Home Study Material नारायण सिंह

नारायण सिंह

मेरठला व दिल्लीला इंग्रजांच्या देशी सेनेने मे १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध युद्धाचे रणशिग कुंकले. त्याचे पडसाद जून १८५७ मध्ये नर्मदेच्या खोऱ्यात उमटले. मध्यप्रदेशात सागर, भोपाळ, दमोह, होशंगाबाद, मंडवा, जबलपूर, सोनाखा इ. भागातील देशी सैन्य इंग्रजांविरूद्ध बंड करून उठले. त्या सैन्याने मध्यप्रदेशाचा हा विशाल प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. या उठावात देशी सैन्याला त्या भागातील सामंतांनी व जमीनदारांनीच नव्हे, तर आमजनतेनेही त्या सैन्याला साथ दिली. इंग्रजांचे होश उडविले. रायपूर भागातील जनताही इंग्रजांच्या जुलमी प्रशासनाविरूद्ध उठाव करण्याच्या तयारीत होती. छत्तीसगढ सुद्धा धुमसत होते. ते पाहून नागपूरच्या कमिशनरने मेजर जनरल विटलॉक याला पत्राने कळविले की, “जर रायपूर भागात विद्रोह सुरू झाला, तर तो ओरिसा पर्यंत पसरेल. तसेच पश्चिमेकडे नागपूर, चंद्रपूर पर्यंत फैलावल्याशिवाय राहणार नाही. …… एवढ्या मोठ्या प्रदेशातील सैनिकांचा व जनतेचा विद्रोह दडपून टाकण्यासाठी आपल्याला फार मोठ्या सैन्याची आवश्यकता भासेल व त्यात हजारो सैनिकांची आहुती द्यावी लागेल.” या प्रदेशातील देशी सैनिक त्यांच्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांच्या हुकुंमाची अवहेलना करायला लागले होते. कॅप्टन इलियट याने देशी सैन्यातील असंतोष दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला म्हणावे असे यश मिळाले नाही.

त्या काळात छत्तीसगड भागात दुष्काळ पडला होता. आम जनता अन्नविना तडफडून मोठ्या संख्येने मरत होती. परंतु नफेबाज आणि शोषक व्यापारी वर्ग आपल्या धान्याची गोदामे बंद करून बसले होते. त्यांना भुकेने मरणाऱ्या जनतेची पर्वा नव्हती.

सोनाखानच्या जमीनदारांना रयतेची दया आली. नारायणसिंह हे सर्वात मोठे जमिनदार होते. त्यांनी लहान-मोठ्या जमीनदारांकडून धान्य गोळा करून गोरगरीबांना वाटण्यास सुरूवात केली. ते धान्य किती दिवस पुरणार? गोळा केलेले धान्य संपल्यावर पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला. ते सहृदय व प्रजावत्सल होते. त्यांच्या जमीनदारीतील एका गावामधल्या माखनलाल नावाच्या बनियाचे फार मोठे धान्यगोदाम होते. तो ते धान्य देत नव्हता, म्हणून नारायणसिंहांनी त्याच्या गोदामाची कुलुपे तोडली व त्या गोदामातील धान्य भुके कंगाल जनतेत वाटून टाकले व जनतेला जगविले. नारायणसिंह प्रामाणिक, सच्चरित्र व इमानदार होते. त्यांनी गोदाम उघडून रयतेला वाटून टाकल्याचे स्वतःहून लगेच रायपूरचा कमिशनर याला कळवून टाकले.माखनलालने त्या कमिशनरकडे नारायणसिंहाविरूद्ध तक्रार नोंदविली. त्या इंग्रज कमिशनरला भुकेने मरणाऱ्या जनतेची दया आली नाही. आपण भुकेने मरणाऱ्या जनतेसाठी काहीतरीउपाय योजना केली पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे, असे त्याच्या मनात सुद्धा आले नाही. माखनलालच्या तक्रारीची दखल घेऊन त्याने रायपूरचा डेप्युटी कमिशनर याला नारायणसिंहाला कैद करण्याचा आदेश दिला. कैद करण्याचे वॉरंट घेऊन इलियटने घोडेस्वारांची तुकडी घेऊन सोनाखानला जाऊन २४ ऑक्टोबर १८५६ रोजी नारायणसिंहाना कैद केले व रायपूरला आणले.

नारायणसिंहांना कैद केल्याने आम जनता खवळून उठली. देशातले धान्य दुष्काळपीडित जनतेला देण्याऐवजी इंग्रज सरकार इतर देशात धान्य निर्यात करीत होते. त्याची जनतेला चीड आली. नफेबाज व साठेबाज व्यापाऱ्यांना पाठीशी घालून जनतेला दुष्काळात वाचविणाऱ्या नारायणसिंहाला इंग्रज सरकार अपराधी म्हणून कैद करते, हे जनतेला असह्य झाले. इंग्रज सरकारविरुद्ध जनतेच्या मनात तीव्र असंतोष भडकू लागला. नारायण सिंहांना कैदेतून कसे सोडवावे, याचा विचार गावोगावचे प्रमुख करू लागले.

[irp]

रायपूरच्या इंग्रजांच्या छांवणीतील देशी पलटणीतील सैनिकांना माहित झाले होते की, नारायणसिंहांना कोणत्या कारणावरून इंग्रज अधिकाऱ्यांनी पकडले आहे. त्यामुळे त्या पलटणीमधील सगळे सैनिक इंग्रज अधिकाऱ्यांवर खूप चिडले होते. सन १८५७ मध्ये मेरठ-दिल्ली मध्ये देशी पलटणींनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारून दिल्ली ताब्यात घेतल्याच्या आणि बहादुरशाह जफर याला तख्तनशीने केल्याच्या बातम्या रायपूरला येऊन थडकल्या. तेव्हा रायपूरच्या सैनिकांनी नारायणसिंहांना तुरूंगातून सोडवून त्यांना आपला नेता बनविण्याचा निर्णय घेतला. नारायणसिंहांना कसे सोडवावे, याची योजना त्यांनी आखली. त्याप्रमाणे २७ ऑगस्ट १८५७ रोजी नारायणसिंह तुरूंग फोडून निसटले व सोनाखानला जाऊन पोचले. इंग्रज शिपायांनी त्यांचा पाठलाग केला. पण त्यांना हात हलवीत परत यावे लागले. सोनाखानला पोहचल्यावर नारायणसिंहांनी लगेच ५०० सशस्त्र सैनिकांची फौज तयार केली. सर्व सैनिकांना बंदुका दिल्या. सोनाखानकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर मोर्चेबंदी केली त्यामुळे इंग्रज अधिकारी घाबरून गेले.

कमिशनरने गव्हर्नर जनरलला कळविले की, “मद्रासकडून येणाऱ्या फौजेची एक तुकडी नागपूर येथे ठेवावी. मोठ्या प्रमाणात इकडे विद्रोह झाला, तर त्या तुकडीच्या साहाय्याने तो दडपून टाकता येईल,” रायपूरचा डेप्युटी कमिशनर इलियट याने लेप्टनंट स्मिथ याला आदेश दिला, “सोनाखान येथे जाऊन नारायणसिंहाला अटक करावी.”स्मिथ सैन्यासह सोनाखानकडे निघाला. काय या देशाचे दुर्दैव! मटगाव, देवरी व बिलाईगड येथील जमीनदारांनी आपापले बंदुकधारी सैनिक स्मिथच्या मदतीला दिले. नारायणसिंहाने केलेले कार्य योग्य होते, याचा विचारही त्यांनी केला नाही. एका घोडेस्वाराने नारायणसिंहाचे एक पत्र स्मिथला दिले. त्यात नारायणसिंहाने लिहिले होते की, “तुम्ही करावयास पाहिजे होते, तेच कार्य मी केले आहे. त्यात मी दोषी कसा?” घोडेस्वाराने असेही सांगितले की, सोनाखानला तुमचा प्रतिकार करण्यासाठी नारायणसिंहांचे सैन्य तयार आहे.

[irp]

स्मिथने जेव्हा आपल्या सैनिकांना चढाई करण्याचा आदेश दिला, तेव्हा त्याच्या सैन्यातील तीस देशी शिपायांनी आपल्याच बांधवांवर हल्ला करण्यास साफ नकार दिला. स्मिथचे सैन्य जेव्हा सोनाखानजवळ आले, तेव्हा जवळच्या ओढ्यातून नारायणसिंहाच्या सैन्याने त्याच्यावर जबरदस्त हल्ला करून त्या सैन्याचा पराभव केला. पण दुसऱ्या बाजूने स्मिथच्या सैन्याच्या एका तुकडीने सोनाखान मध्ये प्रवेश करण्यात यश मिळविले. ते सैन्य आलेले पाहून गावातील लोक शेजारच्या डोंगरावर निघून गेले. त्यांनी डोंगरावरून स्मिथच्या सैन्यावर गोळीबार सुरू केला. पण त्याचा विशेष असा उपयोग झाला नाही. स्मिथच्या त्या सैन्याने सोनाखानमधली घरे लुटली व त्यांना आगी लावून दिल्या, त्यामुळे नारायणसिंहांच्या काही साथीदारांनी माघार घेतली. हताश होऊन नारायणसिंहांनी स्मिथपुढे शरणागती पत्करली. त्यांना अटक करून स्मिथने आपल्या सैन्यासह रायपूरला आणले आणि डेप्युटीकमिशनर इलियटच्या हवाली केले. तेथे नारायणसिंहावर राजद्रोह व विद्रोह केल्याचे आरोप करून खटला दाखल करण्यात आला. त्याचा झटपट निकाल देऊन नारायणसिंहांना देहान्ताची शिक्षा देण्यात आली.

छत्तीसगडच्या या स्वातंत्र्यप्रेमी, उदार, न्यायी देशभक्ताला इंग्रजांनी १० सप्टेंबर १८५७ रोजी फांसावर लटकावले. तुरूंगातील कैद्यांनी व आम जनतेने तो शोकदिन पाळला. इंग्रजांविरुद्ध सर्वसामान्य जनता दात-ओठ खाऊन हात चोळीत बसण्याशिवाय काय करू शकणार होती? नारायणसिंहांची उदारता, देशभक्ती, शौर्य, आत्मसन्मान व त्यांचे बलिदान अजूनही छत्तीसगडच्या जनतेच्या मनात घर करून राहिली आहे. आजही ते लोक गातात

वीर नारायण तुम्हारी वीरता बलिदान से!
आग के शोले निकलते अब भी सोनाखान से॥

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!