Home Study Material तंट्या भिल्ल

तंट्या भिल्ल

इंग्रज सरकारला व त्या सरकारचे दलाल असणाऱ्या जमीनदार, सावकार, वनतदार, पाटील इत्यादिकांना सलग अकरा वर्षे दाद न देणारा तंट्या भिल्ल हा एकोणवीसाव्या शतकातला गरीबांचा वाली होता. आदिवासी जनतेत त्याने राष्ट्रीयत्वाची भावना जागविली होती. त्याच्या शोधावर असलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याने असे लिहून ठेवले आहे. “नर्मदा व तापी या दोन नंद्यांमधील सुमारे दोनशे मैलांच्या प्रदेशात त्या काळात जणू त्याचेच राज्य होते. अत्याचारी जमीनदार, सावकार, पाटील, वतनदार त्याला चळचळा कापायचे. त्यांना लुटून तो गोरगरीबांना, अडलेल्या भागलेल्यांना मदत करायचा. स्वतःसाठी तो काहीच ठेवायचा नाही. आपल्या साथीदारांनाही मुक्त हस्ते मदत करायचा त्यामुळे जनतेचा त्याला जबरदस्त पाठिंबा होता. तो खरा जननायक होता. आदिवासींच्या स्वातंत्र्य लढ्यातील तो एक सोनेरी पान होता. म्हणूनच मध्य प्रदेशातील पाताळपाणी स्टेशन जवळ असलेल्या त्याच्या स्मारकाजवळ या काळातही दरसाल हजारो आदिवासींचा प्रचंड मेळावा भरत असतो. असे भाग्य क्वचितच एखाद्या क्रांतीकारकाला लाभत असते.” एका हिंदी कवीने म्हटले आहे.

शहीदोंकी चिताओंपर जुडेंगे हर बरस मेले । वतनपर मिटनेवालोंका यहीं बाकी निशाँ होगा।

तंट्या भिल्लाच्या संबंधात किती सार्थ आहेत या ओळी.
मध्य प्रदेशातील सातपुड्यातल्या नेमाड जिल्ह्यातील बिरडा या लहानशा खेड्यात तंट्या उर्फ तात्याचा जन्म १८४२ साली झाला. त्याच्या वडिलांचे नाव भावसिंग व आईचे नाव जिवणी बालपणापासूनच तो चपळ आणि निडर होता. वयात आल्यावर त्याची उंची साडेपाच फूट, रंग गोरा, भुरकट केस, घारे डोळे, लांबट चेहरा, जाड ओठ, डोळे बारीक व नजर भेदक होती. तो सडपातळ पण बलवान आणि दृढनिश्चयी होता. तसाच त्याचा स्वभाव साधा सरळ व कनवाळू होता. मनाने तो उदार होता.

भावसिंगाच्या बापाची थोडीशी जमीन जवळच्या पोखर गावी होती. त्याने पोखरच्या शिवा पाटलाकडून थोडेसे कर्ज घेतल्याने ती जमीन त्याच्याकडे गहाण होती. शिवा पाटलाने ती जमीन हडप केल्याने बिरडा या गावी येऊन तो व त्याची बायको तेथल्या पाटलाची जमीन खंडाने कसत होते. खंडांचे धान्य पाटलाला दिल्यानंतर फक्त काही महिने पुरेल, एवढेच धान्य भावसिंगाकडे उरायचे. मग जंगलातील कंदमुळे, फळे यांच्यावर त्यांची भिस्त असायची. बिरडा येथे तात्या वाढला. बांबूच्या कपचीच्या धनुष्यबाणाने शिकार करण्यात तरबेज झाला. दुष्काळामुळे त्यांचे खाण्यापिण्यावाचून हाल होऊ लागले. त्यातच तात्याची आई वारली. भावसिंग खचला. तात्याने ती खंडाची जमीन कसायला सुरूवात केली. पुढे भावसिंगही वारला. मरतांना त्याने आपली जमीन पोखरला आहे व ती शिवा पाटलाकडे गहाण आहे असे सांगितले होते. लहानपणीच तात्याचे लग्न भिकी या मुलीशी झालेले होते. आता तो व भिकी हे दोनच जीव त्या कुटुंबात उरले. भिकी ही पोखरचीच होती. शिवा पाटलाची मुलगी यशोदा तिची मैत्रीण होती. बालपणात त्या दोघी एकत्र खेळत असत. दुर्दैवाने यशोदा बाल विधवा झाली व पोखरला बापाकडेच राहू लागली.
पोखरची आपली जमीन आपण कसावी, म्हणून तात्या पोखरला रहायला आला. शिवा पाटलाकडे त्याने आपली जमीन कसायची इच्छा व्यक्त केली. पण तात्याच्या लक्षात आले की, पाटलाने आपली जमीन त्याच्या नावे करून घेतली आहे. काय करावे हे त्याला समजेना. पोखरला नहाल हा त्याच्या मित्र होता. तो थोडाफार शिकलेला होता. त्याने तात्याला सल्ला दिला की, खांडव्याला जाऊन तुझ्या जमिनीबद्दल शिवा पाटला विरूद्ध कोर्टात तक्रार नोंदवू त्याप्रमाणे तात्याने कोर्टात तक्रार नोंदविली. खटला सुरु झाला. निकाल तात्या विरूद्ध लागला. कारण शिवा पाटील व त्याच्या नाते संबंधातला भुईफळाचा जमीनदार हिंमत पाटील यांचे सर्व अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. हिंमत पाटलामुळेच निकाल तात्या विरुद्ध लागला, हे नहाल व तात्याच्या लक्षात आले होते.

यशोदेला समजून चुकले की, आपला बाप गरीब बिचाऱ्या तात्याला फसवितो आहे. तिने तसे तात्याला सांगितले. ते दोघे बोलत असता गावातील काही तरूणांनी पाहिले व त्यांनी गावात कंडी उठविली की, ‘तात्याचे व यशोदेचे संबंध आहेत’ गाव पंचायतीची बैठक झाली. शिवा पाटलाला जाती बाहेर टाकण्यात आले. त्याला १०० रूपये दंड केला. पाटलाने तो दंड भरला. गावच्या त्या तरूणांनी तात्याला चोप द्यायचे ठरविले. ते यशोदेने तात्याला सांगितले. तो खवळला व त्या तरूणांच्या घरांसमोर जाऊन सज्जड दम भरला. ‘तुमची सर्वांची घरे पेटवून देईन’ अशी धमकी दिली. ते तरूण नरमले.

एके दिवशी दंडुका घेऊन तात्या आपल्या शेतावर गेला. शेतात पाटलाचा गडी काम करीत होता. तात्याने त्याला चांगला चोप दिला व त्याला आपल्या शेतातून हाकून दिले. शिवा पाटलाने हिंमत पाटलाच्या सल्ल्याने तात्यावर दावा लावला. पण तो फसला. मग त्यांनी तात्यावर वाईट वर्तणूक व चोरीचे आरोप ठेवून तात्यावर दुसरा दावा लावला. पोलिस अधिकारी हिंमत पाटलाचे मित्रच होते. खोटे साक्षीदार कोर्टात उभे केले. तात्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्याला एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
शिक्षा भोगून तात्या परत आला. त्याला आता पोखरला राहणे कटकटीचे वाटू लागले. ते गांव इंग्रज सरकारच्या हद्दीत होते. तात्याने आपले बि-हाड होळकर सरकारच्या हद्दीतील हिरापूर गांवात हलविले. तेथे तो व त्याची बायको मोलमजुरी करू लागले. तेथे त्याला एक चांगला मित्र मिळाला. शेजारच्या खजुरी गावचा बिजनिया होता तो. काळा, धिप्पाड व बेडर होता तो.

___हिरापूर जवळच्या बारी गावात चोरी झाली. पोलिसांनां तात्या व बिजनियाचा संशय आला व त्यांना पोलिसांनी पकडले. बिजनिया चिडला व त्याने पोलिसांना मारले, खांडव्याला त्यांच्यावर कोर्टात केस दाखल केली. चोरीचा आरोप सिद्ध झाला नाही. पोलिसांना मारल्याबद्दल दोघांना तीन तीन महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या.

शिक्षा भोगून आल्यावर तात्या होळकर हद्दीतील सिओर गावी राहण्यास आला. त्याला चारचौघांसारखे जीवन जगायचे होते व शिवा पाटील आणि हिंमत पाटील यांच्यापासून दूर रहायचे होते. पोखरीजवळच्या एका गावी चोरी झाली. पोलिसांनी जेलीम नावाच्या भिल्लाला ती चोरी केल्याबद्दल पकडले. हिंमत पाटील जेलीमला भेटला व चोरीच्या वस्तू तात्याने मला दिल्या असे तू कोर्टात सांग, असे त्याला सांगितले.जेलीमने कोर्टात तसे सांगितले तात्या पकडला गेला. त्याच सुमारास बिजनिया व दौल्या हे त्याचे दोन्ही मित्र दुसऱ्या गुन्ह्याबद्दल पकडले गेले. हिंमत पाटील हा पाताळयंत्री माणूस होता. त्याने खोटे साक्षीपुरावे उभे केले. त्या तिघांना खांडवा जेलमध्ये ठेवण्यात आले. ते रात्री तुरूंग फोडून पसार झाले.

तात्या व त्याच्या साथीदारांनी भुईफळ येथे हिंमत पाटलाच्या घरावर धाड घातली. हिंमत पाटलाला व त्याचा मुलगा गोविंद याला त्यांनी भरपूर चोप दिला. हिंमत पाटील पळून जाऊ लागला, तेव्हा बिजनियाने त्याच्यावर गोळी झाडली, त्यातच तो दुसऱ्या दिवशी मेला. तात्याचा आता तंट्या झाला होता. तो व त्याचे सहकारी फरार झाले होते. तंट्याने आता उग्र रूप धारण केले. गावोगावच्या सावकारांना, जमीनदारांना लुटू लागला. लुटलेला पैसा आपल्या साथीदारांना आणि अडलेल्या नडलेल्या गोरगरीबांना, शेतकऱ्यांना वाटून देऊ लागला. एका वर्षात तंट्याचे नांव गावागावात दुमदुमू लागले. रयतेला गांजणाऱ्या, रयतेच्या कष्टावर श्रीमंत झालेल्या, रयतेची पिळवणूक करणाऱ्या जमीनदार सावकारांच्या घरांवर तो दरोडे घालू लागला. दरोडे इंग्रज सरकारच्या हद्दीत घालायचे व होळकर सरकारच्या हद्दीत पसार व्हायचे हे त्याचे आता नेहमीचे तंत्र झाले. त्याचे सर्वसाथीदार त्याच्याशी एकनिष्ठ होते. मात्र दरोडे घालतांना बायकोपोरांना कोणीही हात लावायचा नाही, अशी त्याची आपल्या सर्व साथीदारांना सक्त ताकीद होती. साथीदारांचे तंट्यावर जिवापाड प्रेम होते.

तंट्या जनतेला सतत लुटणाऱ्या जमीनदार, सावकारांना त्यांच्या घरांवर धाड घालून धडा शिकवितो आणि लुटीची रक्कम गरजू गरीब लोकांना देऊन टाकतो, हे साऱ्या नर्मदा खोऱ्यातील लोकांना माहित झाले. जनतेला त्याच्या बद्दल आदर वाटू लागला. मात्र इंग्रज सरकारच्या पोलिस अधिकाऱ्यांची तो डोकेदुखी होऊन बसला. जमीनदाराने, सावकाराने छळ केला की, ती त्रस्त माणसे तंट्याकडे यायची. आपले गाहाणे त्याला सांगायची तंट्या आपल्या टोळीसह त्या जमीनदार-सावकारांना लुटून दम भरायचा.

तंट्याचामुक्काम नर्मदा-तापीच्या खोऱ्यातील डोंगर-दऱ्यांत, घनदाट अरण्यात असायचा. तो वारंवार आपला मुक्काम बदलायचा. त्यामुळे सारे पोलिस खाते हैराण झाले होते. त्याने अनेक देशी व इंग्रज अधिकाऱ्यांनाही धडा शिकविला होता. तो बहुरूपी होता. निरनिराळी सोंगे आणून तो त्या अधिकाऱ्यांना ‘तंट्याचा अड्डा दाखवून देतो’ म्हणून झुलवायचा. त्यांना अवघड जागी नेऊन त्यांची फजिती करायचा. तेव्हा ते धूम ठोकून पळून जायचे.

इंग्रज सरकारची अब्रू त्याने वेशीवर टांगली होती. कोणाही अधिकाऱ्याला तो दिसत नव्हता. मात्र जमीनदार सावकरांच्या घरांवर धाडी घालीतच राहायचा. बिजनिया एका डोंगरावरील जाळीत लपलेला आहे, असे एका खबऱ्याने पोलिसांना सांगितले. तेथे तो व त्याचा एक साथीदार दोघेच होते. पोलिस मोठ्या संख्येने आले. त्या जाळीला वेढा घालून बिजानियाला साथीदारासह पकडले. हिंमत पाटलाचा खून केल्याचा आरोप ठेवून त्याला फाशी देण्यात आले. तो तंट्याचा उजवा हात होता. तो गेल्याने तंट्याला अत्यंत दुःख झाले. तो त्याचा बहादुर साथी होता.

देशी पोलिस अधिकारी तंट्याच्या शोधाचे काम योग्यरित्या करीत नाहीत, म्हणून त्यांच्या जागी मुंबईहून खास इंग्रज पोलिस इनस्पेक्टरांना नर्मदा खोऱ्यात नेमणूका दिल्या पण त्यांनाही त्या कामी यश आले

नाही.

दुष्काळ पडला. व्यापारी, सावकार रयतेला लुटू लागले. तंट्याने लोकांना बिनव्याजी पैसा दिला. त्यामुळे सावकार हबकले. धावत्या आगगाडीत चढून तंट्या व त्याच्या साथीदारांनी सरकारच्या व व्यापाऱ्यांच्या धान्याची शेकडो पोती आगगाडीच्या डब्यातून खाली फेकली व ते धान्य भुकेने तडफडणाऱ्या जनतेला वाटून टाकले. त्यामुळे जनता त्याला आपला तारणहार मानू लागली. गोरगरीब स्त्रियांना तो आपला भाऊ व रक्षणकर्ता वाटू लागला. नंतरच्या कालात चांगले पीक आले. सावकार कमी किंमतीत शेतकऱ्यांचे धान्य दरवर्षी विकत घेण्यास लालचावले होते. तंट्याने आपल्या साथीदारांना लुटीचा पैसा देऊन गावोगावच्या शेतकऱ्यांकडून जादा भावाने धान्य विकत घेतले. ते गरजू गरीब लोकांना वाटून टाकले. त्यामुळे सावकार हबकून गेले.

सरकारने स्पेशल कमिशनर तंट्या ऑपरेशन हे नवे पद निर्माण करून कर्नल वॉर्डची नेमणूक त्या पदावर केली. त्याने खांडवा, बैतूल, होशंगाबाद या तिन्ही जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंबू उभारून पोलिस चौक्या स्थापन केल्या. तरीही त्यांचा काही उपयोग झाला नाही. प्रत्येक गावातला कोणताही माणूस तंट्याची माहिती पोलिसांना देत नव्हता.

___ सर लेफेल ग्रिफिन गव्ह. जनरल तर्फे त्या भागात आले. त्यांनी ‘तंट्या पोलिस’ नावाचे सैन्यदल उभारले. रिसालदार मेजर ईश्वरी प्रसादांकडे तंट्याला पकडण्याच्या मोहिमेची जबाबदारी सोपविली. होळकर सरकार, घाटाखेडी, मकडाई व अचलपूरचे संस्थानिक तंट्याला पकडण्याच्या कामी सरकारला मदत न करता तंट्याला संरक्षण देतात; असा आरोप पोलिस अधिकाऱ्यांनी केला. गव्ह. जनरलने पत्रे देऊन त्यांना तंबी दिली. त्यांनीही तंट्याला पकडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या; पण ते मन लावून काम करीत नव्हते. त्यांनीही तंट्याबद्दल सहानुभूती वाटत होती.

इंग्रज सरकारने तंट्याला पकडून देण्याऱ्यास नंदगाव व चारखेडा या गावांच्या शिवारातली २५०० एकरांची जमीनदारी बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले. होळकर सरकारलाही त्यासाठी बक्षीस जाहीर करण्यास भाग पाडले. पण बक्षीसाच्या लोभाने त्या दोनशे चौरस मैलातील एकही माणूस या कामासाठी पुढे आला नाही. कारण तंट्याचे कार्य व त्यामुळे त्याची वाढलेली लोकप्रियता कोणत्याही गावात तो गेला, तर त्या गावाचे लोक त्याला राजासारखा मान देत असत. तो तर नर्मदा-तापी खोऱ्यातल्या दोनशे चौरस मैलांच्या प्रदेशातील जनतेचा अनभिषिक्त राजाच होता.
एक अशिक्षित व निडर आदिवासीने इंग्रजांच्या बलाढ्य सत्तेपुढे त्या प्रदेशात आव्हान उभे केले होते. काय करावे हे इंग्रज अधिकाऱ्यांना सुचत नव्हते. अखेर इंग्रज सरकारने तंट्याविरूद्ध एक जाहिरनामा गावोगाव जाहीर केला. तो असा-‘तंट्या हा सरकारचा गुन्हेगार आहे. त्याला मदत करणे, म्हणजे गुन्हेगारास मदत करणे होय. त्याला मदत करणारास कडक शिक्षा दिली जाईल. उलट तंट्याला पकडण्यासाठी मदत करणारास मोठे बक्षीस दिले जाईल.’

तंट्या अडाणी होता. पण उत्तम संघटक होता. हुशार होता, धाडसी होता. नेतृत्त्वाचे सगळे गुण त्यांच्यात होते. गनिमी काव्याने शत्रूला नामोहरण करण्यात तो फार तरबेज होता. इंग्रजांनी भिल्ल ही जमात गुन्हेगार म्हणून जाहीर केली होती. पण त्याचा जातीतून हा सर्व जातींचा लोकतनायक म्हणून प्रसिद्ध झालेला होता, हे विशेष होय. त्याला तीन मोठे शत्रू होते. एक इंग्रज सरकार दुसरे व तिसरे गरीब जनतेलालुटणारे सावकार व जमीनदार. ते तर इंग्रज अधिकाऱ्यांचे दलालच होते. तंट्याची लोकप्रियता त्यांच्या मनात सलत होती. हे दलाल आपल्याच देशातील जनतेची पिळवणूक करीत होते, जनतेला लुटत होते. वर्षांनुवर्ष या मूठभर लोकांची समाजावर पकड होती. त्या पकडीतून जनतेला सोडविण्यासाठी तंट्यासारखा आदिवासी मनुष्य दोन्ही दोन्ही दंड थोपटून उभा राहिला. ही घटना क्रांतिकारकच होती. इंग्रज सत्ताधाऱ्यांपुढे त्याने मोठे आव्हान उभे केले होते. तो तंट्याला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने गेल्या दहा वर्षात निर्माण केलेल्या पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्या होत्या. भिल्ल, कोरकू आदिवासी जनता तंट्याच्या पराक्रमाने धीट बनली होती. तिला आता पहिल्यासारखे पोलिसांचे भय वाटत नव्हते. हे घडले केवळ तंट्यामुळे. त्याची गुप्तहेर यंत्रणा तर इंग्रज सरकारच्या गुप्तहेर खात्यापेक्षाही श्रेष्ठ होती. तंट्या सर्वसमान्य जनतेचा मुक्तिदाता ठरला होता. म्हणूनच आजपर्यंत इंग्रज सरकारला दाद दिली नव्हती.

[irp]

अखेर चीफ कमिशनरने गव्ह. जनरलच्या एजंटला पत्र लिहिले. ‘आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे की, तंट्याला सरळ सरळ पकडणे अशक्य आहे. आता एकच मार्ग उरला आहे. तंट्याच्या जवळच्या माणसाचा शोध घ्यावा. त्या माणसाला बक्षीसाच्या लालचीने आपलेसे करावे. त्याच्या मदतीने तंट्याला फसवून धोका देऊन पकडता येऊ शकेल.’ ह्या योजनेला सरकारचा होकार मिळाला.

तंट्या आता ४६ वर्षांचा झाला होता. गेली सोळा वर्षे वणवण करीत होता. त्याचे गुडघेही दुखु लागले होते. शरीर थकत चालले होते. वयाच्या मानाने ते साथ देत नव्हते. शरीरावर व मनावर अनेक ताण होते. पूर्वीची उमेद आता कमी होऊ लागली होती. उरलेले आयुष्य एका ठिकाणी राहून बायको पोरांसह शांतपणे घालवावे, असे त्याला वाटू लागले. होळकर सरकारने जर माफी देऊन नोकरी दिली, तरच हे शक्य होणार होते. म्हणून होळकर सरकारला शरण जाण्याचे विचार त्याच्या मनात वारंवार येत होते.

खरखोन तालुक्यातील बाणेर गावी त्याचा एक मित्र गणपतसिंह राजपूत हा राहात होता. त्याची बायको तंट्याची मानलेली बहीण होती. दरवर्षी तो श्रावणी पौर्णिमेला तिच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी नियमितपणे जात असे. अधून मधूनही त्यांच्याकडे तो जाई. गणपतसिंहाजवळ त्याने आपले होळकर सरकारकडे नोकरी करण्याचे विचार बोलून दाखविले. गणपतसिंहाने प्रयत्न करतो, माझ्या ओळखीचा एक अधिकारी होळकर सरकारच्या नोकरीत आहे. ते एकून तंट्याला आशा वाटू लागली.

[irp]

गणपतसिंह हा महालोभी होता. तंट्याला पकडून देण्यासाठी इंग्रज सरकारने जाहीर केलेले भले मोठे इनाम त्याच्या नजरे समोर नाचू लागले. गणपतसिंह ठाणेदार मनजित भगवंत याला भेटला व त्याला तंट्याचे विचार सांगितले. मनजित भगवंताने आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्याला तसे कळविले. होळकरांना ते समजले. तंट्यामुळे आपल्यालाही इंग्रज सरकारचा रोष पत्करावा लागतो आहे, तेव्हा हे प्रकरण एकदाचे मिटवून टाकावे, या विचाराने मेजर ईश्वरीसिंह यांना बोलावून घेतले. ते १५ मे १८८९ रोजी खरगोन येथे आले. खरगोनच्या छावणीत २९ जून १८८९ रोजी गणपतसिंहाने मेजर ईश्वरी प्रसादची भेट घेतली. गणपतसिंहाला होळकर सरकारने नुकतीच नोकरी दिली होती. तंट्या माझ्या घरी दरवर्षी दरवर्षी श्रावणी पौर्णिमेला माझ्या बायकोकडून राखी बांधण्यास येतो. या श्रावणी पौर्णिमेलाही तो येईल. तेव्हा त्याला पकडता येईल असे त्याने ईश्वरीप्रसादला सांगितले. त्यांनी तंट्याला कसे पकडायचे याची योजना ठरविली.

राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पोलिसदल बाणेरला आले. गणपतसिंहाच्या घराजवळच्या झोपडीत दबा धरून बसले. तंट्या गणपतसिंहाच्या घरी आला. संभ्या भिल्ल हा गणपतसिंहाचा साथीदार होता. त्याने तंट्यावर झडप घातली. तंट्याचा साथीदार नानकू याने संभ्यावर गोळी झाडली. त्या आवाजाने ईश्वरीसिंहाचे पोलिस झोपडीबाहेर धावून आले व सर्वांनी तंट्याला दोरखंडाने बांधून जेरबंद केले. रातोरात त्याला खरगोनला आणले. गणपतसिंहाने बेइमानी करून इनामाच्या लोभाने तंट्याला पकडून दिले. खरगोनहून तंट्याला इंदूरला आणण्यात आले.

[irp]

१६ ऑगस्ट १८८९ रोजी तंट्याला न्यायाधीशासमोर उभे करण्यात आले. त्याला ओळखणारे आधीच तेथे बोलावून घेतले होते. तंट्याची ओळख परेड झाली. इंदूरच्या दरबार जेलमध्ये तंट्याला ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याला शिवाजीराव महाराज होळकरांच्या पुढे उभे करण्यात आले. महाराजांसमोर आता धर्मसंकट उभे राहिले. पण ते आता काहीही करू शकत नव्हते. तंट्याचा न्यायाधीशांसमोर जबाब नोंदविण्यात आला. साक्षीपुरावे झाले. त्याला गव्हर्नर जनरलच्या एजंटाच्या ताब्यात देण्यात आले. रेसिडेंट जेलमध्ये ठेवण्यात आले. चीफ कमिशनरांच्या आदेशानुसार त्याला जबलपुर जेलमध्ये सुरक्षिततेसाठी ठेवण्याचे ठरले. त्याला खांडवामार्गे जबलपूरला नेण्यात आले. तेव्हा त्याला पाहण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर प्रचंड जनसमूह जमला होता. जबलपूर स्टेशनवर लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.

पोखर गावावर दरोडा घालणे व गजरीचे नाक कापणे हे दोन आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्याने सरकारने समाधानझाले नाही. म्हणून त्याच्यावर भुईफळला दरोडा घालणे व हिंमत पाटलाचा खून करणे हे दोन आरोप पुन्हा ठेवण्यात येऊन फाशीची शिक्षा दिली गेली. गेल्या १०/११ वर्षात तंट्याने एकही खून केला नव्हता. हिंमत पाटलाचा खून बिजनियाने केला होता. त्याबद्दल त्याला फांशी दिली होती. हिंमत पाटलाचा खून कर असेही त्याने बिजनियाला सांगितले नव्हते. खून एकाने केला. त्याला फाशी दिले गेले, मग त्या खूनाबद्दल तंट्याला फाशी देणे बेकायदेशीर आहे, असे नामवंतानी एक अर्ज करून वरिष्ठांना कळविले. तो अर्ज फेटाळण्यात आला. फांशीची शिक्षा कायम झाली. तंट्याला ४ डिसेंबर १८८९ रोजी फांशी देण्यात आली. हजारो गोरगरीबांचा हा आदिवासी रक्षणकर्ता क्रांतिकारक या जगातून गेला सगळ्या प्रदेशात सुतकाची छाया पसरली.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!