Home Study Material मेहताब सिंह रणधीर

मेहताब सिंह रणधीर

“ईश्वराची आज्ञा आहे की स्वराज्य प्राप्त करा. कारण स्वधर्म – रक्षणासाठी स्वराज्य अत्यावश्यक असते. जो स्वराज्य – प्राप्तीसाठी प्रयत्न करीत नाही व परदास्यात ही तटस्थ राहतो, तो अधर्मी तर आहेच, देशद्रोही सुद्धा आहे. म्हणून स्वधर्मासाठी स्वराज्य प्राप्त करा.” बुलंदशहर जिल्ह्यातील बराल गावचे मेहताबसिंह यांच्या अंतःकरणात हे शब्द जणू कोरले गेले होते.

मेरठ छावणीत स्वातंत्र्य युद्धाची ठिणगी पडली आणि त्या ठिणगीने बरालपासून गुलावटी, मालागड, बुलंद शहरापर्यंतच्या प्रत्येक गावातील तरुणांची मने त्या युद्धात उडी घेण्यासाठी पेटविली होती. प्रत्येक गावातील लोक इंग्रज सरकारविरुद्ध पेटून उठले होते. बराल गावचे तरुण राजपूत मेहताबसिंह रणधीर यांनी त्या जनतेचे नेतृत्व सांभाळले. त्या भागातील सर्व गावांतील तरुणांनी मेहताब सिंहाच्या नेतृत्वाखाली शस्त्रे उपसली व ते इंग्रजांविरुद्ध लढण्यास तत्पर झाले. ‘स्वातंत्र्य’ हाच शब्द ज्याच्या त्याच्या मुखी होता. सुमारे २०,००० तरुण मेहताबसिंहा भोवती संघटित झाले होते.
बुलंदशहरचा मॅजिस्ट्रेट टर्नबुल याला ही बातमी समजताच तो तेथली एक पटलण घेऊन मेहताबसिंहाचा काटा काढण्यासाठी बराल गावी आला. दोन्ही सैन्यात भयंकर युद्ध झाले. दोन्ही बाजूंचे शेकडोवीर त्या युद्धात मरण पावले. धरती रक्ताने लालेलाल झाली. त्या युद्धात अहीर चौबासी म्हणजे यादवांच्या चोवीस गावातील लोक सुद्धा इंग्रजांविरुद्ध लढले. क्रांतिकारकांनी आपल्या अदम्य उत्साहाने व पराक्रमाने टर्नबुलला व त्याच्या गोऱ्या सैन्याला आश्चर्यचकित केले. मेहताब सिंह दुर्दैवाने या युद्धात कामी आले. बराल आणि आसपासची अनेक गावे टर्नबुलने जप्त केली.

या युद्धाने व्यथित होऊन मालगडचा नबाब वलिदाद खाँ याने बुलंदशहरच्या त्या मॅजिस्ट्रेटला पत्र लिहिले ते असे

“आपण एक आज्ञापत्र मला पाठविले आहे. त्यात आपण लिहीले आहे की, बराल गावात गुजरांची एक मोठी सेना माझ्या सल्ल्याने जमली आहे व ती फौज संघर्ष करण्यास उतावीळ झाली आहे. सत्य हे आहे की, बराल गाव माझ्या रियासतीत नाही. त्या प्रदेशात माझा हुकूम मानणारे माझ्या जातीचे लोक मुळीच नाहीत.

[irp]

आपल्या लोकांनी विनाकारण मेहताब सिंहासारख्या व्यक्तीला ठार केले आहे. तो साधारण मनुष्य नव्हता. तो बराल भागाचा मुखिया होता व त्या भागातील लोकांच्या मनात त्याच्याविषयी फार आदर होता. मेहताब सिंहाच्या हत्त्येमुळे सगळे राजपूत तुमच्याविषयी नाराज झाले आहेत. जर आपण अशाच रीतीने लोकांना ठार करीत राहिलांत, तर हा जिल्हा बरबाद होऊन जाईल. तुमच्या या कारवाईने १२ हजार लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. तसेच करोडो रुपयांची संपत्ती नष्ट झाली आहे. मी तुमच्याबद्दलची तक्रार गव्हर्नर जनरल कडे करीन”

मेहताबसिंहाच्या बलिदानामुळे बलीदाद खाँ फार व्यथित झाला होता. हे पत्र लिहिल्यानंतर दोन दिवसांनी वलिदादखाँने बुलंदशहरातून इंग्रजांना पळवून लावले. बुलंदशहर गुलावटी – हापुड मार्गावरील खेड्यातील लोकांनी त्या पळून जाणाऱ्या इंग्रजांवर गोळीबार केला. ३१ मे १८५७ रोजी ते इंग्रज मेरठ येथे पोचले.

[irp]

बराल गावात ज्या पिंपळाच्या वृक्षाजवळ मेहताबसिंह धारातीर्थी पडले, त्या ठिकाणी बराल गावच्या व आसपासच्या गावच्या लोकानी त्यांचे स्मारक उभारले आहे. त्यांच्या समाधीवर श्रद्धाळू लोक दिवा लावतात व प्रसादही चढवितात. त्या समाधी-स्थानाला ‘देवता का थान’ म्हटले जाते. थान म्हणजे स्थान. मेहताबसिंह आता सुद्धा त्या प्रदेशात देवतातुल्य मानले जातात. बराल गावाला ‘पुण्यभूमी’ व ‘वीरभूमी’ मानले जाते. महान क्रांतिकारी राजा महेद्र प्रताप यांनी मूर्ती सुद्धा या गावात स्थापन करण्यात आली असून ते स्थानही पवित्र मानले जाते.
बराल गावाच्या कांडावरून हे लक्षात येते की, केवळ लोकांची संघटना एखाद्या पुरुषाने उभारली, तरी ती इंग्रजांना धोकेदायक वाटत असे. वास्तविक पाहता मॅजिस्ट्रेट टर्नबुलने उतावीळ होऊन हे युद्ध त्या भागातील लोकांवर लादले होते व नाहक हजारो लोक त्या युद्धात बळी गेले होते. लोकांची संघटना उभारणे हा काही गुन्हा नव्हे. त्या संघटनेपासून त्रास झाला, तर त्याचा प्रतिकार करणे योग्य. पण संघटना उभारणेही इंग्रजांच्या निरंकुश सत्तेला सहन होत नव्हते, हेच बराल गावच्या घटनेवरून स्पष्टपणे दिसून येते.

[irp]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!