Home Study Material ठाकूर दौलत सिंह

ठाकूर दौलत सिंह

१८५७ मध्ये माळव्यात इंग्रजांविरूद्ध जो उठाव झाला, त्यात देवास जिल्ह्यातील राधोगडचे महाराणा ठाकूर दौलत सिंह यांचा सिंहाचा वाटा होता. माळव्यातील उठावाचे ते प्रमुख नेते होते. राधोगड हे स्थान इंदूर-नेमावर मार्गावर इंदूरपासून २२ मैल अंतरावर आहे. राधोगडच्या क्षत्रिय वंशातील या राज घराण्याचा त्या प्रदेशात सामाजिक दृष्टीने फार मोठा मान होता. राधोगडचा राज्यकारभार हाती आल्यावर ठाकूर दौलत सिंहांनी आपल्या संस्थानाची सुधारणा करण्यासाठी व आपली शक्ती वाढविण्यासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले. त्यांनी आपल्या सैन्यात नव्याने भरती करून राधोगडला त्या सैन्याच्या प्रशिक्षणाचे केंद्र बनविले. त्या फौजेत हिंदू व मुसलमान शेतकऱ्यांची विशेषतः तरुणांची संख्या जास्त होती. सैन्यासाठी चांगले घोडे खरेदी केले; तसेच उत्तम शस्त्रेही जमविली. मुसलमानांसाठी त्यांनी एक मशीदही बांधली. त्यांच्या संस्थानात २० गावे होती व संस्थानचे उत्पन्न दरवर्षी ९ लाख रुपये होते.

नानासाहेब पेशव्यांकडून त्यांना इंग्रजांविरूद्ध उठाव करण्यासंबंधी पत्र मिळाले होते. राधोगडच्या गढीत ठाकूर दौलत सिंह आपल्या सहकाऱ्यांसमवेत उठावासंबंधात विचार-विनियम करू लागले. वाढीव सैन्यामुळे खर्चही वाढला. त्यांना पैशांची कमतरता भासू लागली. काय करावे, असा मोठा प्रश्न उभा राहिला. शेजारचा सतवास किल्ला ऐतिहासिक व सामाजिकदृष्टीने महत्त्वाचा होता. त्यात मोठा खजिनाही होता. दौलत सिंहांनी सतवास किल्ल्यावर हल्ला करून त्यातला खजिना ताब्यात घेतला व आपली आर्थिक परिस्थिती सुधारली. इंग्रज अधिकाऱ्यांच्या दृष्टीने सतवास किल्ल्याचे विशेष महत्त्व होते. कारण काही काळापूर्वी हा मजबूत किल्ला चित्तू पेंढाऱ्याचे मुख्य केंद्र म्हणून गणला जात होता. या किल्ल्यावरील दौलत सिंहांच्या विजयामुळे ग्वाल्हेरचे शिंदे व इंदूरचे होळकर सावध झाले. ते दौलत सिंहाविषयी नाराज झाले. एवढेच नव्हे, तर इंग्रज सेनाधिकारीसुद्धा संतप्त झाले. परंतु दौलतसिंहांनी या सर्वांची पर्वा केली नाही. ते उत्तरेकडे स्वातंत्र्ययुद्ध केव्हा सुरू होते, याची प्रतीक्षा करू लागले.

[irp]

१ जुलै १८५७ रोजी होळकर संस्थानचा प्रमुख गोलंदाज सआदत खाँ व त्याचा सहकारी भगीरथ बारगीर यांनी आपल्या सैन्यासह इंदूर रेसिडेन्सीवर हल्ला केला. त्याच दिवशी इंग्रजांच्या महू छावणीतील देशी पलटणीनेहीइंग्रजांविरुद्ध शस्त्र उगारले. क्रांतीच्या ज्वाला मध्य भारतात पसरू लागल्या. ठाकूर दौलत सिंह यांचीच वाट बघत होता. इंदूरचा रेसिडेंट कर्नल डुरेण्ड २०० घोडेस्वार व ३०० भिल्ल सैनिक घेऊनसिहोरकडे पळाला. सिहोरला राधोगडमार्गे जाता येत होते. डुरेण्ड राधोगडच्या परिसरात येताच दौलत सिंहाने आपल्या सैनिकांसह त्याच्यावर वेगाने हल्ला केला. तुंबळयुद्ध झाले. काही सैनिक मारले गेले. परंतु डुरेण्ड जीव घेऊन पळून गेला.

___इंग्रजांनी ठिकठिकाणाहून कुमक मागवून घेऊन मोठ्या सैन्यानिशी राधोगडवर अचानक हल्ला केला. त्यांच्याबरोबर मोठ्या तोफा होत्या. त्या तोफांच्या गोळ्यांच्या माऱ्याने राधोगडचा तट ढासळला, तेव्हा दौलतसिंहांनी आपल्या सर्व शक्तिनिशी इंग्रज सैन्याचा सामना केला. पण इंग्रजांच्या प्रचंड शक्तीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. दौलत सिंहाचे अनेक सैनिक या युद्धात कामी आले. अखेर ते उरलेल्या सैन्यासह राधोगड सोडून निघून गेले, आणि इंदूर जिल्ह्यातील आकिया गावच्या पटेलांच्या वाड्यात त्यांनी आश्रय घेतला. त्यांना स्थानिक जनतेचा पाठिंबा होता. गढी अम्बापाणीच्या आदिल मुहम्मद खाँ या क्रांतिकारी नेत्याचा तसेच तात्या टोपे, रावसाहेब पेशवे आणि शाहजादा फिरोजशाह यांच्याशीही त्यांचा संपर्क होता. देवासच्या नागरिकांनी त्यांना २५ हजार रुपयांची मदत स्वातंत्र्ययुद्धासाठी दिली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. इंदूरचा रेसिडेंट डुरेण्टने दौलतसिंहांना पकडण्यासाठी अनेक जहागीरदारांना व संस्थानिकांना पत्रे लिहून कळविले. इंग्रजांच्या दबावामुळे देवासच्या संस्थानिकाने त्यांना पकडण्यासाठी २ हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. अखेर ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या सैनिकांनी त्यांना धोका देऊन पकडले. डुरेण्डने त्यांना गुणा छावणीत फासावर लटकावले. राधोगडचे राज्य ग्वाल्हेर संस्थानात व देवास संस्थानात विलीन करून टाकले. आपली शक्ती थोडीशी असूनही हा स्वातंत्र्यवीर आपल्याच लोकांकडून पकडला गेला व फाशी गेला, हे आपल्या देशाला लांछनच म्हणावे लागेल.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!