Home Study Material फोंड सावंत

फोंड सावंत

सावंतवाडी करांना सन १८१९ मध्ये इंग्रजांचे मांडलिकत्व एका तहाअन्वये मान्य केले होते. तेव्हापासून सावंतवाडी संस्थानच्या दरबारात इंग्रज पोलिटिकल एजंटाच्या नजरेसमोर कामकाज चालू आहे. सन १८२३ मध्ये खेमसावंत सावंतवाडीच्या गादीवर आला. त्याला इंग्रज एजंटाच्या मर्जीनुसारच राज्यकारभार करणे भाग होते. त्याच्या काळात जी बंडे झाली ती मोडण्यासाठी त्याला इंग्रज सैन्याचे साह्य घ्यावे लागले. पहिले बंड १८२८ सालातले होते महादेवगडचा पूर्वीचा किल्लेदार फोंड सावंत ताबुकवाडीवर याने तो किल्ला काही सैन्य गोळा करुन ताब्यात घेतला. राजाने मुंबई येथील गव्हर्नरलकडे सैनिक साह्याची मागणी केली. मुंबईहून एक इंग्रज पलटण सावंत वाडीला आली. ते पाहून फोंड सावंत आपल्या साक्षीदारांसह शेजारच्या इचलकरंजी संस्थानात पळून गेला. ते साल १८३० चे होते.
___ फोंडसावंताला सात मुलगे होते व ते सारे तरुण होते. आपल्या मुलांसह व साथीदारांसह तो सन १८३८ पासून सावंतवाडीत धुडगूस घालू लागला. कारण इंग्रज पोलिटिकल एजंटाने खेम सावंतला राज्यकारभार करण्यास अपात्र ठरवून सावंतवाडी संस्थानचा कारभार आपल्याकडे घेतला होता. राजा खेम सावंत याला पदच्युत करुन याची चीड सावंतवाडीतील सगळ्या जनतेत पसरली होती. फोंडसावंत तर सावंतवाडी संस्थानचा जुना सरदार होता. त्याला इंग्रजांचे राज्य कारभारातले वर्चस्व कसे सहन होणार?

[irp]

कोल्हापूर संस्थानातील इंग्रज रेसिडेंटने त्या संस्थानातील सगळ्या किल्ल्यातल्या गडकऱ्यांचे हक्क काढून घेतले. त्यांचे किल्लेही गेले व त्या किल्लेदारी निमित्त त्यांना संस्थानकडून परंपरागत मिळालेल्या जमिनीही गेल्या. त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले ते इंग्रज सैन्याने मोडून काढले. त्यांच्याशी फोंडसावंताने संपर्क साधला व ते सारे बेळगावच्या नैर्ऋत्येस ३५ मैलावर असलेल्या मनोहर गडावर गेले. तो किल्ला त्यांचा तळच झाला. ते हेरांकरवी इंग्रज एजंटाला समजले. त्याने मेजर बेन बो याला आपले सैन्य घेऊन हनुमंत घाटाच्या पायथ्याशी नेरुर येथे छावणी टाकून मनोहर गडावरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पाठविले. १० ऑक्टोबर १८४४ रोजी फोंडसावंत व त्याचे साक्षीदार आपल्या सैन्यासह किल्ल्याखाली उतरले. गोठोस गावातील इंग्रजांचे दलाल कुलकर्णी व गडावरील सबनीस यांच्या घरांवर धाड घालून त्यांनी त्यांच्याजवळील सगळी कागदपत्रे जाळून टाकली तसेच सावरकारांची व जमीनदारांची घरे लुटली. नंतर ते नेरुर गावात शिरले. त्या गावातील इंग्रजांच्या दलालांना म्हणजे सावकार व धनिकांना लुटले. दुकानेही लुटली. गावात लुटालूट व जाळपोळ केली. सर्वत्र अराजकता माजली या बंडखोरांना आळा घालण्यासाठी बेनबोच्या सैन्याला फार प्रयास पडले. बंडखोरांचा आत्मविश्वास वाढला. सावंतवाडीच्या गादीचे वारस अण्णासाहेब सावंत यांना आपल्याकडे वळवून घेतले. ते फक्त १६ वर्षे वयाचे होते. तेही मनाहेरगडावर येऊन फोंडसावंताला मिळाले. १६ नोव्हेंबर १८४४ रोजी बंड वाल्यांनी त्यांच्या सन्मानार्थ तोफांची सलामी दिली. त्यांना आपला राजा मानले. आता बंडवाले शिरजोर बनले. त्यांनी सावंतवाडी संस्थानातील काही गावांचा वसूलही गोळा केला. गावागावातून अराजक माजले. सभोवतालच्या इंग्रजांच्या ताब्यातील गावांतही त्यांनी धुमाकूळ घातला. सावंतवाडी संस्थानात बळी तो कानपिळी अशी अवस्था निर्माण झाली. डोंगराळ व जंगलांनी व्यापलेला तो भाग असल्याने तो बंडवाल्यांना हल्ले करुन लपण्यास सहज जागा मिळत होत्या. त्यांच्यापैकी सुभाना निकमने मालवण व सभोवतालचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. बंडवाल्यांनी इंग्रज सैन्याच्या प्रतिकाराची भक्कम तयारी केली.
इंग्रज सरकारने या प्रदेशात लष्करी कायदा १४ जानेवारी १८४५ रोजी लागू केला. बंडाचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून वेगवेगळे कडक हुकूम सोडले. प्रत्येक गावातील पाटील, कुलकर्णी यांनी गावातील सर्व लोकांची हत्यारे जमा करावी. आवश्यक तेवढे आसपासचे जंगल तोडावे. आपल्या गावातील जी व्यक्ती गावात नसेल, तिचा तपास ठेवावा. असे ते हुकूम होते. मद्रास, बेळगाव, वेंगुर्ला येथून सैन्य मागविले. सावंतवाडी संस्थानचे तीन विभाग करुन प्रत्येक विभागात सैनिकी तुकड्या मोक्याच्या ठिकाणी ठेवल्या.

इंग्रज सैन्याच्या एका पलटणीने रांगडा किल्ल्यावर चढाई करुन बंडवाल्यांना तेथेच गुंतवून ठेवले. त्या काळात कॅप्टन ऑट्रमने मनोहर गडावर ताबा मिळविला. बंडखोरांना पिटाळून लावले. त्यातले काही गोवा हद्दीत निघून गेले.

[irp]

इंग्रज सरकारने फोंडसावंत व त्याच्या मुलांना पकडून देणाऱ्यास अनुक्रमे १० हजार व ३ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर केली. पण त्यांना कोणीही पकडून देऊ शकले नाही. तसेच सर्वसाधारण जनतेकरिता माफीचा जाहीरनामा काढला. बंडवाल्यांना सामील झालेल्या लोकांपैकी जे पूर्ववत आपापले धंदे सुरु करतील, त्यांना इंग्रज सरकारने माफी जाहीर केली. सावंतवाडी संस्थानचे वारसदार अण्णासाहेब सावंत यांचा संस्थानावरील हक्क काढून घेतला. मात्र त्यांना सावंतवाडीत येऊन राहण्याची परवानगी दिली. त्यांना दरमहे १०० रु. ची नेमणूक दिली. दि. २१ ऑगस्ट १८४५ रोजी ते सावंतवाडीस येऊन राहिले. तसेच फोंड सावंतच्या धाकट्या मुलांनाही माफी दिली. जर का कठोर उपाय योजले असते, तर जनतेतील असंतोषाचा भडका उडाला असता व परिस्थिती काबूत राहिली नसती व जनतेत इंग्रज सरकारबद्दल विश्वास राहिला नसता. हे सीमित प्रदेशातले बंड ब्रिटिश हद्दीतही वेगाने पसरले असते. हे धूर्त इंग्रज जाणून होते. म्हणूनच त्यांनी वरीलप्रमाणे माफीचा जाहीरनामा काढला. फोंडसावंतानी मात्र आपल्या संस्थानच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळविले होते. हे निर्विवाद होय.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!