Home Study Material राजा चेतसिंह

राजा चेतसिंह

बनारसचा पहिला राजा बलवंतसिंह हा शूर व पराक्रमी होता. त्याचे राज्य अवधच्या नबाबाच्या अधिपत्याखाली होते. त्यामुळे तो नबाबाला दरवर्षी खंडणी देत असे. सन १७७० मध्ये बलवंतसिंहांचे निधन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र चेतसिंह हा बनारसचा राजा बनला. अवधच्या नबाबाचे आणि राजा चेतसिंहाचे संबंध चांगले नव्हते. नबाबाने अनेक वेळा वॉरन हेस्टिग्जला चेतसिंहा विरुद्ध कारवाई करण्यास सांगितले. हेस्टिंग्जने तशी पावले उचलली. तेव्हा त्याच्या कौन्सिलचे सदस्य फ्रान्सिस, क्लेवारिरा आणि मॉन्सन हे चेतसिंहाच्या रक्षणासाठी उभे ठाकले. हेस्टिंग्जने १७७५ च्या करारानुसार राजा चेतसिंहाने कंपनीचे अधीनत्व नाइलाजाने स्विकारले. त्याने कंपनी सरकारला दरवर्षी २२ लाख ५० हजार रुपये खंडणी देण्याचे मान्य करावे लागले. चेतसिंहाला या रक्कमेपेक्षा जादा रक्कम कंपनी सरकारला यापुढे द्यावी लागणार नाही, असेही कलम त्या तहात होते. त्यानुसार राजा चेतसिंह दरवर्षी कंपनी सरकारला २२ लाख ५० हजार रुपये खंडणी देऊ लागला.
मराठ्यांशी व म्हैसूरच्या नबाबाशी वॉरन हेस्टिंग्जने युद्धे सुरु केली. त्यामुळे कपंनीची आर्थिक स्थिती खालावली. वॉरन हेस्टिंग्जचे लक्ष धनप्राप्ती साठी बनारसच्या राज्याकडे गेले. ते राज्य अतिशय समृद्ध होते. म्हणून हेस्टिंग्जने चेतसिंहाकडे खंडणी व्यतिरिक्त आणखी ५ लाख रुपये युद्धखर्च म्हणून मागितले. हे १७७५ च्या तहात नव्हते. राजा चेतसिंहाने ५ लाख जादा देण्याची टाळाटाळ करुन पाहिली. पण हेस्टिंग्जच्या दबाबामुळे चेतसिंहाला ते ५ लाख रुपये द्यावेच लागले.

सन १७७८ मध्ये इंग्रज – फ्रेंच युद्ध सुरु झाले. तेव्हाही कंपनी सरकार आर्थिक अडचणीत आले. हेस्टिंग्जने राजा चेतसिंहाकडे पुन्हा जादा ५ लाख रुपयांची मागणी केली. चेतसिंहावर दबाब आणला की, तो जादा रक्कम देतो, हे हेस्टिंग्जला कळून चुकले होते. म्हणून त्याने चेतसिंहाकडून त्यावर्षीही ५ लाख रुपये जादा उकळले. चेतसिंहाने रक्कम देतांना तहाची आठवण हेस्टिंग्जला करुन दिली व यापुढे जादा रक्कम माझ्याकडे मागू नये, असेही हेस्टिंग्जला लिहिले.
हेस्टिंग्जचा द्रव्यलोभ वाढतच चालला. पुन्हा १७७९ सालीही त्याने चेतसिंहाकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. राजाने हेस्टिंग्जला पत्र देऊन कळविले की, ठरलेल्या खंडणीच्या रक्कमेपेक्षा जादा रक्कम सन १७७५ च्या तहानुसार मागण्याचा मुळीच अधिकार नाही. ते पत्र वाचून हेस्टिंग्ज संतापला व त्याने आपल्या सैन्याची एक तुकडी ती रक्कम वसूल करण्यासाठी बनारसला पाठवून दिली. तेव्हा हतबल होऊन चेतसिंहाला ५ लाख रुपये तर द्यावेल लागले शिवाय दंड म्हणून २ लाख रुपये सुद्धा देणे भाग पडले.

सन १७८० मध्येही हेस्टिंग्जने खंडणीच्या रक्कमेशिवाय आणखी ५ लाख रुपयांची मागणी चेतसिंहकडे केली. जादा रक्कम चेतसिंहाला मागणे सर्वथा अनुचित होते. पण हेस्टिंगच्या दबाबामुळे त्याने हेस्टिंग्जला २ लाख रुपये वैयक्तिक रुपाने भेट म्हणून देण्यासाठी व दरवर्षी ५ लाख रुपयांची मागणी न करण्यासाठी आपल्या एका विश्वासपात्र प्रतिनिधीजवळ देऊन कलकत्त्याला हेस्टिंग्ज कडे त्याला पाठविले. हेस्टिंग्ज ने ती रक्कम ठेवून घेतली व त्या प्रतिनिधिला सांगितले की, जादा ५ लाख रुपये द्यावेच लागतील. ते ५ लाख रुपयेही चेतसिंहाला द्यावेच लागले.
आता हेस्टिंग्ज हात धुवून चेतसिंहाच्या पाठीमागे लागला. त्याने लगेच चेतसिंहाने २००० घोडेस्वार कलकत्त्याला पाठवून द्यावे, असा हुकूम चेतसिंहाला दिला. त्या घोड्यांचा व घोडेस्वारांचा खर्चही चेतसिंहाने द्यावा, असेही त्या हुकुमात हेस्टिंग्ने लिहिले होते. हे आता चेतसिंहाला असह्य झाले. पण बळी तो कान पिळी या न्यायाने घाबरुन जाऊन चेतसिंहाने ४०० घोडेस्वार व ४०० पायदळ सैन्य कलकत्त्याला पाठविण्याचे ठरवून तसे हेस्टिंग्जला एका पत्राने कळविले. हेस्टिंग्जने त्या पत्राचे उत्तर न देता, ४० लाख रुपये दंड म्हणून चेतसिंहाकडून वसूल करायचे ठरविले, आणि मोठे सैन्य घेऊन तो स्वतः बनारसकडे निघाला. ते समजताच चेतसिंहाची पाचावर धारण बसली. कारण त्याचे सैन्य कंपनी सरकारच्या सैन्यापेक्षा फारच कमी होते. तरीही त्याने आल्या प्रसंगाला तोंड द्यायचे ठरविले व आपल्या सैन्याला प्रतिकारासाठी सावध केले. चेतसिंह स्वतः आपल्या राज्याची परिस्थिती हेस्टिंग्जला सांगण्यासाठी त्याच्या बक्सर येथल्या सैन्याच्या तळावर गेला. हेस्टिंग्जने त्याची भेट घेण्याचे नाकराले आणि चेतसिंहाला अटक केली.

[irp]

आपल्या राजाला आपल्याच राज्यात अटक केल्याचे ऐकताच चेतसिंहाच्या सैन्याने इंग्रजी विरुद्ध विद्रोह सुरु केला. आधी बनारसमधल्या सर्व इंग्रजांना त्या सैन्याने कापून काढले. ह्या गोंधळातच चेतसिंह निसटला व बनारसला आला. चेतसिंहाच्या सैन्याने हेस्टिंग्जच्या सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. आत हेस्टिंग्जला आपले प्राण वाचविण्यासाठी काळजी लागली व तो चुनार येथे पळून गेला. तेथून सर्व सूत्रे हलवून हेस्टिंग्जने चेतसिंहाच्या सैन्याचा पराभव केला. चेतसिंहाला पुन्हा कैद केले व त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील तुरुंगात डांबले त्या किल्ल्यातच तो मरेपर्यंत खितपत पडला होता.

चेतसिंहाच्या थोड्या सैन्याने इंग्रज सैन्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले.कंपनी सरकारने आपल्या घोषित ध्येय-धोरणाला, दिलेल्या वचनांना धाब्यावर बसवून चेतसिंहासारख्या निरपराधराजाचे आर्थिक शोषण करणे व त्याच्याकडून भरमसाठ रक्कमा उकळणे, ही कंपनी सरकारच्या नैतिक दिवाळखोरीची व बेकायदेशीर व्यवहाराची पराकाष्ठाच म्हणावी लागेल. त्यात हेस्टिंग्जने धन-लोभापायी बनारस राज्याचा व राजा चेतसिंहाचा नाहक बळी घेतला, हे निःसंशय होय. आपल्या पाशवी बळावर कंपनी सरकारने हिंदुस्थानातील कित्येक राज्ये कपटनीतीने व गुंडागिरीने बळकावली. त्यात लाखो सैनिकांना व अनेक राजांना बळी जावे लागले. हा इतिहास विसरता येणार नाही. कंपनी सरकारच्या मोठ्या सत्तेशी झुंज देण्यामुळेच राजा चेतसिंहाचा आपले स्वातंत्र्य-रक्षणासाठी बळी घेता गेला.


संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!