Home Study Material राजा उमराव सिंह

राजा उमराव सिंह

छोटा नागपूर भागातील ओरमांझीचे राजा उमराव सिंह ओरमंझीच्या आसपासच्या बारा गावांचे जमीनदार होते. ओरमांझीपासून वायव्येकडे १६ मैलावर असलेल्या गंगापातर गावात त्यांचा जन्म झाला होता. रांची जिल्ह्यात त्यांचीही जमीनदारी होती. सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात छोटा नागपूरमध्ये त्यांच्या जमीनदारीतील चुलूपालू घाटीत सर्वप्रथम झाला. हजारीबागकडे जाणाऱ्या डोरंडा छावणीतील देशी सैन्याने ३१ जुलै १८५७ रोजी जमादार माधवसिंह यांच्या नेतृत्त्वाखाली चुलूपालू घाटीत छोटानागपूर पठारावर स्वातंत्र्ययुद्धाचा बिगुल मेजर ग्राहमच्याविरुद्ध वाजविला होता. दोन तोफा डागून त्यांनी मेजर ग्राहमला त्या भागातून पळवून लावले होते. स्वातंत्र्यप्रिय राजा उमरावसिंह यांनी त्या सैन्याला सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यांच्या बरोबर त्यांचा दिवाण व खजिनदार शेख भिखारी यानेही त्यांना उत्साहाने मदत केलीहोती. त्यांच्या मदतीमुळेच त्या विद्रोही सेनेने २ ऑगस्ट १८५७ रोजी रांची शहर ताब्यात घेऊन छोटा नागपूरचा कमिशनर डाल्टन व त्याच्या सहकारी इंग्रज अधिकाऱ्यांना रांचीतून पळून जाण्यास भाग पाडले होते. छोटा नागपूर इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाले व त्यांनी बडका गडचा राजा विश्वनाथ शाहदेव याला छोटा नागपूरचा सुभेदार बनविले. विश्वनाथ शाहदेव संपूर्ण छोटा नागपूरचा राज्यकारभार पाहू लागले. इंग्रजांचे सैन्य पुन्हा छोटा नागपूरमध्ये येऊ नये म्हणून त्या सैनिकांनी चुलूपालू घाटी आणि चारू घाटीचा १० मैलांचा रस्ता खोदून टाकून रहदारीस अयोग्य बनविला. या कार्यात त्या भागातील जनतेने मोठ्या उत्साहाने त्या सैनिकांना मदत केली.

राजा उमराव सिंहाच्या सर्व पुरूषांनी या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला. रामगड आणि बंदगाव घाटींचे घाटवाल, लाला लोकनाथसिंह, उमराव सिंहाचा लहान भाऊ घासी सिंह, शेख भिरवारी हे या युद्धात अग्रभागी होते. कमिशनर डाल्टन बगोदर येथे होता. त्याला जेव्हा कळले की, चुलूपालू घाटीचा व चारू घाटीचा हे दोन्ही रस्ते उमरावसिंहाच्या लोकांनी व विद्रोही सैनिकांनी खोदून नष्ट केले आहेत, तेव्हा तो संतापाने लालेलाल झाला. राजा विश्वनाथ शाहने रामगड घाटीत दोन तोफा गोलंदाजांसह लावून ठेवल्या. या घटनेने रामगडचा राजा शंभूनाथ सिंह भयभीत झाला व त्याने आपल्या राजमहालाचे सर्व दरवाजे बंद करून प्रत्येक दरवाजावर सशस्त्र शिपायांचा पहारा बसविला, आणि तो रात्रभर देवपूजा करीत बसला.

शंभूनाथ सिंह इंग्रजांना आपला रक्षणकर्ता समजत होता. त्याने सारी परिस्थिती जाणून घेण्यासाठी लतीफ खाँ या आपल्या अधिकाऱ्याला ओरमांझी येथे राजा उमरावसिंहाकडे पाठविले. त्याच वेळी रांचीहून राजा उमराव सिंहाचा एक कर्मचारी तेथे आला आणि त्याने सांगितले की, “डोरंडाच्या सैन्याने पुन्हा रांची शहर लुटले. राजा शंभूनाथ सिंह इंग्रज सैन्याला आपले रक्षण करण्यासाठी त्याच्या राज्यात आणण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणून राजा विश्वनाथ शाहदेव शंभूनाथ सिंहाची राजधानी इचाकवर आक्रमण करण्याच्या विचारात आहे.” हे सारे लतीफ खाँ याने ऐकले. रामगडला परत जाऊन लतीफ खाँ ने राजा शंभूनाथसिंह याला सारे काही सांगितले. ते ऐकल्यावर शंभूनाथ सिंह फार घाबरून गेला. बगोदर येथे जाऊन त्याने कमिशनर डाल्टनची भेट घेऊन सारी परिस्थिती त्याला सांगितली व त्याला इचाकला येण्यासाठी फार आग्रह केला. रामगडला येऊन त्याने तीन वेळा गव्हर्नर जनरल कॅनिंगला तारा करून साहाय्य मागितले. कॅनिंगने त्याला तारेने कळविले की, “तुमच्या रक्षणासाठीयुरोपियन सैन्य पाठविण्यात येत आहे.” तेव्हा कोठे त्याच्या जिवात जीव आला.

[irp]

कमिशनर डाल्टन याने राजा उमराव सिंहाला पत्राने कळविले की, “बगोदरला येऊन मला भेटावे.” परंतु राजा उमराव सिंहाने त्याच्या पत्राचे उत्तरही दिले नाही की त्याला जाऊन भेटलाही नाही. उमरावसिंह न आल्याने डाल्टन भंयकर संतापला व त्याने राजा उमरावसिंहाला पत्राने धमकी दिली. “चुलूपालू घाटीचा रस्ता नष्ट करण्यास तूच जबाबदार आहेस. ओरमांझीचा तू राजा असल्याने त्या मार्गाची जबाबदारी तूच घ्यायला हवी होती. त्या मार्गाची नासधूस करण्याच्या गुन्ह्यामुळे तुला फांसी दिले जाईल.” त्याने बंगालचा गव्हर्नर हेलीडे याला कळविले की, “उमराव सिंहाला मी भेटीसाठी बोलाविले, तरी तो आला नाही. छोटा नागपूर पुन्हा ताब्यात घेतल्यावर उमराव सिंहाला फांशीच द्यावी लागेल.”

स्वतंत्र झालेल्या छोटा नागपूरचा राज्यकारभार विश्वनाथ शाहदेव चांगल्या रीतीने करीत होते. त्याच काळात त्यांना कुँवरसिंहाचे पत्र आले की, डोरंडा सैन्य घेऊन रोहतासगडला यावे. ११ सप्टेंबर १८५७ रोजी डोरंडाची सेना तिकडे निघून गेली. २ ऑक्टोबर १८५७ विश्वनाथ शाहदेव यांना तो विचार घातक वाटला आणि डोरंडा सेनेला तिकडे जाण्यास त्यांनी विरोध केला. म्हणून विश्वनाथ शाहदेवला गिरफ्तार करून सेनेने त्यांना आपल्या बरोबर घेतले.

[irp]

२ ऑक्टोबर १८५७ रोजी चतरा गावाजवळ त्या सैन्याची इंग्रज सैन्याशी लढाई झाली व ते सैन्य पराभूत झाले. त्या युद्धात इंग्रज सैन्याने जयमंगल पांडे आणि नादिरअली या दोघांना पकडले आणि त्यांना फाशी दिले. लॉर्ड कॅनिंगने पाठविलेल्या युरोपिअन सैन्याने राजा जगन्नाथ शाहदेवच्या दहा हजार मजुरांच्या मदतीने रामगडघाटीचा मार्ग ८ तासात तयार केला. रांची मध्ये सैन्यच नव्हते. म्हणून २३ सप्टेंबर रोजी इंग्रज सैन्याने रांची शहर सहज आपल्या ताब्यात घेतले. त्या सैन्याला जगन्नाथ शाहदेव याने व पिठोरियाचा राजा जगतपाल सिंह याने भरपूर मदत केली. मद्रासची सेनाही इंग्रजांनी या भागात आणली होती. डाल्टनने त्या सेनेचा मेजर मॅक्डोनल्ड याला राजा उमराव सिंह व शेख भिखारी यांना अटक करण्यासाठी पाठविले. त्याने त्या दोघांना कैद करुन रांचीला आणले. जज्ज ओक्सने कसलीही चौकशी न करता, त्यांच्यावर खटला न भरता त्यांना फांशी देण्यासाठी मॅक्डोनल्डला आदेश दिला की, या दोघांना चुटूपालू घाटीत आम जनतेसमोर झाडांना लटकावून फांशी द्यावी. मॅक्डोनल्डने त्या दोघांना मोरहाबादी जवळील टागोर हिल्स जवळील एका मोठ्या झाडाच्या दोन फांद्यांवर फांशी दिले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या व आम जनतेच्या आक्रोशाने आकाश भरून गेले. त्या स्थानाला तेव्हापासून ‘टुंगरी फांशी’ असे सारे लोक म्हणू लागले. त्या स्वातंत्र्यवीरांनी धैर्याने बलिदान केले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!