Home Study Material राजा बखत बली

राजा बखत बली

बुंदलखंडचे सुप्रसिद्ध महाराजा छत्रसाल यांच्या घराण्यात बखतबलीचा जन्म झाला होता. महाराजा छत्रसालांचे ते पणतू होते. सन १८४२ मध्ये बखतबली शाहगडच्या गादीवर बसले आणि आपल्या संस्थानचा राज्यकारभार पाहू लागले. त्यावेळी त्यांच्या सैन्यात १५० घोडेस्वार व ८०० पायदळ सैन्य होते. १८५७ मध्ये स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले. इंग्रजांच्या देशी पलटणी बंड करून उठल्या. त्यातून काही सैनिक व घोडेस्वार आपल्या शस्त्रांसह बखत बलीकडे आले. तेव्हा त्यांनी त्या सैनिकांना आपल्या सेवेत घेतले. त्यांचे सैन्य वाढले.
बानपुरचे राजा मर्दनसिंह बखतबलीचे मित्र होते. दोघांनी मिळून सागरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त करायचे ठरविले. दोघांनी मिळून सागरवर आक्रमण केले पण सागरचा मजबूत किल्ला त्यांना जिंकता आला नाही. परंतु त्यांनी निराश न होता गढकोटा व मालथौन हे दोन किल्ले जिंकले आणि सागरचा किल्ला सोडून बाकीचा सागर जिल्हा आपल्या ताब्यात घेतला. सागरच्या किल्ल्यावर राजा मर्दनसिंहा बरोबर राजा बखतबलीने पुन्हा आक्रमण केले. पण किल्ल्यातील इंग्रज सैन्याची हिंम्मत या दोन्ही वीरांचा सामना करण्यास झाली नाही. गोरे सैनिक किल्ल्यातून बाहेर पडलेच नाहीत.

जबलपूरच्या छावणीतील ५२ व्या देशी पलटणीचे इंग्रजांविरुद्ध दंड थोपटले व ती सारी पलटण राजा बखतबलीकडे आश्रयाला आली. त्यामुळे बखतबलीच्या सैन्यात चांगली वाढ झाली. त्यामुळे इंग्रज सरकारला काळजी वाटू लागली. तेव्हा सर ह्यूज रोज मोठे सैन्य व तोफखाना घेऊन बखतबली व मर्दनसिंहावर धावून आला. पण त्याला पराभव पत्करावा लागला. परंतु त्याने गढकोट व राहतगड हे दोन किल्ले मात्र जिंकले. या अपयशामुळे ते दोघे वीर घाबरले नाहीत. आता सर ह्यू रोज झांशीकडे आपले सैन्य घेऊन निघाला. राणी लक्ष्मीबाईकडून त्याला झांशीचा किल्ला जिंकून घ्यायचा होता. सागरकडे जाणारे दोनच मार्ग त्या डोंगराळ भागातून होते. एक मालथौन घाटीतून जाणारा व दुसरा मदनपूर घाटीतून जाणारा. मालथौन घाटीचा मार्ग रोखण्याचे बखतबलीने राजा मर्दनसिंह यांचेकडे सोपविले व मदनपूर घाटीचा मार्ग रोखण्याचे काम स्वतःकडे घेतले.

२६ फेब्रुवारी १८५८ रोजी सर ह्यू रोज आपल्या सैन्यासह मालथौन घाटीकडे निघाला. त्या घाटीत पोचताच त्याला दिसून आले की, बंडखोर सैन्य त्या घाटीचा मार्ग अडवून उभे आहे. म्हणून त्याने आपली एक पलटण त्या घाटीत ठेवून तो मदनपूर घाटीकडे निघाला. त्या घाटीतही बंडखोर सैन्याने मार्ग अडविलेला त्याला दिसला. त्याच्या सैन्यावर त्या घाटीत तोफांचा भडीमार सुरू झाला. एका गोळीने सर ह्यू रोजजखमी झाला. त्याचा घोडाही गोळीबारात खाली कोसळला. तरीही त्याने त्या घाटीच्या डाव्या बाजूने त्या बंडखोर सैन्यावर अचानक हल्ला केला त्यामुळे बखतबलीच्या सैन्याची पांगापांग झाली व त्याचे सैन्य पराभूत होऊन शेजारच्या जंगलात इतस्ततः पसरले. अनेक बंडखोर सैनिकांना त्याने कैद केले. राजा बखतबली चरखाणीला पोचला. पेशव्यांच्या सैन्यासह बखतबली झांशीला गेले. तेव्हा सर ह्यू रोजच्या सैन्याने झांशीला वेढा दिलेला होता.

[irp]

१ एप्रिल १८५८ रोजी सर ह्यू रोजच्या सैन्यावर झांशीच्या पलटणीने हल्ला केला. बखतबलीनेही दुसऱ्या बाजूने आक्रमण केले. नंतर बखतबली बेटवा नदीच्या किनाऱ्यावरील कोटरा गावात गेला. परंतु मेजर आरेच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला आणि बखतबलीला अचानक कैद केले. परंतु ऐन वेळी राजा  मर्दनसिंह धावून आला. त्याच्या सैन्याने आरेच्या सैन्याचा धुव्वा उडविला आणि बखतबलीला मुक्त केले. लगेच बखतबलीने आपल्या सैन्यासह आरेच्या सैन्यावर हल्ला करून त्या सैन्याची धूळधाण उडवून दिली.

एप्रिल १८५८ च्या तिसऱ्या आठवड्यात राजा बखतबली काल्पीला पोचला. तेथेच झांशीची राणी लक्ष्मीबाईची त्याने भेट घेतली. बखत बलीने आपली सेना रावसाहेब पेशव्यांच्या सैन्याच्या साह्यासाठी दिली, आणि त्याने तात्या टोपेला स्वातंत्र्य संग्रामात अखेरपर्यंत साथ दिली. १२ मे १८५८ रोजी बखतबलीने तात्या टोपे सह सर ह्यू रोजच्या सैन्याशी जबरदस्त सामना दिला. परंतु त्यांना माघार घ्यावी लागली.

[irp]

१ जून १८५८ रोजी राणी लक्ष्मीबाई, रावसाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी ग्वाल्हेरचा किल्ला जिंकला. बखतबली ग्वाल्हेरकडे निघाला. वाटेतच त्याला दुःखद बातमी समजली की, झांशीची राणी लक्ष्मीबाई युद्धात स्वर्गवासी झाली. अखेर बखतबली निराश होऊन इकडे-तिकडे भटकत राहीला. शेवटी मर्दनसिंहाबरोबर त्यालाही मुरार येथे इंग्रजांनी कैद केले.

बखत बलीला लाहोर येथे पाठवून त्यांना हकीकतराय यांच्या हवेलीत नजर कैदेत ठेवून दिले. तेथे ते खूप आजारी पडले, तेव्हा इंग्रजांनी त्यांना १८७२ साली बुंदेलखंडात जाण्याची परवानगी दिली. तेथेही आजार वाढतच चालला आणि हा महापराक्रमी स्वातंत्र्ययोद्धा २८ सप्टेंबर १८७३ रोजी स्वर्गलोकीनिघून गेला. बुंदेलखंडातील जनता शोकमग्न होऊन गेली. स्वातंत्र्यदेवतेच्या बलीवेदीवर अशा कित्येक महावीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे. त्या सर्वांना आपण विसरलो आहोत.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!