Home Study Material युवराज चैनसिंह

युवराज चैनसिंह

माळव्यातील नरसिंहगडच्या रियासतीचा प्रदेश दीड-दोनशे वर्षांपूर्वी माळव्याचे काश्मीर म्हणून प्रसिद्ध होता. त्या रियासतीच्या डोंगरदऱ्या, जंगले, तलाव यांमुळे तेथले निसर्गवैभव अतुलनीय बनले होते. वर्षभर हिरवागार असलेला हा प्रदेश कोणालाही मोहून टाकेल असाच होता. मग इंग्रज त्याला अपवाद कसे ठरतीय? त्या रियासतीचे राजे होते राजपूत सौभाग्यसिंह. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव चैनसिंह -त्याला सौभाग्यसिंहांनी युवराज पद दिले होते. चैनसिंह बालपणापासूनच अति स्वाभिमानी होता. त्याचे शिक्षण होता होता, तो युद्ध कलेतही निपुण बनला होता. अंगात तारुण्य सळसळत होते. स्वातंत्र्याचा तो उपासक होता.
इंग्रजांनी भोपाळच्या नबाबाला आपल्या अंकित केले आणि सन १८१८ मध्ये सिहोर येथे आपली छावणी स्थापित केली. मि. मैडाक याला त्या छावणीचा अधिकार सोपविला. त्याला भोपाळ, राजगड, खिलचीपूर व नरसिंहगड या रियासतींचा राजनैतिक प्रतिनिधी म्हणून नेमले. इंग्रजांची ही ताबेदारी व दादागिरी युवराज चैनसिंहाच्या मनात डाचत होती. सौभाग्यसिंहाचे महामंत्री आनंदराव बक्शी यांना मैडाकने आपल्या बाजूला वळवून घेतले होते. तो नरसिंहगडच्या दरबारातील हालचालींच्या बातम्या मैडाकला सतत पुरवीत असे. चैनसिंहाला आपला हा महामंत्री आपल्या राज्याशी विश्वासघात करीत आहे याची खात्री झाली. आपल्या पित्याचा विरोध असूनही चैनसिंहाने त्या विश्वास घातकी महामंत्र्याला ठार केले. त्यामुळे मैडाक संतापला.
इंदूरच्या होळकरांनाही इंग्रज सरकारचे आपल्यावरील वर्चस्व मुळीच पसंत नव्हते. त्यांनी आपणांस इंग्रजांच्या पाशातून कसे मुक्त होता येईल, याचा विचार करण्यासाठी मध्यभारतातील सर्व राजेराजवाड्यांची एक बैठक इंदूरला घेतली. त्या बैठकीत नरसिंहगड राज्याच्या वतीने युवराज चैनसिंह हे सुद्धा उपस्थित होते. याची बातमी नरसिंहगडचे एकमंत्री रुपरामबोहरा यांनी गुप्तपणे मि. मैडाक याला दिली. ते चैनसिंहाला समजले. त्याला ही चैनसिंहाने संधीसाधून ठार केले. रुपराम बोहराच्या भावाने कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलकडे त्याबाबत तक्रार एका पत्राने केली. मि. मैडाककडेही तक्रार नोंदविली गव्ह. जनरलने यासंबंधी मि. मैडाककडे चौकशी केली.

चौकशीसाठी मैडाकने चैनसिंहाला आपल्या भेटीस बोलावले. चैनसिंहाने त्याकडे दुर्लक्ष केले व तो मैडाकला भेटायला गेलाच नाही. हा कोण माझी चौकशी करणारा? अशा विचारानेच चैनसिंहाने बेफिकिरी दाखविली. मैडाक बेरसियाला आला व त्याने तेथे आपला तळ देऊन पुन्हा चैनसिंहाला आपली भेट घेण्यासंबंधी पत्र दिले. बेरसिया येथे चैनसिंह आपल्या मोजक्या सैन्यासह आला. त्याची व मैडाकची भेट झाली. तेव्हा मैडाकने चैनसिंहासमोर तीन अटी ठेवल्या. १. चैनसिंहाने नरसिंहगड सोडून काशीला कायमचे राहावे. २. तीन वर्षांपर्यंत नरसिंहगडचे राज्य इंग्रजांच्या आधिपत्याखाली कारभार करील. ३. नरसिंहगड राज्यात उत्पादित होणारी अफू फक्त इंग्रजच खरेदी करतील.

[irp]

चैनसिंहाचे स्वाभिमानी व स्वातंत्र्य-प्रिय मन या अपमानास्पद व गुलामीत गोवणाऱ्या अटी मान्य करण्यास तयार होणे शक्यच नव्हते. त्याने मैडाकच्या अटी धुडकावून लावल्या. दोघांमध्ये बरीच बोलाचाली झाली. तेव्हा मैडाकने मुद्दामच पडते घेऊन चैनसिंहाला २४ जून १८२४ रोजी सिहोर येथे येण्यास सांगितले. कारण सिहोरच्या छावणीत मैडाकच्या हाताखाली १००० सशस्त्र सैनिक होते. चैनसिंहाने ते मात्र मान्य केले. सिहोरला काय होणार, याची कल्पना चाणाक्ष चैनसिंहाला होतीच.

२४ जून रोजी चैनसिंहाने सिहोरला जाण्याची तयारी केली. बेरसियाला काय घडले. ते त्याने आपल्या वडिलांना सर्व कुटुंबियांसमक्ष आधीच सांगितले होते. इंग्रजांपेक्षा आपले बळ फार कमी आहे, म्हणून सौभाग्यसिंहानी आपल्या या वीर पुत्राला सांगितले की, ‘तू सिहोरला जाणे, योग्य नाही.”सौभाग्यसिंहाप्रमाणेच चैनसिंहाच्या आईने, भावाने व पत्नीनेही त्याला विरोध केला. पण या मुजोर इंग्रजांची धमेंड जिरवायचीच या विचाराने आपले दोन – अडीचशे शूर सैनिक घेऊन त्या दिवशी सिहोरला गेलाच. मि. मैडाकच्या निवासस्थानी त्याने मैडाकची भेट घेतली. मैडाकने त्याची एक तलवार बघण्यासाठी मागितली. नंतर त्याने चैनसिंहाची दुसरी तलवार ही मागितली. आपणांस निःशस्त्र करण्याचा मैडाकचा विचार आहे. हे चैनसिंहाने तात्काळ हेरले व तो म्हणाला.

[irp]

__“राजपूताची कमर शस्त्रांविना राहूच शकत नाही, तो दुसरी तलवार देत नाही, हे पाहून मैडाकचे व त्याचे भांडण सुरु झाले. मैडाकने आपल्या सैनिकांना हुकूम केला की, “चैनसिंहाला गिरफ्तार करा.”तोच चैनसिंहाने आपल्या तलवारीने मैडाकवर वार केला व आपली तलवारही त्याच्याकडून हिसकावून घेतली. मैडाक जीव घेऊन पळून गेला. चैनसिंह बाहेर येऊन आपल्या घोड्यावर स्वार झाला. आणि त्याने त्या पळपुट्या मैडाकचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे मैडाकचे सैन्य आणि चैनसिंहाचे सैन्य एकमेकांस भिडले. तेथे भयंकर युद्ध झाले. एका बाजूला चैनसिंहाचे थोडेसे तलवारींनी लढणारे सैन्य व दुसऱ्या बाजूला बंदुकधारी इंग्रजांचे मोठे सैन्य. त्या सैन्यासमोर चैनसिंहाच्या सैन्याचा निभाव लागणे, शक्यच नव्हते. चैनसिंहाचे अनेक सैनिक मारले गेले. तरीही चैनसिंह आणि त्याचे हिंमतखाँ व बहादुरखाँ हे दोघे अंगरक्षक व चैनसिंहाचा शेरु नावाचा कुत्रा इंग्रज सैन्याशी लढतच राहिले. चैनसिंहाच्या मानेवर मोठा घाव झाला, तो मृतवत झाला, तरीही दोही हातात तलवारी घेऊन त्याने अनेक इंग्रज सैनिकांना यमलोकात पाठविले व त्या आणि त्याच्या दोन्ही अंगरक्षकांना वीरगती प्राप्त झाली. शेरुही ठार झाला. त्या स्थानी चैनसिंहाची व शेरुची समाधी व त्याच्या अंगरक्षकांच्या कबरी आहेत. श्रद्धेने त्यांची पूजा केली जाते. लोक गीतात चैनसिंह अमर झाला. “चैनसिंह राजाकी क्या बढाई। फिरांगीयोंको भुला ती लढाई ॥

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!