Home Study Material मौलवी लियाकत अली

मौलवी लियाकत अली

मौलवी लियाकत अली धर्मनिष्ठ होते. संपूर्ण कुराण त्यांनी कंठस्थ केले होते. दररोज पाच वेळा ते नियमितपणे नमाज पढत. मुलांना कुराणाचे ते अध्यापन करीत असत आणि कुराणाच्या आज्ञांचे पालन करायला लावीत असत. ते मानवतावादी होते. राम आणि रहीम कबीरांप्रमाणे एकच मानायचे त्यांचा आदर मुसलमानच नव्हे, तर हिंदूही करीत असत. इंग्रजी सत्तेमुळे जनतेचे होत असलेले शोषण व त्यामुळे देशवासियांना गरिबीत कंठावे लागणारे जीवन पाहून ते व्यथित होत असत. ते सुरुवातीला अलाहाबादच्या चक मोहल्ल्यातील एका मुस्लिम महिलेच्या मुलाची शिकवणी करीत होते. नंतर ते इंग्रजांच्या सैन्यात दाखल झाले. सैन्यातील शिपायांत ते राष्ट्रीय वृत्तीचा प्रचार करीत. त्यांमुळे त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर ते मौलवी झाले व महगावच्या मशिदीत नमाज अदा करू लागले. इंग्रज सरकार विषयी त्यांच्या मनात कमालीचा असंतोष खदखदत असायचा. त्यामुळेच अलाहाबादमधील सैनिकांनी १८५७ मध्ये इंग्रजांविरूद्ध उठाव केला, तेव्हा ते त्या उठावात सामील झाले.

__ अलाहाबादच्या देशी पलटणीतील सैनिकांनी त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्यांची कत्तल केली. त्यांचे बंगले लुटून जाळून टाकले. खजिनाही लुटला. तुरुंग फोडून कैद्यांना मुक्त केले. अलाहाबादच्या आसपासच्या गावातील लोकांनीही त्या सैनिकांना साथ दिली. सैनिकांनी अलाहाबाद व आसपासची गावे ताब्यात घेतली. मौलवी लियाकत अली ७ जून १८५७ रोजी अलाहाबादला आले. त्यांनी खुसरू बागेत सैनिकांचा व जनतेचा मोठा दरबार भरविला. सर्व गांवात कोतवालांची, तहसीलदारांची, ठाणेदारांची व इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्या भागात प्रति सरकार स्थापन केले. त्यांनी लखनौचा शाहजादा बिरजिस कद्र याच्या नावाने आम जनतेत घोषणा केली की, ‘साऱ्या देशात, विशेषतः अलाहाबादच्या परिसरात इंग्रज लोकांनी लुटमार, हत्या, गावांना आगी लावणे, निरपराध लोकांना मारणे, हिंदू-मुसलमानांचे पवित्र ग्रंथ जाळून टाकणे इत्यादी प्रकारे क्रूरतेचे थैमान माजविले. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन धर्मयुद्धासाठी तयार व्हावे आणि कपटी व पापी ईसाई लोकांना ठार करावे.’

[irp]

मौलवी लियाकत अलीच्या नेतृत्वाखाली देशी शिपायांनी व जनतेने अलाहाबादच्या परिसरातील इंग्रजांचे बंगले जाळले, लूटमार केली. सरकारी खजिने लुटले. हे सत्र ९ जून ते १४ जून पर्यंत चालू होते. त्याला त्या भागातील प्रतिष्ठित हिंदू-मुसलमानांचा पाठिंबा होता. त्यानंतर कलकत्त्याहून कर्नल नील मोठे सैन्य घेऊन आला. रस्त्यातीलसगळी गावे त्याने जाळून टाकली. गावातील स्त्री-पुरुष, बाल-बच्चे म्हातारेकोतारे यांच्या कत्तली केल्या. प्रतिकार करणाऱ्या हजारो लोकांना झाडांच्या फांद्यांवर फाशी दिले. रस्त्यावरील सर्व झाडांवर अनेक प्रेते लटकत होती. त्याची माहिती लिहून मौलवी लियाकत अलीने दिल्लीला बहादूरशाह जफरकडे पाठवून दिली. जे लोक जीव घेऊन पळाले ते वाचले. लियाकत अलीसुद्धा कानपूरला जाऊन नानासाहेब पेशव्यांना मिळाले. अलाहाबादच्या छावणीत बंडखोर शिपायांनी कानपूरला प्रयाण केले. त्यांनी कर्नल नीलची राक्षसी कृत्ये पाहिली होती. इंग्रजांवर ते चिडलेलेच होते. नानासाहेब पेशव्यांनी पकडलेल्या इंग्रज स्त्री-पुरूषांना सतीचौरा घाटावरून चाळीस नावांमधून अलाहाबादकडे रवाना केले. तेव्हा या सैनिकांनी त्या नावांतील इंग्रजांवर अंधाधुंद गोळीबार केला. ते लियाकत अलीने पाहिले होते. नीलच्या अमानुष कृत्यांमुळेच चिडून त्यांनी त्या नावांमधील कित्येक इंग्रज स्त्री-पुरूषांना यमसदानास पाठविले. आपल्या या कृत्याबद्दल नीलनेच एका पत्रात लिहिले होते की, ‘निरपराधी अथवा अपराधी, क्रांतिकारी किंवा आमच्याशी प्रामाणिक, आमचे भले इच्छिणारी वा विश्यासधाती, सूड घेण्याच्या भावावेशात सर्वांना मारले गेले… सुमारे सहा हजार लोकांची हत्या करण्यात आली. झाडांच्या प्रत्येक फांदीवर सर्वत्र दोन-तीन प्रेते लटकत होती. सलग तीन महिने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ बैलगाड्यांमधून झाडांवरील व खांबावरील प्रेते काढून त्या बैलगाड्यांत भरून गंगेत सोडली जात होती.’ असा नरराक्षस होता तो नील.

मौलवी लियाकत अली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपले क्रांतिकार्य करीतच होते. इंग्रज दिसला की, त्याला ठार करीत होते. त्याचे नाव निघताच इंग्रज स्त्री-पुरुषांना, त्यांच्या मुलांना धडकी भरायची.

[irp]

लियाकत अली पुन्हा तीन हजार फौज व दोन तोफा घेऊन अलाहाबादला आले. तेथे त्यांनी इंग्रजांशी मोठी लढाई केली. पण तीमध्ये ते पराभूत झाले व परत नानासाहेबांकडे आले. नानासाहेबपराभूत होऊन विठूरहून लखनौकडे निघून गेल्यानंतर ते दक्षिणेकडे गेले. मुंबईला पोचले. तेथे इंग्रजांच्या गुप्तहेरांनी त्यांना पकडून दिले. त्यांनी सरकारविरुद्ध बंड केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. त्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांनी माफी मागावी म्हणून इंग्रज अधिकऱ्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांना प्रलोभनेही दाखविण्यात आली. त्यांना ना माफी मागितली ना ते इंग्रजांच्या प्रलोभनांना बळी पडले. आपला देश या क्रूर व अत्याचारी इंग्रजांच्या तावडीतून केव्हा व कसा मुक्त होईल याचे मनन-चिंतन करीतच ते तुरूंगवास भोगताना अल्लाघरी निघून गेले. या थोर धर्मनिष्ठ क्रांतिकारकाला शतशःप्रणाम! जबरदस्तीने किंवा प्रलोभने दाखवून हिंदू-मुसलमानांचे ईसाई धर्मांतर करणाऱ्या मिशनऱ्यांना पाहून ते संतप्त होत असत. परंतु हिंदू लोकांविषयी त्यांना प्रेम होते. असेच मौलवी भारतात सर्वत्र अखेरपर्यंत असते, तर भारताची फाळणी मुळीच झाली नसती. हे निर्विवाद होय.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!