Home Study Material जयनाथसिंह

जयनाथसिंह

रॉबर्ट क्लाईव्ह मे १७६५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नर म्हणून कलकत्त्याला आला. २३ ऑक्टोबर १७६४ रोजी ईस्ट इंडिया कंपनी व अवधचा नबाब शुजाउदौला, बादशहा शाहआलम आणि मीरकासीम यांच्यात बक्सरचे प्रसिद्ध युद्ध झाले. पुन्हा ३ मे १७६५ रोजी कडा येथे निर्णायक युद्ध होऊन बिहार, बंगाल व ओरिसा प्रांतावर कंपनीची अधिसत्ता झाली. १२ ऑगस्ट १७६५ रोजी क्लाईव्ह आणि नबाब यांच्यात तह झाला. त्यानुसार या तिनही प्रांतांच्या महसूल वसुलीचे काम कंपनी सरकारकडे आणि न्याय व्यवस्था व कायद्याची अंमलबजावणी नबबाकडे अशी दुहेरी राज्यव्यवस्था भारताच्या या संपूर्ण पूर्व भागात सुरु झाली. कंपनी सरकारने महसूल वसुलीसाठी ठेकेदार नेमले. जो ठेकेदार कंपनीला जादा महसूल देईल, त्याच्याकडे त्या त्या भागातील वसुलीचा ठेका कंपनी सरकारकडे देऊ लागले.
प्राचीन काळापासून डोंगर दऱ्यांमध्ये व जंगलामध्ये राहणारे कोट्यावधी आदिवासी कोणत्याही राजाचे प्रजाजन नव्हते. त्यांची त्या भागात स्वतंत्र सत्ता होती. त्यांना कोणत्याही राजाला महसूल द्यावा लागत नव्हता. बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांतांच्या संधि प्रदेशात डोंगरदऱ्या व मोठीमोठी जंगले होती. त्या जंगलात चेरो, हो, लखत्र हो, कोल, मुंडा आदि जातींचे आदिवासी मुक्तपणे राहत असत. जास्तीत जास्त महसूल वसुलीसाठी कंपनी सरकार हळुहळू हा डोंगराळ व जंगलाचा प्रदेश आपल्या ताब्यात घेऊ लागले. त्यामुळे या आदिवासी जातींचे स्वातंत्र्य नष्ट झाले या भागातील जमिनी कंपनी सरकारने मैदानी प्रदेशातील धनिक हिंदू व मुसलमानांना ठेक्याने दिल्या. त्यातूनच नवा जमिनदार वर्ग उदयाला आला – या जमिनदारांनी त्या भागातील आदिवासी कडून जास्तीत जास्त महसूल वसुली सुरु केली. कंपनी सरकारने जंगल-कायदा केल्याने जंगलांवर निर्भर राहणाऱ्या आदिवासी जनांत असंतोष धुमसू लागला. त्यांची लहान लहान राज्ये कंपनी सरकार बळकावू लागले. त्यामुळे आदिवसी राजे व आदिवासींचे नेते संघटित होऊन या नव्या जमीनदारा विरुद्ध व कंपनी सरकारच्या अंमलदाराविरुद्ध लढण्यास उभे ठाकले.

बिहारच्या दक्षिण भागात चेरो जमातीचे लहानसे राज्य होते. त्यांचा राजा पलामू किल्ल्यात राहत असे. इंग्रज या भागात शिरण्यापूर्वी पलामूच्या राज्यधिकाराबाबत अस्थिरता निर्माण झालेली होती. पलामूचा राजा जयकृष्ण राय याची हत्त्या जयनाथ सिंहाने आधीच्या राजाचा नातू चित्रजित राय याच्या साह्याने केली व पलामूच्या गादीवर चित्रजित राय याला बसविले. चित्रजित रायने जयनाथ सिंहाला आपला दीवाण नेमले.
जयकृष्ण राय चा नातू गोपाल राय याने पलामूचे राज्य मिळविण्यासाठी पाटणा येथे जाऊन इंग्रजांचे साह्य मागितले. कंपनी सरकारला त्या भागात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली व पाटण्याच्या इंग्रज कमिशरने दीवाण जयनाथ सिंहाला ९ जानेवारी १७७१ रोजी पत्राने कळविले की, पलामूचा किल्ला ताबडबोब कंपनी सरकारच्या ताब्यात द्यावा जर पलामूचा किल्ला कंपनी सरकारकडे सोपविला, तर कंपनी सरकार चित्रजित रायला राजा म्हणून मान्यता देईल? ते पत्र वाचून जयनाथ सिंहांनी दहा दिवसांची मुदत मागून घेतली त्या आधीच २२ डिसेंबर १७७० पासूनच पलामू किल्ल्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु केली होती.

जयनाथ सिंहांनी मागितलेल्या दहा दिवसांच्या मुदती आधीच पाटण्याच्या कमिशनरने कॅप्टन कॅमकला आदेश दिला. “गोपाल रायला घेऊन शक्य तितक्या लवकर पलामूचा किल्ला हस्तगत करावा.”कॅ. कॅमक शिपायांच्या दहा तुकड्या घेऊन पलामूकडे निघाला. त्याच्या मदतीला ले. डंकन शिपायांच्या दोन तुकड्या घेऊन आला. हे सैन्य शेरघाटीला आले, तेंव्हा ते कीटिंग आपल्या पलटणीसह गोपाल रायला घेऊन त्यांना येऊन मिळाला. पाटण्याहून त्यांनी गोपाळ राय साठी शाही पोशाख मागवून घेतला व पलामूच्या रस्त्यावरील कुंडा येथे गोपल रायचा पलामूचा राजा म्हणून राज्यभिषेकही केला.

२८ जानेवारी १७७१ रोजी त्यांनी पलामूच्या किल्ल्याला वेढा दिला. २९ जानेवारी रोजी त्यांनी दीवाण जयनाथ सिंहाला आत्मसमर्पण करण्याचा संदेश पाठविला. किल्ल्यातून त्यांना उत्तर मिळाले, “चेरो सैनिक आपला राजा चित्रजित रायच्या आदेशाशिवाय अन्य कोणाचाही आदेश मानीत नाहीत.”
पलामूचा हा किल्ला नवा होता व त्यात पिण्याचे पाणी पुरेसे नव्हते. म्हणून जयनाथ सिंह आपल्या चेरो सैनिकांसह जवळच्याच जुन्या किल्ल्यात गुप्त मार्गाने निघून गेला. इंग्रजांनी पलामूचा किल्ला हस्तगत केला. तेव्हा त्यांना दिसून आले की, जुना किल्ला नव्या किल्ल्यापेक्षा कमी उंचीवर आहे. नव्या किल्ल्यातून जुन्या किल्ल्यातील सर्व काही स्पष्टपणे दिसत होते. कॅमकला कळून चुकले की, जुना किल्ला मजबूत आहे, पण त्यात सैन्य आपल्या सैन्यापेक्षा फारच कमी आहे. म्हणून त्याने पाटण्याहून मोठी तोफ व दारुगोळा मागवून घेतला. ती तोफ ६ पौंडी होती. ती येईपर्यंत युद्ध सुरु होऊन इंग्रजांचे शंभरावर सैनिक युद्धात मारले गेले होते.

इंग्रज सैन्यासाठी पाटण्याहून रसद येत आहे, हे पाहून चेरो सैनिकांनी रसदी बरोबर येत असलेल्या इंग्रज सैन्याच्या तुकडीवर अचानक हल्ला केला. तेव्हा कॅमकने शिपांयाच्या तुकड्या रसदीच्या संरक्षणार्थ पाठविल्या. चेरो सैनिकांनी त्यांतील कित्येक शिपाई ठार केले. अटीतटीचे युद्ध चालूच होते. इंग्रजांची रसद संपत आली होती. म्हणून कॅ. कॅमकने पाटण्याला दूत पाठवून भरपूर रसद व चांगले प्रशिक्षित सैनिक मागविले.

३ फेब्रुवारीच्या रात्री चेरो सैनिकांच्या एका तुकडीला जयनाथ सिंहांनी दोन वेळा हल्ला करायला पाठविले. ४ फेब्रुवारीला इंग्रजांनची रसद येत आहे. हे जयनाथसिंहांनी किल्ल्यावरुन पाहिले व आपल्या सैनिकांची एक तुकडी ती रसद लुटून आणण्यासाठी पाठविली. चेरो सैनिकांनी इंग्रजांच्या अनेक प्रशिक्षित सैनिकांना मारुन टाकून ती रसद लुटून आणली.

आपली रसद संपत आल्याचे पाहून कॅ. कॅमकने ७ फेब्रुवारी च्या रात्री जुन्या किल्ल्याच्या तटाला शिड्या लावून आपले सैन्य किल्ल्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. पण चेरो सैनिकांच्या सावधगिरीमुळे कॅमकचा तो प्रयत्न फसला. त्याला मागे सरावे लागले. पुन्हा इंग्रज सैन्याच्यासाठी एक बारा पौंडी तोफ, इतर शस्त्रास्त्रे व दीडशे बैलांवर रसद येत आहे, असे पाहिल्यावर जयनाथ सिंहांनी आपल्या सैन्याची एक तुकडी ती रसद लुटून आणण्याकरिता पाठविली. त्या सैनिकांनी अचानक छापा मारुन त्या रसदीबरोबर येणाऱ्या १९ शिपायांना ठार केले.

[irp]

९ मार्च रोजी इंग्रज सैन्याने त्या मोठ्या तोफेने अनेक वेळा किल्ल्या तटबंदीवर गोळाबारी केली. तेव्हा कोठे २१ मार्च रोजी तो किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. पण जयनाथ सिंह व चित्रजितराय यांनी आत्मसमर्पण न करता रामगड किल्ल्याचा आश्रय घेतला. कॅमकने गोपाल राय याला पलामूच्या तख्तावर बसविले.

आपला पराभव झाला, तरी जयनाथ सिंह निराश झाले नाहीत. १७७१ मध्ये पुन्हा रामगडहून येऊन पलामूचा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. तरीही चेरो सैनिक इंग्रज सैन्यावर गनिमी काव्याने हल्ले करीतच राहिले.

एप्रिल १७७२ मध्ये पुन्हा जयनाथ सिंहांनी पलामूवर चढाई केली. तेव्हा ले. टॉमस स्कॉट आपले सैन्य घेऊन उदयपूरला आला. आपल्या ४०० चेरो सैनिकांसह जयनाथ सिंह उदयपूरला पोचले. ले. स्कॉटने त्यांच्यावर हल्ला केला. पण तो पराभूत झाला. त्या हल्ल्यात स्कॉटच्या पायात गोळी शिरली व तो जयनगरला पळून गेला. पेलविन त्या हल्ल्यात ठार झाला. पराभवाची सूचना पाटण्याला गेली. तेव्हा ले. जॉन बॅटमन एक पलटन घेऊन येऊन स्कॉटला येऊन मिळाला. उदयपूरच्या लढाईत इंग्रज सैनिकांनी चेरो सैनिकांचा धसका घेतला होता. त्यामुळे ते सैनिक जयनाथ सिहांच्या सैनिकापुढे आताही टिकू शकले नाहीत व ले. स्कॉट उरल्या सुरल्या सैन्यासह मतातूला पळून गेला. तेवढ्या वेळात जयनाथ सिंहांनी रांका किल्ला जिंकून घेतला.

इंग्रजांनी काही जमीनदारांचे साह्य घेऊन कॅमकला मोठे सैन्य देऊन १७७२ साली जयनाथ सिंहांचा पाडाव करण्यासाठी पाठविले. त्या सैन्याजवळ तोफा व आधुनिक शस्त्रास्त्रे होती. जयनाथ सिंहांनी जाणले की एवढ्या मोठ्या सैन्यापुढे आपल्या चार-पाचशे सैनिकांचा टिकाव लागणे शक्य नाही व आपल्याजवळ तर आपली परंपरागत हत्यारे आहेत. म्हणून सप्टेंबर १७७२ मध्ये त्यांनी विचारपूर्वक माघार घेतली व सरगुजा येथे निघून गेले. त्यानंतर त्यांचे काय झाले, याबद्दल इतिहास मौन आहे. तरीही पलामूच्या प्रदेशात चेरो सैनिकांनी गनिमी काव्याने आपले छापामार युद्ध चालूच ठेवले. जयनाथ सिंहांनी त्यांच्या मनात जी स्वातंत्र्याची धग निर्माण केली होती, ती पुढे कित्येक वर्षे विझू शकली नाही. धन्य ते चेरो वीर व धन्य त्या जयनाथ सिंहांची. या प्रथम भारतीय क्रांतिकारकाला शतशः प्रणाम!


संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!