जर्मन भाषेत करिअर

56

जर्मन भाषेत करिअर :जागतिकीकरणानंतर अनेक देशांतील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करायला, त्यांचे प्रकल्प इथे आणायला सुरुवात केली. त्यामुळे भारतीय तरुणांना देशात राहून परदेशी कंपनीत नोकरीची संधी मिळाली. आता तर संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा सातत्याने वाढत आहे. जागतिक पातळीवर बदलत्या परिभाषेत देशा-देशांतील अंतरही कमी होते आहे. त्यामुळे देश-परदेशात नोकरीच्या संधी वाढताहेत. परदेशी कंपन्या इथे येतात किंवा आपले लोक तिथे जातात तेव्हा भाषा हे संवादाचे प्रमुख माध्यम असते. हीच भाषा आता रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देते आहे. कारण ज्या परदेशाबरोबर आपण व्यापार करणार, त्यांची भाषा आपल्याला अवगत होणे गरजेचे आहे. भारतात परदेशी भाषा अवगत असणार्‍या व्यक्तींना रोजगाराच्या अनेक संधी मिळत आहेत. भारत हा मोठा उपभोक्ता देश आहे. इथे व्यापार आणि पर्यटन या दोन्हीच्या भरपूर संधी आहेत. विविध देशांतील लोक भारतात येत-जात असतात. परदेशी, कॉर्पोरेट पण बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात वेगाने आपला विस्तार करत आहेत. त्यामुळे तरुण वर्गाला परदेशी भाषेचे ज्ञान असेल त्यांचे करिअर वेगाने पुढे जाऊ शकते.

जर्मन भाषाही अशीच एक महत्त्वाची भाषा आहे. अनेक जर्मन कंपन्या भारतात येत आहेत. त्यामुळे जर्मन जाणणार्‍या तरुणाईला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. परदेशी भाषा शिक्षणात सध्या जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, जपानी आणि चिनी म्हणजे मँडरीन या भाषांची अधिक चलती आहे. गेल्या काही वर्षांत जर्मनी, जपान, इस्रायल सारख्या देशांशी असलेले भारताचे व्यापारी संबंध वृद्धिंगत होत आहेत. त्यामुळे जर्मन, फ्रेंच सारख्या भाषा जाणणार्‍या लोकांची मागणी वेगाने वाढते आहे. इंग्रजी भाषेनंतर फ्रेंच आणि जर्मन या जगातील सर्वाधिक पसंतीच्या दुसर्‍या क्रमांकाच्या भाषा मानल्या जातात. जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये 10 कोटीहून अधिक लोक जर्मनी ही भाषा बोलतात. जागतिक पातळीवर इतर देशांच्या तुलनेत जर्मनी आणि जपान या देशांनी व्यापार, आयटी क्षेत्र आणि इतर क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळेच या देशांमध्ये बोलली जाणारी किंवा या देशांची भाषा जाणणार्‍या व्यक्तींची मागणी वेगाने वाढते आहे.

इंग्रजीचे ज्ञान गरजेचे : जर्मनी किंवा फ्रेंच ही भाषा शिकण्याची इच्छा असेल तर इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे या दोन्ही भाषा इंग्रजीशी मिळत्याजुळत्या आहेत. अर्थात कोणतीही परदेशी भाषा शिकण्यासाठी इंग्रजीचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहेत. हल्ली जापनीज, रशियन आणि स्पॅनिश भाषा या रोजगाराभिमुख भाषा आहेत, असे मानले जाते. या भाषांच्या तज्ज्ञांची मागणी वाढते आहे. कारण जागतिक व्यापारात प्रगती झाल्यामुळे प्रत्येक देशाला दुसर्‍या देशाबरोबरचा व्यापार वाढवण्याची संधी मिळते आहे.

रोजगाराच्या संधी :  परदेशी भाषा शिकण्याची संधी बहुतांश विद्यापीठांमध्ये आणि खासगी स्तरावरही मिळते. परदेशी भाषा शिकणार्‍यांना कॉर्पोरेट पातळीवरही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे परदेशी भाषा तज्ज्ञांनी सांगितले आहे. कॉर्पोरेट पातळीवर भारत विविध देशांबरोबर वेगाने व्यापार वाढवत आहे. त्यामुळे परदेशी भाषा येणे ही एक नक्कीच रोजगाराभिमुख कौशल्य आहे. वाढत्या व्यापाराच्या संधींमध्ये परदेशी भाषा जाणकारांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. जर्मनी, जपान, चीन आदी देशांतील नागरिकांची समस्या अशी आहे की त्यांना हिंदी भाषा येत नाही, समजत नाही. त्यामुळे या देशांची भाषा जाणणार्‍या जाणकारांना आपल्या देशात प्रथम प्राधान्य दिले जाते. भारतातून किंवा परदेशातून एखादे प्रतिनिधी मंडळ जाते किंवा एकमेकांच्या देशात जातात, तेव्हा त्यांना दुभाषी गरजेचा असतो. त्यामुळे सरकारी किंवा खासगी क्षेत्रातही परदेशी भाषा जाणणार्‍या व्यक्तींना खूप जास्त मागणी आहे. त्या व्यतिरिक्त पर्यटन क्षेत्र, भाषा अ‍ॅकॅडमी, हॉटेल उद्योग या ठिकाणीही परदेशी भाषा जाणकारांना खूप संधी उपलब्ध होऊ शकतात.

अभ्यासक्रम आणि पात्रता : परदेशी भाषा शिक्षणात विविध पातळ्यांवर अभ्यासक्रम चालवले जातात. त्यात प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फ्रेंच, जर्मन, इटालियन, रशियन आदी भाषांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम एक वर्ष मुदतीचा आहे तर पदविका अभ्यासक्रम एक ते दोन वर्षांचा आणि पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. तीनही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना 45 टक्क्यांसह 12 वी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता असते. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी अभ्यासक्रम 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण होण्याची आवश्यकता आहे.

उत्तम वेतन :  परदेशी भाषेचे ज्ञान असणार्‍या विद्यार्थ्यांना मागणी भरपूर आहेच. शिवाय, कार्पोरेट क्षेत्रातील वेतनश्रेणीही उत्तम आहे. परदेशी भाषा जाणकारांना सुरुवातीच्या टप्प्यात 20 ते 30 हजार रुपये वेतन मिळू शकते. अर्थात सरकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात वेतनश्रेणी ही 50-60 हजार रुपये इतकी आहे. त्याव्यतिरिक्त परदेशी भाषा अनुवादक म्हणून स्वतंत्रपणे काम करायचे असेल तर अनुवादाला प्रतिशब्द याप्रमाणे मानधन मिळू शकते.

जर्मनीतील 1600 हून अधिक कंपन्या भारतामध्ये भारतीय भागीदार कंपन्या किंवा सहकारी कंपन्यांमार्फत काम करताहेत. या कंपन्यांमध्ये 3 लाखाहून अधिक लोक कार्यरत आहेत. या कंपन्यांना इंग्रजी आणि जर्मन या दोन्ही भाषेच्या जाणकार लोकांची गरज आहे.

जर्मनीसारखी परदेशी भाषा भारतात राहूनही उत्तम रोजगार संधी तरुणाईला उपलब्ध करून देते आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण, रोजगार यांच्या रूळलेल्या वाटा बाजूला ठेवून परदेशी भाषा शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होऊ शकतो. देशामध्ये इंग्रजी जाणणारा वर्ग कमी नाही, त्यालाच परदेशी भाषा शिक्षणाची जोड दिल्यास विविध आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या रोजगार संधी तरुणांना उपलब्ध होत आहेत आणि उत्तम वेतनाचा किंवा कमाईचा लाभ विद्यार्थ्यांना जरूर घेता येईल

जर्मन भाषेत करिअर


करिअर संबंधी अजून काही पोस्ट 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here