Home Study Material चिमासाहेब भोसले

चिमासाहेब भोसले

कोल्हापूरचे राजे बुवासाहेब २९ नोव्हेंबर १८३८ रोजी वारले. त्यांना बाबासाहेब उर्फ तिसरे शिवाजी आणि चिमासाहेब हे दोन अल्पवयीन पुत्र त्यावेळी होते. त्याने आपल्या तंत्राने वागणारा रामराव देसाई याला कोल्हापूरचा मुख्य कारभारी नेमले. त्याने त्या इंग्रज एजंटाच्या सल्ल्याप्रमाणे कोल्हापूर राज्य कारभार सुरु केला. तोपर्यंत कोल्हापूर संस्थानातील सर्व किल्ल्यांवर शिबंदी असे. एक प्रमुख गडकरी असे. त्या इंग्रज एजंटाने १८४४ साली सर्व गडांवरील शिबंदी काढून टाकली. संस्थानचे दरबारी त्यामुळे नाराज झाले. लोकांच्या मनात कटुता निर्माण झाली. शिवकालापासून या गडकऱ्यांना किल्ल्यांच्या रखवालीच्या मोबदल्यात किल्ल्यांच्या परिसरातील जमिनी वहिवाटीस मिळाल्या होत्या. किल्ल्यांवरील शिबंदी काढून टाकल्याने गडकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या. त्यामुळे सारे गडकरी संतप्त झाले व त्यांनी १८४४-४५ या काळात इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. इंग्रज सरकारने या बंडाचा पूर्णपणे मोड केला. कोल्हापूरला इंग्रज पोलिटिकल सुपरिटेंडेंटची नेमणूक केली. त्याचा असा समज झाला की, विधवा राणीनेच हे बंडवाल्यांना फूस दिली होती. म्हणून तिला नेमणूक देऊन पुण्यास कायमच्या रहिवासास पाठविले. कंपनी सरकारची सत्ता झुगारुन देण्याचा आरोपही त्या राणीवर ठेवला. ती पुण्याला नजर कैदेतच होती. तिचा दरबारी सहायक दिनकरराव गायकवाड होता. असेही इंग्रजांना समजले व त्यालाही अशीर गडावर नजरकैदेत ठेवले. तेथेच तो निधन पावला.
बुवा साहेबांचे ज्येष्ठ पुत्र तिसरे शिवाजी उर्फ बाबासाहेब यांचा जन्म १६ डिसेंबर १८३० रोजी झाला होता व कनिष्ठ पुत्र शाहू उर्फ चिमासाहेब यांचा जन्म ८ जानेवारी १८३१ रोजी झाला होता. म्हणजे बुवासाहेबांच्या निधन समयी या दोन्ही पुत्रांचे वय सुमारे ८/९ वर्षांचे होते. २८ फेब्रुवारी १८३९ रोजी इंग्रज सरकारकडून बाबासाहेबांचे राज्यारोहण इंग्रज सरकारने जरी मान्य केले, तरी कोल्हापूर संस्थानचा कारभार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या इंग्रज पोलिटिकल एजंटच्याकडेच ठेवला गेला. जनतेला हे पसंत पडले नाही. तिच्या मनात इंग्रजांविषयी कटुता घर करुन बसली. इंग्रज सरकारच्या तंत्राने कारभार चालविणे, म्हणजे त्याचे आधिपत्य मानणेच होय. त्यामुळेच कोल्हापूर संस्थानातील गडकऱ्यांचा उठाव झाला. तो इंग्रज सरकारने सैनिक कारवाई करुन दडपून टाकला. तरी अंतर्गत आग धुमसतच होती. अशीच बारा वर्षे उलटून गेली. बाबासाहेब वयात आले. तरीही इंग्रज सरकारने त्यांच्या हाती त्यांच्या संस्थानाचा कारभार सोपविला नाही. बाबासाहेब स्वभावाने नेमस्त वृत्तीचे होते. पण चिमासाहेब मात्र जहाल होते.

सन १८५७ साली उत्तरेत इंग्रजांविरुद्ध एतद्देशीय राजे-रजवाडे व संस्थानिक तसेच सर्व सामान्य जनता आणि इंग्रजांच्या पलटणीतील भारतीय सैनिक यांनी मिळून व्यापक उठाव केला. त्याचे सूत्रधार विठूरचे नानासाहेब पेशवे होते. त्यांनी भारतातील सर्व राजेरजवाड्यांना उठाव करण्याविषयी पत्रे दिली. तसेच एक पत्र कोल्हापूरच्या राजालाही आले. पण त्याच्या हातात सत्ताच नव्हती व त्याचा स्वभाव नरम होता. परंतु चिमासाहेबाने ते पत्र वाचून काय करायचे ते मनोमन ठरविले. ते पत्र असे होते.
“कोल्हापूरच्या छावणीतील शिपायांनी बंड केले. त्यावेळी तुम्ही काहीही केले नाही. पण आता दुसरा उठाव होण्यासाठी तुम्ही काहीतरी केले पाहिजे. तुम्ही थोर आहांत याची जाणीव ठेवावी. इकडे आम्ही तळहातावर शिर घेऊन सज्ज आहोत. शिंदे सरकारची काही फौज आम्हाला सामील झाली आहे. परमेश्वर आम्हाला साह्य करील. आपण ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. इंग्रजांच्या बाजूला असत्य आहे. त्यांचा हेतु चांगला नाही. हे पत्र महाराजांच्या हाती द्यावे. तसे जे करणार नाहीत व पत्र लपवून ठेवतील, त्यांना गाई ब्राम्हणांची शपथ आहे.”तसेच ग्वाल्हेरहून ज्योतिराव उर्फ भाऊसाहेब घाटगे याला कोल्हापूरच्या राजाला उठावासाठी तयार करण्यासाठी पाठविण्यात आले. त्याने धाकटे राजे चिमासाहेब यांना ग्वाल्हेरहून आणलेली चांदीची मूठ आणि मौल्यवान पाते असलेली एक तलवार भेट दिली. तीवर नक्षीदार अक्षरात लेख कोरलेला होता. या घाटग्यानेच वरील पत्र आणणाऱ्या इसमाची भेट चिमासाहेबाशी घालून दिली होती. हे दोन्ही इसम पुण्याहून कोल्हापूरला आले होते. घाटगे याने तेथे नजरकैदेत असलेल्या सईबाई साहेबांची भेट घेतली व नंतरच तो आला होता.
बळवंतराव नाईक निंबाळकर हा सरदार सत्तावीसाव्या पलटणीत सारखी ये-जा करीत होता. त्याने पलटणीस उठाव करण्यास तयार केले. तो उठावाच्या आधीच ग्वाल्हेरला निघून गेला होता. त्याचे हे कृत्य उठावानंतर कॅ-jट अॅबटला समजले व त्याने बळवंतरावाची नेज व बुडावर ही दोन इनामी गावे जप्त केली. धाकटे राजे चिमासाहेब यांच्याकडूनही मोजक्या माणसांची ये-जा या पलटणीकडे गुप्तपणे सुरू झाली. मुंबईहून प्रसिद्ध होणारी ‘वर्तमान दीपिका’ व ‘वृत्तसार’ ही दोन मराठी वर्तमानपत्रे उत्तरेकडील उठवाच्या बातम्या आपल्या पत्रांतून देऊ लागली. त्याचा परिणामही या सैनिकांना उठावास उद्युक्त करण्यासाठी झाला.

[irp]

३१ जुलै १८५७ च्या रात्री ‘मारो फिरंगी को अशा आरोळ्या ठोकीत सत्तावीसाव्या पलटणीतील २०० शिपायांनी इंग्रज सेनाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर हल्ला केला. असे होईल. याची कुणकुण इंग्रजांना आधीच लागली होती. म्हणून ते आधीच रेसिडन्सीत निघून गेले होते. तेव्हा त्या सैनिकांचा नेता रामजी शिरसाट याने इंग्रजांचा खजिना लुटण्यास सैनिकांना सांगितले. सैनिकांनी खजिना लुटला. दारूगोळा हस्तगत केला. आणि छावणीचा बाजारही लुटला. ते क्रांतीवीर नंतर कोल्हापूर शहराकडे गेले. तेव्हा त्यांना शहराचे दरवाजे बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी नंतर ‘पागा’ या स्थानी आपला तळ दिला. सकाळी ते सारे राजाच्या भेटीसाठी दरवाजाजवळ आले. पण राजाने दरवाजा उघडण्यास मनाई केली. सकाळी कर्नल मोम याने सैनिकांनिशी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्याला माघार घ्यावी लागली. रामजी शिरसाट सर्व सैनिकांसह सावंतवाडीकडे निघून गेला. सत्तावीसाव्या पलटणीतील काही सैनिकांना क.मोग्रॅमने पकडले. त्यापैकी आठ जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. दोघांना फासावर चढविले. ५१ सैनिकांना गोळ्या घालून ठार केले. रामजी शिरसाट हा पावशी गावात आहे, असे समजताच इंग्रज सैनिक त्या गावी आले. त्यांची चाहूल लागताच शिरसाट जंगलात पळाला. सैनिकही त्याच्यामागे धावले. त्यांच्या गोळीबारात रामजी ठार झाला.
या उठावाचा सुत्रधार कोण याचा छडा क. ग्रँट अॅबटने लावला. तेव्हा २८ व्या तुकडीतील गोविंद दळवी या सैनिकाने घाबरून जाऊन खरे काय ते अॅबटला सांगितले. ‘रामजी शिरसाट, इमामखान आदि सत्तावीसाव्या पलटणीतील नेते सुभेदार दाऊद बेग याच्या घरी जमत होते. त्यावेळी एक मराठा गडी पांढऱ्या घोड्यावर बसून शहरातून त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून शहराचे वारंवार जात-येत होता. त्याने धाकट्या राजाची संमती व मदत आपल्या कार्यासाठी मिळेल, असे आश्वासन त्या बंडखोरांना दिले होते त्यानंतर इंग्रज सरकारने कर्नल ग्रँट जेकब याची नेमणूक कोल्हापूरला स्पेशल कमिशनर म्हणून केली. गोविंद दळवीकडून जे समजले. त्यावरून ग्रँट अॅबटच्या मनात या उठावामागे धाकटे राजे चिमासाहेब यांचा हात असावा, अशा दाट संशय निर्माण झाला. पण ठोस पुराव्या अभावी तो काहीच करू शकत नव्हता. कारण चिमासाहेब हा कोल्हापूरच्या जनतेत अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्यावर नुसत्या संशयावरून कारवाई केली, तर जनतेच्या असंतोषाचा भडका उडेल व त्याला तोंड देणे आपणांस अशक्य होईल हे अॅबट जाणून होता.

अॅबटनेच चिमासाहेबाबद्दल लिहिले आहे – “धाकटा राजा चिमासाहेब मोठा धीराचा माणूस. धिप्पाड शरीरयष्टीचा व उत्साही जनतेचा लाडका असून शिवाजीचा खरा वंशज शोभतो.”

[irp]

चिमासाहेबाने क्रांतिवीरांना आपल्या दूताकरवी आश्वासन दिले होते. पण इंग्रजांना साह्य करणाऱ्या आपल्या थोरल्या भावाविरूद्ध बंड करण्यास तो धजत नव्हता. त्यामुळेच चिमासाहेब उघडपणे बंडखोरांना साह्य देऊ शकत नव्हता. पण गुप्तपणे त्याने आपला पाठिंबा व मदत त्यांना दिली. क्रांतिकारकांनी राजाचा कारभारी,’ अप्पा फडणीस, तात्या मोहिते हा राजाचा खाजगी सेवक यांना आपल्याकडे वळवून घेतले. पन्हाळ्याचे गडकरीही त्यांना येऊन मिळाले ४ ऑक्टोबर १८५७ रोजी या ५०० क्रांतिकारकांनी रात्रीच्या वेळी कोल्हापूर शहरावर हल्ला केला. किल्ला व त्याचे दरवाजे भक्कम होते. कॅ. ग्रँड अॅबट त्याचे रक्षण करीत होता. क्रांतिकारकांनी किल्ल्याच्या तीन बाजूंनी लुटूपुटूची लढाई चालू ठेवून अॅबटला व त्याच्या सैन्याला गुंतवून ठेवले. काही क्रांतिकारकांनी किल्ल्याच्या चौथ्या बाजूच्या तटाला शिड्या लावून किल्ल्यात उड्या टाकल्याराजवाडा ताब्यात घेतला. सर्व दरवाजांवर चौक्या बसविल्या. किल्ला क्रांतिकारकांच्या हाती गेल्याचे समजताच ले-होल बर्टनच्या तुकडीने एका दरवाजावर हल्ला चढविला. तोफ गोळ्यांनी तो उडविला. इंग्रज सैन्य आत शिरू लागताच क्रांतिकारकांनी तुफान गोळीबार सुरु केला. कॅ. थाम्पसन घोड्यासह खंदकात पडला. अनेक इंग्रज सैनिक या धामधुमीत कामाला आले. परंतु आणखी कुमक आल्याने क्रांतिकारक सैरावैरा पळू लागले. इंग्रजांनी आपल्या तोफा आत आणून किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

कॅ. शेनिडरने राजांची भेट घेतली व राजाने क्रांतिकारकांना आपापली शस्त्रे खाली ठेवण्याचा हुकूम सोडला. ५ डिसेंबर १८५७ रोजी ते राजाला शरण आले. या उठावामागे धाकटे राजे चिमासाहेब यांची फूस होती, हे अॅबट जाणून होता. पण नुसत्या संशयावरुन चिमासाहेबाला पकडले, तर राजा नाराज होईल व कोल्हापूरची जनताही बंड करुन उठेल, हे तो जाणून होता. म्हणून अॅबटने वेगळाच मार्ग पत्करला. चिमासाहेबाला गुप्तपणे ताब्यात घेऊन राजाला न समजू देता. दूरच्या ठिकाणी नजरकैदेत ठेवावे, असे त्याने मुंबईच्या गर्व्हनरला कळविले. गव्हर्नरने संमती दिली.

[irp]

अॅबटने चिमासाहेबाला भेटीस आपल्या रेसिडेन्सीत बोलावले. तेव्हा तो चिमासाहेबाला म्हणाला, “तुम्हाला या बंडाचे गुप्त नेते काही लोक समजतात. यावर तुमचे काय मत आहे ?”त्यावर चिमासाहेब ताडकन म्हणाले, “मला यातले काहीच माहीत नाही व यात माझा काहीही संबंध नाही”ही बातमी कोल्हापूरात वाऱ्या सारखी पसरली व सारे लोक रस्त्यावर आले. चिमासाहेब राजवाड्याकडे निघाले. तेव्हा रस्त्यात दुतर्फी जमलेल्या जनसमुदायाने त्यांचा जयजयकार केला. काही ठिकाणी सुवासिनींनी त्यांना ओवाळले. यावरुन अॅबटची खात्री झाली की, चिमासाहेब जनतेचा लाडका व बंडखोरांचा पाठिराखा होता. त्याने चिमासाहेबांना कोल्हापूरमधून दूरवर नेऊन ठेवण्याची योजना आखली.

मे १८५८ च्या सुरवातीस वाघोटणे बंदरात अरबी समुद्रात एक जहात अॅबटने नांगरुन ठेवले. कोल्हापूरच्या जनतेचा ते कळूच दिले नाही. सरकारी परवान्याशिवाय कोणालाही शहराबाहेर जाऊ द्यायचे नाही, असा कडेकोट बंदोबस्त केला. राजालाही त्याची कुणकुण लागू दिली नाही. नंतर रात्री चिमासाहेबांना पोलिटिकल सुपरिटेंडेंटने रेसिडेन्सीत बोलावून घेतले. त्यांना गव्हर्नरचा आदेश वाचून दाखविला आणि लगेच त्यांना अटकेत ठेवले. नंतर त्याचे १६ नोकर रेडिडेन्सीत आणले गेले. चिमासाहेबांसह त्या सर्वांची रवानगी रातोरात वाघोटणे बंदरी करण्यात आली. बोट मुंबईकडे निघाली व तेथून कराचीला गेली. सिंध प्रांताच्या कमिशनरला यासंबंधी आधीच कळविले होते, त्याने चिमासाहेबांना त्यांच्या नोकरांसह ताब्यात घेतले आणि कराची येथे नजरकैदेत ठेवले. त्यांचा खर्च कोल्हापूरच्या तिजोरीतून होत होता. अशा रीतीने कपटी इंग्रजांनी या अत्यंत स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय राजपुत्राला कुजत ठेवले. अखेरीस अकरा वर्षांनंतर दि. १५ मे १८६९ रोजी या राजपुत्राने कराची येथे निधन झाले. त्याचा कारभारी अण्णा चिटणीस आणि खाजगी सेवक तात्या मोहितेलाही जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!