Home Study Material मंगल पांडे

मंगल पांडे

२९ मार्च १८५७ चा दिवस. बंगाल सेनेच्या ३४ व्या रेजिमेंटमधील क्र. १४४६ चा ब्राम्हण शिपाई मंगल पांडे एके दिवशी सकाळी प्रातर्विधी उरकून आपला तांब्या जवळच्या तळ्यावर घासून, धुवून त्यात पाणी भरून आपल्या छावणीकडे निघाला होता. तेवढ्यात एक मेहेतर (भंगी) समोरून आला व त्या शिपायाला म्हणाला, “भाईसाब, पानी पीने के लिए जरा अपना लोटा दीजिए!” ते एकून मंगल पांडे खवळून म्हणाला,

“तुझे लोटा दिया तो वह अपवित्र हो जाएगा और मेरा धर्म भी भ्रष्ट हो जाएगा!” त्यावर तो मेहतर म्हणाला,
“भाईसाहेब, तुम्हारा धर्म तो वैसे भी नष्ट हो जाएगा । अंग्रेज सरकार तुम्हारी नयी बंदुकोंके लिए जो कारतुसे बना रही है, उनके ऊपर गायों की और सूअरों की चर्बी लगाए हुए कव्हर तुम्हें दाँतों से काटने पडेंगे । तब तुम्हारे धर्म का क्या होगा?” हे ऐकल्यावर मंगल पांडेला धक्काच बसला व तो फक्त म्हणाला, “ऐं!” आणि आपल्या छावणीकडे धावला. त्याने छावणीतील सगळ्या हिंदू-मुसलमान सैनिकांना ती बातमी सांगितली व तो म्हणाला, “ये बदमाश अंग्रेज लोग हमारा धर्म नष्ट करने जा रहे है । हमें बगावत करनी ही होगी।” त्याचे ते बोल ऐकून सारेच सैनिक खवळले. मंगल पांडे तर आपली बंदूक सरसावून मैदानात आला व सगळ्या सैनिकांना आवाहन करू लागला, “अंग्रजो को हमें मारना ही चाहिए । चलो उठो! अपनी अपनी बंदूकें सँभालो।”

[irp]

मंगल पांडेचे इंग्रज अधिकाऱ्यांना आव्हानच होते. त्याचे ते आव्हान ऐकून सार्जंट मेजर ह्यूसन त्याच्याकडे पिस्तुल घेऊन धावला. तो समोर येताच मंगल पांडेने आपल्या बंदूकीने अचूक नेम धरून त्याच्यावर गोळी झाडली. मेजर ह्यूसनला ती वर्मी लागली व तो धाडकन कोसळून तडफडू लागला. ते पाहून लेफ्टनंट बॉब घोड्यावरून त्याच्याकडे पिस्तूल रोखून धावला. पांडेने गोळी झाडली, पण ती त्याच्या घोड्याला लागली व घोडा कोसळला. बॉबही खाली पडला व आपली तलवार उपसून पांडेवर वार करण्यासाठी धावला. तो पांडेवर वार करणार तोच पांडेने आपल्या तलवारीने त्याचा हातच छाटून टाकला व धाडकन कोसळून तडफडू लागला. पांडेने दोघांना यमसदनास पाठविले. बाकीचे सैनिक लांब उभे राहून हा सारा खेळ बघत होते. त्यांनी पांडेलाही साथ दिली नाही की त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीलाही ते धावले नाहीत. एका इंग्रज सैनिकाने ते कांड पाहिले व त्याने कर्नल व्हीलरला ते सांगितले. कर्नल व्हीलरला घोड्यावरून पळत आला व त्याने उभ्या असलेल्या सैनिकांना पांडेला गिरफ्तार करण्यास सांगितले. पण त्याचा हुकुम कोणीही मानला नाही. म्हणून तो तणतणत जनरल कर्नल हियरसेकडे गेला व त्याने सारी हकीकत त्याला सांगितली. जनरल हियरसे आपल्या हाताखालील अधिकारी व काही गोरे सैनिक घेऊन त्या ठिकाणी आला. शिपायांना तुम्ही पांडेला पकडण्याचा हुकुम का दिला नाही, असे त्याने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, “शिपाई आमचा हुकूम मानीत नाहीत.” ते ऐकताच तो शिपायाकडे पाहून गरजला.
“कहना नहीं मानते? मेरी बात सुनो, जो पांडे को पकडने आगे नहीं बढेगा उसे मैं गोलीसे उडा दूंगा | फॉरवर्ड मार्च ।”

जनरलचा हुकूम ऐकून ते शिपाई पांडेकडे जाऊ लागले. पांडेला त्या आपल्या साथीदारांना तर मारायचे नव्हते. आता पकडले जाण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे, असा विचार करून बंदुकीची नळी आपल्या छातीकडे वळवली व तिचा घोडा दाबला. गोळी त्याच्या शरीरात शिरली व तो धाडकन खाली पडला, पण मरण पावला नाही. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. हे सारे कांड २९ मार्च १८५७ रोजी घडले. दवाखान्यात पांडे बरा झाल्यावर त्याच्यावर खटला भरण्यात आला. सैनिकी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.[irp]

इंग्रज सैनिकी अधिकाऱ्यांचा आपल्या हिंदी सैनिकांवरील विश्वास या घटनेने उडाला. पांडेला फाशी देण्यासाठी कलकत्त्याहून चार जल्लाद बराकपूरला आणण्यात आले व ८ एप्रिल १८५७ रोजी त्याला फासावर लटकविण्यात आले. मंगल पांडेच्या बलिदानाची हकिकत भारतभरच्या इंग्रजी छावण्यांत पसरली. सारे हिंदी सैनिक आधीच इंग्रजांच्या अन्यायी वागणुकीने असंतुष्ट होते. ते अधिकच संतप्त झाले १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी मंगल पांडेच्या बलिदानाने तयार झाली. तेव्हापासून इंग्रज अधिकारी प्रत्येक बंडखोराला ‘पांडे’ असेच संबोधू लागले.[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!