Home Study Material फूकन आणि बरुआ

फूकन आणि बरुआ

सन १७६४ च्या युद्धामुळे संपूर्ण पूर्व भारत इंग्रजांच्या ताब्यात आला. बंगाल, बिहार, आसाम व ओरिसा प्रांताच्या दीवाणीची सनद बादशहा शाहआलम याच्याकडून इंग्रजांना मिळाली. भूमीकर वसुलीचा अधिकार त्या सनदे द्वारा इंग्रजांना मिळाला. तेव्हा कंपनी सरकारने मोगलांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भूमिकराच्या दिढी-दुपटीने भूमीकर वाढविला. तो वसूल करण्यासाठी दोन दीवाण नेमले. त्यांनी वसुलीसाठी ठेकेदार नेमले. दीवाणांनी कंपनी सरकारला जेवढा वसूल द्यायचा. त्याच्यापेक्षा जास्त वसूल ते ठेकेदारांकडून वसूल करु लागले. म्हणून ते ठेकेदारही शेतकऱ्याकडून प्रमाणापेक्षा जास्त भूमीकर वसूल करु लागले. धान्याऐवजी रोख रक्कमेत भूमीकर वसूल करायचा. अशा आदेश कंपनी सरकारने दीवाणांना व ठेकेदारांना दिला होता. जे शेतकरी एवढा जबरदस्त भूमीकर देऊन शकत नव्हते, त्यांच्या जमिनी जप्त करुन त्या बाहेरच्या श्रीमंत लोकांना विकण्यात येऊ लागल्या. त्यामुळे कंपनी सरकारच्या राजवटीत नवा जमीनदार वर्ग उद्याला आला. रोख रक्कमेत भूमीकर देण्यासाठी काही शेतकरी अशा जमीनदारांकडून, पाटलांकडून, मारवाड्यांकडून किंवा व्यापाऱ्याकडून कर्ज काढून भूमीकर भरु लागले. त्या कर्जाचा व्याजदर इतका जबरदस्त होता की, शेतकऱ्याला पिढ्या न् पिढ्या ते कर्ज व व्याज फेडता येईना. म्हणून कर्ज देणारे हे सावकार जबरदस्तीने शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर राबवून घेऊ लागले. अशा रीतीने नवा सावकार वर्ग निर्माण झाला. जमीनदार, पाटील, सावकार व इंग्रज अधिकारी यांचे अत्याचार शेतकऱ्यांवर वाढू लागले. आदिवासींच्या जमिनीवर पूर्वीच्या कोणत्याही राजवटीने भूमीकर लादला नव्हता. कंपनी सरकारच्या राजवटीत आदिवासी शेतकऱ्यांकडून ही भूमीकर वसूल करण्यात येऊ लागल्या. त्यांच्या वरही जमीनदारांचे, ठेकेदारांचे अत्याचार खूप वाढले. त्यामुळे आदिवासींसह सारी जनता इंग्रजांचे राज्य कधी नष्ट होते, याची वाट पाहू लागली. त्या जनतेतूनच इंग्रज सत्तेशी लढे देणारे वीर क्रांतिकारक पुढे आले.
आसाम राज्यात १८३० च्या आरंभीच्या काळात पियालियार बरगोहाई यांच्या नेतृत्त्वाखाली आसामी ‘जनतेने इंग्रजांची आसामवरील सत्ता नष्ट करण्यासाठी कंबर कसली. पिआलिअर बरगोहाई यांनी सन १८२८ मध्येही स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा दिला होता. १८३० साली पियालियर बरगोहाई, पियाली बरफूकन व जिऊराम दुलिया बरुआ यांनी आसाम मधील नागा, गारो, खाशी, खामती व माओमारिया या आदिवासी जातींच्या नेत्यांना पत्रे पाठवून इंग्रज सरकारविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. सर्वांनी एकत्र येऊन देवपूजा केली व इंग्रजांशी लढण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी असे ठरविले होते की, इंग्रजांच्या शिपायांच्या वस्ती शेजारच्या शस्त्रागाराला आग लावून द्यायची व रंगपूर शहरावर हल्ला करायचा. रंगपूरच्या संरक्षणासाठी फक्त एक जमादार व ३० शिपाई होते. रंगपूर सहजपणे त्या क्रांतिकारकांच्या ताब्यात आले असते. कारण क्रांतिकारकांची संख्या ४०० होती. २५ मार्च १८३० ह्या दिवशी रंगपूरवर आक्रमण करायचे निश्चित झाले होते. परंतु मध्येच माशी शिंकली.

[irp]

क्रांतिकारकांच्या नेत्यांनी खामती जातीचा नेता सादिया खोबा गोहाई याला दोन गुप्त पत्रे हरनाथ याच्या हाती देऊन त्याच्याकडे पाठविले होते. ती पत्रे सादिया खोबा गोहाई याला मिळाली. त्याने धोका देऊन हरनाथला पकडले व इंग्रज एजंटाकडे त्याला २० फेब्रुवारी १८३० रोजी सोपविले. तरीही क्रांतिकारकांनी हिंमत न हरता इंग्रजांच्या रंगपूरमधील शस्त्रागारावर आक्रमण केलेच.
इंग्रज राजनैतिक एजंट कॅप्टन न्यू विले याने आसाम लाईट इन्फंट्रीची एक पलटण रंगपूरला क्रांतिकारांचा प्रतिकार करण्यासाठी पाठवून दिली. इंग्रज सैन्याचे अचानक आक्रमण झाल्याने सारे आदिवासी क्रांतिकारक घाबरुन गेले ते पळून जाऊ लागले. कारण त्यांच्याजवळ त्यांची जुनी परंपरागत हत्यारे होती. बंदुकी व तोफा नव्हत्या. इंग्रजांनी पळून जाणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांचा पाठलाग केला. त्यांच्या बायका मुलांना पकडले. अनेक आदिवासीही पकडले गेले. त्यांना निःशस्त्र करण्यात आले. पिआलिअर बरगोहाई आपल्या मोठ्या मुलासह जंगलात पळून गेले.

[irp]

कैद केलेल्या आदिवासी क्रांतिकारकांवर शिवसागर येथील न्यायालयात दावा दाखल केला गेला. कंपनी सरकार विरुद्ध विद्रोह आणि राजद्रोह केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. इंग्रजांच्या न्यायाचे नाटक तडकाफडकी उरकण्यात आले आणि विद्रोह व राजद्रोह केल्याचा आरोप या आदिवासी क्रांतिकारकांवर सिद्ध झाला. पियाली बरफूकन व जिऊराम दुलिया बरुआ यांना त्या न्यायालयाने फांशीची शिक्षा दिली. सन १८३० च्या ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यात फूकन व बरुआ यांना फाशी देण्यात आले. अन्य क्रांतिकारकर हरनाथ, कुँवर, रुपचंद, बोम सिंगपो, देओराम आदि क्रांतिकारकांना ढाका येथील तुरुंगात दीर्घकाळ डांबण्यात आले. सर्व क्रांतिकारकांची संपत्ती कंपनी सरकारने जप्त केली. अशा रीतीने फितुरीमुळे आसाम मधील क्रांतिकारकांचा हा उठाव दडपून टाकण्यात आला.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!