपल्या वागणुकीने त्याने आपल्या प्रजेचे प्रेम संपादन केले होते.
१४ मार्च १८५८ रोजी इंग्रजांनी महत्प्रयासाने लखनौ शहरावर ताबा मिळविला होता. तेव्हा लखनौची बेगम हजरत महल हिने आपल्या कोवळ्या वयाच्या मुलासह बिरजिस कद्रसह लखनौ सोडले व तिने आपल्या लव्याजम्यासह बौंडी येथील राजा हरदत्तसिंह यांच्या गढीत आश्रय घेतला. तेथे नानासाहेब पेशवे, मौलवी अहमदशाह व राणा बेनी माधोसिंह हे सुद्धा आपल्या लव्याजम्यासह बौंडीला आले. बौंडी येथे या सर्वांच्या सैन्याने तळ दिला. नानासाहेब पेशव्यांना पकडून देणाऱ्यास इंग्रज सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. इंग्रज सैन्य त्यांच्या पाठलागावरच होते. या सर्वांनी बिरजिस कद्र याला ‘अवधचा बादशाह’ म्हणून घोषित केले. बेगम हजरत महल हिने आपल्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असे पर्यंत इंग्रजांशी लढण्याची प्रतिज्ञा केली होती. कोलिन कँपबेल मोठे सैन्य व तोफखाना घेऊन त्यांच्या पाठलागावर होता. दुसऱ्या बाजूने होपग्रँट सैन्यानिशी त्यांच्यावर चालून येण्याच्या प्रयत्नात होता. यासंबंधी ते विचार करीत असतांना त्यांना समजले की, चहलरीचा तरुण राजा शूर, धाडसी व रणकुशल आहे. बेगम हजरत महलने त्याला बोलविण्यासाठी एक पत्र दूता करवी बलभद्रसिंहाकडे चहलारीला पाठविले. दूत चहलारीला पोहचला तेव्हा त्याला समजले की, बलभद्रसिंह आपला धाकटा भाऊ छत्रपालसिंह याच्या लग्नासाठी वरात घेऊन शिवपूरला गेला आहे. दूत लगेच शिवपूरला गेला आणि त्याने ते पत्र बलभद्रसिंहाला दिले.

पत्र वाचताच बलभद्रसिंहाने आपले कर्तव्य काये ठरविले. त्याने वरात वळलारीला परत पाठविली व तो शिवपूरहून परस्पर बौंडीला गेला. तेथे त्याने बेगम हजरत महल हिची भेट घेतली. नानासाहेब, मौलवी अमदशाह आदींनी बलभद्रसिंहाचे स्वागत केले. बेगम हजरत महल हिने बलभद्रसिंहाला इंग्रजांविरुद्ध सहकार्य करण्याचे अवाहन केले. बाराबंकी जनपदातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र महादेवा येथे जाऊन होपग्रँट याच्याशी लढा देण्याचे काम बलभद्रसिंहाकडे सोपविले. बलभद्रसिंहाने प्रसन्न मनाने ते काम स्वीकारले आणि तो लगेच चहलारीला परतला.
बलद्रसिंहाने चहलारीला गेल्यावर आपल्या सैन्याची तयारी केली. युद्धसाहित्य जमविले. त्यानंतर त्याने आपल्या सैन्याला महादेवाकडे कूच करण्याचा आदेश दिला. नंतर राजमहालात जाऊन आपल्या तरुण गर्भार पत्नीचा त्याने निरोप घेतला. त्यावेळी त्याचे वय अवघे अठरा वर्षांचे होते. त्या षोडषवर्षीय पत्नीने त्याला कुंकुमतिलक लावून ओवाळले आणि त्याच्या कमरेला दोन रत्नजडित तलवारी बांधल्या. नंतर त्याने आपल्या आईचा आशीर्वाद घेतला व तो महादेवाकडे प्रस्थान करता झाला. महादेवा येथे आधीच नानासाहेब, बिरजिस कद्र, मौलवी अहमदशाह, राजा बेनी माधोसिंह व बौंडीचा राजा हरदत्तसिंह, बेगम हजरत महलसह उपस्थित होते. बेगम हजरत महल हिने बलभद्रसिंहाला ‘राजा’ ही पदवी दिली. मानाची वस्त्रे, एक रत्नजडित तलवार, शंभर गावांची जहागीर व एक हत्ती भेट म्हणून दिला.

राजा बलभद्र सिंहाने लखनौ-फैजाबाद मार्गावरील रेठ नदीवरील पुलाच्या पूर्वेस असलेल्या ओबरी गावाच्या विशाल मैदानावर आपल्या सैन्याची व्यूहरचना केली. आपले १६ हजारांचे सैन्य युद्धास सज्ज केले. हे समजताच इंग्रज सेनापती बिग्रेडिअर होप ग्रँट पूर्णपणे तयारी करून आपल्या विशाल सैन्यासह आबरीकडे निघाला. त्याचे सारे सैन्य आधुनिक शस्त्रांसह सज्ज होऊन निघाले.त्या सैन्याबरोबरच लांब पल्ल्याच्या तोफाही होत्या. चिनहरजवळ कर्नल पुरनेल आपल्या १२०० सैनिकांच्या तुकडीसह येऊन होप ग्रँटला मिळाला. होप ग्रँट साऱ्या सैन्यासह आवरीच्या पुलाजवळ बलभद्रसिंहाच्या पुढे येऊन उभा राहिला.

[irp]

१३ जून १८५८ रोजी होप ग्रँटने रेठ नदीच्या पुलावरून पुढे जाण्याचा आदेश आपल्या सैन्याला दिला. इंग्रजांचे सैन्य पूल पार करून येताच बलभद्र सिंहाने आपले सैन्य चार भागात विभाजित करून इंग्रजांच्या सैन्यावर चारही बाजूंनी हल्ला केला. त्या हल्ल्यामुळे इंग्रज सैन्याचे होश उडाले. होप ग्रँटला आपला पराभव स्पष्टपणे दिसू लागला. पण त्याने आपला धीर सोडला नाही. क्रांतिकारकांचे सैन्य उत्साहाने वप्राणपणाने लढत होते. होप ग्रँट आपल्या सैन्याच्या मध्यभागी पोचला. त्याने चारी बाजूंनी हल्ला करण्याचा आदेश आपल्या सैन्याला दिला. त्यांच्या हल्ल्याने क्रांतिकारकांच्या सैन्याचा एकमेकांचा संपर्क तुटला. त्याच वेळी उत्तरेकडून इंग्रजांच्या मदतीसाठी आणखी सैन्याच्या दोन तुकड्या आल्या. त्यांनी जोराचा हल्ला केल्याने इंग्रजांची बाजू सावरली गेली. तुंबळ युद्धास सुरूवात झाली. क्रांतिकरकांचे सैन्य मागे हटू लागले. परंतु राजा बलभद्रसिंह त्वेषाने इंग्रज सैन्याशी लढत राहिला. ६०० सैनिकांसह तो धारातिर्थी पडला. तो पराभूत झाला, पण आपली निष्ठा व सन्मानाला डाग लागू दिला नेही. होप ग्रँट ही युवा योद्ध्याचे धैर्य व शौर्य पाहून चकित झाला. अशाच महान स्वातंत्र्य योद्ध्यांनी भारताचे स्वातंत्र्य जवळ आणले, हे विसरता कामा नये. धन्य तो युवा योद्धा!

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!