Home Study Material राघोजी नाईक

राघोजी नाईक

इंग्रजांनी सन १८१८ मध्ये पेशवाई बुडविली व महाराष्ट्रातील जनतेचे शोषण सुरु झाले. लोकांची वतने गेली, इनामे बुडविली राजे रजवाड्यांचे सैनिक निकामी होऊन बेकार झाले. त्यांचा भार शेतीवर पडू लागल्याने जनतेला अर्धपोटी राहावे लागले. जमीन महसूल दुपटीने झाला. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. आदिवासींची वतने गेल्याने त्यांच्या मनात इंग्रज सरकारविरुद्ध असंतोष खदखदू लागला. तो सर्वप्रथम उमाजी नाईकाच्या उठावाने प्रकट झाला. त्यानंतर राघोजी नाईक इंग्रजांविरुद्ध चवताळून उठला.

राघोजी नाईक हा अकोले-सिन्नर भागातील महादेव कोळी होता. सन १८३० मध्ये जुन्नर भागातील भाऊ खरे, चिमण दरबारे व जाधव यांनी इंग्रजांविरुद्ध रान उठविण्यास सुरुवात केली. पुणे, ठाणे, नासिक व अहमदनगर भागातील महादेव कोळी व भिल्ल संघटित होऊ लागले. राघोजी नाईक इंग्रजांविरुद्ध रणांगणात उतरला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील घोडेगावच्या लोकांनी या उठावाला साथ न देता इंग्रज सरकारच्या सैन्याला मदत केली. त्यामुळे महादेव कोळ्यांचा पराभव झाला आणि ते डोंगरात पसार झाले. ५४ क्रांतिकारी त्यात मारले गेले.
___सन १८३८ मध्ये रायगड किल्ल्याच्या परिसरात या आदिवासी वीरांचे इंग्रजांच्या सैन्याशी तुंबळ युद्ध झाले.त्यात या वीरांनी इंग्रजांचा खजिना हस्तगत केला. व तीन गांवातील सावकार जमीनदार बनियांना लुटले. इंग्रज सैन्याने ८० महादेव कोळ्यांना कैद केले. पण राघोजी नाईक त्यांच्या हाती लागला नाही. त्याने इंग्रजांविरुद्धच्या कारवाया बेधडकपणे चालूच ठेवल्या.

[irp]

नासिक, संगमनेर, अकोला, इगतपुरी इ. ठिकाणी राघोजीने आपल्या महादेव कोळी व भिल्ल वीरांच्या साह्याने इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरु केला. त्यात सरकारी खजिना लुटला व काही किल्लेदारांनाही मारले व त्यांना हाकलून दिले. परंतु काही फितुरांना हाताशी धरुन इंग्रजसेनाधिकाऱ्यांनी नासिक व नगर जिल्ह्यातील काही आदिवासीवीरांना कैद केले. त्यांना तुरुंगात डांबून त्यांचा अमानुष छळ केला. त्यातल्या १०० वीरांना प्यायला पाणी व अन्न न दिल्याने ते तुरुंगातच मरण पावले, बाकीच्या कैद्यांना गोळ्या घालून ठार केले. ही बातमी सगळीकडे पसरली. तेव्हा मोठ्या प्रमाणात तरुण कोळी व भिल्ल राघोजीला येऊन मिळाले. इंग्रज सैन्याची कोंडी करण्याचे प्रयत्न राघोजीने सुरु केले. पुन्हा काही फितुरांकरवी त्याची वार्ता इंग्रज अधिकाऱ्यांना समजली व संघर्षसुरु व्हायच्या आधीच तो दडपण्याच्या योजना ते आखू लागले. त्यामुळे राघोजी व त्याचे अनेक अनुयायी भूमिगत झाले. ते गनिमी काव्याने इंग्रज सैन्यावर हल्ले करु लागले.
इंग्रजांशी सामना करण्यासाठी बापू भांगरे आपल्या कोळी व भिल्ल वीरांनिशी राघोजीला येऊन मिळाला. इंग्रजांशी सामना देतांना एका फितुराने फितुरी केल्याने बापू भांगरे मारला गेला. इंग्रज सरकारने राघोजीला पकडून देणारास ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ते ऐकताच राघोजी कोकणात निघून गेला व साधूच्या वेषात गावोगाव हिंडत राहिला. परंतु दुर्दैव त्याच्या पाठिशी लागले होते. एका फितुराने त्याला ओळखले व इंग्रज अधिकाऱ्यांना बक्षिसाच्या लोभाने त्याची बातमी दिली. त्यामुळे तो पकडला गेला. त्याच्या बरोबरच रामचंद्र गोरे व काही महादेव कोळी वीरही पकडले गेले. राघोजीला व त्याच्या या साथीदारांना फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. तेव्हा राघोजी म्हणाला, “मला फाशी न देता, माझे डोके तलवारीने उडविण्यात यावे.” परंतु इंग्रजांनी ते मानले नाही व दि. २ मे १८४८ रोजी राघोजीसह या सर्वांना ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हे वीर स्वतंत्रतेच्या बलिवेदीवर प्राणार्पण करते झाले. या अशिक्षित आदिवासी वीरांचे स्मरण आजच्या पिढीला राहू नये, हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!