Home Study Material मौलवी अहमदुल्ला शाह

मौलवी अहमदुल्ला शाह

१८५७ च्या स्वातंत्र्य-लढ्यात हिंदूच्या बरोबरीने अनेक मुसलमानांनी सुद्धा खांद्याला खांदा लावून आपल्या प्राणांचे बलिदान केलेले आहे. अशाच स्वातंत्र्यवीरांत मौलवी अहमदुल्ला शाह याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्याचे मूळ गाव मिझ अहमदशहा असे होते. मिर्झ या त्याच्या उपाधीवरून तो मुस्लीम राजघराण्यातील होता, हे स्पष्टपणे दिसून येते. तो मोगलांच्या राजघराण्यातील उत्तर मुघलकालातल्या अकबर (द्वितीय) (१८०६ ते १८३७) याचा मुलगा कामरान याचा एक मुलगा होता. तो अतिशय स्वाभिमानी, बुद्धिमान पण गरम डोक्याचा होता. त्याचे शिक्षणात मुळीच लक्ष नव्हते. म्हणून एके दिवशी कामरानने आपल्या या उनाड मुलाच्या थोबाडीत जोराने थप्पड लगावली. त्याचा राग येऊन तो पळून गेला. त्याचा कामरानने खूप तपास केला, परंतु तो सापडलाच नाही. आपला वेष बदलून तो हिंदुस्थानातच नव्हे, तर अफगणिस्तान, इराण, इराक, अरबस्तान इ. देशात हिंडत राहिला. त्याची गाठ एका चांगल्या फकिराशी पडली. त्या फकिराजवळ तो राहू लागला. त्या फकिराकडून त्याला अरबी व फारसी या भाषांचे व इस्लामच्या धर्मतत्वांचे ज्ञान झाले. नंतर तो हिंदुस्थानात येऊन फकिरांच्या संगतीने निरनिराळ्या प्रातांत हिंडत राहिला. मद्रास प्रांतात तो बराच काळ राहिला व त्याने तमीळ भाषेवर प्रभुत्व मिळविले. हिंडत असतानाच त्याने हिंदी, ब्रज, उर्दु, मैथिली इ. भाषांचेही ज्ञान प्राप्त करून घेतले. त्याला एकंदर सात भाषांचे चांगले ज्ञान होते. तो फकिराच्या वेषात ग्वाल्हेरला आला, तेव्हा तेथला श्रेष्ठ फकीर मियाँ तुराबशाह यांचा तो चेला बनला. तुराबशाहने त्याचे नाव मौलवी अहमदुल्लाह असे ठेवले. याच नावाने तो पुढे ओळखू जाऊ लागला.
काही दिवसानंतर मियाँ मेहराब शाह या श्रेष्ठ साधकाजवळ राहून त्याची सेवा करू लागला. मियाँ मेहराब शाह याने आपल्या साधकावस्थेत त्याला आशीर्वाद दिला की, “जा मी तुला अवधचा बादशहा बनविले आहे.” ज्या काळात लखनौला इंग्रजांनी तैनाती फौज ठेवून आपल्या अंकीत करून घेतले होते, त्याच काळातील ही गोष्ट आहे. अहमदुल्ला शाहने आपल्या गुरुचा शब्द प्रमाण मानून त्याने काही घोडे जमविले, शस्त्रे जमविली. काही अनुयायी मिळविले. त्यांच्यासह तो अवधकडे निघाला. सर्वात पुढच्या घोड्याच्या पाठीवरील अनुयायी आपल्यापुढे डंका (नगारा) ठेवून तो वाजवीत चालला होता. डंका वाजवीतच त्याची स्वारी गावागावातून अवधकडे चालली होती. वाटेत त्याला आणखी काही अनुयायी मिळाले. त्यांची संख्या वाढतच चालली. त्या डंका वाजविल्यामुळे त्याला लोक ‘डंका शाह’ म्हणू लागले. त्याला गावोगाव नजराणेही मिळू लागले. प्रत्येकगावात तो बेधडपणे सांगायचा की, “मी अवधचा बादशहा आहे.” अशा रीतीने तो आपल्या अनुयायीकरवी डंका वाजवीत लखनौला पोचला. तेथे तो घासमांडीतील एका घरात राहू लागला. तो जेव्हा लखनौ शहरात आपल्या अनुयायांसह हिंडायचा, तेव्हाही आपल्या पुढे डंका वाजवीतच जायचा. त्यामुळे तो लखनौमध्येही ‘डंका शाह’ म्हणून प्रसिद्ध झाला.

मौलवी अहमद शाह हा फकीर आपल्या सशस्त्र अनुयायांसह नेहमी लखनौमध्ये हिंडत असतो. हे लखनौच्या पोलिसांनी तेथल्या इंग्रज मॅजिस्ट्रेटला सांगितले. तेव्हा मॅजिस्ट्रेटने पोलिसांना सांगितले की, “त्याच्याकडून तुम्ही शस्त्रे काढून घ्या व त्याला सांगा की, तू जेव्हा लखनौहून निघून जाशील, तेव्हा ही शस्त्रे तुला परत मिळतील.” पोलिसांनी त्याच्याजवळची शस्त्रे जेव्हा मागितली तेव्हा तो त्या पोलिसांच्या अंगावर धावून गेला आणि चवताळून म्हणाला, ‘मी अवधचा बादशाह आहे. कोणत्या बादशाहने अशा रीतीने कधी आपली शस्त्रे दिली आहेत काय? कोण माझी शस्त्रे घेऊ शकतो. तेच मी बघतो. पोलिसांनी त्याला पागल समजून त्याचा नाद सोडून दिला आणि त्याचे म्हणणे मॅजिस्ट्रेटला सांगितले. मॅजिस्ट्रेटने त्यावर सांगितले की, “त्याला जाऊन सांगा.शस्त्रे देत नसशील, तर लखनौमधून तू तुझ्या अनुयायांना घेऊन निघून जा.”
पोलिसांनी त्याला तसे सांगितले. तेव्हा तो आपल्या अनुयायांसह फैजाबादला निघून गेला. इंग्रज त्याला तेव्हा पासून मॅड मौलवी म्हणू लागले.

कानपूरचा पूर्णपणे पाडाव झाल्यावर नानासाहेब पेशवे लखनौकडे चालले होते. तेव्हा मौलवी अहमदुल्लाह त्यांना भेटला. त्यांचे बरेच बोलणे झाले. आधीपासूनच तो फकिरी वेषात हिंडत असताना इंग्रजांच्या अत्याचारी कारभाराबद्दल गावोगावच्या जनतेला इंग्रजांविरुद्ध भडकवीत होता. नानासाहेबांशी बोलणी झाल्यावर मौलवी अहमदुल्लाहाने स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.

फैजाबादमध्येही त्याच्या डंका फेऱ्या सुरु होत्या. एके दिवशी तेथल्या सशस्त्र पोलिसांना सांगितले की, त्या मॅड मौलवीकडून शस्त्रे काढून घ्या.” त्या पोलिसांनी मौलवीकडे जाऊन त्याची व त्याच्या अनुयायांची शस्त्रे मागितली. तेव्हा तो त्या सशस्त्र पोलिसांच्या अंगावर आपली तलवार उपसून धावून गेला. त्या झटापटीत त्याने दोन पोलिसांना ठार केले व अनेक पोलिसांना घायाळ केले. ते कळताच मॅजिस्ट्रेटने जादा सशस्त्र पोलीस पाठवून त्यांच्याकरवी त्याला अटक केली आणि तुरुंगात डांबून ठेवले. तुरुंगात तो पोलिसांना व इंग्रजांना मोठमोठ्या शिव्या द्यायचा. एके दिवशी तो मॅजिस्ट्रेट तुरुंगात येऊन त्याला म्हणला, आम्ही तुला तुरुंगातून मोकळे केले, तर आमच्यासाठी काय करशील? तेव्हा त्या मॅजिस्ट्रेटला शिव्या देत तो म्हणाला, ‘मी माझ्या देशातल्यासर्व इंग्रजांना ठार करीन.” हा खरोखरच मॅड (पागल) आहे, असे समजून तो मॅजिस्ट्रेट गुपचूप निघून गेला.

इंग्रजांच्या देशी पलटणीतील सैनिकांच्या बातम्या चहुकडे पसरल्या. लखनौच्या देशी सैनिकांनी उठाव केला. फैजाबादलाही तेच घडले. फैजाबादच्या देशी पलटणीतील शिपायांनी तेथला तुरुंग फोडला व मौलवी अहमदुल्ला शाहसह सर्व कैद्यांना मुक्त केले. त्यांनी त्या मॅजिस्ट्रेटला व तेथल्या इंग्रज पुरुषांना कैद केले. मैलवी अहमदुल्ला शाहने त्यांच्या बायका-मुलांना नावांत बसवून घागरा नदीतून सुरक्षितपणे इलाहाबादेस पाठवून दिले.
मौलवी अहमदुल्लाह हा हिंदु-मुस्लिम धर्म समान मानीत होता. त्याला धर्मभेद पसंत नव्हता. देशप्रेम व माणुसकी हाच त्याचा धर्म होता. उठाव करणाऱ्या सैनिकांनी त्याला आपला सरदार मानले त्या भागातील जमीनदार व तालुकदारही त्याला येऊन मिळाले. सर्वांनी फैजाबादचा खजिना घेऊन लखनौकडे कूच केले.

इंग्रजांनी लखनौमधील जनतेचा आवडता नबाब वालिद अली शाहला पदच्युत करुन कलकत्ता येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे लखनौच्या जनतेत इंग्रज सरकारविरुद्ध असंतोष धुमसत होता. इंग्रजांचे राज्य आपल्या देशातून पूर्णपणे नष्ट झाले पाहिजे, असे लखनौच्या जनतेला व तेथल्या देशी पलटणीमधील शिपायांना वाटत होते. त्यासाठी ते कटिबद्ध झाले होते. मौलवी अहमदुल्लाशाहने प्रतिज्ञा केली की,

[irp]

“मादरे हिंद तुझे कैदसे छुडायेंगे। या तेरी खाक में हम मिल जायेंगे॥

(हे माझ्या हिंद-मातृभूमी, आम्ही तुला इंग्रजांच्या कैदेतून मुक्त करु; नाहीतर तुझ्या धुळीत मिसळून जाऊ.)

तो इंग्रजांचे सैन्यबल व शस्त्रबल जाणून होता. त्याने आपल्या सैनिकांसाठी एक जाहीरनामा काढला. त्यात त्याने सैनिकांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले होते, ते असे

“आपल्या सैनिकांनी फिरंग्यांच्या सैनिकांशी समोरासमोर सामना देऊ नये. कारण बंदोबस्तात, शिस्तीत व कवायतीत त्यांच्या पलटणी आपल्याहून श्रेष्ठ आहेत. त्यांच्याजवळ मोठमोठ्या तोफा फार आहेत. म्हणून त्यांच्याशी उघडपणे लढाई न करता, त्यांच्या आजूबाजूस राहून त्यांच्या सैनिकी तळांवर वारंवार छापे घालावे. त्यांच्या हालचाली रोखीत जाव्या. नद्यांवरील सर्व घाट व पूल दाबून धरावे. त्यांचे दळणवळण तोडून टाकावे. त्यांची रसद लुटावी. डाक (टपाल) लुटाव्या. त्यांची ठाणी नष्ट करावी.त्यांच्या तळाभोवती सतत घिरट्या घालाव्या. त्या फिरंग्यांना मुळीच विश्रांती मिळू देऊ नये.”

लखनौला मौलवी अहमदुल्लाह, नानासाहेब पेशवे, बाळासाहेब पेशवे, शाहजादा फिरोजशहा आपापल्या सैन्यासह बेगम हजरत महल हिला येऊन मिळाले. लखनौमधील बेलीगारदमध्ये सारे इंग्रज एकत्र झाले होते. बेलीगारदवर त्यांनी हल्ला केला. त्यात हेन्री लारेन्स व विल्सन हे इंग्रज सेनाधिकारी मारले गेले. त्यानंतर सर्वांनी शाहजहाँपूरवर संघटितपणे हल्ला करुन ते शहर ताब्यात घेतले व तेथून सगळे इंग्रज पळवून लावले. हा त्यांचा मोठा विजय होता. नंतर त्यांनी लखनौवर चाल केली व तेथल्या इमामवाडा आणि मच्छी भवनवर हल्ला करून ती दोन्ही स्थाने बळकावली. तेथून सारे इंग्रज आलमबागेत निघून गेले. दिल्लीहून बख्तखाँ हा सेनापती आपल्या पाच हजार सैन्यासह लखनौत दाखल झाला. लखनौच्या मुख्य तुरुंगावर मौलवी अमदुल्लाशाहने हल्ला करुन तो तुरुंग फोडला. कैद्यांना मुक्त केले. या हल्ल्यात जनरल हार्स ठार झाला. इंग्रज सैनिक हताश होऊन निघून गेले. आता तर मौलवी अहमदुल्लाह सगळ्या इंग्रजांना आपला कर्दनकाळच वाटू लागला. त्याला जिवंत किंवा मृत अवस्थेत त्याला पकडलेच पाहिजे, असा इंग्रजांनी निर्धार केला. चिनहटची लढाई सुध्दा या क्रांतिकारकांनी जिंकली त्यांनतर लखनौच्या गादीवर बेगम हजरत महल हिचा अल्पवयीन मुलगा बिरजीस कद्र याला समारंभपूर्वक बसविण्यात आले. बेगम हजरत महल त्याची संरक्षिका बनली व तिने राज्यसूत्रे हाती घेऊन राज्यकारभार सुरु केला.

दिल्ली व कानपूर या महत्त्वाच्या क्रांतिकेंद्रातील विद्रोह शमविल्यानंतर होपग्रँट, ल्यूगार्ड, वालपोल आदी इंग्रज सेनाधिकारी मोठे सैन्य घेऊन लखनौकडे आले. त्यांनी शाहजहाँपूरवर हल्ला चढवून ते शहर जिंकले. लखनौमध्ये मात्र त्यांना इंच इंच भूमिसाठी जिवाचा आटापिटा करून लढावे लागले. त्यात त्यांचे काही सेनाधिकारी कामास आले तरीही नानासाहेब, मौलवी अहमदुल्लाह, बेगम हजरत महल, राणा बेनी माधोसिंह इत्यादिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. ते मोठ्या चातुर्याने लखनौमधून निघून जाऊन नेपाळकडे वळले. सारा अवध प्रांत अजून विद्रोह्यांनी व्यापला होता. तो हस्तगत करण्याचा निश्चय इंग्रजांनी केला. इंग्रजांचे सैन्य नानासाहेब, बेगम हजरत महल व मौलवी अहमदल्लाह यांच्या पाठलागावरच होते. नेपाळच्या दक्षिण सीमेच्या अलीकडील राप्ती नदीच्या किनारी इंग्रज सैन्याने त्यांचा पूर्ण पराभव केला. तेव्हा ते नेपाळच्या तराईत निघून गेले. लखनौच्या मोहीमेत नेपाळचा राजा १० हजार सैन्यासह येऊन इंग्रजांच्या मदतीला आला होता. म्हणूनच इंग्रजांना लखनौ जिंकता आले.

[irp]

मौलवी अहमदुल्लाहची पोबेनचा राजा जगन्नाथसिंहाशी ओळख होती. त्याने जगन्नाथसिंहाला मदत करण्यासाठी निरोप दिला. पण इंग्रजांनी त्याला आपल्याकडे वळवून घेतले होते आणि मौलवीला पकडून देण्याबद्दल मोठ्या बक्षिसाची लालूच त्याला दाखविली होती. जगन्नाथसिंहाने मौलवी अहमदुल्लाह याला आपल्या पोबेनच्या किल्ल्यात येण्याचे आमंत्रण दिले. मौलवी येतो आहे, असे समजताच जगन्नाथसिंहाने

आपल्या किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद केले. जगन्नाथसिंह हा गलेलठ्ठ, सुखचैनीने सुस्त व काहीसा मंदबुध्दी होता. इंग्रजांचा सगळीकडे विजय होतो आहे., हे समजताच अवध प्रांतातील बहुतेक राजे-रजवाडे, जहागीरदार, तालुकदार इंग्रजांची जी हुजुरी करु लागले होते. त्यातलाच हा पोबेनचा जगन्नाथसिंह.
__ मौलवी अहमदुल्लाह आपल्या निवडक सैनिकांनीशी पोबेनच्या किल्ल्याजवळ आला. तेव्हा पाहतो तो किल्ल्याचे दरवाजे बंद आणि तटावर जगन्नाथसिंह व त्याचा लहान भाऊ बलदेवसिंह काही सैनिकांसह तटाबर उभे. मौलवीने जगन्नाथसिंहाला दरवाजा उघडण्यास सांगितले. तेव्हा तो गलेलठ्ठ राजा खदाखदा हसू लागला. तेवढ्यात बलदेवसिंहाने नेम धरुन मौलवीच्या छातीवर गोळी झाडली. ती त्याच्या छातीतून आरपार निघून गेली व तो आपल्या हत्तीवरुन खाली कोसळला. लगेच त्याचे सैनिक पळून गेले. मौलवी निष्प्राण झाला. हे पाहिल्यावर ते दोघे भाऊ दरवाजा उघडून त्याच्या मृतदेहाजवळ आले व त्याचे मुंडके कापून घेऊन किल्ल्यात गेले. पुन्हा किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. केवढा हा विश्वासघात! आणि तोही आपल्याच हिंदी राजाकडून! अशा विश्वासघातक्यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमीच होईल. नंतर त्या दोन्ही भावांनी ते मौलवीचे मुंडके धावत जाऊन इंग्रजांच्या छावणीत सर कोलिन याच्यापुढे ठेवले. तेव्हा कोलिनचा आनंद काय वर्णावा. इंग्रजांच्या कर्दन काळाचे मुंडके त्याच्या समोर पडले होते. त्याबद्दल त्याने जगन्नाथसिंहाला ५० हजार रुपये दिले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!