Home Study Material भागोजी नाईक

भागोजी नाईक

महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या रामोशी, भिल्ल, कोळी इ. आदिवासी जमातींना आपल्या गडकिल्ल्यांच्या संरक्षणाचे काम दिले होते. त्यांची बलदंड आणि काटक शरीरे, त्यांचा धाडसी व प्रमाणिक स्वभाव हेरूनच छत्रपतींना त्यांना या सन्मानाच्या जागा दिल्या होत्या. त्या लोकांना नायक म्हणजे नाईक अशी पदवीही छत्रपतींना दिली होती. त्यांना त्याच्या या कामाबद्दल गडाजवळच्या जमिनींची वतने दिलेली होती. ती जवळजवळ पेशवाईच्या अखेरीपर्यंत चालू होती. इंग्रजांचे राज्य आल्यावर त्यांना गड संरक्षणाचे अगत्य राहिले नाही व त्यांना या आदिवासी लोकांच्या परंपरागत चालत आलेल्या नेमणूका रद्द करुन टाकल्या. एवढेच नव्हे, तर ज्या जंगलांवर या आदिवासींचे जीवन अवलंबून होते, त्या जंगलात प्रवेश करण्याचा, गुरेढोरे चारण्याचा आदिवासींचा हक्क रद्द करुन टाकला, त्यामुळे या जमातीमध्ये असंतोष माजला व ते लोक इंग्रजीविरुद्ध बंडे करण्यास सज्ज झाले.
३ एप्रिल रोजी इंग्रज सरकारने नाशिक जिल्ह्यातील पेठ व सुरगणा या तालुक्यातील किल्ले आपल्या ताब्यात घेऊन त्या डोंगराळ भागात आपला अंमल चालू केला. सह्याद्रीच्या खोऱ्यांतील महादेव कोळ्यांचे व भिल्लांचे हक्कही रद्द करुन टाकले. त्यामुळे या जमातीचे लोक खवळून उठले. त्यांचे नेतृत्व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील नांदूर शिंगोटे गावच्या भागोजी नाईकाने केले. त्याच्या पाठीशी सारे महादेव कोळी व भिल्ल उभे राहिले. भागोजीने सिन्नर, अकोले, संगमनेर, पारनेर या तालुक्यातील तहसीलदारांना आदेश दिला की, त्यांनी आमच्यासमोर शरण यावे.१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या बातम्या उत्तरेकडून दक्षिणेकडे येत होत्या. उत्तरेत सर्वत्र इंग्रजांविरुद्ध उठाव सुरु झाले होते. ते ऐकून भागोजीचा उत्साह वाढला. त्याने आपल्या शेकडो साथीदारांसह बंडाचे निशाण उभारले.

भागोजी व त्याचा मुख्य साथीदार मक्राणी फुलदीखान यांनी ६ डिसेंबर १८५७ रोजी पेठ तालुक्यातील हरसूलच्या सरकारी कचेरीवर हल्ला केला आणि तेथल्या तहसीलदाराला ताब्यात घेतले. त्याला पेठ पर्यंत नेले. पेठच्या कचेरीची नासधूस केली. बाजारही लुटला. हरसूलचा खजिना ताब्या घेऊन ते आले होते. त्यानंतर त्यांनी पेठ-सुरगण्याचे महादेव कोळी जातीचे राजे भगवंतराव पवार यांचेकडे जाऊन त्यांना मुजरे केले. ही बातमी समजताच अहमदनगरचा पोलीस अधीक्षक हेन्री आपल्या ४० शिपायांसह भागोजीला पकडण्यासाठी आला. त्याने भागोजीला ‘हत्यारे ठेवा आणि शरण या’ असा आदेश दिला. तो आदेश भागोजी व त्याचे साथीदार कसा मानणार? त्यांनीहेन्रीलाच लढण्याचे आव्हान दिले. धुमश्चक्री उडाली व आरंभीच हेन्री भागोजीच्या गोळीला बळी पडला. त्यामुळे त्याचे शिपाई घाबरुन पळून गेले. हेन्रीला भागोजीने ठार केल्याने त्याच्या सर्व साथीदारांत उत्साह संचारला. ही बातमी समजताच लेफ्टनण्ट ग्लासपूल धावून आला. तसेच भागोजीचा भाऊ महिपती या लढाईत ठार झाला.भागोजी आपल्या साथीदारासह सिन्नरकडे निघून गेला. कॅ. नेटाल व ले.ग्लासपूल यांचेशी भागोजीच्या अन्य साथीदारांचा संघर्ष चालूच होता.
 

शेवटी भागोजीला पकडण्यासाठी सरकारने मेजर फ्रांसाचरला अधिक सैन्य देऊन नासिक भागात पाठविले व त्याबरोबरच त्या सर्व प्रदेशात गुप्तहेरांचे जाळेही पसरले. या सेनाधिकाऱ्यांना समजले की, पेठचा राजा भगवंतराव पवार या क्रांतिकारकांना आतून सामील असून तो त्यांना मदतही करतो. लगेच पेठला जाऊन त्यांनी २८ डिसेंबर १८५७ रोजी भगवंतरावाला पकडून फासावर चढविले.

फरार झालेला म्हातारा पथाजी नाईक स्वतःहून पुण्याला जाऊन पोलीस ठाण्यावर हजर झाला व तेथल्या प्रमुख पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला, “साहेब, मी पथाजी नाईक भिल्ल आहे. तुमच्याकडे येऊन तुमच्या हाती पडावे, असे जर माझ्या मनात आले नसते, तर मी कधीही तुमच्या हाती लागलो नसतो. आता तुम्ही मला कैद करा आणि वाटल्यास फाशी द्या. पण तुमच्या अधिकाऱ्यांनी पकडलेल्या माझ्या दोन्ही मुलांना वाचवा.” त्याच्या वयाकडे पाहून त्याला त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माफी दिली.

अहमदनगरचे पोलीस सुपरिडेंटेंट नोव्हें. १८५९ मध्ये सर फ्रँक साऊटर आपल्या शिपायांसह सिन्नरला आले. तेव्हा त्यांना गुप्तहेरांकडून समजले की, भागोजी तो आल्याचे समजताच भागोजीने त्या तहसीलदाराला सोडून दिले. व ते जंगलात फरार झाले. ग्लासपूलने आठवडाभर त्यांचा त्यास चालविला, पण त्यात त्याला यश आले नाही. उलट भागोजीने आपल्या साथीदारांसह त्याच्यावर धाड टाकून त्याला कचेरीत डांबून ठेवले.

[irp]

भागोजीने ले. ग्लासपूलला डांबून ठेवल्याची बातमी कळताच कॅप्टन नेटाल १५० शिपाई व ५० घोडे स्वारांसह त्या भागात आला. त्याची बातमी आधीच भागोजीला समजल्याने त्याने आपल्या साथीदारांसह त्र्यंबकेश्वरला आदल्याच दिवशी धाव घेतली व त्र्यंबकेश्वरचा सरकारी खजिना ताब्यात घेऊन तो अकोले तालुक्यातील समशेरपूरला आला. तेथे ८० वर्षांचा म्हातारा पथाजी नाईक आपल्या साथीदारांसह त्याला येऊन मिळाला. तेथे कर्नल कॅमन, लेफ्ट. ग्रॅहम, मेजर चॅपमन आपल्या शिपायांसह आले. दोन्हीसैन्यात तुंबळ युद्ध होऊन त्यात हे तिन्ही पोलीस अधिकारी मारले गेले. आदिवासी क्रांतिकारकांचा हा मोठा विजय होता. या घटनेने चिडून जाऊन कॅ. नेटाल व लेफ्ट. ग्लासपूल यांनी निरपराध महादेव कोळी व भिल्ल स्त्रीपुरुषांचा छळ करुन त्यांना पकडून नेले. त्यात पथाजीची दोन तरुण मुलेही होती. वरील अधिकारी ठार झाल्यानंतर पथाजी फरार झाला.

[irp]

१९ डिसेंबर १८५७ रोजी कॅप्टन बोस्वेल दहावी पलटण घेऊन पेठ भागात आला. कॅ. नेटाल व कॅ. बोस्वेलला भागोजीच्या ५०० क्रांतिवीरांशी सामना द्यावा लागला. त्यात नेटालचा घोडा मारला गेला. सिन्नरजवळच्या माठ-साखर टेकड्यांत विश्रांती घेत आहे. मेजर फ्रांसाचर ही तेवढ्यात आपल्या शिपायांसह तेथे आला. त्यांनी त्या टेकड्यांना वेढा दिला. त्यांनी भागोजीला हत्यारे टाकून शरण येण्याचे आवाहन केले. पण भागोजीने ते मानले नाही. तो आपल्या साथीदारांसह त्यांच्यावर तुटून पडला. अटीतटीची लढाई झाली. शेवटी भागोजीसह त्याचे ४५ साथीदार त्या लढाईत मारले गेले व नासिक भागातील ते प्रचंड वादळ शमले. भागोजी ठार झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सर्व कुटुंबियांनाही मारुन टाकले. भागोजीचा वंशच खंडित झाला. भागोजीने ज्या घाटात इंग्रजांशी सामना देऊन बीरमरण पत्करले, तो घाट सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे या गावापासून एक कि. मीटर अंतरावर आहे. त्या घाटात त्याची समाधी आहे. त्या घाटाला ‘भागोजी नाईक घाट’म्हटले जाते. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात महाराष्ट्रातील या आदिवासी क्रांतिवीरांनीही सिंहाचा वाटा उचलला होता. त्या वीरांचे स्मरण चालू पिढीने आदरपूर्वक ठेवले पाहिजे. तीच त्यांना दिलेली खरी श्रध्दांजली ठरेल.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!