Home Study Material नबाब अब्दुल रहमान खाँ

नबाब अब्दुल रहमान खाँ

अब्दुल रहमान खान खाँचा पिता नबाब फैज अली खाँ अत्यंत जुलमी, दुराचारी व व्यसनी होता. त्याच्या कारकीर्दीत त्याची प्रजा अत्यंत पीडीत व दुःखी होती. हरियाणा राज्यातील रोहटक जिल्ह्यात त्याचे झज्जर संस्थान होते. त्याचे निधन झाले तेव्हा झज्जर संस्थानातील प्रजेला हायसे वाटले. त्यांच्या निधनानंतर त्याचा मुलगा अब्दुल रहमान खाँ गादीवर आला तो झज्जरचा नबाब बनला. तो मात्र सद्गुणी व विचारी होता. आपल्या प्रजेचे दुःख निवारण करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील होता. त्यामुळे त्याच्या राज्यात प्रजा सुखासमाधानाने राहू लागली. त्याने जेव्हा आपल्या संस्थांनचा दौरा केला, तेव्हा त्याला आढळले की, आपल्या बापाच्या काळातले गुमास्ते प्रजेकडून जबरदस्तीने मन मानेल तसा कर वसूल करीत आहेत. तेव्हा त्याने त्या गुमास्त्यांना नोकरीवरून दूर केले व प्रामाणिकपणे काम करणारे गुमास्ते नेमले. वसूल निश्चित केला व ठरल्यापेक्षा जास्त वसूल न करण्याची ताकीद नव्या गुमास्त्यांना दिली. उजाड झालेली गावे पुन्हा बसवली.

अब्दुल रहमान खाँने आधी झज्जरचे पंडित रिजपाल सिंह यांना आपला दीवाण नेमले. त्यानंतर कुलानीचे स्यालू सिंह व बादलीचे चौधरी गुलाब सिंह यांना दीवाणपदी नेमणुका दिल्या. अब्दुल रहिमान खाँ बहराइच वंशीय पठाण होता. तसाच बहादुरगडचा नबाबही त्याच वंशाचा होता. बहादूरगडचा नबाब मोहम्मद इस्माईलखाँ मरण पावला, तेव्हा त्याचा मुलगा बहादूरजंग फक्त अडीचवर्षांचा होता. अब्दुल रहमानखाँने त्याचा सांभाळ तर केलाच पण त्याच्या बहादूरगड संस्थांचा कारभारही उत्तम रीतीने केला. वयात आल्यावर बहादूरजंग याने आपले संस्थान आपल्या ताब्यात देण्याची मागणी अब्दुल रहमान खाँ कडे केली. तेव्हा अब्दुल रहमान खाँ ने त्या संस्थानातील दादरीचा भाग आपल्याकडे ठेवून बहादूरगडच्या संस्थानचा बाकीचा सर्व भाग बहादूरजंगकडे सोपविला. दादरीच क्षेत्र आपल्या ताब्यात मिळावे, म्हणून बहादुरजंगने दिल्लीच्या रेसिडेंटकडे अपील केले. या दोन्ही संस्थानांच्या कारभारात हसतक्षेप करण्याची संधी इंग्रजांकडे आयतीच चालून आली. त्या रेसिडेंटने दादरी क्षेत्रातील १९ गावे अब्दुल रहमान खाँकडे राहू दिली व बाकीची गावे बहादुरजंगला देऊन टाकली.

सन १८४८ मध्ये बहादुरगड तरुण नबाब बहादुरजंग याची आर्थिक स्थिती भयंकर खालावली. तो कर्जबाजारी झाला. दादरी क्षेत्र लिलावात काढण्याचा प्रसंग आला, तेव्हा झज्जारचा नबाब अब्दुर रहमान खाँ याने बहादुरजंगचे सर्व कर्ज चुकते केले आणिदादरीचे त्याच्याकडचे क्षेत्र आपल्या ताब्यात घेतले. इंग्रज अधिकारी बहदुरगडचा हा अत्यंत सुपीक भाग गिळंकृत करू पाहात होते. पण अब्दुल रहमान खाँने ते प्रकरण आपसात मिटवून तो सुपीक भाग आपल्या ताब्यात घेतल्याने इंग्रजांचा रोष या दोन्ही नबाबांना पत्करावा लागला.

त्यानंतर १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले. इंग्रजांच्या विस्तारवादी व देशी जनतेचे आणि राजेरजवाड्यांचे शोषण करणाऱ्या कारभाराविषयी अब्दुल रहमान खाँ याच्या मनात तीव्र असंतोष होता. तो स्वातंत्र्यप्रिय देशभक्त होता. त्याच्या संस्थानात ३५० गावे होतीव वार्षिक उत्पन्न १४ लाख होते. अब्दुल रहिमान खाँ ने आपले सैन्य सुदृढ केले. सैन्यात नवीन भरती केली. दोन छावण्या उभारल्या. त्यांत सैनिकांना गोळीबाराचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले. नवीन उमदे घोडे सैन्यासाठी खरेदी केले. अवधच्या बेगम केसरने लिहिलेल्या केसरनाम्यात तिने नबाब अब्दुल रहमान खाँ विषयी लिहिले आहे, ‘नबाब झज्जरने यह पक्का इरादा कर लिया है की, आजादी की लड़ाई में वह पूरी मुस्तैदी से बादशाहा का साथ देंगे। उनकी पलटन में पूर्वीये ऊँचे दर्जे के लडाके हैं।’ नबाबाने आपल्या झज्जर किल्ल्याची दुरूस्ती केली व त्याच्या बुरुजांवर तोफा लावून ठेवल्या.

[irp]

१० मे रोजी इंग्रजांच्या छावणीतील देशी पलटणीने उठाव केला व ११ मे रोजीदिल्लीला येऊन बहादुरशाह जफरला आपला नेता बनविले. दिल्लीच्या छावणीतील देशी पलटणीही त्यांना सामील झाल्या. दिल्ली त्यांनी जिंकली. अशा परिस्थितीत इंग्रजांनी अब्दुल रहमान खाँकडे संदेश पाठवून १२ मे १८५७ रोजी पाचशे सैनिक व काही तोफा पाठविण्यास सांगितले. त्याने तशी मदत पाठविलीच नाही. त्याच दिवशी रोहटकलाही इंग्रजांविरुद्ध विद्रोह सुरू झाला. तेव्हा सुद्धा इंग्रजांनी त्याला सैन्याची व तोफांची मदत मागितली. त्याने दोन छोट्या तोफा व काही शिफाई पाठवून दिले. त्या तोफा विशेष कामाच्या नव्हत्या. उलट रोहटककडे जाणारे शिफाई रस्त्यातील गावामधील लोकांना इंग्रजांविरूद्ध भडकवीतच रोहटकला पोचले.

दिल्ली येथील कमिशनर ग्रेसरयाची हत्या विद्राही सैनिकांनी केली. त्यांनी मॅजिस्ट्रेट जॉन मेटकाफवरही हल्ला केला. तेव्हा तो कसाबसा जीव घेऊन पळाला व झज्जरला आला. तेव्हा नबाब अब्दुल रहिमान खाँ त्याला भेटला नाही. त्यानंतर काहीइंग्रज अधिकारी अनेक इंग्रज स्त्रियां-मुलांसह झज्जरला आश्रयासाठी आले. त्या सर्वांना त्याने संरक्षण दिले. दिल्ली पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर त्याने त्या सर्वांना आपला फैजदार मिर्झ हुसेन यांच्यासह दिल्लीला रवाना केले.

अब्दुल रहमान खाँ मात्र विद्रोही सैनिकांना पुरेपूर मदत करीत होता. २४ मे १८५७ रोजी अब्दुल रहमान खाँ ने आपले सैनिक पाठवून रोहटकच्या इंग्रजांच्या छावणीतून २ लाख रुपये लुटून आणले. त्याने रामपूर रेवाडीच्या तुलारामलाही इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत केली. त्याने बादशाह बहादुरशाह जफरशीही पत्रव्यवहार सुरू केला होता. पण त्याची पत्रे बादशाहपर्यंत पोचतच नव्हती. मध्येच ती गायब होत होती. कारण त्याचा ब्राम्हण दिवाण पंडित रिछपाल सिंह याला जनरल अॅन्सनने फितुर करून घेतले होते. दिल्लीहून मोठा शस्त्र साठा झज्जरला पाठविला गेला होता. तो मध्येच गायब केला गेला.

[irp]

दिल्ली ताब्यात घेतल्यावर ब्रिगेडियर शॉवर्स व कर्नल हडसन मोठे सैन्य घेऊन झज्जरकडे निघाले. त्यांनी रेवाडी ताब्यात घेऊन १७ ऑक्टोबर १८५७ रोजी झज्जरवर आक्रमण केले. नबाब अब्दुल रहमानखाँने युद्धाची तयार केलेलीच होती. परंतु इंग्रजांना फितुर झालेल्या पं. रिछपाल सिंह या ब्राम्हण दिवाणाने अब्दुल रहमान खाँ याला इंग्रजांपुढे शरणागती पत्करण्याचा सल्ला दिला. नबाबाने छुछकवास येथील इंग्रजांच्या छावणीत जाऊन आपल्या दिवाणाच्या सल्ल्यानुसार कर्नल लॉरेन्ससमोर आत्मसमर्पण केले. इंग्रजांनी १८ ऑक्टोबर रोजी नारनौल किल्ल्यावर व १९ ऑक्टोबर रोजी झज्जरच्या किल्ल्यावर आपले युनियन जॅक फडकावले. नबाब अब्दल रहमान खाँ ची लाखो रुपयांची संपत्ती लुटली. झज्जरच्या किल्ल्याच्या चहुबाजूस असलेल्या झाडांच्या फांद्यांवर शेकडो लोकांना फाशी देण्यात आले. तरीही झज्जरच्या सैन्याने पं. रिछपाल सिंहाचा शरणागतीचा सल्ला मानला नाही. ते सैनिक इंग्रजांशी लढता लढता जोधपूर कडील विद्राही सैन्याला जाऊन मिळाले आणि शेवट्या क्षणापर्यंत आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिले.

अब्दुल रहमान खाँला कळून चुकले की, आपल्या दिवाणानेच आपल्याला फसविले. त्याचा सल्ला मानून आपण इंग्रजांसमोर शरणागती पत्करली, ही आपल्या हातून फार मोठी चूक झाली हे त्याला समजले व त्याने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. शॉवर्सने अब्दुल रहमान खाँ याला व फर्रुखनगरचा नबाब अहमद अली याला अटक करून दिल्लीला आणले. कर्नल लॉरेन्सच्या मदतीसाठी पतियाळा संस्थांच्या राजाने सहाशे पायदळ सैन्य व दोनशे घोडेस्वार झज्जरच्या रक्षणासाठी पाठविले. बहादूर गडच्या नबाब बहादूरजंगलाही पकडून दिल्लीला आणले. अहमद अली व त्याचे ११ साथीदार, नबाब बहादूरजंग यांना नोव्हेंबर १८५७ मध्ये दिल्लीत गोळ्या घालून ठार केले. राजा नाहरसिंगला फांशी दिले. मिलिटरी कमिशनचा अध्यक्ष जनरल चेंबरलेनयाच्यापुढे नबाब अब्दुल रहमान खाँवर राजद्रोहाचा खटला १२ डिसेंबर १८५७ रोजी सुरू केला. विद्रोह्यांना मदत करणे, स्वतः विद्रोहाचा प्रयत्न करणे, विद्रोह्यांना सेना व धन पुरविणे, त्यांना आश्रय देणे, झज्जरच्या व्यापाऱ्यांकडून पाच लाख रुपये वसूल करून ती रक्कम दिल्लीला बहादूरशाह जफरच्या मदतीसाठी पाठविणे इ. आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. मेटकाफ फोर्ड, लॉक या इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर दिवाण रिछपालसिंह व दिवाण स्यालू सिंह यांनी नबाबाविरुद्ध साक्षी दिल्या. हे दोन्ही दिवाण विश्वासघातकी व निमकहराम निघाले, याचे मनस्वी दुःख नबाब अब्दुल रहमान खाँ याला झाले. सुनावणीचे नाटक संपले आणि नबाबाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या स्वातंत्र्यप्रिय, स्वाभिमानी देशभक्ताला २३ डिसेंबर १८५७ रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर चांदणी चौकात आम जनतेसमक्ष फाशी देण्यात आले. भारताचा एक महान स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्य देवतेच्या बलिवेदीवर बळी गेला. इंग्रजांनी त्याच्या प्रेताचे तुकडे आपणांस साह्य करणाऱ्या देशी संस्थानिकांना व फितुरांना दिले. केवढे हे कौर्य! झज्जर संस्थान रोहटक जिल्ह्यात विलीन करण्यात आले. प्रमुख फितुर दिवाण पं. रिछपालसिंह याला झज्जरचा ऑनररी मॅजिस्ट्रेट बनविले व दिवाण स्यालू सिंहला कुतनी गावाची इनामदारी दिली. याच कृपेसाठी ते दोघे दिवाण इंग्रजांना फितुर झाले होते. दुसरे काय?

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!