Home Study Material तिलका मांझी

तिलका मांझी

ईस्ट इंडिया कंपनीने बादशहा शाहआलमकडून बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांची दिवाणीची सनद मिळविली. तो १८ व्या शतकाचा उत्तरार्ध होता. सध्याचा आसाम त्या काळात बंगाल प्रांतातच समाविष्ट होता. म्हणजे इंग्रजांनी भारताच्या या संपूर्ण पूर्वभागावर आपली अधिसत्ता मिळविली होती. जास्तीत जास्त जमीन-महसूल वसूल करण्यासाठी त्यांनी डोंगराळ व जंगल प्रदेशही एकापाठोपाठ एक असे हस्तगत केले व त्या भागातील जमीनीचे महसूल ठेकेदारी पद्धतीने कंपनी सरकार वसूल करु लागली. कंपनी सरकारने मोगल बादशहांच्या महसूलाच्या दुप्पट महसूल त्या सर्व प्रदेशावर लादला. त्यामुळे मैदानी भागातील शेतकरी व डोंगराळ जंगल भागातील आदिवासींची पिळवणूक सुरु झाली.
त्या काळापर्यंत आदिवासी जनजातीकडून भारतीय राजे महसूल वसूल करीत नसत. इंग्रजांनी जनतेचे शोषण अधिकाधिक करण्यासाठीच जबरदस्त महसूल भारतीय जनतेवर लादला. त्यामुळे त्या भागातील सर्व जमातीच्या लोकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढे दिले. इंग्रजांनी सर्व प्रथम भारताच्या या पूर्व भागातील व दक्षिण भागातील प्रदेश गिळंकृत केल्याने त्यांना याच भागांमधून सर्वप्रथम विरोध भारतीय जनतेकडून केला गेला म्हणूनच या भागात इंग्रजांशी लढणारे स्वातंत्र्यवीर हे भारतातील आद्यक्रांतिकारक ठरतात.

अशा आद्य क्रांतिकारकांपैकी बिहारच्या बंगालला लागून असलेल्या राजमहल व भागलपूर मधल्या पहाडातील संथाल जमातीचा तिलका मांझी हा एक बहाद्दूर वीर व कुशल संघटक होता. त्याने या प्रदेशातील हिंदू-मुस्लिमांसह अन्य जातीमधील लढवय्यांचे उत्तम संघटन करुन इंग्रजी सत्तेशी प्राणपणाने टक्कर देऊन आपल्या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
तिलका मांझीचा जन्म दि. ११ फेब्रुवारी १७५० रोजी सुलतानजंग ठाण्याअंतर्गत तिलकपूर या गावी संथाल जमातीत झाला. डोंगरदऱ्यांतील निवास, मुक्तजीवन, वंशपरंपरागत शिकारीचा व्यवसाय यामुळे तो शरीराने बळकट, धाडसी, नेमबाजीत तरबेज व स्वतंत्र जीवनाचा चाहता बनला. जवानीत तो चांगलाच ताकदवान बनला. तसाच दृढनिश्चयी, शब्दांना जागणारा व दूरदर्शी झाला. त्याच्या अंगी आध्यात्मिक शक्तीही चांगली होती. ती त्याला कशी प्राप्त झाली हे मात्र सांगता येत नाही. एवढे मात्र खरे की, तो जे म्हणेल, तसेच घडून येई. तारुण्यातही तो सात्विक जीवन जगत होता. त्यामुळे त्याच्याकडे तरुणांचा ओढा सतत असायचा त्याच्या आध्यात्मिक शक्तीमुळे लोकांची त्याच्यावर श्रद्धा वाढू लागली. तो विचारी होता. त्याने आपल्या समाजाची व अन्य हिंदू-मुसलमानांची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेतले. सगळ्या धर्माच्या आणि जाती-जमातींच्या लोकांना तो समान समजत असे. त्याच्या मनात भेदभाव यात्किंचितही नसायचा. ब्रिटिशांनी साऱ्या लोकांचे जिणे कसे दुष्कर करुन टाकले आहे, हे त्याने प्रत्यक्ष पाहिले आणि ब्रिटिशांना आपल्या प्रदेशामधून हाकलून द्यायचा त्याने दृढसंकल्प केला.त्याचा बहुतेक काळ सुलतानगंजच्या डोंगराळ भागातच व्यतीत व्हायचा. भागलपूरमध्ये तो तरुणांच्या गुप्त सभा आपल्या संकल्पपूर्तीसाठी घेत असे. आदिवासी, हिंदू व मुसलमानांचे त्याने चांगले संगठन केले. ते सारे लहानपणापासूनच निशाणबाजीत तरबेज होते.

इंग्रज जोपर्यंत आपल्या भूमीवर राहतील. तोपर्यंत ते साऱ्या जनतेचे शोषण अनेक मार्गानी करीतच राहतील, हे त्याने आपल्या साथीदारांना पटवून दिले. इंग्रजांचे दलाल जमीनदार व सावकार आणि इंग्रज यांना आपल्या प्रदेशातून आपण हाकलून लावलेच पाहिजे असा त्यांनी दृढनिश्चय केला. आणि तिलका मांझीने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वरील शोषणकर्त्यां विरुद्ध वयाच्या एकतीसाव्या वर्षी म्हणजे १७८१ साली युद्ध सुरु केले. त्याने गंगेच्या काठच्या प्रदेशातून मार्गो व तोलियागदी या दांमधून येणारा व जाणारा इंग्रजांचा खजिना लुटणे सुरु केले. लुटीचा पैसा तो आपल्या साथीदारांना व गोरगरीब जनतेत वाटून देई. तो अत्यंत निःस्वार्थी होता.

___गंगा व ब्राम्ही नद्यांच्या दुआबातील जंगल तराईच्या प्रदेशात तसेच मुंगेर, भागलपूर व संथाल परगण्यात त्याच्या इंग्रजांशी अनेक लढाया झाल्या. बिहारच्या त्या भागात पहाडिया जमातही राहायची. पहाडिया जमातीत व संथाल जमातीत सतत लढाया चालू असत. पहाडिया लोकही आधी इंग्रजांविरुद्ध मारगो व तेलियागढी दऱ्यांमधून जाणारा-येणारा इंग्रजांचा खजिना ते सुद्धा लुटत असत. संथाल लोक वीरभूम, राजशाही व सुलतानगंज या भागात लूटमार करुन इंग्रजांना व त्याच्या एतद्देशीय दलालांना जिणे नकोसे करायचे.
सन १७७४ मध्ये कॅप्टन जेम्स ब्राऊन जंगलतराईचा सैनिक गव्हर्नर झाला. त्याने पहाडिया जमातीच्या नेत्यांना आपलेसे करायचे प्रयत्न सुरु केले. सन १७७६ मध्ये ऑगस्टस क्लीवलँड राजमहलचा मॅजिस्ट्रेट म्हणून आला त्यानंतर तो भागलपूरचा मॅजिस्ट्रेट झाला. त्याने दूरदर्शीपणाने आणि चलाखीने पहाडिया जमातीच्या नेत्यांना आपलेसे करुन घेतले. मुसलमान जमीनदार सतत पहाडिया व संथाल लोकांची पिळवणूक करीत असत. त्या जमीनदारांना आकळविण्यासाठी क्लीवलँडने पहाडिया नेत्यांचा उपयोग करुन घेऊन त्या जमीनदारांच्या जाचातून त्यांची सुटका केली. पहाडिया सरदारांना आपलेसे करुन घेतल्यानंतर संथालांचा उठाव पहाडिया सरदारांच्या साह्याने दडपून टाकायचे क्लीवलॅडने ठरविले.

क्लीवलँड, सर आयरकूट हे इंग्रज सैन्यासह व पहाडिया सरदार आपल्या पहाडिया साथीदारांसह एकत्र मिळून तिलका मांझीचा पाडाव करण्यासाठी निघाले. जंगल तराईत तिलका मांझीच्या सैन्याशी त्यांच्या अनेक लढाया झाल्या. त्यात तिलका मांझी त्यांना पुरुन उरला. १३ जानेवारी १७८४ रोजी तिलका मांझीने भागलपूरवर चढाई केली. एका ताडाच्या झाडावर चढून तिलका मांझीने घोड्यावरुन जात असलेल्या क्लीवलँडच्या छातीवर बाण मारला. क्लीवलँड तात्काळ घोड्यावरुन खाली कोसळला व लगेच मरण पावला. क्लीवलँडच्या निधनाने इंग्रज सैन्य हबकून गेले व मार्ग सापडेल तिकडे पळून गेले.

तिलका मांझीचा विजय झाला. त्याचे सैन्य विजयाचा आनंद साजरा करीत असताना रात्रीच्या अंधारात सर आयर कूट व पहाडिया सरदार यांनी मिळून तिलका मांझीच्या बेसावध सैन्यावर अचानक हल्ला केला. त्या लढाईत तिलका मांझीचे बरेच सैनिक मारले गेले आणि पुष्कळसे गिरफ्तार करण्यात आले. तिलका मांझी आपल्या उरलेल्या सैनिकांसह सुलतानगंजच्या डोंगरात आश्रयाला निघून गेला आणि पुढची योजना ठरवू लागला. नंतर काही महिने त्याचे सैन्य इंग्रज सैन्याला आणि पहाडिया सैनिकांना गनिमीकाव्याने बेजार करीत होते.

[irp]

तिलका मांझीचा पाडाव कसा करावा, या विचाराने सर आयर कूट संत्रस्त झाला. त्याने आता तिलका मांझीचे आश्रयस्थान असलेल्या डोंगरांना वेढे दिले. त्यांना बाहेरची रसद मिळू दिली नाही. अन्नपाण्यावाचून तिलका मांझीच्या सैनिकांचे हाल होऊ लागले. तेव्हा गनिमीकाव्याने लढणे सोडून देऊन तिलका मांझीने इंग्रजांशी आमनेसामने लढायचे ठरविले. आपल्या सैन्यासह तो डोंगर सोडून खाली उतरला व निकराने लढू लागला. त्या लढाईत धोक्याने तिलका मांझी इंग्रजांच्या हातात सापडला तेव्हा त्याला जेरबंद करण्यात आले. सर आयर कूट त्यामुळे आनंदाने बेहोश झाला. त्याने तिलका मांझीला दोरखंडाने बांधून चार घोड्यांकरवी भागलपूर पर्यंत रस्त्यावरुन फरफटत नेले. त्याचे अंग अंग सोलून निघाले तरी तो जिवंत राहिला. सर आयर कूटने त्याला भागलपूरच्या एका चौकातील झाडावर फाशी दिली. नंतर त्याचे प्रेत त्या वडाच्या बुंध्याशी बांधून त्याच्या छातीत मोठे मोठे खिळे ठोकण्यात आले. अशारीतीने या महान आदिवासी नेत्याने स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली.

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भागलपूरमधील त्या चौकाला ‘तिलका मांझी चौक’ असे नाव देण्यात आले आणि त्या चौकात एक चळूतरा उभारुन त्यावर तिलका मांझीच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाले.

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!