Home Study Material तीरथसिंह

तीरथसिंह

खासी पर्वत भारताच्या पूर्व सीमेवर दक्षिणेकडील सिल्हेट जिल्ह्यापासून थेट उत्तरेकडे शेकडो कि.मीटर पसरलेला आहे. या पर्वताच्या डोंगरदऱ्यांतून खासी या जातीच्या लोकांचा निवास आहे. खासी लोक सभ्य आणि लढाऊ वृत्तीचे आदिवासी आहेत. इंग्रजांच्या राज्याआधी या प्रदेशात एकूण तीस राज्ये खासी लोकांची होती. त्या प्रत्येक राज्याचा एक मुखिया असायचा व त्याचे एक मंत्री-मंडळ असायचे. गणराज्येच होती ती. त्या सर्व गणराज्यांमध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध होते. एखाद्या महत्वाच्या विषयात परस्परांत विचार-विनिमय होई व त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जात असे. त्यामुळे सर्व खासी लोक शांततेने व सुखासमाधानाने जीवनयापन करीत असत. या प्रदेशात तोपर्यंत कोणाही विदेशी व्यक्तीचा शिरकाव झालेला नव्हता.




इंग्रज सरकारच्या ताब्यात अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात आसाम प्रांत आला. आसामच्या ईशान्य प्रदेशाचा इंग्रज सरकारचा एजंट डेव्हिड स्कॉट याने गव्हर्नर जनरलला असे सुचविले की, आसामच्या ईशान्य भागापासून खासी पर्वताच्या डोंगरदऱ्यांतून दक्षिणेकडील सिल्हेटपर्यंत एक राजमार्ग तयार केला, तर आपल्या सैन्याच्या वाहतुकीस असा मार्ग फारच उपयुक्त होईल. तसेच या खासी गणराज्यांच्या मुखियांवर नियंत्रणही ठेवणे सुकर होईल. त्यामुळे आसामच्या पूर्वसीमेवर आपले प्रभूत्व स्थापन करणे सोपे होईल. गव्हर्नर जनरलला ही योजना पसंत पडली व त्यासाठी कारवाई करण्यास डेव्हिड स्कॉटला सांगण्यात आले. तो लगेच या कामाला लागला. हा प्रस्तावित राजमार्ग चेर्रा, मुंगक्ला आणि भिल्लम या तीन गणराज्यांमधून सिल्हेटकडे जाणारा होता. स्कॉटच्या या योजनेला चेर्राचा मुखिया दीवानसिंह आणि मुंगक्लाचा मुखिया छत्रसिंह यांनी नाइलाजास्तव संमती दिली; पण भिल्लमचा मुखियाने स्कॉटच्या प्रस्तावाला जोरदार विरोध केला.




सन १८२६ मध्ये मुंगक्लाचा मुखिया छत्रसिंह याचे निधन झाले. त्याच्या जागी तीरथसिंह हा मुंगक्लाचा मुखिया झाला. त्यानंतर दीड वर्षातच तीरथसिंहाच्या लक्षात इंग्रज सरकारचे अन्यायकारक वर्तन आले. पण टानीचा मुखिया बलरामसिंह याच्याशी त्याचा संघर्ष सुरू झाला. म्हणून तीरथसिंहाने बलरामसिंहाशी लढण्याकरिता स्कॉटकडे मदत मागितली. स्कॉटने तीरथसिंहाला मदत न देता बलरामसिंहाला दिली. आधीच इंग्रज सरकारला खंडणी द्यावी लागत असल्याने तो इंग्रज सरकारबद्दल जळत होता. त्यात स्कॉटने मदत त्याच्या विरोधकांना दिली. त्यामुळे तो खवळला आणि त्याने इंग्रजांना खासी पर्वतातून हाकून लावण्याचा निर्धार केला.




भिल्लमचा मुखिया इंग्रजांविरुद्ध होता. तीरथसिंहाने त्याच्याशी संधान बांधले व ४ एप्रिल १८२९ रोजी भिल्लमच्या मुखियाच्या साह्याने इंग्रजांवर सर्वप्रथम आक्रमण केले. त्यांनी तहसीलदार महीधर बरुआ व अनेक कर्मचाऱ्यांना अटक केली. कॅप्टन बोडिंगफील्ड व कॅप्टन बर्लटन यांना ठार केले. इंग्रजांच्या खाजगी व सरकारी बंगल्यांना आगी लावून दिल्या. तुरूंग फोडून साऱ्या कैद्यांना मुक्त केले. या लढ्याची बातमी खासीच्या डोंगरदऱ्यांत पोचली; तेव्हा डोंगरदऱ्यांमधून प्रत्येक मार्गाने शेकडो खासी वीर तीरथसिंहाला येऊन मिळाले. तीरथसिंहाने आपल्या परिचयाच्या बऱ्याच योद्ध्यांना या लढ्यात सामील होण्यासाठी पत्रे पाठविली. पण ती इंग्रज सरकारच्या हेरांनी मधेच लांबविली. परंतू तीरथसिंहाने सुरू केलेल्या लढ्याची बातमी मैदानी प्रदेशात पोचली, त्यानंतर त्या प्रदेशातील लोकांनी इंग्रज सरकारला महसूल देणे बंद केले आणि तीरथसिंहाला येऊन मिळाले. तशात त्या प्रदेशात अशी अफवा पसरली की, गारो लोक इंग्रजांना गोहाटीतून हाकून देण्यासाठी हजारोंच्या संख्येन गारो पर्वताच्या डोंगरदऱ्यांमधून गोहाटीकडे निघाले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी घाबरून गेले. इंग्रज अधिकारीही चिंताग्रस्त झाले.

इंग्रज सरकारने तीरथसिंहाला नष्ट करण्यासाठी कॅप्टन लिस्टरला पाठविले. तो आपली पलटन घेऊन सिल्हेटला आला. पण तीरथसिंह त्याच्या हाती लागला नाही. तो आधीच आपल्या सैनिंकासह पसार झाला होता. तेव्हा तीरथसिंहाला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

[irp]

___ मानसिंह आणि वनमोर हे तीरथसिंहाचे महापराक्रमी साथीदार होते. त्यांच्यासह तीरथसिंह डोंगर दऱ्यात गेला व अनेक खासीवीर त्यांनी आपल्या सैन्यात दाखल करून घेतले. इंग्रज सरकारला मदत करणाऱ्या खासी मुखियांना धमक्या देणे व सर्वच रस्त्यांवर अडथळे निर्माण करणे त्यांनी वेगाने सुरू केले. त्यामुळे खासी वीरांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला. त्या भागातील इंग्रज सरकारच एजंट ब्रेकरॉफ्ट याने या बाबतीत नरमाईमचे धोरण सरकारने ठेवावे, असे सुचविले; पण सरकारने ती सूचना फेटाळून लावली. व टी.सी. राबर्टसन याने दडपशाही केल्याशिवाय गत्यंतर नाही असे सुचविले. त्याची सूचना मान्य करून आणखी काही सेनाधिकारी जादा सैन्यासह मुंगक्लामध्ये येऊन ठाकले.

[irp]

इंग्रज सेनाधिकाऱ्यांनी राजा सिंहमानिक याच्या मार्फत तीरथसिंहाला सुचविले की, त्याने आत्मसमर्पण करावे. आत्मसमर्पण केले, तर त्याचे राज्य त्याच्याकडे सोपविले जाईलं आणि तो स्वतंत्रपणे राहू शकेल. तीरथसिंह मानसिकदृष्ट्या व शारीरिक कष्टांनी आता खचत चालला होता. ९ जून १८३२ रोजी त्याने त्याचा मित्र जीतराय याच्यामार्फत इंग्रज सेनाधिकाऱ्यांकडे निरोप पाठविला की, ‘तुम्ही सुचविलेला मार्ग मला मान्य आहे’ लेफ्टनंट ईगिल्स याने शपथ घेऊन तीरथसिंहाला अशी हमी दिली की, आमच्याकडून त्याच्या जीवाला धोका होणार नाही. तेव्हा तीरथसिंहाने आत्मसमर्पण केले.

२६ जानेवारी १८३३ रोजी त्याला गोहाटीला पाठविण्यात आले. इंग्रजांनी त्याचा विश्वासघात केला व त्याच्यावर गोहाटीच्या न्यायालयात फौजदारी न्यायालयात खटला दाखल केला. निकाल आधीच ठरला होता. न्यायालयाने त्याला ‘विद्रोही ठरवून तुरूंगवासाची सजा दिली. कलकत्त्याच्या कौन्सिलच्या आदेशाने तीरथसिंहाला ढाक्याला तुरूंगात डांबण्यात आले. त्या तुरूंगात एकाकी जीवन कंठीत असतांना सन १८४१ मध्ये तो स्वाभिमानी, स्वातंत्र्यप्रिय वीर निधन पावला. त्याला गोहाटीला पाठविल्यानंतर खासी पर्वताच्या डोंगरदऱ्यांत इंग्रजांचे दमन चक्र व मुक्त संचार सुरू झाला.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!