Home Study Material पीर अली मर्दाना

पीर अली मर्दाना

पाटणा शहर हे एकोणिसाव्या शतकात वहाबीपंथाच्या कडव्या मुसलमानांचे प्रमुख केंद्र होते. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धा आधी पाच वर्षे त्या पंथाच्या मौलवींची आपली गुप्त संघटना उभारली होती. मोठ मोठे श्रीमंत व्यापारी, पेढीवाले, जमीनदार त्या संघटनेचे प्रमुख सदस्य असल्याने संघटनेला त्याचे भरपूर अर्थसहाय्य मिळत असे. ही संघटना इंग्रज सरकारविरुद्ध गुप्तपणे कार्य करण्यासाठी निर्माण केलेली होती. त्या संघटनेत इंग्रजांचे काही पोलिसही सामील झाले. इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार असलेल्या शेकडो लोकांना आपल्या सभासदांच्या नांवावर नोकरीस ठेवून या संघटनेच्यावतीने त्यांना नियमित पगारही दिला जात असे. बिहारमधील अनेक गावांतील जमीनदारही या संघटनेचे सभासद होते. त्यामुळे संघटनेला पैशांची ददात नसायची. या संघटनेच्या गुप्तहेरांनी बिहारमधील इंग्रजांच्या देशी पलटणींना आपल्याकडे वळवून घेतले होते. त्यात दानापूरच्या ७ व्या, आठव्या व ४० व्या देशी पलटणी पूर्णपणे संघटनेचे आदेश पाळण्यास तयार झालेल्या होत्या. त्या पलटणी पाटण्याहून कोणता आदेश येतो, याची प्रतीक्षा करीत होत्या. पाटणा शहरातील पोलीस, दुकानदार सुद्धाबंडाची ठिणगी केंव्हा पडते त्यांची वाट पाहात होते. कारण सारी जनता इंग्रजांच्या जुलमी व अत्याचारी राजवटीने असंतुष्ट झालेली होती.
मेरठला देशी शिपायांनी बंड केले, ही बातमी पाटण्याचा कमिशनर याला समजताच त्याने २०० शीख शिपायी बोलावून घेऊन ते कर्नल रॅटरे यांच्या हाताखाली शहराच्या बंदोबस्तास ठेवले.

पाटण्याजवळील तिरहूतमध्ये असलेला पोलीस जमादार वारिसअली याच्याबद्दल तेथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना संशय आला म्हणून त्यांनी एकदम त्याच्या घरावर धाड टाकली. तेव्हा तो गया येथील करीम अल्ली नावाच्या क्रांतिकारक पुढाऱ्याला एक गुप्त पत्र लिहीत बसलेला त्यांना दिसला. त्यांनी वारिस अलीला पकडून त्याच्या घरातली सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यात इंग्रज सरकारविरुद्ध बरीच पत्रे होती. त्यामुळे त्याला फाशी देण्यात आले. गया येथील करीम अल्लीला पकडण्याचा हुकूम टेलरने दिला. गयेच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो हत्तीवर बसून पळून गेला. त्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलाच नाही. पण टेलरने अनेक लोकांना संशयावरुन तुरुंगात डांबले.

पाटण्याचा पीर अली हा मूळचा लखनौचा तो पाटण्यास आला व तेथे त्याने पुस्तक-विक्रीचे दुकान थाटले. तो तर पाटण्यातील मुसलमानांच्या गुप्त संघटनेचा एकप्रमुख नेता होता. दुकानातली पुस्तके तो स्वतः वाचून त्यांची माहिती त्याच्याकडे येणाऱ्या संघटनेच्या सदस्यांना देत असे. पुस्तके वाचीत असतांनाच त्याला इतिहासाचे चांगले ज्ञान झाले. त्यांच्याकडे नेहमी संघटनेच्या मान्यवर सभासदांची ऊठबस असे. मोठमोठ्या लोकांत त्याची मोठी प्रतिष्ठा होती. अनेक तरुण त्याचे अनुयायी होते. ते सुद्धा त्या गुप्तसंघटनेचे सभासद होते. “माझ्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असे पर्यंत मी इंग्रजांशी लढेन व माझ्या मातृभूमीला परदास्यातून मुक्त करीन.” अशी शपथ पीर अलीने प्रत्येक सभासदाला घ्यायला लावली होती.

[irp]

पाटण्यातील या गुप्त क्रांतिकारक संघटनेच्या नेत्यांच्या घरी रात्रीच्या वेळात सभासदांच्या गुप्त बैठकी होत असत. त्यातल्या तीन मौलवींची नावे कमिशनरला कळली ते तिघे त्या गुप्त संघटनेचे प्रमुख होते व पाटणा शहरातील लोक त्यांना मानीत असत. या तिघा मौलवींना पकडण्यासाठी टेलरने एक डाव टाकला. पाटण्यातील सर्व प्रमुख लोकांची बैठक त्याने आपल्या निवासस्थानी घेतली. देशातील धामधुमीच्या काळात पाटणा शहरात शांतता कशी राखावी, हा त्या बैठकीचा विषय होता. बैठक संपताच सारे लोक तेथून
निघाले, तेव्हा त्या तिघां मौलवींना टेलरने थांबविले व तो त्यांना म्हणाला, “देशातील धामधुमीच्या काळात तुम्हां तिघांना मोकळे राहू देणे धोकादायक असल्याने तुम्हांस अटक करण्यात येत आहे.” असे हसतमुखान म्हणून टेलरने त्या तिघां मौलवींना नजरकैदेत ठेवून दिले. विचारविनिमयासाठी शहरातील प्रतिष्ठितांना आपल्या निवासस्थानी बोलावून, त्यांना अटक करणे, हा विश्वासघात असतो. विश्वास घात करणे, हे तर इंग्रजांच्या रक्तांतच होते. त्यानंतर त्याने आणखी दोन आदेश जारी केल. एक पाटण्यांतील लोकांना निःशस्त्र करण्याचा व दुसरा रात्री ९ वाजेनंतर कोणीही घराबाहेर न पडण्याचा हे आदेश म्हणजे जखमीवर मीठ चोळणेच होते. आधीच तिन्ही मौलवींच्या अटकेने पाटण्यातील हिंदू-मुस्लिम जनता प्रक्षुब्ध झालेली होती. या आदेशांची अंमलबजावणी सुरु होताच पाटण्यातील मुसलमानांनी जिहाद पुकारला व ते आपापली शस्त्रे घेऊन पीर अलीच्या दुकानासमोर जमू लागले. पीर अलीसह त्या दोनशे जिहादींनी पाटण्याच्या चर्चकडे आपला मोर्चा नेला. चर्चसमोर कर्नल लायल शीख सैनिकांसह त्या मोर्चाला रोखण्यासाठी आला. पीर अलीने आपल्या बंदुकीच्या एकाच गोळीने त्याला ठार केले. ते पाहून त्या राजनिष्ठ शीखांनी त्या जमावावर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात कित्येक जिहादी मरण पावले. कित्येक जखमी झाले. अनेकांना पकडण्यात आले. त्यांत पीर अलीही होता. त्याच्या हातापायांत इतक्या जोराने बेड्या कसण्यात आल्या की, त्या त्याच्या हातापायाच्या मांसात शिरल्या व त्याच्या हातापायातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्याला फांशीची शिक्षा सुनावण्यात आली.

[irp]

त्याला फाशीच्या स्थळाकडे नेले. तेव्हा एक इंग्रज अधिकारी त्याला म्हणाला, “पीर अली, अजूनही वेळ गेलेली नाही. तू तुझ्या साथीदारांची नावे सांग आणि आपले प्राण वाचव.” ते ऐकताच पीर अली बाणेदारपणे म्हणाला, “माणसाच्या जीवनात असेही प्रसंग येतात की, तेव्हा आपले प्राण वाचविणे आवश्यक असते. परंतु अनेकदा असेही प्रसंग येतात की, आपले प्राण वाचविण्यापेक्षा ते नष्ट करुन टाकणेच अत्यावश्यक असते. आता तर प्राणदान करणेच योग्य आहे. यावेळी मृत्यूच्याअधीन होणे, हाच अमर होण्याचा एकमेव मार्ग आहे.” नंतर पीरअली म्हणाला,

“तुम्ही मला ठार करु शकता. माझ्यासारखे माझे अनेक देशबांधव तुम्ही फांसावर चढवाल.परंतु तुम्ही आमच्या स्वातंत्र्ययुद्धाची परंपरा तोडूच शकणार नाही. माझ्या मरणानंतर माझ्या शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो बहादुर क्रांतिकारक स्वातंत्र्य युद्धासाठी निर्माण होतील व तुमचे जुलमी राज्य धुळीला मिळवून सुखा-समाधानाने जगू शकतील.”
पीर अलीची भविष्यवाणी लवकरच खरी ठरली. दानापूरच्या ७ व्या, ८ व्या व ४० व्या पलटणी इंग्रजांविरुद्ध लढण्यास उभ्या राहिल्या व त्या जगदीशपूरच्या बिहारकेसरी कुँवरसिंहाला जाऊन मिळाल्या आणि त्यांनी कुँवरसिंहाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांना सळोकीपळो करुन सोडले. पीरअलीच्या बलिदानानंतर कमिशनर टेलर म्हणाला, “पीरअली हा अत्यंत साहसी व दृढसंकल्प वीर होता. तो जेवढा कठोर तेवढाच शांत व संयमी होता. त्याच्या वागणुकीत शालीनता होती. असे लोक आपल्या अजेय निष्ठेमुळे खतरनाक शत्रू बनतात. पण आपल्या दृढनिश्चयामुळे ते प्रशंसेस पात्रही ठरतात.”

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!