Home Study Material नरगुंदकर भावे

नरगुंदकर भावे

हिंदू धर्मात दत्तक घेण्याची प्रथा पूर्वापारपासून चालत आलेली आहे. ती एक हिंदूंची धार्मिक बाब आहे. धार्मिक विधीनुसारच दत्तक घेतला जातो. असा दत्तक नामंजूर करून अनेक राज्ये डलहौसीने आपल्या ताब्यात घेतली. हा हम करे सो कायदा उपटसुंभ इंग्रजांनी हिंदुस्थानात सुरु करून आपले साम्राज्य हिंदुस्थानात वढविले. हीच गत नरगुंद संस्थानचे राजे बाबासाहेब भावे यांची इंग्रजांनी केली व त्यांचे संस्थान खालसा केले.
नरगुंदचे संस्थान धारवाड जिल्ह्यात होते. त्या लहानशा संस्थानचे राजे बाबासाहेब भावे यांचा एकुलता एक मुलगा सन १८४३ मध्ये वारला. तेव्हा दक्षिण महाराष्ट्राचा पोलिटिकल एजंट मॅन्सन याला दत्तक घेण्याची परवानगी भाव्यांनी मागितली. ती त्याने फेटाळून लावली. त्यामुळे बाबासाहेब भावे फारच निराश झाले. सन १८५७ मध्ये उत्तर हिंदुस्थानात इंग्रजांविरुद्ध मोठ्या प्रमाणात उठाव झाला. त्याचे लोण दक्षिण भारतातही पसरले. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, जमखिंडी इत्यादी संस्थानांच्या राजांशी पत्रव्यवहार करुन नरगुंदच्या भाव्यांनी त्यांच्याकडून मदत मागितली. धारवाड जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रांतिकारक भीमराव मुंदरगी यालाही आपलेसे करुन घेतले. धारवाडच्या कलेक्टरला याचा सुगावा लागू दिला नाही. २५ मे १८५८ रोजी नरगुंदकर भाव्यांनी कंपनी सरकार विरुद्ध उठाव केला, तेव्हा तो कलेक्टर चकीतच झाला. त्याला कधीही वाटले नव्हते की, भावे एवढे धाडस करतील.
कलेक्टरने लगेच मॅन्सला आपले सैन्य घेऊन भाव्यांचा बंदोबस्त करण्यास पाठविले. रामदुर्गचे राजे नरगुंदकर भाव्यांचे धाकटे बंधू होते. ते इंग्रजांना सामील झाले होते. मॅन्सने आपल्या दीडशे स्वारांसह नरगुंदवर चाल केली. बाबासाहेबांना हेरांवी ते आधीच समजे होते. त्यांनी सहाशे स्वारांसह मॅन्सनवर हल्ला केला. बाबासाहेबांना पाहून मॅन्सन घबरला व एका देवळात लपून बसला. त्याला हुडकून काढले व विष्णू कुलकर्णी या स्वाराने पकडले. दोघांचे मल्लयुद्ध झाले. विष्णूने त्याला लोळाविले. तेव्हा तो आपल्या प्राणांची भीक मागू लागला. पण लगेच त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

भीमराव मुंदरगी हा सुद्धा आपल्या २५०० साथीदारांसह बाबासाहेबांच्या साह्यास धावून आला. मॅन्सनच्या शिपायांचा त्यांनी धुव्वा उडविला. मॅन्सनचे शिर नरगुंदच्या वेशीवर ३० मे १८१८ रोजी टांगण्यात आले. मॅन्सनच्या खिशात दोन पत्रे सापडली. त्यात लिहिले होते की, “किल्ल्यातील कोठारात असलेल्या दारूच्या साठ्यात शेण व बाजरी मिसळून टाकली आहे.” बाबासाहेबाच्या कारभाऱ्याचे ते पत्र होते. त्यांचा कारभारीच इंग्रजांना फितूर झाला होता.

[irp]

मॅन्सन ठार झाल्याने इंग्रज हादरून गेले. लगेच मालकम मोठे सैन्य घेऊन नरगुंदवर चालून आला. त्याने नरगुंदला वेढा दिला. आता आपली धडगत नाही हे पाहून बाबासाहेब वेषांतर करून किल्ल्यातून निसटले. त्यांची माता व पत्नीही किल्ल्यातून बाहेर पडल्या. दहा मैलावरील मलप्रभा नदीच्या काठी आपल्या अंगावरील सर्व दागिने एका ब्राह्मणाला दान करून त्यांनी त्या नदीत जलसमाधी घेतली. त्यांची प्रेते बुदीहाल गावी नदीतीराला लागली. तेथल्या लोकांनी त्यांचा विधिपूर्वक अग्निसंस्कार केला.

[irp]

नरगुंदवर इंग्रजांचा कब्जा झाला. बाबासाहेबांच्या सेनापतीसह १०/१२ लोकांना इंग्रजांनी फासावर चढविले. बाबासाहेबांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस इंग्रजांनी जाहीर केले. बाबासाहेब तोरंगळ या गावच्या पाटलाच्या घरी आले. फ्रेंक सूटर यांच्या मागावर होताच. बाबासाहेब तोरंगळला आहेत, ही बातमी त्याला समजली तोरगळला येऊन त्याने आपल्या सैनिकांसह त्या पाटलाच्या घराला गराडा घातला. थोडी झटापट झाली. बाबासाहेब पकडले गेले. त्यांना २ जून १८५८ रोजी बेळगांवला आणले त्यांच्यावर अनेक आरोप ठेवून खटला भरला. खटल्याचे नाटक झाल्यावर त्यांना फाशीची शिक्षा सुनविण्यात आली. १ जून १८५८ रोजी त्यांना बेळगावच्या जनतेसमोर उघड्यावर फाशी देण्यात आली. नरगुंदचे संस्थान खालसा करण्यात आले.
बाबासाहेबांचा साथीदार भीमराव मुंदरगी याने कोयलच्या किल्ल्यात आसरा घेतला होता. इंग्रजांना ते समजले. लेफ्ट-केरने मोठ्या सैन्यानिशी कोयलच्या किल्ल्याला वेढा दिला. अटीतटीची लढाई झाली. त्या लढाईत भीमराव मारला गेला. त्याचे १५० साथीदार पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना निरनिराळ्या शिक्षा दिल्या. अशा रीतीने नरगुंदचा उठाव दडपून टाकण्यात आला. अशा गुंडगिरीनेच इंग्रजांनी अनेक संस्थाने आपल्या ताब्यात घेऊन हिंदुस्थानात साम्राज्य-विस्तार केला आणि दडपशाही करुन हिंदुस्तानचे आर्थिक शोषण करुन हा देश कंगाल करुन सोडला.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!