Home Study Material राजा नंदकुमार

राजा नंदकुमार

राजा नंदकुमार चा जन्म सन १७०५ मध्ये भद्रपूर या गावी झाला होता. त्याचे वडील पद्यनाथ प्रतिष्ठित ब्राम्हण होते. नंदकुमार बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी व साहसी होते. त्यांनी बंगाली व फारसी भाषांवर प्रभुत्व मिळविले. त्यांचे वडील बंगालच्या नबाबाच्या पदरी मोठ्या जागेवर काम करीत असत. सन १७५६ मध्ये ते सिराज उद्दौलाच्या पदरी हुगलीचे फौजदार म्हणून काम करीत होते. त्यांनी एका युद्धात इंग्रजांचा पराभव केला. प्लासीच्या युद्धानंतर बंगालमध्ये इंग्रजांचा प्रभाव वाढला. त्यानंतर इंग्रजांनी मीरजाफरला गादीवर बसविले. नंतर त्याला पदच्युत करुन मीर कासीमला बंगालचा नबाब बनविला. त्यालाही पदच्युत करुन इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा बंगालच्या गादीवर बसविले. तेव्हा मीरजाफरने नंदकुमारला आपला मंत्री म्हणून नेमले. नंदकुमार कर वसुली करुन हिशेब चोख ठेवत होता. नबाबाकडून जास्तीत जास्त पैसा हडपण्यासाठीच इंग्रजांनी बंगालच्या नबाबांना वेळोवेळी बदलले होते. नंदकुमार करवसुलीच्या पदावर असतांना आपल्याला नबाबाकडून जास्त रक्कम उकळता येणार नाही, म्हणून वॉरन हेस्टिंग्ज त्यांच्यावर असंतुष्ट झाला होता. त्याला मीरजाफरच्या मंत्रीपदावरुन काढून टाकण्यासाठी वॉरन हेस्टिंगने त्याच्यावर खोटे आरोप करीत राहण्याचे सत्र सुरु केले. म्हणून नंदकुमार चिडले.
वॉरन हेस्टिंग्ज आपल्याला बदनाम करीत आहे, असे पाहून नंदकुमार फार मोठे धाडस करायचे ठरविले. त्यांनी गव्ह. जनरलच्या कौन्सिलचे सदस्य सर फिलिप फ्रांसिस यांच्या मार्फत एक पत्र कौन्सिलला सादर केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, “हेस्टिंग्ज साहेबासारख्या शत्रूबद्दल तक्रार दाखल करतांना मी माझ्या संरक्षणासाठी ईश्वराच्या कृपेवरच विसंबून आहे. मी आत्माभिमानाला प्राणांपेक्षाही जास्त मानतो. मी जर असली रहस्य उघड केले नाही, आणि मौन राहिलो, तर माझ्यावर आणखीही अनेक संकटे येतील. म्हणून नाइलाजाने हे रहस्य आपणांसमोर उघड करीत आहे. हेस्टिंग्ज साहेबांनी मीरजाफरच्या म्हाताऱ्या विधवा आईकडून तीन लक्ष चौपन्न हजार एकशे पाच रुपयांची लाच घेऊन तिला मीरजाफरची संरक्षिका बनविले आहे. आणि ते माझ्या सर्वनाशासाठी षड्यंत्र रचित आहेत. त्यात माझे शत्रू जगतचंद्र, मोहनप्रसाद व कमालुद्दीन आदी सारे सामील आहेत.”

नंदकुमारांचे हे पत्र जेव्हा कॉन्सिलच्या सदस्यांसमोर वाचून दाखविण्यात आले, तेव्हा वॉरन हेस्टिंग्जचा चेहरा पांढराफटक पडला दोन दिवसांनंतर कौन्सिलच्या बैठकीत नंदकुमारांचे आणखी एक पत्र वाचून दाखविण्यात आले, त्यात लिहिले होते की, “कौन्सिलची परवानगी असेल, तर मी स्वतः कौन्सिलच्या बैठकीस येऊन असली बाबींचा पुरावा सादर करु इच्छितो. त्यांनी लाच घेतलेल्या रक्कमेची पावती दाखल करु इच्छितो. “तेव्हा कर्नल मॉन्सल म्हणाला की, महाराज नंदकुमारांना कॉन्सिल बैठकीत येऊन त्यांना या संबंधीचा पुरावा प्रत्यक्ष सादर करण्याची आज्ञा देण्यात यावी.”हे ऐकताच वॉरन हेस्टिंग्ज रागाने लाल बुंद झाला. आणि म्हणाला, “जर नंदकुमार माझा दावेदार बनून कौन्सिलच्या बैठकीत हजर झाला, तर मी माझा अपमान माझा प्राण गेला, तरी सहन करणार नाही. आमचे कौन्सिलचे सदस्य माझ्या कार्यांचा विचार करुन जर एखाद्या सामान्य अपराध्यासारखा माझा विचार करतील, तर मी कौन्सिलच्या बैठकीत उपस्थित राहणार नाही”बार्बल साहेबाने असा सल्ला दिला की, “या प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाद्वारे केली जावी”पुष्कळशा वादविवादानंतर असे निश्चित ठरले की, महाराज नंदकुमार यांना कौन्सिलच्या बैठकीत बोलवाले.
एका सत्ताधारी इंग्रज गव्हर्नर जनरलवर एका हिंदी व्यक्तीने मोठे दोषारोषण करावे, ही अत्यंत धाडसाची अभूतपूर्व बाब होती. त्यामुळे साऱ्या बंगालच्या जनतेचे लक्ष या प्रकरणाने वेधून घेतले होते. कौन्सिलची बैठक घेतली गेली. महाराज नंदकुमार उपस्थित झाले. लगेच वॉरन हेस्टिंग्ज बैठकीतून निघून गेला. कौन्सिलचे एक सदस्य क्लेवरींग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु झाली. महाराज नंदकुमार यांनी त्या बैठकीत गव्ह-जनरल वॉरन हेस्टिंग्ज वर केलेल्या आरोपांचे पुरावे दाखल केले. ते पाहून कौन्सिलने वॉरन हेस्टिंग्जला अपराधी ठरविले. त्याबरोबर असाही ठराव करण्यात आला की, वॉरन हेस्टिंग्जने लाच म्हणून घेतलेली रक्कम कंपनी सरकारच्या खजिन्यात लगेच जमा करावी. वॉरन हेस्टिंग्जने हा ठराव फेटाळून लावल्यावर कौन्सिलने ठरविले की, कंपनीच्या वतीने सुप्रीम कोर्टात दावा दाखल करावा. त्याकरिता या प्रकरणाचे सगळे कागदपत्र कंपनीच्या सॉलिसिटर जनरलकडे सुपूर्द करण्यात आले. सॉलिसिटर जनरलने ते कागदपत्र वाचल्यावर आपले पत यासंबंधात नोंदविले ते असे.

“माझ्या विचारानुसार कंपनीच्या वतीने हेस्टिंग्ज साहेबावर सुप्रीम कोर्टात फिर्याद दाखल करावी. असे केल्यास हेस्टिंग्ज साहेबांना या प्रकरणी आपला जबाब द्यावाच लागेल. फिर्याद दाखल झाल्यानंतर बंगालमधील सारे झगडे निकालात निघतील व त्यामुळे कंपनीला अधिक लाभ होईल.”

वॉरन हेस्टिंग्जने परिस्थितीचे रंग-ढंग पाहून सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायाध्यीश इम्पेसाहबांच्या बंगल्यावर जाऊन गुप्तपणे खलबत केले. परिणामतः दुसऱ्याच दिवशी अचानक मोहनप्रसाद याने महाराज नंदकुमारांवर फसवेगिरीची एक निंदाव्यंजक फिर्याद सुप्रीम कोर्टात दाखल केली. तीत म्हटले होते की, “महाराज नंदकुमारांनी एक बनावट दस्तऐवज बनवून बुलाकीदासांच्या रियासतीतून बरीच रक्कम वसूल केली आहे.”हा दावा दाखल झाल्यानंतर लगेच नंदकुमारांच्या अटकेचे वारण्टजारी करण्यात आले व त्यांना तात्काळ अटक करुन तुरुंगात डाबण्यात आले. ते ब्राम्हण असल्याने तुरुंगाच्या आवारात राहुटी उभारुन तीमध्ये नंदकुमारांना अन्य कैद्यापासून अलग ठेवण्यात आले.
३ जून १७७५ रोजी कोर्टाचे कामकाज सुरु झाले. जज्ज इम्पे आसनाधीन झाला. त्याचे व वॉरन हेस्टिंग्जचे गुप्त खलबत आधीच झालेले होते. नंदकुमार कठड्यात उभे राहिले. अब्दुल कमालुद्दीन, शिलावतसिंह व माधवराव यांच्या त्या बनावट दस्त ऐवजावर सह्या होत्या कमलुद्दीनची साक्ष झाली. बाकी दोघे मरण पावले हाते. शिलावतसिंह यांची सही ओळखण्यासाठी राजा नवकृष्ण आले होते. त्यांनी दस्तऐवज पाहून म्हटले, “ही तर शिलावतसिंहांची सही मुळीच नाही.”

__ कृष्णजीवनने सांगितले की, “करारनामा स्वतः बुलाकीदास यांनी लिहिला होता. त्यात बुलाकीदास यांनी सन १७६५ मध्ये नंदकुमार महाराजांच्या ४८०२१ रुपयांच्या दस्तऐवजाबाबत स्पष्टपणे लिहिले होते.”या दोन्ही साक्षीदारांच्या उपयुक्त साक्षीमुळे कोर्टातील जज आणि वॉरन हेस्टिंग्ज यांचे चेहरे पांढरे फटक पडले. पण मुख्य न्यायाधीश सावरले व म्हणाले, “यांचे म्हणणे मिथ्या आहे.”

वॉरन हेस्टिंग्जने पैसे देऊन नवे खोटे साक्षीदार कोर्टात हजर केले. त्यांनी खोट्या साक्षी देऊन नंदकुमारने बुलाकीदासांच्या रियासतीतून रु. ४८०२१/- हडप केलेले आहेत असे कोर्टात सांगितले. ते मात्र इम्पे याने खरे मानले व तशी नोंदही केली. त्याने नंदकुमारचे बॅरिस्टर फरार यांना सफाईसाठी साक्षीदार उभे करण्यास सांगितले. फरार म्हणाले, “अद्याप गुन्हा जर शाबितच झाला नाही, तर सफाई कशी द्यायची. आतापर्यंतच्या कामकाजावरुन स्पष्ट दिसते की, महाराज नंदकुमार निर्दोष आहेत. त्यांची सुटका झाली पाहिजे.”त्यावर इम्पेने सांगितले.

“त्यांच्यावरील अपराध सिध्द झाला आहे. तुम्ही सफाई दिली नाही. तर आम्हांला सर्व पुराव्यांचा विचार करायला सांगावे लागेल.”

ज्या जाली दस्तऐवजावरुन नंदकुमार यांना कैद करुन तुरुंगात डांबले होते, त्या प्रकरणाची हकीकत वेगळीच आहे. मुर्शिदाबादेत एक राजनैतिक विद्वान पं. बापूदेव शास्त्री राहत असत. नबाब अलीवर्दी खाँ यांना त्यांच्याविषयी फार आदर वाटायचा. राजकारणात नबाब त्यांचा सल्ला नेहमी घेत असे. याच विद्वान शास्त्र्यांकडून महाराज नंदकुमार यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासून २० वर्षापर्यंत ८ वर्षे संस्कृतमधून धर्मशास्त्रांचे शिक्षण घेतले होते. अलीवर्दीखाँने पंडितजींच्या शिफारशीवरुन महाराज नंदकुमार यांची नेमणूक त्यांच्या वयाच्या २२ व्या वर्षी मेहिषदल परगण्यात करवसुली अधिकारी म्हणून केली होती. हळूहळू त्यांची कामकाजाची पात्रता वाढली. तेव्हा नबाबाने त्यांना हुगळी परगण्याचे फौजदार म्हणून नेमले. या पदावर राहून त्यांनी भरपूर पैसा कमावला. त्यानंतर आपल्या गुरुजींचे पंडित बापूदेव शास्त्रींचे दर्शन घेण्यासाठी ते मुर्शिदाबादेस गेले. शास्त्रीजींच्या प्रमदादेवी या मुलीला नंदकुमार आपली धर्मभगिनी मानत असत. म्हणून तिच्यासाठी त्यांनी अनेक दागिने त्यावेळी आणले हाते. मुर्शिदाबाद येथे आल्यावर त्यांना समजले की, आपल्या गुरुपत्नीचा मृत्यु झालेला असून आपली धर्मभगिनी ही विधवा झालेली आहे. अशा स्थितीत ते दागिने गुरुजींना देणे त्यांना योग्य वाटले नाही. म्हणून त्यांनी ते दागिने आपला चांगला परिचय असलेले बुलाकीदास महाराज यांच्या दुकानात अमानत म्हणून ठेवून दिले आणि ठरविले की, नंतर वेळ मिळाल्यावर ते दागिने विकून जी रक्कम येईल, ती धर्मभगिनी प्रमदादेवी हिला देऊन टाकू. नंतर दैवगती फिरली. मीरकासीम आणि इंग्रजांत युध्द जुंपले. त्यात मीर कासीमचा पराभव झाल्यावर इंग्रजांनी मुर्शिदाबाद शहर लुटले. त्यात बुलाकीदासांचे सर्वस्व लुटले गेले. बुलाकीदास प्रामाणिक व धर्मात्मा होते. त्यांनी महाराज नंदकुमार यांच्या दागिन्यांची किंमत ४८०२१ रुपये ठरवून तेवढ्या रकमेचा दस्तऐवज लिहून दिला. त्यानंतर काही दिवसांनी बुलाकीदासांचे निधन झाले. तोच दस्तऐवज महाराज नंदकुमार यांच्यावरील या मुकादम्याला कारणीभूत ठरला.

[irp]

महाराज नंदकुमार यांचे बॅरिस्टर फरार यांनी सफाईचे साक्षीदार कोर्टात उभे केले. मोठ मोठ्या इज्जतदार लोकांनी नंदकुमारांच्या बाजुने साक्षी दिल्या. साक्षी संपल्यानंतर इम्पेने ज्युरींना खटल्याची सर्व हकीकत समजावून सांगितली. ज्युरींनी अर्धा घंटा विचार. विनिमय करुन सांगितले की, “महाराज नंदकुमार अपराधी आहेत.”कारण वॉरन हेस्टिंग्जने सर्व ज्युरींना पैसा चारुन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्यांचा निर्णय ऐकल्यानंतर न्यायाधीश इम्पे याने महाराज नंदकुमार यांना फांशी देण्याची शिक्षा सुनावली. नंतर त्याने महाराज नंदकुमारला तुरुंगात पाठवून दिले.

५ऑगस्ट १७७५ रोजी राजा नंदकुमार यांना फाशी देण्यात आले. सत्यानंद शास्त्रींनी या प्रसंगाबद्दल लिहिले आहे, “ज्या वेळी महाराजांच्या गळ्यात फास अडवला आणि त्यांच्या पायाखालचा तख्ता काढून घेतला. त्यांचे निर्जीव शरीर लोबकळू लागले. त्यावेळी लोक किंकाळ्या मारीत पळत गेले. पळता पळता ते ओरडत गेले, “ब्रम्ह हत्या झाली. कलकत्ता अपवित्र झाले. देश पापांनी भरला. फिरंग्यांना धर्मज्ञान नाही.”

प्रसिध्द बॅरिस्टर पी. मित्रांनी लिहिले आहे, “ज्या साक्षींच्या आधारे महाराज नंदकुमारांना फांशी देण्यात आले, त्या साक्षी विचारात घेता, कोणता ही विचारवंत किंवा साधारण मनुष्य एका माशीलाही प्राणदंड देणे न्यायोचित म्हणणार नाही.

प्रसिध्द इतिहासतज्ञ मार्शमनने लिहिले आहे, “महाराज नंदकुमार यांना देण्यात आलेली फांशीची शिक्षा इंग्लंडच्या त्या काळातल्या नीचतम कायद्यानुसार असली, तरी ती न्यायाच्या विरुध्द होती.”

लॉर्ड मेकॉलेने म्हटले आहे, “कोणताही विचारी मनुष्य याबाबत संशय घेऊ शकत नाही की, इम्पेसाहबाने हे नीच कर्म गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज याला खुश करण्यासाठीच केले होते. वॉरेन हेस्टिंग्जनेच एका पत्रात लिहिले आहे की, “इम्पे साहेबांच्या साहाय्यामुळेच माझ्या धनाचे, मानाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण झाले.”याच्या बदल्यात हेस्टिंग्जने इम्पेसाहेबाला बर्दमान जिल्ह्यातील एका मोठ्या पुलाचा ठेका दिला होता व त्यातून इम्पे साहेबाला लाखो रुपयांचा लाभ झाला होता. इम्पे साहेबाने इंग्रज न्यायासनाला या प्रकरणाने कलंकित केले आहे.”

इंग्लंडला गेल्यावर इम्पे साहेबावरही या प्रकरणी दावा दाखल करण्यात आला होता. राजा नंदकुमार यांनी इंग्रजांशी हाती शस्त्र घेऊन लढाई केलेली नसली, तरी इंग्रजांच्या भारतातील सर्वोच्च अधिकाऱ्यावर लेखी आरोप ठेवून इंग्रजांची नीचता उघडकीस आणली, ही गोष्ट क्रांतिकारीच म्हणावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!