Home Study Material फाजिल मुहम्मद खाँ, आदिल मुहम्मद खाँ

फाजिल मुहम्मद खाँ, आदिल मुहम्मद खाँ

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात भोपाळ संस्थानची संस्थानिक नबाब सिंकंदर बेगम हिने इंग्रज सरकारला मदत दिली. परंतु संस्थानातील आमजनता, जहागीरदार, मौलवी, पंडित, कर्मचारी मात्र स्वातंत्र्य युद्धात सक्रिय भाग घेण्याच्या विचारात होती. मेरठ, दिल्ली, कानपूर, लखनौमध्ये कंपनी सरकारच्या देशी पलटणीतील शिपायांनी इंग्रज सरकारविरुद्ध उठाव केल्याची बातमी समजताच गढी अंबापाणीचे जहागीरदार फाजिल मुहम्मद खाँ व त्याचे बंधू आदिल मुहम्मद खाँ यांनी सैनिकांची भरती केली व जुलै १८५७ मध्ये इंग्रज सरकार विरुद्ध त्यांनी उठाव केला. हे दोघे बंधू नबाब सिकंदर बेगमचे नातेवाईक होते व त्यांची जहागीर बेगमच्या संस्थानात होती. त्यांनी भोपाळ संस्थानातच नव्हे, तर विदिशा, सागर, होशंगाबादपर्यंत उठावाचे लोण पसरविले. त्यांचा पराक्रम आणि आम जनतेचे त्यांना मिळणारे समर्थन पाहून भोपाळच्या व इंग्रजांच्या सैन्याला धडकीच भरली.

आदिल मुहम्मद खाँला वाटत होते की, आपल्या मध्य भारतातून इंग्रजांना हाकून देऊन आपला हा प्रदेश स्वतंत्र करावा. म्हणून त्याने रेवा,नागौद दतिया, चरखारी, छतरपूर, बिजावर, नागपूर, झाशी ठिकाणच्या १५ संस्थानिकांना तशी पत्रे लिहिली व सर्वांनी संघटित होऊन इंग्रजांशी लढा द्यावा, असे त्यांना सुचविले. भोपाळच्या नबाब सिकंदर बेगम हिला त्यांनी पत्र देऊन कळविले की, ‘माझ्या कार्याला रोखणे हे खुदा व पैगंबरांच्या हुकुमाविरूद्ध आहे. भोपाळ संस्थानात अराजक माजविण्याचा माझा हेतू नाही. माझा हेतू इंग्रजांना आपल्या प्रदेशातून हाकून लावणे वढाच आहे.’ परतु भोपाळच्या बेगमने आपले इंग्रजांना मदत करण्याचे धोरण सोडले नाही.

___दोन्ही भावांनी पठारी रियासतवर २८ सप्टेंबर १८५७ रोजी हल्ला केला. पठारी चे नबाब हैदर मुहम्मद खाँ यांच्याशी त्यांचा सामना झाला. दोन्ही बाजूचे काही सैनिक मारले गेले. नबाबचे सैनिक घाबरून पळून गेले. फाजिल मुहम्मद खाँ ने पठारीवर ताबा मिळविला आणि हैदर मुहम्मद खाँला कैद केले, परंतु नबाब हैदर खाँ ने सुटून जाऊन सैन्य जमविले व पठारीची गढी आपल्या ताब्यात घेतली, जे धनिक उठावासाठी आर्थिक मदत देत नव्हते, त्या सर्वांना फाजिल मुहम्मद खाँ ने लुटले. गावागावांतून इंग्रजांविरूद्ध विद्रोहाची आग भडकावली. जुलै १८५७ ते नोव्हेंबर १८५७ पर्यंतच्या काळात या दोन्ही बंधूंनी भोपाळ, विदिशा, सागर, होशंगाबाद या भागात आपला धाक जमविला. भोपाळच्या बेगमेपुढे मोठे संकट उभे राहिले. तिने आपले निवडक सैन्य गोहतगंज येथे पाठवून मोर्चाउभारला. दुसरा मोर्चा बेगम गंजला व तिसरा मोर्चा बाम्होरीला उभारला. तिन्ही मोर्चांवर घोडेस्वार, पायदळ ठेवले आणि तोफा सुद्धा सज्ज ठेवल्या. या प्रकारे फाजिल मुहम्मद खाँच्या अंबापाणी गढीला तिने घेरले.

७ ऑक्टोबर १८५७ रोजी बाम्होरी जवळ राजगढी येथे दोन्ही सैन्यांची गाठ पडली. निकाराचे युद्ध झाले. त्यात फाजिल मुहम्मद खाँचा जमादार भीकमसिंह यांच्यासह त्याचे २७ सैनिक मारले गेले. त्याचे सामानही लुटले गेले. त्यानंतर भोपाळच्या बेगमेने तिच्या सैन्याचा कमांडर मुरव्वत मुहम्मद खाँ याला सिहोरहून बोलावून घेऊन निवडक सैन्यासह मोर्चावर पाठवून तो मोर्चा मजबूत केला.

[irp]

फाजिल मुहम्मद खाँला कामदार खाँ, सजात खाँ पेंढारी, ठाकुर छत्रसाल आणि आपल्या दोन्ही भावांसह फत्तेपूरचा गोंडराजा येऊन मिळाले होते. आता ते होशंगाबाद, बेगमगंज आणि गैरतगंज वर आक्रमण करण्याची योजना आखीत होते. हे समजल्यावर बेगमने इंग्रजांच्या साहाय्यासाठी मोठे सैन्य पाठविले. ते सैन्य येत आहे असे पाहून फाजिल मुहम्मद खाँ १७ ऑक्टोबर १८५७ रोजी गढी अंबापाणी मधून निघून गेला. गढीवर इंग्रजांनी तोफांचा मारा केला, तेव्हा गढीतील स्त्रियांनी आपल्या मुलांसह गढी भोपाळच्या सैन्याच्या ताब्यात देऊन टाकली. इंग्रजांनी विद्रोही सैनिकांना तुरूंगात टाकले.

गढी अंबापाणीहून निघाल्यानंतर फाजिल मुहम्मद खाँ आपल्या भावासह राहतगडला गेला व तो किल्ला त्यांनी ताब्यात घेतला तेथले सारे इंग्रज गड सोडून पळून गेले. सिहोर छावणीमधील भोपाळ सैन्याच्या एक हजार सैनिकांनी बंड पुकारले. इंग्रजांची कार्यालये ताब्यात घेतली. जुलै १८५७ ते नोव्हेंबर १८५७ पर्यंत सिहोर छावणी स्वतंत्र झाली होती. सर ह्यू रोज मोठे सैन्य घेऊन ६ जानेवारी १८५८ रोजी महू मधून सिहोरच्या मार्गाने २४ जानेवारी १८५८ रोजी राहतगडला पोचला. हेमिल्टनहीआपल्या पलटणीसह त्याला येऊन मिळाला. भोपाळच्या बेगमेने आपला सेनापती मुरव्वत खाँ याला सैन्यासह ह्यू रोजच्या मदतीला पाठविले. राहतगडवर त्यांनी चढाई केली. बीजा नदीच्या किनाऱ्यावर फाजिल मुहम्मद खाँच्या सैन्याने त्यांच्याशी निकराचा लढा दिला. इंग्रज सैन्य ज्या जंगलात होते ते जंगल विद्रोही सैनिकांनी चहुबाजूंनी पेटवून दिले. जंगलात आग वेगाने पसरली; वरून कडक ऊन आणि सभोवताली आगीची धग यामुळे इंग्रज सैन्य जणू भाजूनच निघाले. बाकीच्या इंग्रज सैन्याने राहतगड शहर जिंकून घेतले. किल्ल्यावर आणि किल्ल्यातील इमारतीवर इंग्रजांचा तोफगोळ्यांचा मारा चालूच होता तेव्हा इंग्रज सैन्यावर बानपूरचा राजा मर्दनसिंह याने जबरदस्त आक्रमण केले. परंतु इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. म्हणून मर्दनसिंह आपल्यासैन्यासह निघून गेला. २८ जानेवारी १८५८ च्या रात्री किल्ल्याच्या दुर्गम भागातून फाजिल मुहम्मद खाँ आपल्या विद्रोही सैन्यासह किल्ल्यातून निघून गेला. २९ जानेवारी इंग्रज सैन्याने त्यांचा पाठलाग करून १०० विद्रोही सैनिकांना पकडले. फाजिल मुहम्मद खाँ जंगलात लपला होता. त्याला सुद्धा गिरफ्तार केले. इंग्रजांनी पकडलेल्या विद्रोही सैनिकांचा क्रूरपणे छळ केला. फाजिल मुहम्मद खाँ याला राहतगडच्या मुख्य दरवाजावर फांशी देण्यात आली. कामदार खाँ यालाही तेथेच फांशी दिली.

आदिल मुहम्मद खाँ मात्र निसटला आणि १ एप्रिल १८५८ रोजी आपल्या सैन्यासह तात्या टोपे याला जाऊन मिळाला. झांशीच्या राणीला ही त्याने मदत केली. अखेर त्यालाही त्यांच्याबरोबर प्राणार्पण करावे लागले. अशा रीतीने या मुस्लिम बंधूंनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान केले व ते अमर झाले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!