Home Study Material मूलराज

मूलराज

महाराजा रणजितसिंहाचे निधन २७ जून १८३९ रोजी झाले व पंजाबचे समृद्ध राज्य पोरके झाले. त्या काळात पंजाबच्या शिख राज्यातील मुलतानचा सुभेदार सावन्तमल हा होता. मुलतान सुभ्याचा कारभार त्याने उत्तम रीतीने चालविला होता. पण १८४४ साली त्याचेही निधन झाले व मुलतानची सुभेदारी त्याचा मुलगा मूलराज याच्याकडे आली.

रणजितसिंहाच्या निधनानंतर इंग्रजांनी पंजाबच्या राज्यकारभारात हस्तक्षेप सुरु केला. शिख राज्य तर नेताविहीन झाले होते. इंग्रजांनी कुरापत काढून शिखांशी युद्ध केले. त्यात शिखांचा पराभव झाला. त्यात सतलजच्या दक्षिणेकडील प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. लाहोरला शिख दरबारात हेन्री लोरन्स याची नेमणूक कंपनी सरकारने केली. त्याच्या देखरेखीखाली शिख राज्याचा कारभार सुरु झाला. मुलतानच्या सुभेदारीच्या उत्तराधिकाराबद्दल त्याने मूलराजकडे ३० लाख रुपयांची मागणी केली. मूलराज हा स्वाभिमानी व शूर होता. “मी सुभेदार झालो, तो माझ्या वंशपरंपरेने. तेव्हा इंग्रज रेसिडेंटला ३० लाख रुपये मी का म्हणून द्यावे?”असा विचार करुन त्याने ती मागणी फेटाळून लावली.
मुलतानच्या सुभ्यातून लाहोर दरबारला १९ लाख रुपये दरवर्षी दिले जात होते. ही प्रथा रणजितसिंहाच्या कारकिर्दीपासून सुरु होती. मूलराजने ३० लाखांची मागणी फेटाळल्यानंतर हेन्री लारेन्सने नवा प्रस्ताव मुलराजकडे पाठविला. त्यात म्हटले होते की, “मूलराजने चालू वर्षी १९ लाखांऐवजी २५ लाख रुपये द्यावे.”पुढच्या वर्षापासून दरवर्षी २० लाख रुपये देत जावे.”हा प्रस्ताव सुद्धा मूलराजने फेटाळून लावला व आपल्या सुभेदारीची त्यागपत्र लाहोर. दरबारकडे पाठवून दिले. हेन्री लारेन्सने ते त्यागपत्र मंजूर केले नाही. पण १८४८ मध्ये त्याच्या जागी क्युरी हा इंग्रज रेसिडेंट आला. त्याने मूलराजचे त्यागपत्र मंजूर केले.

क्युरीने इंग्रज -धार्जिणा सरदार खानसिंह मान याची नेमणूक मुलतानला सुभेदार पदी केली. आपले सहकारी वान्स एग्न्यू व अंडरसन यांच्यासह क्युरीने खानसिंह मान याला मुलतान येथे सुभेदारीची सूत्रे घेण्यासाठी पाठविले. मूलराजने शांत चित्ताने खानसिंह मान यांच्याकडे सुभेदारीचा सर्व कारभार सोपविला. ती तारीख १९ एप्रिल १८४८ ही होती. त्याच दिवशी इंग्रज सरकारवर असंतुष्ट असलेल्या शिख सैनिकांनी वान्स एग्न्यू व अंडरसन या दोघा अधिकाऱ्यांची हत्त्या केली. या हत्त्यामागे मूलराजचा हात असला पाहिजे, असा संशय रेसिडेंट क्युरी याला आला. मुलतान मधील शिख सैनिकांनी मूलराजला इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासाठी प्रवृत्त केले. त्याने शिखांना आपल्या धर्मरक्षणासाठी आवाहन केले व सशस्त्र उठावास तो सिद्ध झाला. त्याच वेळी मुलतानमध्ये खरे तर स्थानिक उठावास सुरुवात झाली.
__ परंतु इंग्रजांनी या उठावाकडे जाणून-बुजून विशेष असे लक्ष दिले नाही. त्यांना वाटत होते की, “पंजाबमध्ये असेच अनेक उठाव व्हावे. म्हणजे पंजाबातील राज्यकारभारात अव्यवस्था माजली जाऊन हा संपूर्ण समृद्ध प्रांत आपल्याला हस्तगत करण्यास आयतेच कारण सापडेल व नंतर पंजाबचे राज्य आपल्या राज्यात सहज विलीन करता येईल.”आणि तसेच झाले. पेशावर, बन्नू आणि पंजाबचा वायव्य भाग या प्रदेशात ही इंग्रजांविरुद्ध उठाव सुरु झाले. या उठावांमागे रणजिसिंहाची लहान राणी जिन्दन कौर हिचाच हात आहे, असा ग्रह इंग्रजांचा झाला. कारण सारी शिख प्रजा राणी जिन्दन कौर हिला मानीत होती.

[irp]

रेसिंडेट क्युरीने एक पत्र पाठवून गव्हर्नर जनरलला कळविले की, “मूलराज, सगळे शिख सैन्य आणि पंजाबचा जनतेची अशी इच्छा दिसते की, राणी जिन्दन कौर हिने पंजाबातील उठावांची सूत्रे स्वतः हाती घ्यावी. “राणी जिन्दान कौर पंजाबच्या उठावाच्या केंद्रस्थानी राहील. तेव्हा जाणून-बुजून राणीवर खोटेनाटे आरोप ठेवून तिला बदनाम करता येईल. त्यामुळे शिखांच्या भावना भडकतील व सारे पंजाब राज्य उठाव करुन उठेल. त्यानंतर पंजाबात अराजक माजले आहे, हे कारण दर्शवून पंजाबचे समृद्ध राज्य आपल्या राज्यात सामील करुन घेता येईल, असा कयास इंग्रज अधिकाऱ्यांचा होता. तर डलहौसीचे धोरणही तसेच होते.
__ रेसिडेंट क्युरीने दुसऱ्या एका पत्राचे गव्हर्नर जनरलला कळविले की, “हे खरे आहे की, मूलराज, सारे शिख सैन्य आणि शिख जनता यांना वाटते की राणी जिन्दन कौर हिनेच उठावाच्या केंद्रस्थानी राहावे. पण याला कसलाही पुरावा नाही.’

हिंदुस्थानातील इंग्रज सैन्याचा प्रमुख सेनापती ह्यू गफने मुलतानचा उठाव झाल्यानंतर काही दिवसांनी लेफ्ट. एडवर्ड याला सैन्याची एक तुकडी देऊन मुलतानवर आक्रमण करण्यास पाठविले. त्यामुळे संपूर्ण पंजाब राज्यात विद्रोहाच्या ज्वाला भडकल्या. त्या काळात हजाराचे शिख सुभेदार छत्तरसिंह यांचा पुत्र शेरसिंह हा लाहोर दरबारचा सेनापती होता. रेसिडेंट क्युरीने त्याला मूलराजचा बीमोड करण्यासाठी त्याचे शिख सैन्य घेऊन मुलतानला पाठविले. शेरसिंह मुलतानला पोचला, तेव्हा त्याचे शिख सैन्य मूलराजच्या शिख सैन्याला जाऊन मिळाले व तो सुद्धा मूलराजला साह्य करु लागला. अशा प्रकारे मूलराजचा स्थानिक उठाव राष्ट्रीय आंदोलनात सामील झाला. त्याने स्वातंत्र्य युद्धाचे रुप धारण केले. ते कळताच ग. ज. डलहौसीने शिखांशी युद्ध करण्याची घोषणा केली.

सेनाप्रमुख [ गफने रावी नदी पार करुन चिनाब नदीकाठी असलेल्या रामनगर जवळ शेरसिंहाच्या सैन्यावर हल्ला केला. पण त्या लढाईत कोणाचाही विजय झाला नाही. ते युद्ध अनिर्णयात्मक ठरले. जानेवारी १८४९ मध्ये ह्यू गफचे सैन्य आणि शिख सैन्य यांच्यात चिलियानवाला या गावाजवळ भीषण युद्ध झाले. ह्यू गफच्या सैन्यापेक्षा शिख सैन्य कमी असले, तरी त्या सैन्याने अदम्य उत्साहाने गफच्या सैन्याशी मोठ्या पराक्रमाने सामना दिला. त्यात २३ हजार इंग्रज सैनिक जखमी झाले. त्यातले काही हजार सैनिक रणांगणावरच मारले गेले. इंग्रज सैन्याचे भयंकर नुकसान झाले. तसेच २६ इंग्रज अधिकारी ठार झाले व ६६ अधिकारी जखमी झाले. २२ जानेवारी १८४९ मध्ये उरलेल्या इंग्रज सैन्याने मूलराजचा पराभव केला व त्याने मुलतानच्या किल्ल्यात आश्रय घेतला. तेव्हा गफने किल्ल्याला वेढा दिला. अखेर मूलराजला शरणाखती पत्कारावी लागली आणि मूलराजला अटक करण्यात आली. शिखांचा पूर्णपणे पराभव झाला. १२ मार्च १८४९ रोजी शेरसिंह, छत्तरसिंह व अन्य शिख सरदारांनीही आत्मासमर्पण केले.

[irp]

मूलराजवर विद्रोहाचा व राजद्रोहाचा आरोप ठेवून सैनिकी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याचा निकाल लागून मूलराजला आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली.

मूलराजवर आणि शिख राज्यावर आपण अन्याय केला आहे. असे काही प्रामाणिक इंग्रज इतिहासकारांचे मत होते. कारण त्या आधीही इंग्रजांना शिखांचे सहकार्य मिळत होतेच. २९ मार्च १८४९ रोजी ग. ज. डलहौसीने पंजाब आपल्या साम्राज्यात सामील करुन घेतला. त्याचे हे कृत्य अन्याय पूर्ण होते. ते राज्य सामील करुन घेण्याचा नैतिक अधिकार डलहौसीला नव्हता. असेही काही इंग्रज इतिहासकारांनी

लिहून ठेवले आहे. एक इंग्रज अधिकारी बेल हा म्हणतो की, “पंजाब इंग्रज साम्राज्यात सामील करुन घेणे, हे विश्वासाविरुद्ध एक हिंसात्मक प्रतिज्ञा भंगाचेच उदाहरण आहे.”

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!