Home Study Material भीमाबाई

भीमाबाई

भीमाबाई ही इंदूरचे राजे मल्हारराव होळकर यांची भगिनीयशवंतराव होळकर (दुसरे) यांची कन्या तिच्या आईचे नाव केशर बाई तिच्या पोटी भीमाबाईचा जन्म सन १८३५ च्या सुमारास झाला होता. तिचे शिक्षण झाल्यावर यशवंतरावांनी तिचे लग्न त्यांच्याच तोलामोलाच्या घराण्यात एका राजकुमाराशी लावून दिले होते. दुर्दैवाने लग्नानंतर तिच्या पतीचे निधन झाले. वैधव्य प्राप्त झाल्यानंतर ती माहेरी निघून आली. पुन्हा सासरी गेलीच नाही. आपल्या पित्याच्या छत्राखाली ती शस्त्रे चालविण्यात, घोडेस्वारी करण्यात निपुण झाली. ती अत्यंत स्वाभिमानी, शूर व पराक्रमी होती. पुरुषांइतकीच युध्दकलेत पारंगत होती. एका कवीने तिच्याविषयी म्हटले आहे.

“वी, शेरनी लडनेवाली, रण से हुई सगाई थी। खूब लड़ी मर्दानी रणमें, वह तो भीमाबाई थी॥”

पुरुषांच्या सैनिकी वेषात ती घोडाकेक करीत जायची, तेव्हा ती जणू रणचंडिकाच दिसायची. इंदूर राज्यातील जनतेत तिच्या विषयी खूप आदर होता. आपला भाऊ मल्हारराव याच्यापेक्षा ती राजकारणात अधिक कार्यक्षम होती. मल्हारराव तिच्या सल्ल्याप्रमाणे आपला राज्यकारभार चालवायचा दरबारी लोकांतही तिचा मोठा मान होता.
एकोणवीसाव्या शतकात कंपनी सरकार कुटिल नीतीने हिंदुस्थानातील एकेकराज्य आपल्या अंकित करीत चालले होते. सारा हिंदुस्थान आपल्या सत्तेखाली यावा अशी इंग्रजांची महत्वाकांक्षा होती. म्हणून न्याय-अन्याय, नीती अनीतीचा विचार न करता हिंदुस्थानातील एकेक राज्य ते हडप करीत चालले होते. आधीच गव्हर्नर जनरल लार्ड वेलस्लीने अनेक राजांना आपल्या राज्यात तैनाती फौज ठेवायला भाग पाडले होते व त्या प्रत्येक राज्यात आपला एक प्रतिनिधी (रेसिडेंट) कायमचा ठेवून दिला होता. तो रेसिडेंट राज्याच्या कामकाजात हस्तक्षेप करायचा व आपला दबाव त्या राजावर ठेवायचा. इंदूरलाही एक रेसिडेंट होताच. त्याचा आपल्या राज्यकारभारातील हस्तक्षेप भीमाबाईला मुळीच आवडत नसे.

यशवंतराव ह्यात होते, तो पर्यंत तेथल्या रेसिडेंटच्या कारवाया ते मुळीच चालू देत नसत. पण तरुण मल्हारराव गादीवर आल्यानंतर रेसिडेंटची लुडबूड राजकारणात वाढू लागली. मल्हाररावाला समजून चुकले की, कंपनी सरकार आपले राज्य सुद्धा हडप करण्याच्या विचारातर आहे. तेव्हा मल्हाररावाने आपली बहीण भीमाबाई हिचा सल्लाघेतला. भीमाबाईने त्याला स्पष्टपणे सांगितले की, “आपल्या राज्यकारभारात लुडबूड करण्याचा इंग्रजांना मुळीच अधिकार नाही. त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्या या कारवाया आपण थांबविल्याच पाहिजेत.” मल्हाररावाला ही भीमाबाईचे विचार पटले आणि दोन्ही भावा-बहिणींनी गुप्तपणे युद्धाची तयारी सुरु केली. सैन्यभरती करुन नव्या सैनिकांना राज्यात ठिकठिकाणी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. शस्त्रास्त्रांची खरेदी सुरु केली. तयारी होताच मल्हाररावाने युद्धाची घोषण केली.
मल्हाररावाच्या सैन्यात दहा हजार पायदळ, पंधरा हजार घोडेस्वार होते व १०० चांगल्या तोफा होत्या. आपले सैन्य घेऊन मल्हाररावाने आपल्या बहिणीसह महीदपूरला तळ ठोकलाभीमाबाई तर सर्व सैनिकांना रणचंडीच वाटत होती. पुरुषवेषातील तिचेरुप सैन्याला प्रोत्साहित करीत होते. इंग्रज सेनाधिकारी हिस्लॉप आणि हंट यांना हे समजताच ते सुद्धा आपले सैन्य घेऊन महीदपूरला मल्हाररावांच्या सैन्यासमोर युद्धाच्या तयारीत येऊन उभे ठाकले. त्या सैन्यात थोडे गोरे सैन्य व बहुतेक देशी सैन्य होते. हिस्लॉप व हंट हे दोघेही अनुभवी सेनाधिकारी होते. हंट हा सडपातळ पण शूर होता. गोया घोडेस्वार तुकडीचे नेतृत्व त्याच्याकडे होते. त्याला आपल्या रणकुशलतेचा गर्व होता.

गुप्तहेरांनी हंटला सांगितले होते की, मल्हाररावांची बहीण भीमाबाई ही शूर व पराक्रमी असून ती नेहमी पुरुष वेषात असते. ती अत्यंत धाडसी असून ती अतिशय निडर आहे. तिला कोणचीही भीती वाटत नाही. युद्धकलेत ती तरबेज असून ती सुद्धा पुरूषवेषात लढण्यासाठी आलेली आहे. ते ऐकल्यावर हंट तिला बघण्यासाठी उत्सुक झाला व मल्हाररावाच्या सैन्याकडे त्याने दुर्बिण लावली तेवढ्यात भीमाबाई आपल्या घोडेस्वारांच्या तुकडीसह त्याच्यावर चालून आली. हंट चकित होऊन तिच्याकडे बघतच राहिला. तेव्हा भीमाबाई कडाडली.

‘हे फिरंग्या, बघतोस काय? युद्धाला तयार हो!’हंट भानावर आला व त्याने आपल्या घोडेस्वारांच्या तुकडीस भीमाबाईच्या सैन्यावर चाल करण्याचा हुकुम दिला. तुंबळ युद्ध सुरू झाले. रणभूमीवर रक्ताचा सडा पडू लागला. हंट व भीमाबाई आपल्या तलवारीचे पाणी एकमेकांस दाखवू लागले. हंट भीमाबाईच्या हातातील तलवार तिच्या हातातून खाली कशी पडेल, याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात भीमाबाईने संधी साधून हंटच्या खांद्यावर आपल्या तलवारीने जोराचा वार केला. त्याच्या खांद्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो चांगलाच घायाळ झाला व आपल्या घोड्यावर पडता पडता वाचला.
भीमाबाई त्याला म्हणाली, ‘हे फिरंगी! जा आणि आपल्या जखमेवर उपचार करून घे!’त्यानंतर ही हिस्लॉप आपल्या सैन्यासह मल्हाररावावर धावून आला. मल्हारराव हत्तीवरून लढत गेला. त्याचा हत्ती घायाळ होऊन मागे वळून पळू लागला. भीमाबाई सैन्याच्या पिछाडीला जाऊन थोडा वेळ आराम करीत होती. मल्हाररावांचा हत्ती पळू लागल्याने त्याचे सैन्यही घाबरून पळू लागले. त्याचा पराभव झाल्यासारखेच होते. तेव्हा हिस्लॉपने त्याच्याकडे तहाच्या अटी पाठविल्या. त्या अशा

१. मल्हाररावाने आपली राजधानी कंपनी सरकारच्या ताब्यात द्यावी व दुसरीकडे राहाण्यास जावे.

२. कंपनी सरकार त्याला दरवर्षी पेन्शन देईल.

३. त्याचा राजकारणात संबंध राहणार नाही.

४. इंदूरमध्ये इंग्रज फौजेची छावणी राहील.

[irp]

युद्ध थांबलेसे पाहून भीमाबाई घोड्यावर स्वार होऊन मल्हाररावाकडे आली व तिने त्या तहाच्या अटी वाचल्या. तेव्हा ती अत्यंत संतापली व म्हणाली, मी या अटी मुळीच मंजूर करणार नाही. मी माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी इंग्रजांशी मरेपर्यंत लढेन.’ तिचे उत्तर ऐकून हिस्लॉपचा दूत परत गेला आणि पुन्हा युद्ध सुरू झाले. भीमाबाई आपल्या घोडेस्वारांसह रणमैदानात उतरली. लगेच हंटही आपल्या घोडेस्वारासह तिच्यापुढे युद्धसज्ज होऊन आला. भीमाबाईने त्याला विचारले, ‘हे फिरंगी! घाव भरून आला का?’

दोघेही परस्परांवर तलवार चालवू लागले. हंट आता सावधानतेने लढत होता. कारण मागच्या वेळेस भीमाबाईने त्याला चांगलेच जखमी केले होते. आधीच्या पराभवाने भीमाबाई व्यथित झाली होती. आता ती प्राणपणाने हंटशी लढत होती. हंटने भीमाबाईवर आपल्या तलवारीने जोरात वार केला. तिने तो आपल्या तलवारीवर झेलला खरा, पण तिच्या हातातून तिची तलवार त्या जबरदस्त वाराने निसटून खाली पडली. तेव्हा हंट तिला म्हणाला, “राणीसाहेब! तुम्ही शूर आहात. तुमच्या शौर्याने माझ्या मनात तुमच्याविषयी श्रद्धा निर्माण झाली आहे. तुम्ही निःशस्त्र आहात. निशस्त्र शत्रूवर वार करणे मला योग्य वाटत नाही. तुमची तलवार उचलून तुम्हाला देऊ का?’ ‘आभारी आहे, पण शत्रूने दिलेल्या तलवारीने युद्ध करणे, हा मी माझा अपमान समजते.” राणीने त्याला बाणेदारपणे उत्तर दिले. हंट म्हणाला, ‘मी फक्त ऐकत होतो की, हिंदुस्थानी स्त्रिया रण मैदानात उत्तरून शत्रुशी युद्ध करतात. आज मी ते प्रत्यक्ष बघतो आहे. तुमच्या शौर्याने मी प्रभावित झालो आहे. मला सांगा, मी आपली काय सेवा करू?’

[irp]

भीमाबाईने विचार करून त्याला लगेच उत्तर दिले. ठीक आहे, तुम्ही तर हिंदी राजांना एकमेकांत लढवून त्यांची राज्ये हडप करीत आहात. तुम्ही कपटनितीने हिंदी लोकांना गुलाम बनवित आहात. तुम्ही काय आमची सेवा करणार? तेव्हा हंट बोलला, ते जाऊ द्या. मी खरोखरच आपल्यासाठी काही तरी करायला उत्सुक आहे. सांगून तर बघा.

भीमाबाई म्हणाली, चांगली गोष्ट आहे, मला तुम्ही वचन द्या की, इंग्रजी फौजेची छावणी इंदूरला यापुढे राहणार नाही.’

हंटला हे वचन देणे अवघड होते. कारण ते त्याच्या अधिकाराच्या कक्षेत येत नव्हते. म्हणून तो म्हणाला, राणीसाहेब, मी वचन तर देऊ शकत नाही.कारण ते माझ्या अधिकारात नाही पण त्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन.

हंटने वरिष्ठ सेनाधिकारी हिस्लॉपला भीमाबाईची मागणी सांगितली. पण ते त्याच्या ही अधिकार कक्षेत नव्हते. पण त्याने हंटला आश्वासन दिले की, मी याविषयी आपल्या पोलिटीकल एजंटला अवश्य विनंती करीन. हिस्लॉपच्या विनंतीला पोलिटिकल एजंटने मान दिला. त्यामुळे इंग्रजांच्या फौजेची छावणी इंदूरमध्ये न होता, महू येथे झाली.भीमाबाईच्या युद्धात पराजय झाला.तरी तिने आपल्या मनाप्रमाणे इंग्रज अधिकाऱ्याकडून आपले म्हणणे मान्य करून घेतले.हाच तिचा त्या युद्धातला इंग्रजांवर विजय म्हणवा लागेल. मानी व साध्वी अहिल्याबाई होळकरांची वंशज होती ती!

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!