Home Study Material फिरोजशहा

फिरोजशहा

१८५७ क्रांतियुद्धात मुघल घराण्यातील ज्या एकमेव व्यक्तीने प्रत्यक्ष रणांगणात भाग घेतला, ती व्यक्ती म्हणजे फिरोजशहा पण तो कोणाचा मुलगा, त्याची जन्मतारीख कोणती, त्याचे शिक्षण किती झाले, याची माहिती मिळू शकत नाही. तरी ही एवढे मात्र खरे की, तो दिल्लीचा बादशहा बहादुरशाह जफरच्या मुलांपेक्षा धाडसी, पराक्रमी व युद्धकलेत निपुण होता. सप्टेंबर १८५७ मध्ये इंग्रजांनी क्रांतिकारी सैन्याकडून दिल्ली जिंकली.बहादुरशाहच्या संपूर्ण परिवाराला कैद केले. त्याच्या सर्व मुलां नातवंडाना ठार केले. त्यातून फिरोजशहा कसा निसटला हे सांगता येत नाही. तो लपत छपत काही महिने हिंडत राहिला आणि थोडेफार सैन्य जमवून उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या शहरी आला. येतांना तो नानासाहेब पेशव्यांच्या बरोबर मार्च १८५८ मध्ये बरेलीस खान बहादूर खान याला भेटायला गेला होता. व त्यानंतर दोन एक गावे लुटून तो एप्रिल १८५८ मध्ये मुरादाबादेस पोचला होता.

काही दिवस मुरादाबादेस राहिल्यानंतर तो इटावा जिल्ह्यात आला. मे १८५८ मधये त्याला रूपसिंग या झोटिंगशहाशी अनेक ठिकाणी चकमकी कराव्या लागल्या त्यात त्याने रुपसिंगाची नांगीच मोडली. नंतर तो माळव्यातील नीमच छावणीजवळील जीरन या गावी आपल्या सैन्यासह तळ ठोकून बसला. नीमच छावणी जवळचे हे संकट इंग्रजांना दुर्लक्ष करण्याजोगे नव्हते. म्हणून त्यांनी २३ ऑक्टोबर १८५८ रोजी जीरन येथल्या फिरोजशहाच्या तळावर हल्ला चढविला. त्यांनी आधी तोफांची सरबत्ती केली. नंतर त्यांच्या पायदळाने फिरोजशहाच्या शिपायांवर हल्ला केला. तो त्या शिपायांनी परतवून लावला आणि त्यांची एक तोफ हस्तगत केली. नंतर छावणीतून घोडदळ आले व त्याने त्या शिपायांवर जोराचा हल्ला करुन ती तोफ परत मिळविली. दुसऱ्या दिवशी पहाटेस फिरोजशहा आपल्या शिपायांसह तेथून निघून गेला. त्यानंतर १५ दिवसांनी आपल्या सैन्यात अरब, रोहिल्यांची आणखी भरती करुन तो ८ नोव्हेंबर १८५८ रोजी नीमच छावणीवर चालून आला. व १५ दिवस छावणीतील सैन्याला त्याने नीमचच्या चौकात कोंडले. पण छावणीच्या मदतीला मुंबईकडून मोठे सैन्य आल्याने फिरोजशहाने आपला वेढा उठविला व तो मंदसोरकडे वळला.
मंदसोरकडे जातांना त्याने महीदपूरची इंग्रजांची छावणी लुटली. ते कळताच त्या छावणीचा प्रमुख ड्यूरंड याने आपली घोडेस्वारांची मोठी तुकडी त्यांच्या पाठलागावर पाठविली. त्या तुकडीला थोडेफार लूट परत मिळविता आली व ती छावणीत परतली.त्यानंतर तो माळव्यातून पुन्हा उत्तरप्रदेशात मुरादाबादेला आला. तेव्हा त्याचे सैन्य बरेच कमी झाले होते. कारण पैशांचा अभाव. त्याने मुरादाबादेत पैसा मिळविण्याचा प्रयत्न करुन पाहिला; पण हात हालवीत तो मोहन या गावी आला. तेथे त्याने आपल्या कर्तुत्वाने चांगला जम बसविला.

[irp]

लखनौ इंग्रजांनी घेतले व अवध प्रांतातली बंडाळी मोडून काढण्याच्या प्रयत्नास ते लागले. त्यांनी बेगम हजरत महल, नानासाहेब आदि नेत्यांना नेपाळकडे रेटीत नेले. त्यांच्याबरोबर फिरोजशहा सुद्धा होता. पण त्याने इंग्रजांना झुकांडी दिली व तो ७ डिसेंबर १८५८ रोजी सीतापूर मार्गे गंगापार होऊन दुआबात उतरला. जातांना त्याने प्रत्येक गावात ‘मी इकडे चाललो, तिकडे चाललो, अशा थापा इंग्रजांना आपला ठावठिकाणा लागू नये म्हणून दिल्या होत्या. तसेच टेलिग्राफच्या तारा तोडीतच त्याने डिसेंबर १८५८ मध्ये यमुना नदी ओलांडली. त्याला बुंदेलखंडात जाऊन तात्या टोपेला भेटायचे होते. त्यांचा पत्रव्यवहार अधून मधून चालूच असे. तिकडे तात्या टोपे, रावसाहेब पेशवे इंग्रजांना हैराण करीत होते. त्यांना जाऊन मिळण्यासाठी तो आपल्या सैन्यासह तिकडे निघाला होता.
१७ डिसेंबर १८५८ रोजी चंदेरीजवळ त्याची गाठ इंग्रजांच्या एका सैन्य-तुकडीशी पडली. त्या तुकडीशी झुंज देऊन तो रोहिल खंडातून माळव्याकडे जात असतांना इंग्रज सैन्य त्याच्या पाठलागावरच होते. त्या सैन्याला झुकांड्या देत देत तो १३ जानेवारी १८५९ रोजी तात्या टोपे व रावसाहेब पेशवे यांना भेटला. अतिशय वेगाने लांब लांब मजला मारीत आल्याने त्याच्या सैन्याला विश्रांतीची गरज होती.

[irp]

१३ जानेवारीच्या भेटीनंतर काही दिवसांनी देवास या गावी त्यांचा तळ पडला. तेथे ते तिघे पुढच्या कार्यक्रमाची चर्चा करीत असतांनाच इंग्रजांचे सैन्य त्यांच्यावर चाल करुन आले. थोड्या चकमकीनंतर ते तेथून निसटले. त्या पळापळीत त्यांची बरीच हानी झाली. बरेच युध्द साहित्य व सैनिक त्यांना गमवावे लागले. त्यानंतर २१ जानेवारी १८५९ रोजी फिरोजशहाने तात्या टोपेचा निरोप घेतला व तो पश्चिमेकडे राजस्थान सिंधमध्ये निघून गेला. आता त्याच्या जवळ फारच थोडे सैन्य उरले होते. निराश होऊन त्याने त्या सैन्यालाही निरोप दिला व तो आपल्या पत्नीसह इराण मध्ये निघून गेला. इराणात त्याचे फार हाल झाले. म्हणून तो मक्केला गेला व थोड्याच काळात त्याचे तेथे निधन झाले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!