Home Study Material भीमराव देसाई

भीमराव देसाई

सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात दक्षिण हिंदुस्थानातील दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या प्रदेशाचाही मोठा सहभाग होता. या प्रदेशातील जनता असंतोषाने पेटली होती. या प्रदेशातील अनेक ठिकाणी त्या काळात उठाव झाले. धारवाड जिल्ह्यात मुंडरगीच्या भीमराव देसायानेही तसा उठाव केला होता. धारवाड जिल्ह्यातील मुंडरगीचा रंगराव नंदगोडा यांचा मुलगा भीमराव देसाई. तो बेल्लारी जिल्ह्यात तहसीलदार होता. गैरवर्तणुकीच्या कारणावरून त्याला सरकारने बडतर्फ केले. त्यामुळे तो इंग्रज सरकारवर चिडला होता. सोरटूरचे देसाई, डुंबलचा देसाई, कंचनगौडा, हम्मिगीचा देसाई, गोवनकोणचा नाडगौडा इ. लोक त्याचे चांगले मित्र होते. हे सर्वजण इंग्रज सरकारविरूद्ध होते. या प्रदेशातील अनेक देसायांवर व जमीनदारांवर भीमराव देसाई व नरगुंदकर भावे यांचा चांगला प्रभाव होता. भीमराव व भावे यांच्या लोकांकडून इंग्रजाविरूद्ध प्रचार सुरु झाला. भीमराव धाडसी व पराक्रमी असला तरी एकसूत्रपणे काम करणे त्याच्या गावीही नव्हते. धारवाडच्या अतिश्रीमंत व्यापारी बाळाप्पा जायप्पा यांच्याकडे भीमरावाची उठबस असे. हेबळीचे जहागीरदारही भीमारावाचे मित्र होते. हे सारे इंग्रज सरकारला गुप्तहेरांकडून समजत होते. म्हणून बाळप्पा व हेबळीचे जहागीरदार यांच्यावर इंग्रजांच्या गुप्तहेरांनी पाळत ठेवली होती. बेल्लारी, कोप्पल भागातही लोकही भीमरावाला मानीत असत. भीमरावाची पत्नी जिवाबाई हिचे माहेर कोप्पल होते.
बल्लारीहून धारवाडच्या कलेक्टरला कळविण्यात आले की, भीमराव देसाई रंगाराव नाडगौडा याला हाताशी धरून माणसे जमवीत आहे. डुंबल तालुक्यात तलाव बांधण्यासाठी ही माणसे आपण गोळा करीत आहोत, असे ते सांगतात. पण त्यांचा सरकारविरुद्ध उठाव करण्याचा बेत आहे.असे कळते.”

धारवाडच्या कलेक्टरने भीमराव देसाई व सोरटूरचा देसाई यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी बोलणी केली-तेव्हा भीमराव बेमालूमपणे सफाई केली. खरे तर बादशहा बहादुरशाह जफर याला बादशाहीचे अधिकार मिळावे आणि नानासाहेब पेशवे यांना पेशवेपदाचे अधिकार प्राप्त व्हावे, हाच उठावाचा मुख्य उद्देश होता. भीमरावामुळे बेल्लारी जिल्ह्यात सारावसुलीला अडथळा येतो आहे, असे धारवाडच्या कलेक्टरला कळविण्यात आले होते. भीमराव मोठ्या प्रमाणात शस्त्र-संग्रह करीत आहे, असेही कलेक्टरला समजले होते. म्हणून त्याने पोलिस अधिकाऱ्यांना हुकूम केला होता की, भीमरावाच्या कारवायांवर सतत कडक नजर ठेवावी.

[irp]

मे १८५८ च्या शेवटच्या आठवड्यात भीमरावाने उठाव केला. काही खेडी लुटली. व तो तुंगभद्रा खोऱ्यात गेला. हम्मिगी या गावी पोलिसांनी शस्त्रांचा मोठा साठा ताब्यात घेतला. भीमरावाने केंचन गौडाला बरोबर घेऊन शस्त्रसाठ्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ला केला. व त्याने तो शस्त्रसाठा ताब्यात घेतला. नंतर सरकारी खजिनाही लुटला. भीमरावाचे सैन्य वाढू लागले. तो गदगवर चालून गेला. त्याने सरकारी कचेऱ्या उध्वस्त करून टाकल्या. टेलिग्राफच्या तारा तोडून टाकल्या. भीमराव व केंचन गौडा यांचा पाठलाग पोलिसांची पथके करीत होती. कोप्पळचा पोलिस अधिकारी त्याच्या मागावरच होता. त्याने भीमरावाच्या काही सैनिकांना अटक केली. भीमरावाने कोप्पळवर हल्ला केला. कोप्पळचा किल्ला त्याने ताब्यात घेतला. आता त्याने उघडपणे उठाव पुकारला. बेल्लारी, धारवाड, रायचूर येथून इंग्रज सैन्य कोप्पळवर चालून गेले. त्या सैन्याने कोप्पळच्या किल्ल्याला वेढा दिला. इंग्रजांकडून व किल्ल्यातून परस्परांवर गोळीबार सुरू झाला. मेजर ह्यूजस याने आपल्या दुताकरवी भीमरावाला निरोप पाठविला की, भीमरावाने शरण यावे व किल्ला मोकळा करावा. भीमरावाने उत्तर दिलेच नाही.लढण्यासाठी तो तप्तर होता.
१ जून १८५८ रोजी कोप्पळच्या किल्ल्यावर चहूबाजूंनी हल्ला केला. हा किल्ला अत्यंत मजबूत होता व त्याला दुहेरी तटबंदी होती. भीमरावाच्या सैनिकांनी चांगली झुंज दिली. पण त्याच्याजवळ तोफा नव्हत्या. तरीही त्याचे सैनिक प्राणपणाने लढले. इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्याच्या तटाला खिंडार पाडले व भीमरावाला शरण येण्यास सांगितले. पण त्याने शरण न येता लढा चालूच ठेवला. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर लढत असतांना भीमराव व केंचन गौडा ठार झाले. त्यांचे कित्येक सैनिक मारले गेले. १५० सैनिकांना पकडण्यात आले. काही सैनिक किल्ल्यातून पळून गेले. तिकडे नरगुंदचे भावेही हरले. कोप्पळ व नरगुंद इंग्रजांनी जिंकल्यानंतर डुंबरचे श्रीनिवास देसाई, मुंडरगीचे भीमराव नाडगौडा, गोवेनकोपचा केंचनगौडा, नरगुंदचे भावे यांच्या सर्व जमिनी जप्त करण्यात आल्या.

[irp]

भीमरावाला दोन बायका होत्या. एक जिवाबाई व दुसरी वेंकूबाई. भीमरावाला रंगराव नावाचा मुलगा होता. त्यांना बेनेहल्ली गावात कायमचे वास्वव्य करण्यास सांगण्यात आले व पेन्शन देण्यात आले. भीमरावाचा व नरंगुदकर भाव्यांचा पाडावं पाहून या गावातील उठाव थंड पडला.

पकडलेल्या सैनिकांवर दावे दाखल करण्यात आले. त्यांचेपैकी ७५ सैनिकांना तोफेच्या तोंडी दिले. भीमरावाचा गुमास्ता भीमाप्पा यालाही तोफेच्या तोंडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा त्याने इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितले की, मी या उठावाचीसर्व माहिती आपणास द्यायला तयार आहे. तेव्हा त्याची शिक्षा ताप्तुरती स्थगित करण्यात आली. रायचूरचा डेप्युटी कमिशनर टेलर याच्या समोर ४ जून १८५८ रोजी भीमाप्पाची जबानी घेण्यात आली. त्याने उठावासंबंधीची सगळी माहिती आपल्या जबानीत सांगून टाकली. त्यानंतर त्याला काही वर्षांच्या कैदेची शिक्षा देण्यात आली. अशा रीतीने या भागातील उठाव मोडून काढण्यात आला. भीमराव देसाई व नरगुंदकर भावे यांच्याकडे नानासाहेब पेशव्यांचे दूत नानासाहेबांची उठावाची पत्रे घेऊन आले होते. त्यावरुन सिद्ध होते की, १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध नियोजनपूर्वक आखले गेले होते. नानासाहेबांची व बहादुरशाह जफर यांची पत्रे सर्व राजे-रजवाड्यांना, जहागीरदारांना पाठविण्यात आली होती. पण ठरलेल्या ३१ मे १८५७ च्या आधीच उठाव सुरु झाला व सारी योजनाच फिसकटली. या युद्धात हिंदु-मुस्लिमांचे ऐक्य इंग्रजांना दिसून आले. म्हणून त्यांनी या दोन्ही धर्मात फूट पाडण्याचे सत्र सुरु केले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!