Home Study Material मुहम्मद अली

मुहम्मद अली

मुहम्मद अली हा १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात लखनौची मोर्चेबंदी करणारा लखनौ दरबारच्या कुशल इंजिनिअर होता. त्याचा जन्म उत्तर प्रदेशात बरेली या जिल्ह्याच्या ठिकाणी झाला. त्याचा बाप बरेली येथील इंग्रजांच्या छावणीतील मेसमध्ये खानसामा (स्वयंपाकी) होता. मुहम्मद अलीचे शिक्षण बरेली छावणीतील शाळेत इंग्रज मुलांबरोबर झाले. तो अतिशय बुद्धीमान असल्याने शेवटच्या परिक्षेत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. आपल्या बापाच्या मध्यस्थीमुळे त्याला रुडकी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्या कॉलेजात इंग्रज मुले शिकत होती. इंजिनिअरींगची अंतिम परीक्षा तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. इंग्रजांच्या सर्व मुलांपेक्षा त्याला सर्वाधिक गुण त्या परिक्षेत मिळाले होते. तो अस्खलितपणे इंग्रजीत बोलायचा. दिसायला तो रुबाबदार होता. सर्वांशी तो सभ्येतेने वागायचा. त्याने इंग्रज अधिकाऱ्याकडे नोकरीसाठी अर्ज केला. त्याला त्या अधिकाऱ्याने अगदी हलक्या दर्जाची नोकरी दिली. एका सामान्य इंग्रज सुताराच्या हाताखालचा नोकर म्हणून पहाडी भागातील सडका तयार करण्याचे काम देण्यात आला. ही बाब अत्यंत अपमानास्पद होती. पण एका गरीब मुस्लीम खानसाम्याचा मुलगा. पोटासाठी नोकरी करणे त्याला त्याला जरूरीचे होते. तो गोरा सुतार स्वतःला फार श्रेष्ठ समजायचा व मुहम्मद अलीशी तुच्छतेने वागायचा. गोऱ्या सुताराच्या उर्मट वागणुकीला कंटाळून त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला व तो लखनौ दरबारात मानाने इंजिनिअर म्हणून काम करू लागला.
लखनौ दरबारात काम करीत असताना त्याला समजले की, नेपाळचा राजा जंगबहादुर याला इंग्लडला जायचे असून त्याला इंग्रजी भाषेत प्रवीण असणाऱ्या सेक्रेटरीची आवश्यकता आहे. मुहम्मद अलीने लखनौच्या नबाबाच्या परवानगीने राजा जंगबहादुर याच्याकडे सेक्रेटरी पदासाठी अर्ज केला. तो समक्ष त्या राजाला भेटला. जंगबहादुरने त्याची निवड सेक्रेटरी म्हणून लगेच केली व तो त्या राजासह इंग्लंडला गेला.

इंग्लंडहून परत आल्यानंतर त्याने काही संस्थानिकांकडे नोकरी केली. ब्रह्मावर्तचे नानासाहेब पेशवे यांचे दरसालचे आठ लाखांचे पेन्शन बंद केले होते. ते सुरु करण्यास डलहौसी दाद देत नव्हता. म्हणून नानासाहेब पेशव्यांनी आपला विश्वासू मंत्री अजीमुलाखाँ याला आपला वकील म्हणून इंग्लडला पाठविण्याचे ठरविले. अजीमुलांखाँ यांचे इंग्रज व फ्रेंच या दोन्ही भाषांवर प्रभुत्व होते व तो चाणाक्ष, विचारी आणि बुद्धिमानहोता. म्हणूनच नानासाहेबांनी वकील म्हणून त्यांची निवड केली. मुहम्मदअली राजा जंगबहादुराबरोबर इंग्लडला गेला होता. हे अजीमुल्लाखाँ याला माहीत होते. एक माहितगार व अनुभवी म्हणून अजीमुल्लाखाँने मुहम्मद अलीला आपल्या बरोबर घ्यावयाचे ठरवून नानासाहेबांना तसे सांगितले. त्यांनाही त्याला संमती दिली व त्या दोघांना १८५४ साली ५० हजारावर पौंड एवढी रक्कम देऊन इंग्लडला पाठविले.
___ अजीमुल्लाखाँ याने मुहम्मद अलीसह अनेक इंग्रज उमरावांशी, पार्लमेंट सदस्यांशी व ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरशी चांगले संबंध जोडले. त्यांच्यासाठी खूप पैसाही खर्च केला. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या धूर्त डायरेक्टरनी त्याला मुळीच दाद दिली नाही. नानासाहेबांचे पेन्शन सुरु करण्याचे नाकारले. ग. ज. डलहौशीचा निर्णय योग्य आहे. त्यात आम्ही फेरफार करू शकत नाही. असे उत्तर अजीमुलाखाँला त्यांनी दिले. त्यामुळे अजीमुल्लाखाँ व मुहम्मद अली नाराज झाले व त्यांच्या मनांत इंग्रजांविषयी भयंकर चीड निर्माण झाली.

कंपनी सरकारने साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांना पदच्युत करून त्यांना बनारस येथे नजरकैदत ठेवले होते. आपले राज्य आपणास परत मिळावे, म्हणून प्रतापसिंहानी रंगोबापूजी या आपल्या एकनिष्ठ सेवकास १८३९ साली आपला वकील म्हणून इंग्लंडला पाठविले होते. रंगोबापूजींनी इंग्लंडमध्ये १४ वर्षे सातत्याने त्यासाठी प्रयत्न केले. पण कंपनीच्या डायरेक्टरांनी त्यालाही वरीलप्रमाणे उत्तर देऊन वाटेला लावले. रंगोबापूजीची व अजीमुल्लाखाँ आणि मुहम्मद अली याची भेट लंडनमध्ये झाली. तिघेही इंग्रजांवर चिडले होते, याची योजना त्यांनी ठरविली. रंगोबापूजी १८५४ साली, तर अजीमुल्लाखाँ आणि मुहम्मद अली तुर्कस्तान, इराण, अफगणिस्तान या देशांना भेटी देऊन १८५६ साली ब्रह्मावर्तास परत आले. त्यांनी नानासाहेबांना इंग्रजाविरूद्ध उठाव करून त्यांना हिंदुस्थानातून कसे हाकून द्यायचे याची योजना सांगितली. उत्तर हिंदुस्थानात अजीमुल्लाखाँ त्या प्रयत्नास लागला. तर रंगोबापूजीने दक्षिण हिंदुस्थानात तसा प्रयत्न आधीच सुरू केला होता. हिंदुस्थानच्या सर्व भागातून इंग्रजांचा नायनाट करण्याचे ठरले.
इंग्लंडहून परत आल्यावर लखनौची बेगम हजरत महल हिने मुहम्मद अलीला आपल्या दरबारात इंजिनिअर म्हणून नोकरीवर घेतले. १० मे १८५७ रोजी मेरठच्या देशी पलटणीने इंग्रज सरकारविरुद्ध उठाव केला. दिल्लीच्या देशी पलटणीही त्यांना सामील झाल्या. बहादुरशाह जफर याला त्या विद्रोही सैनिकांनी हिंदुस्थानचा बादशहा म्हणून घोषित केले. बरेली येथील देशी पलटणीने ही तसाच उठाव केला. त्या पलटणीतीलसैनिक दिल्लीकडे निघाले. मुहम्मद अलीही त्यांच्याबरोबर दिल्लीला आला. बादशाहाने त्याची नेमणूक युद्धकालात इंजिनिअर म्हणून केली. त्याआधीच त्याने आपली बायको व मुले सुरक्षित स्थानी पोचविली होती.

मुहम्मद अलीने दिल्लीच्या रक्षणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली. त्यामुळेच इंग्रजांच्या हाती दिल्ली चार-साडेचार महिने येऊ शकली नाही. दिल्ली इंग्रजांच्या हाती पडल्यानंतर सेनापती बक्तखाँ आणि मुहम्मद अली आपल्या पाच हजार सैन्यासह मथुरेला आले. मुहम्मद अलीने थोड्याच अवधीत यमुना नदीवर नावांचा पूल तयार केला व त्या पुलांवरून ते आपल्या सैन्यासह यमुनापार झाले आणि लखनौ येथे पोचले.

खरे युद्ध तर आता अवध प्रांतातच व्हायचे होते. लखनौला आल्यावर बेगम हजरत महलने मुहम्मद अलीची नेमणूक पुन्हा आपल्या दरबारात इंजिनिअर म्हणून केली. लखनौच्या चहुबाजूंची प्रतिरक्षात्मक व्यवस्था मुहम्मद अलीने केली. त्यामुळेच इंग्रजांना लखनौवर ताबा मिळविण्यासाठी बराच काळ लागला. त्यात त्यांचे काही चांगले सेनापती ठार झाले. सिकंदर बागेच्या रक्षणाची व्यवस्था मुहम्मद अलीनेच केली होती. लखनौ इंग्रजांच्या ताब्यात गेले. तरी सिकंदर बागेवर बादशहाचा हिरवा झेंडा दिमाखाने फडकतच होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर इंग्रजांनी सिकंदर बागेवर ताबा मिळविला. त्यानंतर तो झेंडा नाहीसा झाला. हे दृश्य मुहम्मद अली दुःखित मनाने शाहनजफमधून पाहत होता.

लखनौच्या युद्धाच्या काळात मुहम्मद अलीने गुप्तहेराचे ही काम केले. एक नोकराच्या डोक्यावर गोड पावांचा हार देऊन तो पावविक्याच्या वेषात उन्नाव येथल्या इंग्रजांच्या छावणीत गेला. इंग्रज सेनाधिकारी उन्नावच्या छावणीतून किती शिपाई व किती तोफा लखनौला नेत आहेत, ही इत्यंभूत बातमी काढण्यासाठी पावविक्याच्या वेषात उन्नाव छावणीत शिरला होता. इंग्रजांकडे किती युद्ध सामग्री आहे हे सुद्धा त्याला बघायचे होते. तेथेही आपल्या लोकांचे फितुरीचा अनुभव त्याला आला. बरेलीच्या एका देशी सैनिकाने मुहम्मद अलीला ओळखले व त्याने ती बातमी तेथला सेनाधिकारी फोर्बस मिचेल याला दिली. फोर्बस मिचेलने त्याला पकडण्याचा हुकूम काही शिपायांना दिली. त्या शिपायांनी मुहम्मद अली व त्याचा पावांचा
हारेवाला या दोघांना पकडले आणि फोर्बस मिचेल पुढे आणले. त्याने मुहम्मद अलीचा कसून चौकशी केली. त्यांच्यात बरीच प्रश्नोत्तरे झाली. चौकशी संपल्यावर मुहम्मद अलीने फोर्बस मिचेलकडून लंडनची इंग्रजी वर्तमानपत्रे मागून घेतली व तो ती वाचू लागला. तेव्हा फोर्बस मिचेलला फार आश्चर्य वाटले. “तुला इंग्रजी भाषेचे एवढे चांगले ज्ञान कसे झाले?” असा प्रश्न त्याने मुहम्मदअलीला विचारला. तेव्हा त्याने अस्खलखित इंग्रजीत फोर्बसला सांगितले की, “मी बरेलीला छावणीतील शाळेत व नंतर रुडकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन प्रथम क्रमांकाचे इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे.” हे ऐकताच फोर्बस मिचेल अधिकच चकित झाला. हिंदी लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दलचे त्याचे पूर्वग्रह एकदम नाहीसे झाले. मुहम्मद अलीने हे सुद्धा स्पष्टपणे सांगितले की, “मी पावविक्या म्हणून कशासाठी तुमच्या छावणीत आलो होतो.”

[irp]

मुहम्मद अलीच्या व फोर्बस मिचेलच्या नंतर बऱ्याच गप्पा मोकळेपणाने झाल्या. मुहम्मद अलीला आता माहीत झाले होते की, येथून आपली सुटका होणे शक्यच नाही. म्हणून त्याने आपल्या मनाची तयारी कोणत्याही शिक्षेला सामोरे जाण्याची केली. त्याच्यावर एक इंग्रजाच्या हत्येचा खोटा आरोप ठेवून त्याला तेथल्या सैनिकी न्यायालयात फाशीची शिक्षा सुनविण्यात आली. तेव्हा दोन तीन इंग्रज सैनिक मुसलमानांना निषिद्ध अशी डुकराची चरबी आणण्यास निघाले. तेव्हा फोर्बस मिचेलने त्यांना तसे करण्यास मनाई केली. म्हणून मुहम्मद अलीने त्याचे आभार मानले व तो म्हणाला,

“आम्ही तुम्हां इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यात आम्हांला यश आले नाही. तरीही आमचे बलीदान व्यर्थ जाणार नाही. तुमची आमची लढाई यापुढेही चालूच राहील. तुम्ही लखनौला जाल, तेव्हा तुमचे जास्तीत जास्त सैनिक ठार होतील, असाच बंदोबस्त मी केलेला आहे. तुम्ही तो बघालच.” नंतर दुसऱ्याच दिवशी उन्नाव छावणीत मुहम्मद अलीला फाशी देण्यात आले. धन्य तो इंजिनिअर! आणि धन्य त्याचे धाडस!

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!