Home Study Material टिकेंद्रजित सिंह

टिकेंद्रजित सिंह

भारताच्या पूर्व सीमेवर नागालँड व मणिपूर ही दोन पहाडी राज्ये आहे. या दोन्ही राज्यांत दीर्घकालापासून हाडवैर होते. त्यांच्यात सतत लढाया होत असत. कधी नागा विजयी होत असत, तर कधी मणिपूर विजयी व्हायचे. मणिपूरचा राजा गंभीरसिंह हा कंपनी सरकारचा मित्र होता. ब्रम्हदेशाच्या युद्धात त्याने कंपनी सरकारला चांगले साहाय्य केले होते. त्याचे निधन सन १८३४ मध्ये झाले. त्यानंतर त्याचा मोठा मुलगा चंद्रकीर्तिसिंह मणिपूरच्या गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत कंपनी सरकारने आपला रेसिडेंट मणिपूरला ठेवला. चंद्रकीर्ति सिंहाने आठ विवाह केले होते. त्याने आपला मोठा मुलगा शूरचंद्र याला आपल्या उतारवयातच मणिपूरच्या गादीवर बसविले होते. तसेच आपल्या बाकीच्या मुलांनाही सन्माननीय पदे दिली होती.

टिकेंद्रजित सिंह हा चंद्रकीर्ति सिंहाच्या तिसऱ्या राणीचा मुलगा. लहानपणापासूनच थोडासा धाडसी व निडर होता. जसजसे त्याचे वय वाढत गेले तसतसे त्याच्या अंगचे गुण प्रकट होऊ लागले. रणविद्येत, घोडेस्वारीत व राजनीतीत तो निपुण झाला. शिकार करणे हा त्याचा आवडता छंद होता. अनेक वाघांना त्याने समोरासमोर तलवारीने वा भाल्याने ठार केले होते व त्या वाघांपासून आपल्या खेडोपाडीच्या जनतेचे रक्षण केले होते. त्यामुळे त्याची कीर्ती साऱ्या मणिपूर राज्यात पसरली होती. मणिपुरी जनतेच्या मनात त्याच्याविषयी फार आदर होता.
कंपनी सरकारला पूर्वेकडून चिनी सैन्याच्या आक्रमणाची भीती वाटत होती. त्यासाठी त्यांना हिंदुस्थानची पूर्वसीमा सुरक्षित करायची होती. कंपनी सरकारला पूर्व सीमेवरील गारो, खाशी, नागा व मणिपूरच्या डोंगराळ प्रदेशातून आपल्या सैन्याच्या दळणवळणासाठी रस्ते बांधायचे होते. त्यासाठी ही पूर्व सीमेवरील राज्ये आणि त्यापलीकडील ब्रम्हदेशही कंपनी सरकारला आपल्या ताब्यात घ्यायचा होता.

कंपनी सरकारने आधी नागा राज्यावर सन १८७८ मध्ये चढाई केली. त्यासाठी मणिपूरच्या राजाने सहाय्य करावे, असे कंपनी सरकारने आपल्या रेसिडेंटमार्फत चंद्रकीर्तिसिंहाला कळविले. तेव्हा टिकेंद्रजित सिंहाने आल्या सैन्यासह त्या लढाईत भाग घेऊन इंग्रजांच्या सैन्याला चांगली मदत केली. त्याने नागा सैन्याची धूळधाण उडवून दिली. इंग्रज सरकारने त्याच्या पराक्रमावर खुश होऊन टिकेन्द्रजित सिंहाला समारंभपूर्वक सुवर्णपदक प्रदान केले आणि त्याच्या सैनिकांनाही बक्षिसे दिली.

सन १८८५ मध्ये कंपनी सरकारने ब्रम्हदेशावर चढाई केली. त्या युद्धातही टिकेंद्रजित सिंहाने इंग्रज सरकारला बहुमोल मदत केली. त्या युद्धात ब्रम्हदेशाचा राजा थिबा याचा पूर्णपणे पराभव झाला. इंग्रज सरकारने त्याला हद्दपारीची शिक्षा देऊन महराष्ट्रात रत्नागिरी येथे नजर कैदेत ठेवले. त्याला राहण्यासाठी त्याच्या खजिन्यातून पैसा खर्च करून रत्नागिराला एक महाल बांधून दिला. ब्रम्हदेशच्या युद्धात टिकेंद्रजित सिंहाने मोठा पराक्रम गाजविला. त्यात अनेक इंग्रजांचे प्राण वाचविले. टिकेंद्रजित सिंहाच्या मदतीविना इंग्रजांना ब्रम्हदेश जिंकताच आला नसता.
सन १८८६ मध्ये नागा लोकांनी मणिपूरवर हल्ला केला. तेव्हा टिकेन्द्रजित सिंहाने त्या युद्धासाठी इंग्रज सरकारकडे मदत मागितली. पण इंग्रज सरकारने मदत दिली नाही. टिकेंद्रजित सिंहाने आपल्या बाहुबलावरच नागांचा पराभव केला. त्याचे हे शौर्य पाहून राजा शूरचंद्राने त्याला सेनापतीपद दिले.

मणिपूरच्या राज्यात नंतरच्या काळात गृहकलह माजला. राजा शूरचंद्राच्या दोन सावत्र भावांनी त्याच्या महालात एका मध्यरात्री प्रवेश केला. तेव्हा शूरचंद्र खिडकीतून पळाला व त्याने रेसिडेंट ग्रिमउडचा आश्रय घेतला. रेसिडेन्सीत ग्रिमउडने त्याचे सांत्वन करून त्याला संरक्षण दिले. टिकेन्द्रजित सिंहाने मोठ्या कौशल्याने तो गृहकलह मिटविला आणि शस्त्रागार, दारूगोळा व खजिना आपल्या ताब्यात घेतला.

ग्रिमउडने शूरचंद्राच्या मनात भरविले की, या गृहकलहात टिकेंद्रजित सिंहाचाच हात आहे. ते ऐकून शूरचंद्र हताश झाला व आसामचा चीफ कमिशनर क्विंटन याला भेटावयास गेला. पण क्विंटनची व त्याची भेट झाली नाही. शेवटी शूरचंद्र कलकत्त्याला गव्हर्नरला भेटण्यासाठी निघून गेला. गृहकलह सुरू झाल्यानंतर टिकेन्द्रजित सिंहाचा एक सावत्रभाऊ कुलचंद्र हा त्या रात्री मणिपूरपासून चार कोसावरील एका गावी पळून गेला होता. टिकेन्द्रजित सिंहाने त्याला मणिपूरला आणले व शूरचंद्राच्या राजगादीवर बसवले. टिकेन्द्रजित सिंह आणि त्याच्या बाकीच्या भावांनी कुलचंद्राच्या आधीन राहून राज्यकारभार सुरू केला. परंतु आसामचा चीफ कमिशनर क्विंटन याने रेसिडेंट ग्रिमउडला कळविले की, ‘कुलचंद्राला मणिपूरचा राजा म्हणून मानण्यासाठी सरकारची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.’

इंग्रजांनी आता आपले असली रूप दाखवायला सुरूवातकेली. शूरचंद्रापेक्षा कमकुवत मनाचा कुलचंद्र यालाच मणिपूरच्या गादीवर ठेवावे आणि त्याच्याकडून आपल्याला हितावह अशा अटी मान्य करून घ्याव्या, असे व्हाईसराय लॅन्सडाऊन याने आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले. आसामचा कमिशनर क्विंटनने त्या अटींचा मसुदारेसिडेंट ग्रिमवुडकडे पाठविल्या. त्या अटी अशा

१. महाराज कुलचंद्रांनी इंग्रज सरकारची ३०० सैनिकांची फौज मणिपूरला ठेवावी व तिचा सर्व खर्च

त्यांनी द्यावा. २. महाराज कुलचंद्रांनी आसामचे पोलिटिकल एजंट यांच्या साह्याने राज्यकारभार करावा. ३. महाराज कुलचंद्रांनी टिकेंद्रजित सिंहाला सेनापतीपदावरून काढून टाकून त्याला हद्दपार करावे.
२१ मार्च १८९१ रोजी इंग्रज सरकाने महाराज शूरचंद्रांना कळविले की, ‘तुम्हांला मणिपूरची गादी मिळणार नाही. त्या ऐवजी सरकारकडून तुम्हाला पेन्शन मिळेल. शूरचंद्राला त्यावरच समाधान मानावे लागले. इंग्रज सरकारने रेसिडेंट ग्रिमवुड याला गुप्त सूचना दिली की, ‘कसेही करून टिकेंद्रजित सिंहाला कैद करावे. ही तर शुद्ध हरामखोरी होती. ज्या शूरचंद्राच्या सल्ल्यानुसार टिकेंद्रजित सिंहाने नागा-युद्धात व ब्रम्हदेशाच्या युद्धात इंग्रज सरकारला बहुमोल साहाय्य करून ते प्रदेश जिंकण्यास मदत केली होती, त्या शूरचंद्राला मणिपूरच्या गादीपासून वंचित ठेवायचे व टिकेंद्र सिंहाकडून सेनापती पद काढून घेऊन निर्वासित करायचे ही हरामखोरी नव्हे का? इंग्रज सरकारचा अंतस्थ हेतू असा होता की, टिकेंद्रजित सिंहासारखा शूर व पराक्रमी लढवय्या मणिपुरात असला, तर ते राज्य आपणांस मुळीच बळकवता येणार नाही. हे टिकेंद्रजित सिंहाच्या चाणाक्ष नजरेतून सुटणेच शक्य नव्हते. म्हणून टिकेंद्रजित सिंहाला अटक करायचे रेसिडेंट ग्रिमवुडने ठरविले.

पोलिटिकल एजंट क्विंटनने मणिपूरला दरबार भरविला. त्यात टिकेन्द्रजित सिंह आजाराचे कारण दाखवून उपस्थित राहिला नाही. क्विंटनचा हेतू हा दरबार भरविण्यामागे काय आहे. हे तो जाणून होता. नंतर रेसिडेन्सीत नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करून टिकेंद्रजित सिंहाला आमंत्रण देण्यात आले. तेव्हाही टिकेंद्रजित सिंह आजाराचे कारण दाखवून गेला नाही. नंतर रेसिडेंट ग्रिमवूड टिकेंद्रजितसिंहालाभेटण्यासाठी त्याच्या महालाकडे आला ते कळताच टिकेंद्रजितसिंह पालखीत बसून महालाबाहेर आला. ग्रिमवूड त्याला म्हणाला,

‘तुम्हाला मणिपूर सोडून हिंदुस्थानात कोठेही जावे लागेल. सरकार तुम्हाला पेन्शन देईल.’ त्यावर टिकेंद्रजित सिंहाने स्पष्टपणे त्याला सांगितले,

_ ‘त्याची तुम्हाला काळजी करण्याचे कारण काय? आमच्या या छोट्याशा राज्याच्या कक्षेतील बाबीसाठी आपण एवढा शीण का घेत आहात?

मी जर या राज्यात काही आपराध केला असेल, तर महाराज मला जी काही शिक्षा देतील, ते मी आनंदाने भोगीन. तुमचे सरकार आमच्या मामल्यात हस्तक्षेप करण्यासाठी एवढी उतावीळ का झाले आहे, याचे कारण तुम्ही मला सांगा.’

“सरकार तुम्ही या राज्यातून बाहेर जाण्यातच या राज्याचे कल्याण आहे, असे समजते.”

“तुमचे सरकार एवढा त्रास का घेत आहे? मी कोणता अपराध केलेला आहे, हे आधी मला सांगा.”

“सेनापती, आपण माझे पूर्वीपासूनचे मित्र आहात. तुम्ही उदार मनाचे आहात. मणिपूर राज्यातली जनता तुम्हांला आदरणीय मानते. तुमच्यावर जनतेची अपार श्रद्धा आहे, हे मला पूर्ण माहीत आहे.”

“अस्सं! म्हणूनच तुम्ही मला या अपराधांसाठी माझ्या राज्यातून बाहेर घालवून देण्यासाठी एवढे उतावीळ झाला आहात ना?”

“तसे नाही. सरकार यासंबंधी जरूर विचार करील.”

“अस्सं! मी सारे जाणून आहे. आणखी आपणांस काही सांगायचे आहे काय?”

“मी आपणांस माझा परम मित्र समजून आपणांस सल्ला देतो की, आपण माझ्या बरोबर रेसिडेन्सीत येऊन क्विंटन साहेबांची भेट घ्यावी.”

“नाही. यावेळी माझी तब्येत ठीक नाही. म्हणून मी येऊ शकत नाही. तब्येत दुरूस्त झाल्यावर मी त्यांना भेटेन.”

ग्रिमवूड निराश होऊन रेसिडेन्सीत निघून गेला.

टिकेंद्रजित सिंहाने सावध होऊन आपल्या महालाच्या व आसपासच्या भागाच्या संरक्षणाची व्यवस्था केली. महालाभोवती व महत्वाच्या ठिकाणी सशस्त्र सैनिक तैनात केले. सैनिकांना पुढच्या संकटाची कल्पना देऊन त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तिकडे रेसिडेन्सीतील इंग्रज अधिकाऱ्यांनी ठरविले की “आजच टिकेंद्रजितसिंहाला कसेही करुन पकडायचेच.” त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर क्विंटन, कॅप्टन बूचर आदी काही इंग्रज अधिकारी आपले सैन्य घेऊन टिकेन्द्रजितसिंहाच्या महालावर चालून आले. बूचर महालाच्याभिंतीला शिड्या लावून काही सैनिकांसह महालाच्या आवारात उतरला. महालाच्या सगळ्या खोल्यांत त्याने टिकेंद्रजितसिंहाचा शोध घेतला. पण महालात कोणीही नव्हते. टिकेंद्रजितसिंह अंधार पडल्यावर सहकुटुंब सुरक्षित ठिकाणी निघून गेला होता. इंग्रजांचे सैन्य चालून आलेले पाहून मणिपूरी सैन्याने त्याच्यावर हल्ला केला. मणिपूरी जनताही आपापली शस्त्रे घेऊन धावून आली. घनघोर युद्ध झाले. त्यात कित्येक इंग्रज सैनिकांचे मुडदे पडले. टिकेंद्रजितसिंहाला कैद करण्यासाठी जे इंग्रज आले होते, त्यांनाच आता आपला जीव कसा वाचवावा याची काळजी वाटू लागली.

रेसिडेन्सीवरही मणिपुरी सैन्याने व जनतेने हल्ला केला. चहुबाजूंनी गोळीबार होत होता. टेलिग्राफचे तार त्यांनी तोडून टाकले. इंग्रज अधिकारी आता विचार करू लागले की, “सगळी भानगड तर आपणच निर्माण केली आहे. तेव्हा ही लढाई बंद करणेच आपल्याला हितावह होईल.” म्हणून त्यांनी युद्धबंदीचा बिगुल वाजविला. तो आवाज ऐकल्यावर टिकेंद्रजितसिंहाने आपल्या सैनिकांना युद्ध बंद करण्याचा आदेश पाठविला. लढाई बंद झाली. मणिपूरवाल्यांच्या या व्यवहाराची प्रशंसा इंग्रजांच्या सैन्यातील गुरखे सैनिक उघडपणे करू लागले.

[irp]

क्विंटनने महाराज कुलचंद्र यांना एकपत्र पाठविले. “तुम्ही कोणत्या अटीवर आमच्या रेसिडेन्सीवर होणारा गोळीबार बंद करू शकाल?” तो, ग्रिमवूड, कर्नल स्कीन यापुढे काय करायचे याचा विचार करीत बसले असतांना कुलचंद्रांचे पत्र घेऊन एक शिपाई रेसिडेन्सीत आला. कुलचंद्राने लिहिले होते की, “तुमच्याशी लढाई, झगडा करण्याची आमची किंचितही इच्छा नाही. तुम्हीच आधी आमच्यावर आक्रमण केले. तुम्ही जर पूर्णपणे शस्त्र-त्याग केला, तरच आम्ही संधी करण्यास तयार असू.”क्विंटनने त्या शिपायाला विचारले,“या वेळी सेनापती टिकेंद्रजितसिंह भेटू शकतील?” शिपाई उत्तरला, “हो, जरूर भेटू शकतील.” त्याच्या उत्तराने क्विंटनच्या आशा पल्लवित झाल्या. रात्री साडे आठ वाजता क्विंटन, ग्रिमवूड, कर्नल स्कीन, सिम्पसन, कझिन्स व एक बिगुलची राजाकडे आले. टिकेंद्रजितसिंह ही तेथेच होता. तो म्हणाला, “तुमच्या व्यवहाराने आम्ही भ्यालो आहोत. तुम्ही जर तुमच्या शस्त्रांचा पूर्णपणे त्याग केला नाही, तर तुमच्या बोलण्यावर आम्ही मुळीच विश्वास ठेवणार नाही.” टिकेंद्रजितसिंहाची ही अट त्या इंग्रज अधिकाऱ्यांना अपमानास्पद वाटली व ते दरबारातून बाहेर पडले. “यांना बाहेर पोचवून या.” असे टिकेंद्रजितसिंहाने आपला भाऊ अंगेय भिंगवोला सांगितले व तो आपल्या महालात निघून गेला.

इंग्रज अधिकारी दरबारातून बाहेर आले, तेव्हा अचानक अनेक सशस्त्र मणिपुरी सैनिक व जनताही आपली शस्त्रे घेऊन गर्दी करून उभी होती. इंग्रजांवर संतापलेल्या एका मणिपुरी शिपायाने आपली तलवार उपसून लेफ्टनंट सिम्पसनवर वार केला. एका शिपायाने ग्रिमवूडला लक्ष्य करून त्याच्या अंगावर असा भाला मारला की, तो भाला त्याची छाती छेदून गेला. ग्रिमवूड तात्काळ कोसळून मरण पावला. जनताही भयंकर खवळून उठली. तेव्हा एका मणिपुरी जमादाराने उरलेल्या पाच इंग्रज अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे एका खोलीत बंद केले ही आरडाओरड ऐकताच टिकेंद्रजितसिंह लगेच तेथे आले व त्यांनी अंगेय मंगतो याला त्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यास सांगून ते निघून गेले. मणिपूरचे माजी सेनापती त्यानंतर तेथे आले. इंग्रजांच्या कारवायांमुळे ते आधीच संतप्त झाले होते. त्यांनी त्या खोलीचे रक्षण करणाऱ्या आपल्या शिपायांना आज्ञा केली की, “त्या पाचही हरामखोरांना बाहेर काढा व त्यांची कत्तल करा.” त्या शिपायांनी पोलिटिकल एजंट क्विंटनसह सर्व इंग्रज अधिकाऱ्यांची मुंडकी उडविली व त्यांना एका खड्ड्यात गाडून टाकले.

[irp]

रात्री एक वाजला, तरी आपले अधिकारी दरबारातून रेसिडेन्सीत परत आले नाहीत, हे पाहून रेसिडेन्सीतले सारे इंग्रज स्त्री-पुरूष घाबरले. उन्मत जनतेचा आरडाओरडा ऐकल्यावर त्यांना आपल्या प्राणांची भिती वाटू लागली व ती सगळी इंग्रज मंडळी गुरखा शिपायांसह रात्रीच त्या डोंगराळ जंगलातून मणिपूर राज्यातून बाहेर जाण्यासाठी निघाली, काही दिवस अन्नावाचून त्या जंगलातून चालत होते. वाटेतच अनेक इंग्रज स्त्री-पुरूष व मुले आणि गुरखे तहान-भुकेने मरण पावले. पुढे गेल्यानंतर इंग्रज सैन्य येतांना दिसले व त्यांच्या जीवत जीव आला. इंग्रज सरकारला मणिपूरची हकीकत समजल्यानंतर तीन बाजूंनी मोठमोठे सैन्य मणिपूरवर हल्ला करण्यासाठी पाठविण्यात आले. याची कल्पना टिकेंद्रजितसिंहला होतीच.म्हणून तो, राजा कुलचंद्र व थंगाल हे सारे आपल्या कुटुंबासह एका सुरक्षित गावी निघून गेले होते. इंग्रज सैन्याने मणिपुरात प्रवेश केला, तेव्हा या नगरीत फक्त १०/१५ लोकच होते. सगळे महाल मोकळे होते. त्या महालात इंग्रज सेनाधिकारी राहू लागले. त्यांनी टिकेंद्रजित सिंह, कुलचंद्र व थंगाल यांचा तपास चालविला. त्या तिघांना पकडून देणाऱ्यास हजारो रूपये बक्षीस म्हणून दिले जातील, असे जाहीर केले.

___आपल्या देशात पैशाचे लोभी फितुर व सत्ता लोभी निमक-हराम यांची कमी नाही. आपल्या इतिहासात अनेक प्रसंगी असे दिसून आले आहे. मणिपूर राज्यातील काही फितुरांनी टिकेंद्रजित सिंह, कुलचंद्र व थंगाल हे तिघे कोणत्या गावात आहेत, हे त्या इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी मोठे सैन्य त्या गावी पाठवून टिकेंद्रजित सिंह, कुलचंद्र व थंगाल यांना अटक केली. सन १८९१ मध्ये त्यांच्यावर दावा लावला. त्या तिघांना फांशीची शिक्षा देण्यात आली. अंगेय मंगतो याला मणिपूरमधून निर्वासित केले. त्याबरोबर मणिपुरी जनता गुलामीत अडकली, ती कायमचीच. इंग्रजांचा हेतू पूर्ण झाला. राजा कुलचंद्र, टिकेंद्रजित सिंह व माजी सेनापती थंगाल यांना फाशी देण्यात आले. मणिपूरचे उदाहरण हे इंग्रजांच्या कुटिल कारवायांचे व गुंडगिरीचे एक दुर्दैवी दर्शन आहे, यात शंकाच नाही. टिकेंद्रजित सिंहाची विधवा पत्नी कशी तरी मथुरा-वृंदावनला पोचली व दारिद्र्यात आपले उर्वरित आयुष्य व्यथित मनाने घालवू लागली. उतारवयात ती आंधळी झाली. तेव्हा तिचे किती हाल झाले असतील व तिचा अंत कसा झाला असेल, हे सांगता येत नाही. या देशातला एकही सतीचा लाल तिच्या मदतीसाठी पुढे आला नाही, हे आपल्या देशास लांच्छनास्पद नव्हे काय?

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!