Home Study Material रंगो बापूजी

रंगो बापूजी

शिवछत्रपतींची आणि स्वराज्याची एकनिष्ठतेने सेवा करणारी दोन घराणी शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध होती. एक बाळाजी आवजी चिटणीसांचे व दुसरे रोहिडखोरेकर देशपांडे दादजी नरस प्रभू गुप्तांचे. यांनी रोहिडेश्वरासमोर बेलभंडार उचलून बालशिवाजी बरोबर स्वराज्याची शपथ घेतली होती. दादजी नरस प्रभू हे कायस्थ. कायस्थ प्रभूनींच पिढ्यान् पिढ्या स्वराज्यासाठी आपले जीवन खर्चीले. शिवछत्रपतींच्या घराण्यावरील आपले इमान कधीही ढळू दिले नाही.

रंगो बापूजी गुप्ते हा दादजी नरस प्रभुंच्या पाचव्या पिढीतला शिवछत्रपतींच्या घराण्याचा एकनिष्ठ सेवक, दादजीचा खापरपणतू, दादजीच्या हयातीतच त्याचे वतन भोरच्या शंकराजी नारायण या ब्राह्मण सचिवाने गिळंकृत केले होते. एवढेच नव्हे तर, त्याने दादजीच्या घरावर धाड घालून त्याचे वतनाचे दस्तऐवजही जाळून टाकून त्याचे घर लुटले होते. दादजींचे मूळ गांव रोहिडखोऱ्यातले ‘कारी वृद्धावस्थेत दादजीला अत्यंत दारिद्र्यात दिवस कंठावे लागले. ते दारिद्र्य रंगो बापूजीपर्यंत चालूच होते. राजाराम महाराजांनी गुप्त्यांचे वतन त्यांना देऊन टाकण्याबद्दल तंबी दिली होती. तिलाही या ब्राह्मण सचिवाने भीक घातली नाही. औरंगजेबाच्या छावणीत महाराणी येसूबाई व पुत्र शाहू यांच्या सेवेसाठी दादजीचा पूत्र कृष्णाजी हा अखेरपर्यंत होता. त्यांची सुटका औरंगजेबाचा मुलगा आजमशहा त्याने केल्यानंतर शाहू महाराज सातारा येथे गादीवर बसले. त्यांनीही सचिवाला गुप्त्यांचे वतन त्यांचे त्यांना देण्याचे फर्माविले. परंतु सचिवाने ते जुमानले नाही.
शाहू छत्रपतींचे निधन १७४९ साली झाले. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांने राजकारभाराचा व शिक्षणाचा गंध नसलेला, खेडेगावात राहिलेला ताराबाईचा तथाकथीत नातू रामराजा ह्याला, तो आपल्या हातातले बाहुले राहील म्हणून साताऱ्याच्या गादीवर बसविले. त्याला पेशव्यांच्या खजिन्यातून खर्चासाठी ६ लाख रुपये दरवर्षी दिले जाऊ लागले. राज्याचा खरा धनी छत्रपती साताऱ्याला, राज्याचा महसूल जमा होई पुण्याला पेशव्याच्या खजिन्यात, त्यातून छत्रपतीला खर्चासाठी किती रक्कम द्यायची ते पेशव्यांच्या मर्जीवर! कसा उलटा न्याय पहा! जगात असले उदाहरण सापडायचे नाही. पुढे नाना फडणीसाने तर कडच केली. ६ लाख जास्त होतात म्हणून दरवर्षी एकच लाख छत्रपतींना दिले जाऊ लागले. साताऱ्याच्या गडावरून हत्ती, पागा, तोफा सगळे काही पुण्याला आणून ठेवले. एवढेच नव्हे, तर क्षुल्लक कामासाठीही पेशव्यांची लेखी परवानगी छत्रपतींनी घेण्याचा दंडक घालून दिला. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने तर साताऱ्याच्याकिल्ल्यावर कडक पहारा बसविला. कोणत्याही मराठी सरदाराने छत्रपतींची भेट घेऊ नये, असा बंदोबस्त केला. छत्रपतींचा भयंकर कोंडमारा होऊ लागला. रामराजानंतर दुसरा शाहू, त्यानंतर प्रतापसिंह गादीवर आला.

दुसऱ्या बाजीरावाने आपल्या सरदारांचे न ऐकता वसई येथे १८०२ साली इंग्रजांशी नामुष्कीचा तह करून इंग्रज रेसिटेंड आपल्या व छत्रपतींच्या मानगुटीवर बसवून घेतला. साताऱ्याच्या गडावर जरी कडक बंदोबस्त असला, तरी छत्रपतींचा व त्यांच्या कुटुंबाचा कसा कोंडमारा होत आहे, याच्या बित्तंबातम्या गडाखाली येतच होत्या. त्या ऐकून प्रजा हळहळत होती. छत्रपतीनिष्ठ चिटणीस, रंगो बापूजी, चाफळकर स्वामी व त्यांचे साथीदार तर संतापाने हात चोळीत होते. त्यांनी खलबत करून छत्रपतींना दुसऱ्या बाजीरावाच्या पंजातून सोडविण्यासाठी पुण्याचा इंग्रज अधिकारी एल्फिस्टन यांच्याशी संधान बांधले. कारण एल्फिस्टन हाच तेव्हा मराठा राज्याचा सर्वेसर्वा होता. बाजीरावाच्या गुप्तहेरांना टाळून त्याची भेट घेणे, हे अत्यंत धाडसाचे काम होते. ते रंगो बापूजीने पत्करले व बोलणी यशस्वी केली.
बाजीरावाने जेव्हा एल्फिस्टन सैन्याशी युद्ध आरंभले, तेव्हा त्या युद्धात त्याचा पूर्ण पराभव झाला व त्याला दरवर्षी ८ लाख रुपये पेन्शन घेऊन उत्तरेस गंगातीरी विठुरला कायमचे राहावे लागले. मराठा राज्य इंग्रजांच्या ताब्यात आले. तेव्हा एल्फिस्टनने उत्तरेकडील नीरा नदीपासून दक्षिणेकडे वारणा नदीपर्यंतचा दोनतीन जिल्ह्यांचा प्रदेश प्रतापसिंहाला देऊन त्याला साताऱ्याच्या गादीवर बसविले. तो अन्य संस्थानिकांप्रमाणे इंग्रजांचा मांडलीक बनला. साताऱ्याला पँटडफ या रेसिडेंटच्या मार्गदर्शनाखाली राज्य कारभार करू लागला. त्याने सातारा राज्याला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. उत्तम रीतीने राज्यकारभार केला.

डफच्या हाताखाली बाळासाहेब नातू हा महाकारस्थानी चित्पावन ब्राह्मण काम करीत होता. त्याला सातारा राज्याचे दिवाणपद पाहिजे होते. ते त्याला मिळू शकले नाही. म्हणून त्याने खोटे दस्तऐवज करून प्रतापसिंहावर मोठे कुंभाड रचले. परिणामी कंपनी सरकारने प्रतापसिंहाला ४ सप्टेंबर १८३९ रोजी पदच्युत करून एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे काशीला कायमचे पाठवून दिले. प्रतापसिंहाला दरसाल एक लाख वीस हजार रुपयांची नेमणूक लावून दिली. बघा, धन्याला एक लाख वीस हजार आणि त्याचा नोकर दुसरा बाजीराव याला आठ लाख! इंग्रजांचा न्याय कसा उलटा आहे, हे पाहून कोणाचेही माथे भडकावे. प्रतापसिंहानंतर त्याचा व्यसनीभाऊ आप्पासाहेब याला इंग्रजांनी साताऱ्याच्या गादीवर बसविले.

रंगो बापूजीने प्रतापसिंहाशी गुप्त मसलत केली. नंतर रंगोबापूजीला काही हजार रूपये देऊन इंग्लंडला आपला वकील म्हणून पाठविला. तो सारे कागदपत्र घेऊन लंडनला पोचला. तेथे त्याने महत्प्रयासाने इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात केले. ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डासमोर त्याने त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह आपली कैफियत मांडून प्रतापसिंहावरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करून दाखविले. पार्लमेंट च्या सदस्यांची ओळख करून घेऊन पार्लमेंटमध्येही भाषण करून आपली न्याय्य बाजू मांडली. एवढेच नव्हे तर लंडनमध्ये व अन्य शहरात यासंबंधी शेकडो व्याख्याने दिली. पत्रके छापून घेऊन वाटली. १८४० सालापासून १८५४ सालापर्यंत त्याने इंग्लडमध्ये हाल अपेष्टा सहन करून आपल्या धन्याला न्याय मिळावा, साताऱ्याचे राज्य प्रतापसिंहाला मिळावे म्हणून जिवापाड कष्ट घेतले. पण त्याचा उपयोग झाला नाही. गव्हर्नर सर राबर्ट ग्रँटने डायरेक्टर बोर्डाला आधीच कळविले होते की, ‘ब्रिटीश राज्याच्या सलग मुलखाच्या पट्टीत हे साताऱ्याचे राज्य म्हणजे निष्कारण अडगळ आहे. ती निर्माण करण्यात पूर्वीच्या आपल्या मुत्सुद्यांची चूक झालेली आहे. ती चूक सुधारण्याची हीच वेळ आहे. हा साताऱ्याच्या राज्याचा प्रदेश म्हणजे दख्खनचा सर्वात उत्तम सुपीक प्रदेश. तेव्हा आपणच निर्माण केलेले हे राजेशाहीचे बाहुले उचकून फेकून देण्याची आताच छान संधी आलेली आहे. शेवटी डायरेक्टर बोर्डाने त्यानुसारच रंगो बापूजीला उत्तर दिले. “गव्हर्नर जनरलचा निर्णय योग्य आहे. त्यात आम्हाला बदल करणे योग्य वाटत नाही.हे उत्तर ऐकताच आपले १४ वर्षाच्या वनवासातले कष्ट व पायपीट वाया गेली असे पाहून रंगो बापूजी कमालीचा निराश झाला.
दुसरा बाजीराव १८५१ साली मरण पावला. त्यानंतर गव्हर्नर जनरलने त्याचे दरवर्षी ८ लाख पेन्शन बंद केले. ते ग. ज. पुन्हा बाजीरावाच्या दत्तकपुत्र नानासाहेब पेशवे यांना देईना. म्हणून नानासाहेब पेशव्यांनी आपला इंग्रजी व फ्रेंच भाषा जाणणारा विश्वासू मंत्री अजी मुलाखाँ आला महंमद अलीसह आपला वकील म्हणून भरपूर पैसा देऊन इंग्लडला पाठविले. तेथे त्याने पार्लमेंटचे सभासद, ईस्ट इंडिया कंपनीचे

डायरेक्टर बोर्ड व अन्य प्रतिष्ठित इंग्रजांपुढे मोठ्या जिद्दीने नानासाहेबांची बाजू मांडली. परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. रंगो बापूजीला जसे परखड उत्तर मिळाले, तसेच त्याला ही मिळाले. टेम्स नदीच्या काठी रंगो बापूजीची व त्याची भेट झाली. दोघेही इंग्रजावर भयंकर चिडले होते. त्यांनी विचारविनिमय करून भारतात परतल्यावर इंग्रजांना भारतातून कसे हाकून द्यायचे, त्यांचा नायनाट कसा करायचा याची योजना आखली. अजीमुलाखाँने उत्तरेत रान उठवायचे व रंगो बापूजी दक्षिणेत. मात्र अतिशय गुप्त रितीने हे काम करायचे असे ठरले. रंगो बापूजी १८५४ मध्ये भारतात परत आला. अजीमुलाखाँ मिस्त्र, तुर्कस्तान,रशिया, वगैरे देशात जाऊन त्या देशांकडून आपल्या कार्यात काही मदत मिळेल का? हे पाहून १८५६ मध्ये भारतात परत आला. क्रिमीयन युद्धात रशियन सैनिकांनी इंग्रज सैन्याला कसे पाणी पाजले होते, ते त्यांनी पाहिले होते. इंग्रज हे काही अपराजेय नाहीत, हे त्यांने हेरले होते.

विठुरला परत आल्यावर नानासाहेबांना त्याने पेन्शन मिळू शकणार नाही, असे जेव्हा सांगितले, तेव्हा नानासाहेब कमालीचे निराश झाले, नंतर अजीमुल्लाखाँने इंग्रजानाच आपल्या देशातून कसे हाकून द्यायचे ते त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे काम सुरू झाले. नानासाहेब, बाळासाहेब, अजीमुलाखाँ यांनी तीर्थ यात्रेच्या निमित्ताने उत्तर भारताची यात्रा केली. बहादुरशहालाही त्यासाठी तयार केले. सगळ्या संस्थानिकांना एकदम उठाव करण्यासाठी पत्रे दिली. रंगो बापूजीनेही दक्षिणेत सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, बेळगाव, धारवाड भागातील संस्थानिकांना तयार केले. तेथल्या इंग्रजांच्या छावण्यातील देशी पलटणींना उठावासाठी उद्युक्त केले. या कामी त्याचा मोठा मुलगा सीताराम त्याला साथ देत होता. या कामासाठी पैसा, हत्यारे, रसद मिळवून मोक्याच्या ठिकाणी गुप्तरितीने त्यांचे साठे करून ठेवले. विश्वासू लढवय्ये तयार केले. धाडसी रामोशी व मांग यांच्या संघटना बांधल्या. त्यांना खजिने लुटण्याचे अमिष त्याने दाखविले होते. बंदुकीसाठी गोळ्या तयार करून घेतल्या. रंगो बापूजी साधूच्या वेषात नासिक त्र्यंबकेश्वर पासून दक्षिणेतील बंगळूरपर्यंत उठावासाठी माणसांना प्रवृत करण्याकरिता सारखा हिंडत होता. त्याचा मोठा मुलगा सगळ्या कामांवर गुप्तपणे देखरेख करीत होता.

[irp]

रंगो बापूजीने कायस्थ प्रभू, मावळे, भंडारी, कातकरी, कोळी यांनाही संघटित केले. साऱ्या लोकांची मने पेटून उठली होती. त्याचे हेरही त्याने सर्वत्र पेरुन ठेवले होते. कोल्हापूरच्या राजाचे कनिष्ठ बंधु चिमासाहेब यांनीही रंगो बापूजीला उत्तेजन दिले. त्यांनी पैसा, हत्यारे व दारुगोळा सुध्दा पुरवला. प्रतापसिंहाची पत्नी राजसबाई हिला रंगो बापूजीबद्दल खूप आदर होता. साताऱ्याच्या दोन्ही राजकुटुंबांचा तर तो आता एकमेव त्राता होता. दक्षिण महाराष्ट्रातील औंध, सांगली, मिरज, इचलकरंजी येथले पेशव्यांचे ब्राह्मण सरदार संस्थानिक मात्र चुळबूळ करु लागले. तेव्हा रंगोबापूजीच्या विश्वासातल्या म्होरक्यांनी त्यांना सज्जड दम भरला, “आमच्या भानगडीत पडाल, इंग्रज अधिकाऱ्यांना कळवाल, तर इंग्रजांच्या आधी तुमचाच चेंदामेंदा करुन टाकू, लक्षात ठेवा.ते भिऊन चूप बसले.

भोरचा देशस्थ ब्राम्हण संस्थानिक पंतसचिव मात्र एका बाजूला रंगोजीला पाठिंबा द्यायचा बहाणा करायचा व दुसऱ्या बाजूला आपला नोकर कृष्णराव सिंदकर याच्यामार्फत पुण्याच्या इंग्रज कमिशनरला रंगो बापूजीच्या बातम्या पोचवायचा याच सिंदकराने शेवटी घात केला.
साताऱ्यावर व महाबळेश्वरवर एकाच वेळी हल्ला करायचे ठरले. रंगो बापूजीच्या या उद्योगाची कुणकुण पुण्याच्या इंग्रज कमिशरला लागली. नाझर कोर्टातील शिपाई मानसिंग या कटात सामील आहे, असे समजल्यावर त्याला बंदुकीच्या गोळीने उडविले. नाशिकपासून बेळगाव -धारवाडपर्यंत एकाच दिवशी उठाव करायचे ठरले होते. उठावाचा दिवस जवळ आला म्हणून रंगो बापूजी कृष्णराव सिंदकरला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेला. सिंदकराने हिवतापाने आजारी असल्याचे सोंग केले होते. रंगो बापूजीने त्याला विचारले, “तू उठावाची व्यवस्था कशी काय लावलीस? उठावाचा तुझा बेत कसा ठरला आहे ?” तोच शेजारच्या खोलीतून काही इंग्रज सोजीर आत आले व त्यांनी रंगो बापूजीला पकडले. तेव्हा रंगो बापूजी त्याला त्वेषाने म्हणाला, “बुवा सिंदकरा! आपल्या महाराष्ट्र मायभूमीचा गळा कापलास तू. जातीच्या नावाला कालिमा फासलास. तुझा निर्वंश होईल. मी तर मरणालाच मिठी मारुन आजवर उद्योग केला. तू मात्र आपल्या महाराष्ट्र भूमीचाच घात केला आहेस.” ।

[irp]

रंगोबाला पकडून दिल्याबद्दल भोरच्या पंत सचिवाची कंपनी सरकारने मोठी वाहवा केली. त्याला अनेक सवलती सन्मानाने दिल्या. कृष्णराव सिंदकराला काही गावांची इनामदारी वंशपरंपरा देऊन त्याला ‘विश्वासराव’ हा किताब बहाल केला.

रंगो बापूजीला महाराष्ट्रात न ठेवता ग्वाल्हेरच्या तुरुंगात गोऱ्या सोजिरांच्या पहाऱ्यात ठेवले. रंगोबाला इंग्रजी भाषेत अस्सलखित बोलता येत होतेच. त्याने त्या सोजिरांना आपल्या प्रवासातील कहाण्या सांगून सांगून आपलेसे केले व त्यांचा विश्वास संपादन केला. तो पार्लमेंटच्या मेंबरांचाही मित्र आहे. त्याच्या प्रतिष्ठित इंग्रज दोस्तांनी त्याला निरोप देताना चांदीचे तबक दिले होते.हे ऐकून त्याचा चांगलाच प्रभाव त्या सोजिरांवर पडला. त्यांची चांगली दोस्ती झाली. तेव्हा संधी साधून एके रात्री रंगो बापूजी ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून जो पळाला, तो जंग जंग पछाडूनही इंग्रजांच्या हाती लागला नाही.

__ इकडे महाराष्ट्रात ३१ जुलैला जागोजाग उठाव झाले. ते इंग्रज सरकारने दडपून टाकले. त्यात रंगोबाचा मुलगा सिताराम, बेळगांवच्या पलटणीतला ठाकुरसिंह मुनशी, रंगो बापूजीचे मेव्हणे केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, गणेश कारखानीस, बाबिया मांग, येशा मांग इ.ना देहान्ताच्या शिक्षा देण्यात येऊन त्यांना फाशी दिले. बाकीच्या क्रांतिकारकांच्या मनाचा ठाव सूड बुद्धीने घेतला. त्यांनी पंढरपूरचे ठाणे उध्वस्त केले. तेथला मामलेदार नागेश राघवेद्र व त्याचे दोन मुसलमान शिपाई यांना ठार करुन तेथला खजिना लुटला. ते सारे ८/१० बहादुर होते. पैशाच्या लोभाने गिरजाप्पा वाणी याने त्या सर्वांची नावे सांगितली. त्या सर्वांना पकडण्यात येऊन दोघांना फाशी देण्यात आली व बाकीच्यांना जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. साताऱ्याच्या छत्रपती घराण्याची एकनिष्ठतेने सेवा करणाऱ्या रंगोबापूजींच्या वंशातील सर्वांचा शिरच्छेद करण्यात आला.

[irp]

___ या उठावाच्या मुळाशी सातारचे छत्रपती घराणे आहे.असे समजून इंग्रजांनी छत्रपती घराण्यातील प्रतापसिंहाचा दत्तकपुत्र शाहू ऊर्फ जंगली महाराज, त्याचा चुलता काकासाहेब, राजसबाई, गुणवंताबाई, तिचा पुत्र दुर्गासिंह या सर्वांना अटक करुन मुंबईजवळ बुचर बेटावर अलग अलग ठेवले. तेथून त्यांना १८५८ साली कराचीला नेले. तेथेही वेगवेगळे ठेवून एकमेकांच्या भेटी होऊ दिल्या नाहीत. अप्पासाहेबाचा दत्तक पुत्र व्यंकाजी याला आधी अहमदाबादला व नंतर अहमदनगरला ठेवले. या सर्वांना दरमहा ३८० रु तनखा देण्यात येत असे.

___ शाहू ऊर्फ जंगली महाराजांना जुलै १८८५ मध्ये मुक्त केले. ते पुण्यात भवानी पेठेत राहत असत. तेथेच १ जून १८९२ रोजी त्यांचे निधन झाले. त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. कराचीत अटकेत ठेवलेल्या सर्वांचीच सुटका १८८५ च्या सुमारास झाली व ते महाराष्ट्रात परत आले. रंगो बापूजीचा पत्ता मात्र कोणालाही अखेरपर्यंत लागला नाही. यवतमाळ जिल्ह्यात अडाम नदीच्या तीरावर पुसद या शहराजवळ बैरागी महाराजांचा एक मठ आहे. त्या मठात एक समाधी आहे. ती समाधी रंगो बापूजीची आहे व त्यांचा स्वर्गवास याच मठात झाला, असे म्हणतात. तेथे दरवर्षी रंगो बापूजीची पुण्यतिथी साजरी केली जाते. काही इतिहाससंशोधकांचे मतही असेच आहे.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!