Home Study Material ठाकुर परगन सिंह

ठाकुर परगन सिंह

१८५७ चे युद्ध १० मे १८५७ रोजी उत्तरप्रदेशातील मेरठ येथे सुरु झाले. त्याचे लोण बिहारमध्ये पाटण्यापर्यंत पसरले. ३ जुलै १८५७ रोजी पाटणा येथील देशी पलटणी इंग्रजांविरुद्ध बंड करुन उठल्या. दानापूरच्या छावणीतील देशी पलटणी त्यांचे नेते हरकिसनसिंह व रणदलनसिंह यांच्या नेतृत्वाखाली बंडास सज्ज झाल्या. त्यांना जगदीशपूरचे ८० वर्षे वयाचे राजपूत जहागीरदार कुँवरसिंह या महापराक्रमीवीराचे नेतृत्व लाभले. कुँवरसिंहाने सारा बिहारप्रांत इंग्रजांविरुद्ध पेटविला. गनिमी काव्याने इंग्रजांच्या फौजांना हुलकावण्या देत त्यांनी इंग्रजांना सळोकीपळो करुन सोडले. इंग्रजांच्या पलटणी त्यांचा पाठलाग करु लागल्या. कुँवरसिंह कधी पाटण्याकडे, तर कधी सासारामकडे, कधी रेवा संस्थानात, तर कधी जबलपूरात, तर कधी काल्पीकडे, कधी आयकडे, तर कधी आजमगडकडे भयंकर वेगाने आपल्या सैन्यासह इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवत होते.
कुँवरसिंह जेव्हा आजमगडकडे आले, तेव्हा आजमगडजवळील हीरापट्टी गावाचे ठाकुर परगनसिंह यांनी त्यांना फार मोठे सहकार्य दिले. परगनसिंह अतिशय धाडसी, पराक्रमी व स्वातंत्र्यप्रेमी होते. इंग्रजांच्या निरंकुश, शोषक आणि अत्याचारी प्रशासनाविषयी त्यांच्या मनात तीव्र असंतोष होता. इंग्रजांचे राज्य आपल्या देशातून कधी नष्ट होईल, हाच विचार त्यांच्या मनात सतत घोंगावत होता. हीरापट्टीगाव त्या काळात विद्रोही सैनिकांचे व विद्रोही जनतेचे केंद्र बनला होता. आजमगड ताब्यात घेऊन तेथे स्वतंत्र सरकार स्थापन करण्यासाठी हीरापट्टीतले तरुण अधीर झाले होते. ठाकुर परगनसिंहानी विद्रोही तरुणांचे मोठे संघटन केले होते. आजमगडच्या परिसरातील गांवातल्या तरुणांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास उद्युक्त केले व त्याभागांत इंग्रज सैन्याशी अनेक ठिकाणी सामना देऊन बाबू कुँवरसिंहांना मदत केली.

[irp]

२१ मार्च १८५८ रोजी कर्नल मिलमॅनने आपल्या सैन्यासह परगनसिंहाच्या विद्रोही सैनिकांवर आक्रमण केले. तेव्हा परगनसिंहांनी त्याचा जबरदस्त पराभव केला व त्याच्या कित्येक सैनिकांना ठार केले. त्याचे युद्धसाहित्यही हस्तगत केले. परगनसिंहांनी चिरैयाकोट, सदर, सगडी, फुलपूर आदी गावांत विद्रोहाची आग भडकविली. त्यांनी फुलपूर तहसीलवर आणि महाराजगंज ठाण्यावर ताबा मिळविला. कोइलसाही जिंकले. फैजाबादचा पूर्वेकडील भाग त्यांच्या संघर्षाचे क्षेत्र बनला होता.
इंग्रज सरकारने परगनसिंहांना पकडून देणाऱ्यास मोठे इनाम जाहीर केले. परंतु ते कधीही इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. २६ मे १८५८ रोजी बाबू कुँवरसिंहांचे निधनझाले. त्यानंतर इंग्रजांनी आजमगडवर ताबा मिळविला. परगनसिंहांचे हीरापट्टी गाव लुटून सर्व घरांना आगी लावून दिल्या. तेव्हा हीरापट्टी गावातील बहुसंख्य कुटुंबे गोरखपूर जिल्ह्यात निघून गेली. हीरापट्टी गावातील विणकर व कलाल बनारसकडे निघून गेले. १ नोव्हेंबर १८५८ रोजी व्हिक्टोरिया राणीचा माफीचा जाहीरनामा सर्वत्र जाहीर झाला. त्यानंतर हिरापट्टीतून निघून गेलेल्या लोकांपैकी काही लोक ५/६ वर्षांनी आपल्या गावात परत आले. इंग्रजांनी विद्रोही सैनिकांच्या जमिनी लिलावात विकून टाकल्या अखेर निराश होऊन ठाकूर परगनसिंह नेपाळात निघून गेले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!